HomeFilmsHindi

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : नोव्हेंबर 14, 2023 | 5:59 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. आज सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट या लेखात आपण बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला कळवा.

Hindi movie release in Sept 2022 list, Hindi movie reviews and information
१. फ्रायडे नाईट प्लॅन
२०२३. विनोदी, नाटक. १ तास ४९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक वत्सल नीलकंठन
दिग्दर्शकवत्सल नीलकंठन
तारांकितबाबिल खान , अमृत जयन , आध्या आनंद, रिया चौधरी , मेधा राणा , आदित्य जैन, निनाद कामत , जूही चावला
निर्माताफरहान अख्तर
प्रदर्शित तारीख१ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

फ्रायडे नाईट प्लॅन” चित्रपट समीक्षा :-

नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेला फ्रायडे नाइट प्लॅन हा चित्रपट म्हणजे दोन भावांची गोष्ट आहे. फरहान अख्तर याची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन वत्सल नीलकंठन यांनी केलं आहे.
दोन वयात आलेल्या भावांचं नातं कसं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. खूप कमी जणांच्या बाबतीत ते मैत्रीपूर्ण असतं. असंच काहीसं नातं चित्रपटातील सिद्धार्थ आणि आदी या दोन भावांचं आहे. मोठा भाऊ सिद्धार्थची भुमिका बबिल खान तर धाकट्या आदीची भुमिका अमृत जयन याने साकारली आहे.
सिद्धार्थ हा स्वतःतच रमणारा, शांत स्वभावाचा कुठेतरी स्वतःला कमी समजणारा मुलगा असतो तर आदी त्याच्या उलट. मस्तीखोर, सगळ्यांमध्ये मिक्स होणारा. परंतु दोघांचं एकमेकांसोबत अजिबात पटत नसतं तर चित्रपटाची कथा याच दोन भावांच्या नात्यावर आधारित आहे. त्यांची आई म्हणजे जुही चावला कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर दोघांना जेव्हा घरी रहायची वेळ येते तेव्हा काय होतं हे या चित्रपटात पहायला मिळतं.
मित्रांसोबत पार्टी करण्याच्या नादात दोघांकडून अशी काहीतरी चुक होते की त्यांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. ही कथा फक्त एका रात्रीत घडणारी आहे. तर असं नेमकं काय घडतं ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
बबिल खान तर आपल्या वडिलांसारखाच अभिनयाच्या बाबतीत कमाल आहे, त्याचसोबत या चित्रपटात अमृत झयन याने सुद्धा आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. दिग्दर्शन उत्तम आहे. चित्रपट मधे मधे थोडा संथ वाटतो पण शेवटपर्यंत बघायला भाग पाडतो. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


२. मिस्ट्री ऑफ द टॅटू
२०२३. सस्पेन्स, रोमांचक. १ तास ५६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक कलाइरसी साथप्पन
दिग्दर्शककलाइरसी साथप्पन आणि गणेश महादेवन
तारांकितअर्जुन रामपाल , अमीषा पटेल , डेजी शाह, रोहित राज , मनोज जोशी
निर्माताकशिश खान
प्रदर्शित तारीख१ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.१⭐/ ५

मिस्ट्री ऑफ द टॅटू” चित्रपट समीक्षा :-

काही चित्रपट असे असतात की ते बघितल्यावर हा चित्रपट आपण का बघितला असा प्रश्न पडण्याऐवजी हा चित्रपट मुळात बनवलाच का असा प्रश्न पडतो. जर तुम्ही ‘मिस्ट्री ऑफ द टॅटू’ हा चित्रपट बघण्याचा विचार करत असाल तर कदाचित तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडू शकतो.
अमिषा पटेल आणि अर्जुन रामपाल यांनी या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केले आहे. अमिषा पटेल हीने जगप्रसिद्ध चित्रकार चित्रा देवी ही भूमिका साकारली आहे आणि वीस वर्षांपूर्वी तिचा खुन झालेला असतो. तो कोणी केलाय ही मिस्ट्री असते आणि ती खुन्याच्या हातावर असलेल्या टॅटूशी निगडित आहे.
अभिनेत्री डेझी शाह हीने आत्मिका ही भूमिका साकारली असून ती चित्रकला शिकत आहे. परंतु ती एका खुनाच्या केसमध्ये अडकते. खरं तर नंतर तिच्यावर सुद्धा हल्ला होतो. या सगळ्या खुनांचा आणि एकंदर प्रकाराचा संबंध असतो मारेकऱ्याच्या हातावर असलेल्या टॅटूशी. आता तो काय आहे हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु तुम्हाला ते कळेल की नाही ही खात्री देता येत नाही. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


३. लव्ह ऑल
२०२३. खेळ, नाटक. २ तास १२ मिनिटे. [ यु ]
लेखक सुधांशू शर्मा
दिग्दर्शकसुधांशू शर्मा
तारांकितके के मेनन , स्वस्तिक मुखर्जी , श्रीस्वरा, अतुल श्रीवास्तव , सत्यकाम आनंद, राजा बुंदेला
निर्मातासुधांशू शर्मा, पुलेला गोपीचंद
प्रदर्शित तारीख१ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

लव्ह ऑल” चित्रपट समीक्षा :-

के के मेनन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो स्पेशल ऑप्स या सिरिजमधील हिम्मतसिंग. अजुनही त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे. तब्बल चार वर्षांनी के के मेनन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आला आहे.
बॅडमिंटन या खेळाचं प्रचंड वेड असलेला सिद्धार्थ शर्मा म्हणजेच के के मेनन आणि त्याचा मुलगा आदित्य शर्मा या बापलेकाची ही गोष्ट आहे. काही कारणांमुळे सिद्धार्थ शर्मा याला बॅडमिंटन खेळापासून दूर राहावं लागतं. राजकारणी नेते, सरकारी यंत्रणांकडून केली जाणारी उपेक्षा, दुर्लक्ष या सगळ्यामुळे आता त्याच्या मनखत या खेळाविषयी प्रचंड चिड निर्माण झालेली असते आणि म्हणूनच तो आपल्या मुलाला या खेळापासून जमेल तेवढा दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
परंतु नियती असं काही घडवून आणते की ज्या शहरात सिद्धार्थची स्वप्न धुळीस मिळालेली असतात त्याला परत तिथेच यावं लागतं. बऱ्याच गोष्टी घडतात की तो आपल्या मुलाला प्रोत्साहन तर देतोच पण शिकवतो सुद्धा. तर असं नक्की काय घडतं ते बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. वडील आणि मुलगा यांचं सुंदर भावविश्व बघायला मिळतं. सगळ्यांनीच अभिनय उत्तम केला आहे. पुर्वार्ध थोडा संथ वाटतो परंतु उत्तरार्धात कथा पकड घेते आणि क्लायमॅक्स तर छानच आहे. जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


४. जवान
२०२३. ॲक्शन, नाटक. २ तास ४५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक ॲटली कुमार, एस. रमणगिरीवासन
दिग्दर्शकॲटली कुमार
तारांकितशाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर, गिरीजा ओक, लेहर खान, संगीता भट्टाचार्य, संजय दत्त
निर्मातागौरी खान, गौरव वर्मा
प्रदर्शित तारीख७ सेप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८⭐/ ५

जवान” चित्रपट समीक्षा :-

बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट अजुनही बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवत आहे. एटलीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवीन इतिहास रचला आहे. पठाण नंतर पुन्हा एकदा शाहरुख ने त्याचा करिष्मा दाखवला आहे.
चित्रपटाची कथा नवीन नाही. सैन्यदलात आपल्या सैनिकांना निकृष्ट दर्जाची शस्त्रे किंवा निकृष्ट सेफ्टी जॅकेट पुरवली गेल्यावर सैनिकांचा मृत्यू होतो आणि मग कोणीतरी त्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतो ही कथा आजपर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये आपण पाहीलेली आहे. हीच अशीच कथा आहे या चित्रपटात.
विक्रम राठोड हा निकृष्ट दर्जाची शस्त्रे पुरवणाऱ्या कालीच्या विरोधात उभा राहतो. त्यामुळे अर्थातच विक्रमला आपला जीव गमवावा लागतो. मग पुढे जाऊन त्याच्याच सारखा दिसणारा त्याचा मुलगा आझाद या सगळ्याचा बदला घेतो अशी मुख्य कथा असलेल्या या चित्रपटात अजुन बरेच मुद्दे मांडले गेले आहेत. भ्रष्टाचार, भ्रष्ट झालेली सरकारी यंत्रणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा बऱ्याच गोष्टींवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा नवीन नाही , हे सगळं आधी कोणत्या ना कोणत्या चित्रपटात बघितलं आहे असं वाटतं. परंतु शाहरूख खान आणि दिग्दर्शक एटली यांच्यामुळे चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


५. हड्डी
२०२३. नाटक, रोमांचक. २ तास १४ मिनिटे. [ ए ]
लेखक अदम्य भल्ला, अक्षत शर्मा
दिग्दर्शकअक्षत अजय शर्मा
तारांकितनवाजुद्दीन सिद्दीकी , अनुराग कश्यप, मोहम्मद झीशान अयूब , इला अरुण , सौरभ सचदेवा , विपिन शर्मा
निर्माताझी स्टूडियोज, संजय सहा , राधिका नंदा
प्रदर्शित तारीख७ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

हड्डी” चित्रपट समीक्षा :-

तुम्हाला जर रक्तरंजित, रक्ताचे पाट वाहणारी दृश्य असणारे, डास मारतात तसे माणसांचे मुडदे च्या मुडदे पडत आहेत अशा दृश्यांचा भरणा असणारा चित्रपट बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही हड्डी हा चित्रपट पाहू शकता.
झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला हड्डी या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप हे मुख्य भुमिका साकारत आहेत. तृतीयपंथी लोकांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, समाजाकडून केली जाणारी त्यांची अवहेलना या सगळ्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असला तरी ही एक सुडाची, बदल्याची कथा आहे.
हरी हा जन्मतः पुरूष म्हणून जन्माला आला असला तरी त्याला मुली सारखं राहायला आवडत असतं. मग याच हरीची हरिका होते अर्थात ही भुमिका नवाजुद्दीन याने लीलया पार पाडली आहे. अनुराग कश्यप याने प्रमोद अहलावत ही भूमिका साकारली आहे. तो एक स्वार्थी राजकारणी असून मेलेल्या माणसांच्या हाडांची तस्करी करण्याघा तो धंदा करत असतो. आपला बदला पुर्ण करण्यासाठी हड्डी म्हणजेच नवाजुद्दीन कसा प्रमोदच्या धंद्यात सामील होतो, आणि रक्ताचे पाट कसे वाहतात हे या चित्रपटात पहायला मिळतं.
नवाजुद्दीन सिद्दिकी, मोहम्मद झीशान आयुब, इला अरुण या सगळ्यांचा अभिनय उत्तम झाला आहे तरी चित्रपट म्हणावा इतका खास नाही. मुळात इतके खुन आणि अति रक्तरंजित दृश्य बघून उबग येतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


६. जाने जां
२०२३. रहस्य, रोमांचक. २ तास १९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक सुजॉय घोष और राज वसंत
दिग्दर्शकसुजॉय घोष
तारांकितजयदीप अहलावत , करीना कपूर खान, विजय वर्मा , सौरभ सचदेवा , नायशा खन्ना, करमा टकामा , लिन लैशराम
निर्माताजय शेवकरमानी , अक्षय पुरी , एकता कपूर
प्रदर्शित तारीख२१ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

जाने जां” चित्रपट समीक्षा :-

काही चित्रपट असे असतात की कथा, पटकथा, सिनेमॅटोग्राफी या सगळ्यापेक्षाही ते कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध होतात आणि निव्वळ त्यांच्या अभिनयाच्या जोरावर ते चालतात. नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेला जाने जां हा चित्रपट सुद्धा असाच आहे.
करीना कपूर हीने या चित्रपटाद्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण केले आहे. सोबतच जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांचा तगडा अभिनय आहे. ही एक मर्डर मिस्ट्री असलेला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.
माया डिसुझा ही आपल्या मुलीसोबत कॅलिपॉंग या शहरात राहत असते. आपल्या दारूड्या नवऱ्याला सोडून ती या शहरात आलेली असते. ती घर चालवण्यासाठी टिफीन नावाचं हॉटेल चालवत असून तिचा शेजारी नरेन म्हणजेच जयदीप अहलावत हा तिचा हॉटेलचा नियमित ग्राहक असतो. सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक तिचा नवरा अजित म्हात्रे हा तिच्या आयुष्यात परत येतो. आणि एके दिवशी मायाच्या घरी अजित आलेला असतो तेव्हा मुलगी तारा हिच्या हातून अजितचा खून होतो. ही गोष्ट शेजारी असलेल्या नरेनला कळते.
नेमकं तेव्हाच अजितच्या शोधात पोलिस अधिकारी करण म्हणजेच विजय वर्मा हा मुंबई वरून कॅलिपॉंग इथे आलेला असतो. तो नेमका नरेनचा वर्गमित्र असतो. आता अजितचा खुन झालाय हे करणला कळतं का.? आणि तो कोणी केलाय हे तो शोधून काढतो का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा ही एका जापानी रहस्यकथेवर आधारित आहे. दिग्दर्शक सुजॉय घोष यांचा कहाणी हा चित्रपट ज्यांनी पाहीलाय त्यांचा थोडा अपेक्षाभंग होऊ शकतो परंतु करीना, विजय वर्मा आणि खास करून जयदीप यांचा दर्जेदार अभिनय बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही जरूर बघावा. करीना हीने साकारलेली एक आई अतिशय प्रभावी वाटते. स्वतःच्या आयुष्यात जे झालं ते आपल्या मुलीसोबत घडायला नको म्हणून धडपडणारी एक आई करीनाने उत्तम साकारली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


७. द ग्रेट इंडियन फॅमिली
२०२३. नाटक. २ तास ३२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक विजय कृष्ण आचार्य
दिग्दर्शकविजय कृष्ण आचार्य
तारांकितविक्की कौशल, मानुषी छिल्लर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, यशपाल शर्मा, सादिया सिद्दीकी, अलका अमीन, सृष्टि दीक्षित, वेदांत सिन्हा
निर्माताआदित्य चोपडा
प्रदर्शित तारीख२१ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

द ग्रेट इंडियन फॅमिली” चित्रपट समीक्षा :-

भारत हा देश सगळ्याच बाबतीत विविधतेने नटलेला देश आहे. अनेक जाती, धर्म, प्रांत अनेक भाषा सर्व एकत्र सुखाने नांदत आहे. परंतु अजुनही आपल्याकडे जातीपातीच्या भिंती माणुसकीच्या आड येताना दिसतात. याच भिंती तोडण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे चित्रपट “द ग्रेट इंडियन फॅमिली”.
आदित्य चोपडा निर्मित आणि विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बऱ्याच संवेदनशील विषयांना स्पर्श करून जातो. बलरामपुर नावाच्या एका गावातील ही गोष्ट आहे. एका पंडीत कुटुंबातील वेद व्यास त्रिपाठी हा भजन गाण्यासाठी लोकप्रिय असतो. म्हणुनच तो भजन कुमार या नावाने प्रसिद्ध असतो. जागरण, भजन अशा कार्यक्रमांना भजन कुमार चं भजन म्हणजे ठरलेला कार्यक्रम. त्याचे वडील, काका, आत्या सगळेच कर्मठ ब्राम्हण. परंतु अचानक या कुटुंबाच्या ब्राह्मण असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आता ते का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. याच प्रश्नावर उत्तर देताना भजन कुमार हिंदू मुस्लिम यात नक्की फरक काय हा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारतो. तेव्हाचा तो संवाद ऐकण्यासारखा आहे.
विकी कौशल याने उत्तम अभिनय केला आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी आधीच्या चित्रपटांच्या मानाने चांगलं दिग्दर्शन केले आहे. भव्यदिव्य सेट नाही, इफेक्ट नाही तरीही चित्रपट परिणाम साधतो. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.

८. सुखी
२०२३. नाटक. २ तास १९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक राधिका आनंद, पॉलोमी दत्ता, रूपिंदर इंद्रजीत
दिग्दर्शकसोनल जोशी
तारांकितशिल्पा शेट्टी, चैतन्य चौधरी, अमित साध, दिलनाज ईरानी, कुशा कपिला, पवलीन गुजराल, किरण कुमार
निर्माताभूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा और शिखा शर्मा
प्रदर्शित तारीख२२ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.२⭐/ ५

सुखी” चित्रपट समीक्षा :-

एखाद्या चित्रपटाची रेसिपी चांगली होण्यासाठी फक्त मोठे कलाकार असणं पुरेसं नाही तर त्या कलाकारांचा अभिनय, उत्तम दिग्दर्शन, कथा पटकथा, संवाद,गाणी, सिनेमॅटोग्राफी सगळंच चांगलं असणं गरजेचं आहे परंतु या सगळ्याचीच कमतरता जाणवते ती “सुखी” या चित्रपटात.
शिल्पा शेट्टी हिची मुख्य भूमिका असलेला सुखी हा चित्रपट महिलांचं भावविश्व उलगडून सांगणारा आहे असं म्हणू शकतो परंतु ते दाखवण्यात सुखी कुठेतरी कमी पडला. सोनल जोशी यांचं दिग्दर्शन अजुन चांगल्या प्रकारे होऊ शकलं असतं, स्वतः एक स्त्री असून स्त्री च्या भावनांचे पदर उलगडून दाखवताना, बारकावे समजून घेण्यास त्या कमी पडल्या असं म्हणायला हरकत नाही.
आपला नवरा, मुलं घर संसार यात अडकलेल्या स्त्रीयांना स्वतः साठी असा वेळ मिळतच नाही. स्वतःसाठी जगायचं राहुन गेलेलं असतं. त्यामुळेच त्यांना थोडा ब्रेक हवा असतो. अशाच ब्रेकची गरज चित्रपटाची नायिका सुखी हिला आहे म्हणून तिला तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींना भेटायला दिल्ली ला जायचे आहे. परंतु तिच्या नवऱ्याचा सो कॉल्ड इगो दुखावला जातो. त्यामुळे आता तो तिला जाऊ देतो की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु तुमच्याकडे बराच वेळ रिकामी आहे तरच हा चित्रपट तुम्ही बघा.
शिल्पा शेट्टी हिचा अभिनय कुठे आहे हे शोधावं लागतं. बाकी सहकलाकारांचा अभिनय सुद्धा बरा आहे. एकंदरच चित्रपट का काढला असा प्रश्न पडतो. तर असो, या चित्रपटाला माझ्याकडून एक स्टार.


९. द पूर्वांचल फाईल्स
२०२३. ॲक्शन, नाटक. २ तास २२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक राजेंद्र त्रिपाठी
दिग्दर्शकस्वरूप घोष
तारांकितआर सिद्धार्थ, शिवानी, जरीना वहाब, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, हेमंत पांडेय
निर्माताराज वसोया, मनाली वसोया
प्रदर्शित तारीख२२ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

“द पूर्वांचल फाईल्स” चित्रपट समीक्षा :-

दाक्षिणात्य अभिनेता आर. सिद्धार्थ याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत पुर्वांचल फाईल्स या चित्रपटात हिरोची भुमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा तशी जुनीच. नव्वदच्या दशकातील कथा असायच्या तसा या चित्रपटाचा बाज आहे.
गाझीपूर मध्ये फोफावलेला भ्रष्टाचार आणि गुंडगिरी संपवायला डीएसपी रितेश पांडे या गावात दाखल झालेला आहे. अर्थात ही भूमिका आर सिद्धार्थ याने केली आहे. या गावातील आमदार अभिसार राणा हा अतिशय उन्मत्त गुंड प्रवृत्तीचा राजकारणी आहे. याच्या अत्याचारांचा समाचार घेता घेता रितेश याला आपल्या वडिलांच्या खुनाबद्दल एक रहस्य समजत व तो त्या खुनाचा बदला घेतो.
आता ते रहस्य काय.? अभिसार विरोधात रितेश लढू शकतो का याची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच मिळतील. अर्थात साधी सरळ कथा पटकथा आहे. थोडा दाक्षिणात्य टच असलेल्या या चित्रपटाला माझ्याकडून अडीच स्टार.


१०. द वॅक्सिन वॉर
२०२३. नाटक, रोमांचक. २ तास ४१ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक विवेक अग्निहोत्री
दिग्दर्शकविवेक अग्निहोत्री
तारांकितनाना पाटेकर , पल्लवी जोशी , रायमा सेन, निवेदिता भट्टाचार्य , सप्तमी गौड़ा, गिरिजा ओक
निर्मातापल्लवी जोशी और अभिषेक अग्रवाल
प्रदर्शित तारीख२२ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

द वॅक्सिन वॉर” चित्रपट समीक्षा :-

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) चे माजी महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी लिहिलेल्या “गोईंग व्हायरल” या पुस्तकावर आधारित हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. यापुर्वी विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स हा चित्रपट बराच गाजला होता. परंतु हा चित्रपट तेवढ्या तोडीचा झालेला नाही.
कोरोनाने जेव्हा अख्ख्या जगाला वेठीस धरले होते. संपूर्ण जगाने ज्या व्हायरस ची धास्ती घेतली होती तेव्हा त्यावरची लस शोधून काढण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक, डॉक्टर्स दिवसरात्र काम करत होते. तेव्हा आपल्या भारतातील सुद्धा काही महिला वैज्ञानिक, डॉक्टर ही लस बनवण्यासाठी झकत होते. त्यांच्याच शोधाचा हा प्रवास म्हणजेच हा चित्रपट.
सर्वाधिक लस निर्मिती झाली ती म्हणजे भारतात परंतु त्यांच्यामागे असलेल्या त्या डॉक्टर ची, महीला वैज्ञानिकांची पाहिजे तेवढी दखल घेतली गेली नाही. तीच खंत व्यक्त करणारा हा चित्रपट आहे. महिला सक्षमीकरणा सारख्या मुद्द्यांवर सुद्धा हा चित्रपट भाष्य करतो.
पल्लवी जोशी हीचा अभिनय कौतुकास्पद आहे. नाना पाटेकर यांच्या अभिनयात तोच तोचपणा दिसून येतो. ठिकठाक म्हणावी अशी ही फिचर फिल्म आहे. कोरोनाची लस शोधून काढण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांची मेहनत, जिद्द, त्यांनी केलेली तडजोड या सगळ्यासाठी प्रेरणा म्हणून हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


११. फुकरे ३
२०२३. विनोदी, नाटक. २ तास २५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक विपुल विग
दिग्दर्शकमृगदीप सिंह लांबा
तारांकितपंकज त्रिपाठी, ऋचा चड्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह और अली फजल
निर्माताफरहान अख्तर और रितेश सिधवानी
प्रदर्शित तारीख२८ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

फुकरे ३” चित्रपट समीक्षा :-

२३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला फुकरे ३ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे असं लक्षात येतंय. फुकरे रिटर्न जिथं संपला होता तिथुनच सुरू होणारी गोष्ट म्हणजे फुकरे ३.
भोली पंजाबन हिला निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे आणि त्यासाठी तिला फुकरे टिमची मदत हवीय. चूझा आणि हनी यांची अजुन पुढच्या वर्गात जायची लक्षणं नाहीत. भोली पंजाबन च्या विरोधात निवडणुकीसाठी चुझाला उभं केलं गेलंय. आता कोण जिंकणार, काय होणार ही धमाल बघण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे.
पंकज त्रिपाठी आणि वरूण शर्मा यांनी आपल्या विनोदी अभिनयाने चित्रपट हलकाफुलका केला आहे. परंतु आधीच्या दोन्ही भागांपेक्षा हा थोडासा कमी पडलाय असं जाणवतं. तरीही एकदा खळखळून हसण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१२. द्वंद द इंटरनल कॉन्फ्लिक्ट
२०२३. नाटक. १ तास ५६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक इश्तियाक खान
दिग्दर्शकइश्तियाक खान
तारांकितसंजय मिश्रा, इश्तियाक खान, विक्रम कोचर, विश्वनाथ चटर्जी, इप्शिता चक्रबोर्ती
निर्मातारोहनदिप सिंघ, विकास विशिष्ठ,
प्रदर्शित तारीख२९ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

द्वंद द इंटरनल कॉन्फ्लिक्ट” चित्रपट समीक्षा :-

ग्रामीण भागातील संस्कृती आणि शहरातील आधुनिकीकरण यात नेहमीच एक वादाची लकेर असते. खेड्यापाड्यात काही ठिकाणी अजुनही शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे विचार अजुनही संकुचित असतात. हेच अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.
एका गावात भोला आणि त्याचे मित्र हे अजय देवगण याचा ओमकारा चित्रपट बघून त्यात इतके घुसून जातात की प्रत्येक जण स्वतःला त्यातील एक कॅरेक्टर समजू लाघतो. त्यांच्या याच ॲक्टिंगच्या वेडापायी त्यांना शेक्सपिअर चं ॲथोलो हे नाटक करावस वाटतं. त्यासाठी दिग्दर्शक म्हणून ते गुरूजी म्हणजे संजय मिश्रा यांना शहरातून बोलवून घेतात. परंतु खरी समस्या तेव्हा येते जेव्हा कोणीच महिला कलाकार मिळत नाही.
आता भोलाच्या या गॅंग ला महिला कलाकार भेटते का.? हे बघण्यासाठी हा धमाल चित्रपट तुम्ही नक्कीच बघा. सगळ्यांनी अभिनय उत्तम केला आहे. इंटरवल नंतर चित्रपट जास्त पकड मिळवतो. काही ठिकाणी सीन्स उगीच ॲड केलेत असं वाटत राहतं. बऱ्याच वेळा सामाजिक व्यवस्थेवर, विषमतेवर हा चित्रपट भाष्य करतो. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१३. तुमसे ना हो पाएगा
२०२३. विनोदी, नाटक. २ तास १२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक नितेश तिवारी, निखिल मेहरोत्रा , वरूण अग्रवाल
दिग्दर्शकअभिषेक सिन्हा
तारांकितनितेश तिवारी, निखिल मेहरोत्रा और वरुण अग्रवाल
निर्मातानितेश तिवारी, अश्विनी अय्यर तिवारी, रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर
प्रदर्शित तारीख२९ सप्टेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

तुमसे ना हो पाएगा” चित्रपट समीक्षा :-

या चित्रपटाची कथा वरुण अग्रवाल यांच्या ‘हाऊ आय ब्रेव्हड अनु आंटी अँड को-फाऊंड अ मिलियन डॉलर कंपनी’ या पुस्तकावर आधारित आहे. अभिषेक सिन्हा दिग्दर्शित हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
इश्वाक सिंह म्हणजेच गौरव हा या चित्रपटाचा नायक आहे. इंजिनीअरिंग केलेल्या गौरवला मुळातच कामात रह नसतो त्यात त्याला कामावरून काढून टाकण्यात येतं. मग आता पुढे काय हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर असतोच. त्यातच त्याच्या आईच्या दृष्टीने तो कोणत्याच कामाचा नाही असा शिक्का त्याच्यावर बसलेला असतो. परंतु हाच समज खोडून काढण्यासाठी तो तेथील महिलांना सोबत घेऊन एक नवीन स्टार्ट अप सुरू करतो. जे लोकं घरापासून दूर राहतात त्यांना आईच्या हातचं जेवण मिळावं या संकल्पनेतून तो टिफीन सर्विस सुरू करतो. परंतु या कामात सुद्धा खूप अडथळे येतात. आता पुढे तो काय करतो हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
आपल्या समाजात आजुबाजुला अशी बरीच माणसं असतात ज्यांना इतर काही कामधंदा नसल्यासारखे ते आपल्या मागे लागलेले असतात. आपल्या प्रत्येक कामात त्यांना मधे मधे उगीच काहीतरी करायचं असतं अशाच अनु ऑंटी आहेत ज्यांना दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. चित्रपटाची कथा तशी फार नवीन नाही. मुख्य कलाकार इश्वाक सिंह याचा अभिनय चांगला आहे. परंतु चित्रपट म्हणावा तेवढा परिणामकारक नाही. संगीत, सिनेमॅटोग्राफी म्हणावी इतकी खास नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


१४. गोल्डफिश
२०२३. नाटक. २ तास ३२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक अर्घ्या लहरी, पुशन कृपलानी
दिग्दर्शकपुशन कृपलानी
तारांकितकल्की कोचलीन, दिप्ती नवल
निर्माताअमित सक्सेना
प्रदर्शित तारीख१ सप्टेंबर २०२३
भाषाइंग्लिश
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

गोल्डफिश” चित्रपट समीक्षा :-

ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणारा चित्रपट गोल्डफिश शेवटी १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुशन कृपलानी यांनी केलं आहे.
आई आणि मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. डिमेन्शिया आजाराने त्रस्त असणारी संध्या ही अनामिकाची आई असते. संध्याला आपला देश सोडून दुसऱ्या देशात राहायला गेल्यावर तिची मानसिक स्थिती अजुन बिघडलेली असते. आता सुद्धा ती डिमेन्शिया आजाराने त्रस्त असल्यामुळे तिची मुलगी अनामिका तिच्याकडे काही दिवस राहायला गेल्यावर अशा घटना घडतात की अनामिकाला तिथेच खूप काळासाठी रहावं लागतं. या सगळ्या दिवसांमध्ये त्या दोघींची घुसमट, राग सगळं बाहेर पडतं. भावनांचे अनेक पदर उलगडत जातात. दोघींना आपलं नातं नव्याने गवसतं.
मानसिक स्थिती बिघडलेल्या लोकांना मानसिक आधाराची गरज असते, समजून घेण्याची गरज असते तसंच शारीरिक स्वास्थ्य जसं महत्त्वाचं तसंच मानसिक स्वास्थ सुद्धा महत्वाचं आहे हे सांगणारा हा चित्रपट आहे.
कल्की आणि दिप्ती नवल यांचा अभिनय उत्तम आहे. कथा पटकथा चांगली आहे. संवाद अजुन प्रभावी असू शकले असते. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.

हे पण वाचा :-

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *