HomeFilmsMarathi

सप्टेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा

सप्टेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा | List of Marathi Movies released in September 2024 and Movie Reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : सप्टेंबर 17, 2024 | 10:41 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण सप्टेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

सप्टेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

List of Marathi Movies released in September 2024 & Movie review and information
१. श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन (Shriyut Non Maharashtrian)
२०२४. ॲक्शन, ड्रामा, थ्रिलर. १ तास ४७ मिनिटे. [U/A]
लेखक गौरव उपासनी
दिग्दर्शकअजिंक्य उपासनी
कलाकारगौरव उपासनी, अथर्व देशपांडे, संपदा गायकवाड,वैभव रंधावे, सर्वेश जोशी
निर्माताडॉ. पार्थसारथी, प्रेरणा उपासनी
रिलीज तारीख६ सप्टेंबर २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन” चित्रपट समीक्षा :-

आपल्या देशात त्यातल्या ऊमहाराष्ट्रात चालणारा भ्रष्टाचाराने आता उच्चांक गाठलेला आहे. मोठमोठ्या परीक्षा, पेपरफुटी, नोकरी भरती यात चालणाऱ्या भ्रष्टाचारावर हा चित्रपट आधारित आहे. आपण नेहमी एखादी भरती निघते तेव्हा अगदी मोजक्या जागांसाठी सुद्धा हजारो लाखो तरूण नोंदणी करतात. याचाच फायदा घेऊन किती तरी मोठे स्कॅम होत असतात. या चित्रपटाचा विषय यावरच आधारित आहे हे नक्कीच चांगलं आहे परंतु कथा पटकथा सक्षमपणे मांडण्यात आणि दाखवण्यात लेखक दिग्दर्शक नक्कीच कमी पडले.
जनक सिंह हा कथेचा नायक चांगल्या पगाराची नोकरी करत असतो परंतु आजुबाजुला नोकरीच्या नावाखाली चालणारा स्कॅम त्याच्या लक्षात येतो. जनकची दोन रूपं यात बघायला मिळतात. तो नोकरी सोडून नवीन उद्योग करायचं ठरवतो यासाठी तो समीर रंधवे याला पार्टनर बनवतो. परंतु महाराष्ट्रात उद्योग करणं इतकं सोपं नसतं हे त्यांच्या लक्षात यायला सुरुवात होते. त्यांना कोणामुळे अडचणी येतात, पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. एकीकडे नोकरीचं आमिष दाखवून करोडपती होणाऱ्या ए. के. या गुन्हेगाराला पकडण्यासाठी जनक काय करतो हे ही बघायला मिळतं. जनक आणि त्याची वैयक्तिक दुश्मनी असते का, तो ए.के. ला पकडतो का हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
थ्रिलर प्रकारचा हा चित्रपट आहे. परंतु ॲक्शन सीन्स किंवा कथेतील तो थ्रिलर चा टच तेवढासा प्रभावी झाला नाही. कलाकार सुद्धा नवखे आहेत हे अभिनय बघून कळतं. कथा पटकथा संवाद या सगळ्यातच हा चित्रपट कमी पडतो. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


२. फौजी (Fauji)
२०२४. ॲक्शन, ड्रामा. २ तास मिनिट. [U/A]
लेखक घनशाम विष्णुपंत येडे
दिग्दर्शकघनशाम विष्णुपंत येडे
कलाकारसौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, विवेक चाबुकस्वार, रोहित चव्हाण, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान,
निर्माताघनशाम विष्णुपंत येडे
रिलीज तारीख१३ सप्टेंबर २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

फौजी” चित्रपट समीक्षा :-

घनशाम विष्णुपंत येडे यांनी या चित्रपटाची संपूर्ण धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची कथा पटकथा त्यांचीच आहे, चित्रपटाची निर्मिती करत दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलं आहे. त्यांनी या चित्रपटात अभिनय सुद्धा केला आहे. तसेच सौरभ गोखले बऱ्याच काळानंतर या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करत आहे. मराठी चित्रपटांकडे आधीच प्रेक्षक पाठ फिरवत आहेत त्यात हे असे चित्रपट काढून निर्माते दिग्दर्शक प्रेक्षकांना मराठी चित्रपट न बघण्याची कारणं देत आहेत. देशासाठी लढणारे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून देशासाठी लढत आहेत म्हणून आपण इतके बिनधास्त आयुष्य जगत आहोत हेच या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ज्या प्रकारे ही कथा मांडली गेली आहे त्यात नाविन्य तर नाहीच परंतु इतर बऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवते.
चैतन्य मराठे(सौरभ गोखले) आणि भरत देशमुख(घनशाम येडे) हे दोघे तरूण इंडियन आर्मी चे जवान आहेत. ते दोघंही आपापल्या कुटुंब, नातेवाईक, माणसांना सोडून कसे भारतभूमी साठी लढत आहेत हे दाखवलं आहे. ठरलेली स्टोरी म्हणजे दहशतवाद्यांकडून होणारा हल्ला रोखण्यासाठी चाललेला संघर्ष, युद्ध बघायला मिळतं. चित्रपटात नवीन असं काही नाही. भारतीय जवान दुश्मनाचा जीव घेतच नाही तर प्रसंगी जीव देतात, असे फक्त फौजीच असतात हे सांगणारा हा चित्रपट आहे.
खरं तर चांगल्या कलाकरांची फौज असून सुद्धा दिग्दर्शकाला हा चित्रपट प्रभावी बनवता आलेला नाही. एडिटिंग, पार्श्वसंगीत, कॅमेरा वर्क यात सुद्धा बऱ्याच त्रुटी आहेत. दिग्दर्शकाने अभिनय करण्याचा हट्ट केला नसता तर कदाचित चित्रपट थोडा तरी बरा झाला असता. एकंदर फसलेला चित्रपट आहे. आपल्या जवानांप्रती आदर म्हणून एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या कलाकृतीला दिड स्टार.


३. नवरा माझा नवसाचा २ (Navra Maza Navsacha 2)
२०२४. विनोदी, ड्रामा, परिवार. २ तास २३. [U]
लेखक सचिन पिळगांवकर
दिग्दर्शकसचिन पिळगांवकर
कलाकारसचिन पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, सुप्रिया पिळगांवकर , हेमल इंगळे
निर्मातासचिन पिळगांवकर
रिलीज तारीख२० सप्टेंबर २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

नवरा माझा नवसाचा २ ” चित्रपट समीक्षा :-

सचिन पिळगांवकर यांच्या “अशी ही बनवाबनवी” या चित्रपटाचा ज्याप्रमाणे एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे तसंच “नवरा माझा नवसाचा” या चित्रपटाचा सुद्धा एक चाहता वर्ग आहे. आणि जेव्हापासून या चित्रपटाचा सिक्वेल येणार हे कळलं होतं तेव्हापासूनच प्रेक्षक प्रचंड उत्सुकतेने वाट बघत होते. परंतु दहा टक्के लोकांना हा चित्रपट आवडला असू शकतो तर उरलेल्या प्रेक्षकांची घोर निराशा झालेली आहे असा एकंदर सूर दिसतोय. भरपूर प्रमोशन करून सुद्धा तब्बल १९ वर्षांनी बनवलेला हा सिक्वेल प्रेक्षकांना आवडला नाही याची खरं तर बरीच कारणं आहेत.
यावेळी या चित्रपटात एसटी नाही तर कोकण रेल्वेत ही कथा, ही मज्जा घडताना बघायला मिळते. कथेचा गाभा तोच आहे. चोर आणि प्रवासी यांच्यातील धमाल, नवसाची गंमत जंमत हे सगळं असलं तरी चित्रपट तेवढा प्रभावी झाला नाही. अशोक सराफ यांच्या वाट्याला भूमिका फार कमी आलेली आहे तिथेच सगळं खटकायला सुरुवात होते. स्वप्निल जोशी हा अजून मुंबई पुणे मुंबई किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा यातून बाहेर आलेला नाही. सचिन पिळगांवकर यांनी यावेळी अगदीच सुमार कथा लिहिली आहे. चित्रपटाची जेवढी हवा झाली तेवढा चित्रपट खास नाही. त्यातही तुम्ही जर पहिल्या चित्रपटाशी तुलना करून बघणार असाल तर न बघितलेला उत्तम. अशोक सराफ, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव यांचे फॅन असाल आणि बघायचा हट्ट च असेल तर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


४. धर्मवीर २ (Dharmaveer 2)
२०२४. जीवनचरित्र, ड्रामा. २ तास ३७ मिनिटे. [U/A]
लेखक प्रविण तरडे
दिग्दर्शकप्रविण तरडे
कलाकारप्रसाद ओक, क्षितिश दाते, मंगेश देसाई
निर्मातामंगेश देसाई
रिलीज तारीख३० ऑगस्ट २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

धर्मवीर २” चित्रपट समीक्षा :-

पालघर मध्ये दोन साधूंची हत्या होते आणि काळ असतो नेमका कोरोनाचा. यावेळी नगर विकास मंत्री म्हणून असलेले एकनाथ शिंदे या घटनेने अस्वस्थ झालेले असतानाच त्यांना धर्मवीर आनंद दिघे यांचा साक्षात्कार होतो आणि ते त्यांना दिशा दाखवतात अशी चित्रपटाची सुरुवात आहे.
शिवसेनेचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते एकनिष्ठ शिवसैनिक एकनाथ शिंदे यांचा प्रवास, साहेबांचं अस्तित्व तसेच शिंदे यांच्या आठवणींतील धर्मवीर आनंद दिघे यांची कहाणी यावेळी बघायला मिळते. खरं तर धर्मवीर हा चित्रपट दिघे यांच्यावर आधारित असला तरी यावेळी मात्र कथा शिंदेमय झालेली दिसते. चित्रपटाचा जास्त भाग हा एकनाथ शिंदे यांची कारकीर्द, त्यांचा प्रवास, त्यांनी केलेलं समाजकार्य, शिवसेना या पक्षासाठी केलेलं काम या सगळ्यावर आहे. पक्षाविरुद्ध बंडखोरी याबद्दलची त्यांची भूमिका या कथेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात दिग्दर्शक प्रवीण तरडे यशस्वी झाले‌ आहेत.
एक कलाकृती म्हणून बघायचं झालं तर कथा पटकथा संवाद अजून प्रभावी हवे होते परंतु दिग्दर्शन उजवं झाल्यामुळे ती कमतरता भरून निघते. प्रसाद ओक याने यावेळी सुद्धा भूमिकेला न्याय दिला आहे. क्षितिज दाते याने‌ सुद्धा एकनाथ शिंदे यांची भूमिका चोख साकारली आहे. या चित्रपटाचा उद्देश किंवा राजकीय हेतू बाजूला ठेवला तर कलाकृती म्हणून बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


५. घात (Ghaath)
२०२४. ड्रामा, सोशल. २ तास ५ मिनिटे. [A]
लेखक छत्रपाल निनावे
दिग्दर्शकछत्रपाल निनावे
कलाकारजितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, जनार्दन कदम, सुरूची अडारकर, धनंजय मांडगावकर
निर्माताशिलादीत्या बोरा, मनीष मुंड्रा, मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता
रिलीज तारीख२७ सप्टेंबर २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“घात” चित्रपट समीक्षा :-

घात हा चित्रपट खरं तर २०२३ मध्ये बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. आता १७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. यात कोणतीच लव्हस्टोरी नाही किंवा कौटुंबिक इमोशनल ड्रामा सुद्धा नाही. हा चित्रपट नक्षलवादी, पोलिस आणि राजकारण या सगळ्याशी संलग्न आहे.
नक्षलवादी भागात नक्षलवादी संघटना का सक्रिय होतात, पोलिसांची तिथली भूमिका काय असते किंवा या सगळ्याचा आणि राजकीय परिस्थितीचा कसा संबंध असतो याचं चित्रण या चित्रपटात पहायला मिळतं. खरं तर चित्रपटात जंगल, जमीन आणि पाणी हे मानवी जीवनातील किती महत्वाचे घटक आहेत आणि नक्षलवाद्यांचं आंदोलन किंवा त्यांची भूमिका ही जल, जमीन आणि जंगल या सगळ्याशी कशी निगडित आहे हे दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांनी छान दाखवलं आहे.
चित्रपटाची कथा मुख्यत्वे नक्षलवादी असलेले फाल्गुन (धनंजय मंदावकर), त्याचा भाऊ रघुनाथ (मिलिंद शिंदे) आणि एसीपी नागपुरे (जितेंद्र जोशी) या तिघांभोवती जास्त फिरते. नक्षलवादी भागात पोलिस अधिकाऱ्यांना जास्त काळ काम करायला आवडत नाही तसंच नागपुरे सुद्धा आपली बदली व्हावी म्हणून एखाद्या नक्षलवाद्याला पकडून सरकार च्या ताब्यात देण्याच्या प्रयत्नात असतो. त्याच अनुषंगाने रघुनाथच्या मागावर असलेला नागपुरे रघुनाथ ला ठार मारतो अशी बातमी बाहेर येते. आता हे खरं असतं का.? नागपुरे आणि रघुनाथ यांच्यात काय दुश्मनी असते .? भावाच्या मृत्यूचा बदला फाल्गुन घेतो का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर हा चित्रपट तुम्ही नाक्की बघा. एक गुढ पण सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणारा वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे यांनी अभिनय अगदी अफलातून केला आहे. या चित्रपटात विदर्भ,‌ मराठवाडा, भंडारा या भागातील चित्रिकरण बघायला मिळतं. एक वेगळा प्रयोग म्हणून हा चित्रपट बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.

    तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *