सस्पेन्स थ्रिलर, गुन्हेगारी वर असलेल्या काही गाजलेल्या हिंदी वेबसिरीज भाग – १
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 26, 2022 | 4:21 PM
” कंटाळला आहात…? कळत नाहीय कोणता सिनेमा चांगला किंवा नक्की बघावं काय.?
तर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या ” सस्पेन्स थ्रिलर” वेबसिरीज असू शकतात तुमच्या साठी उत्तम पर्याय!”*
दिवसेंदिवस वाढत चाललेला वेबसिरीज चा प्रेक्षकवर्ग पाहता आता बऱ्याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर नवनवीन वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. एखाद्या सिरीज च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांची पसंती मिळाली की निर्माते आणि दिग्दर्शकांची जबाबदारी वाढते. आणि प्रेक्षक सुद्धा आतुरतेने दुसऱ्या पर्वाची वाट बघत असतात.
आज आपण अशाच काही २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या “सस्पेन्स थ्रिलर” वेबसिरीज बघणार आहोत. असह्य झालेला लॉकडाऊन सुसह्य करण्यासाठी या सिरीजचा नक्कीच हातभार लागला होता.
१. फॅमिली मॅन २
वर्ष :- २०२१ कालावधी : – ४५ मिनिटे ( एक भाग )
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८✰ / 5✰
शैली : – ॲक्शन, नाटक, विनोदी
लेखक : – राज निदिमोरू, कृष्णा डिके, सुमन कुमार
दिग्दर्शक : – राज निदिमोरू, कृष्णा डिके, सुपर्ण वर्मा
कलाकार : – मनोज बाजपेयी, समंथा अक्किनेनी, प्रियामणी
प्रदर्शित तारीख : – 4 जुन २०२१
भाषा : – हिंदी
“फॅमिली मॅन २” सिरीज समीक्षा :-
२०१९ मध्ये आलेली फॅमिली मॅन ही वेबसिरीज “प्राईम व्हिडिओ” वर प्रदर्शित झाली होती. श्रीकांत तिवारी (मनोज बाजपेयी) हा नॅशनल इंटॅलिजन्स एजन्सी साठी गुप्तपणे काम करत असतो पण इतरांसाठी मात्र तो मध्यमवर्गीय आयुष्य जगत असतो. ही दुहेरी आयुष्यं जगत असताना कामाला प्राधान्य देऊन त्याने दिल्ली शहराला एका गॅस ॲटॅक पासून वाचवले होते. याच मालिकेचं दुसरं पर्व म्हणजेच “फॅमिली मॅन २”.
पहील्या पर्वाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या पर्वाची प्रतिक्षा जास्त होती. या पर्वात मनोज वाजपेयी सोबत समंथा अक्कीनेनी ही दहशतवादी राजलक्ष्मीच्या भूमिकेत दिसत आहे. मनोज आणि समंथाशिवाय नीरज माधव, पवन चोप्रा, गुल पनाग, प्रियामनी या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका या वेब सीरिजमध्ये आहेत.
हे पर्व आणि याची कथा पूर्ण वेगळी असून या सिझन मध्ये समंथा चा अभिनय पाहण्याजोगा आहे. काही दृश्यांमध्ये ती मनोज वाजपेयी यांच्या पेक्षा सरस वाटते. सुरूवातीला एका कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीकांत ला टास्क फोर्स मधून अशा काही बातम्या कानावर पडतात की तो पुन्हा ॲक्शन मोड वर येतो आणि तिथून कथा चालू होते. चेन्नई, मुंबई, श्रीलंका आणि लंडन अशा विविध शहरांमध्ये आणि देशांमध्ये ही कथा फिरताना दिसते.
दक्षिण भारतात घडणारा श्रीलंकन तमिळ बंडखोर आणि ISI यांच्यातील वाद, संघर्ष या मालिकेत बघायला मिळतो.
पहिल्या पर्वाइतकी रंजक नसली तरी नऊ भागांची ही मालिका बघताना कुठेच कंटाळवाणी वाटत नाही. तुम्ही अजूनही ही सिरीज पाहीली नसेल तर ॲमेझॉन प्राईमवर नक्की बघा पण त्यापूर्वी पहिला सिझन सुद्धा बघणं गरजेचं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४✰ स्टार.
२.स्पेशल ऑप्स १.५ : द हिम्मत स्टोरी
वर्ष :- २०२१ कालावधी : – ५० मिनिटे ( एक भाग )
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६ ✰ / ५✰
शैली : – ॲक्शन, गुन्हेगार, रोमांचक
लेखक : – नीरज पांडे, दिपक किंगराणी, बेनझीर अली फिदा
दिग्दर्शक : – नीरज पांडे, शिवम नायर
कलाकार : – के के मेनन, विनय पाठक, आफताब शिवदासानी
प्रदर्शित तारीख : – १२ नोव्हेंबर २०२१
भाषा : – हिंदी
“स्पेशल ऑप्स १.५ : द हिम्मत स्टोरी” सिरीज समीक्षा :-
निरज पांडे निर्मित “Special Ops 1.5” ही बहुप्रतिक्षित सिरीज १२ नोव्हेंबर २०२१ रोजी “डिस्नी हॉटस्टार प्लस” वर प्रदर्शित झाली होती. के.के. मेनन यांच्या दमदार अभिनयाची छाप त्यांनी पहिल्या सिझन मध्येच सोडली होती. एका प्रामाणिक रॉ एजंटची भुमिका साकारली होती.
खरं तर २०२१ साली प्रेक्षकांना प्रतिक्षा असलेल्या बऱ्याच सिरीज चे दुसरे किंवा तिसरे सिजन प्रदर्शित झाले होते. त्यापैकीच एक म्हणजे “स्पेशल ऑप्स चा दुसरा सिझन “स्पेशल ऑप्स१.५ : द हिम्मत स्टोरी”.
या सिझन मध्ये हिम्मत सिंह(के. के. मेनन)हे रॉ एजंट कसे बनले हा प्रवास, त्यांचा सुरूवातीपासून चा संघर्ष
फ्लॅशबॅक मध्ये दाखवला आहे. हिम्मत सिंह यांचे सहकारी दिल्ली पोलीस शेख अब्बास (विनय पाठक) यांच्या तोंडून ही गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते. २०२१ साली झालेल्या संसदेच्या इमारती हल्ल्याचं एक रहस्य सुद्धा या फ्लॅशबॅक मध्ये लोकांसमोर येतं.
या सिझन मध्ये अफताब शिवदासानी यांची सुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे. ॲक्शन आणि सस्पेन्स ने परिपूर्ण या सिरीजमध्ये के.के. मेनन या गुणी कलाकाराचा सुंदर अभिनय बघायला मिळतो.
ही सिरीज तुम्ही पाहीली नसेल तर अजिबात वेळ वाया घालवू नका. पण त्यापूर्वी पहिला सिझन बघणं गरजेचं आहे. तसंही दुसरा सिजन हा फक्त चार भागांत बनवला गेला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४✰ स्टार.
३. कॅंडी
वर्ष :- २० कालावधी : – ३९ मिनिटे ( एक भाग )
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.४ ✰ / ५✰
शैली : – रोमांचक
लेखक : – देबोजित दास पुर्खावास्ता, अग्रिम जोशी
दिग्दर्शक : – आशिष शुक्ला,
कलाकार : – रोनित रोय, रिचा चड्डा, मनु चड्डा,
प्रदर्शित तारीख : – ८ सप्टेंबर २०२१
भाषा : – हिंदी
“कॅंडी ” सिरीज समीक्षा :-
नावावरून ठरवायला जाल फसाल! “वूट सिलेक्ट” या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेली ही वेबसिरीज गुन्हेगारी, थ्रिलर आणि सायकॉलॉजी्कल हॉरर अशा धाटणीची आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये वूट ने ही दमदार सिरीज प्रदर्शित केली होती, त्याआधी सुद्धा वूट ची “आसूर” ही सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती, आणि म्हणूनच या सिरीज कडून पण बऱ्याच अपेक्षा होत्या.
रोनीत रॉय, रिचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सिरीज सस्पेन्स ने भरलेली आहे. ज्यांना सुरूवातीपासून अंदाज बांधायला आवडतं की खुनी कोण असेल, किंवा पुढे काय होणार त्यांच्या मेंदूला चालना देणारी ही सिरीज आहे. कारण या सिरीज मधला आपला प्रत्येक अंदाज चुकीचा ठरतो.
एका शाळकरी मुलाचा निर्घृण खून झाल्यानंतर त्यात एक शिक्षक अडचणीत येतो आणि तो शिक्षक आणि पोलिस अधिकारी मिळून हे रहस्य कसं सोडवतात हे पाहण्यासाठी ही सिरीज नक्की बघा. यासाठी तुम्हाला वूट सिलेक्ट चं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४.५ ✰ स्टार.
४. आर्या २
वर्ष :- २०२१ कालावधी : – ५१ मिनिटे ( एक भाग )
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.४ ✰ / ५✰
शैली : – नाटक, गुन्हेगारी, रोमांचक
लेखक : – संयुक्थ चावला शेख, अणु सिंघ चौधरी
दिग्दर्शक : – राम माधवाणी, विनोद रावत, कपिल शर्मा
कलाकार : – सुश्मिता सेन, चंद्राचुर सिंघ, नमित दास, अंकुर भाटीया, विकास कुमार
प्रदर्शित तारीख : – १९ जुन २०२१
भाषा : – हिंदी
“आर्या २” सिरीज समीक्षा :-
सुश्मिता सेन या अभिनेत्रीने तसं खूप कमी चित्रपटात काम केलं आहे. तरीसुद्धा तीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. बऱ्याच वर्षांनंतर आर्या या सिरीज मधून तिने वेबच्या दुनियेत पदार्पण केलं.
आर्या या सिरीज मध्ये सुश्मिता ला एका करारी भुमिकेत पहायला मिळतं. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी एक आई काहीही करू शकते. ती कोणत्याही थराला जाऊ शकते हेच आर्याने दाखवून दिलं आहे.
बऱ्याच वर्षांनंतर सुश्मिता ने कमबॅक केलं आहे.
ड्रग्स आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांपासून दूर जाण्याच्या तयारीत असताना आपल्या नवऱ्याचा खून होतो आणि आर्या आणि तिच्या मुलांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. ३०० कोटीची ड्रग्स ची चोरी, घरातलेच दुश्मन, बाहेरचे गुंड, ड्रग्स माफिया या सगळ्यांपासून ती आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतः ड्रग्स आणि गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकते, मुलांना दुसऱ्या देशात घेऊन जाते. पण तिथे पण ती सुरक्षित आहे की नाही हा ट्विस्ट आणि सस्पेन्स कायम ठेवत पहिला सिझन संपवला होता. आणि म्हणूनच आर्या चा दुसरा सिझन बहुप्रतिक्षित होता.
दुसऱ्या सिझन मध्ये आर्या पुन्हा भारतात येते. आपल्या वडिलांविरुद्ध साक्ष देण्याच्या बदल्यात तीला आणि मुलांना सुरक्षा मिळण्याचं आश्वासन मिळाल्यामुळे ती शेवटचं म्हणून भारतात येते. पण कोर्टात जाण्यापूर्वी असं काही समजतं की तीला साक्ष बदलावी लागते. आणि इथूनच पुढे मग तीचा संघर्ष परत चालू होतो.
साक्ष बदल्यामुळे पोलीस संरक्षण द्यायला नकार देतात. एकीकडे रशियन ड्रग्स माफिया तीच्या मागावर असतात, एकीकडे कुटुंबातील च काही सदस्य तीच्या विरोधात आहेत. या सगळ्यांपासून वाचण्यासाठी ती काय करते हे बघण्यासाठी ही सिरीज बघायला हवी.
परिस्थितीमुळे कणखर, करारी आणि बाणेदार झालेली एक आई आपल्या मुलीच्या नाजूक आणि हळव्या प्रसंगी हतबल झालेली दिसते, आणि हे दाखवताना सुश्मिताच्या अभिनयाची ताकद दिसून येते.
लवकरच या सिरीज चा तिसरा सिझन सुद्धा येईल, त्याआधी तुम्ही ही सिरीज नक्की बघा. डिस्ने हॉटस्टार प्लस वर ही सिरीज तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३.५ ✰ स्टार.
५. मत्स्य कांड
वर्ष :- २०२१ कालावधी : – ४० मिनिटे ( एक भाग )
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८✰ / ५✰
शैली : – रोमांचक
लेखक : – नमेश दुबे, तेजपाल रावत, शिव सिंग, अनुक्रिती झा
दिग्दर्शक : – अजय भूयान,
कलाकार : – रवी दुबे, मधुर मित्तल, राज शर्मा, रवी किशन, झोया अफरोज
प्रदर्शित तारीख : – १८ नोव्हेंबर २०२१
भाषा : – हिंदी
“मत्स्य कांड ” सिरीज समीक्षा :-
नावावरूनच तुमच्या लक्षात आलेच असेल की ही सिरीज गुन्हेगारी विश्वाशी निगडित अशी आहे. मॅक्स प्लेयर वर प्रदर्शित झालेल्या या सिरीज ला प्रेक्षकांची खूप जास्त पसंती मिळाली होती. खूप कमी दिवसांत खूप जास्त व्ह्युज या सिरीज ला मिळाले होते.
‘मत्स्य कांड’ या वेबसिरीजमध्ये एक हुशार, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि एक लबाड, सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात निष्णात असलेला ठग यांच्यातील उंदीर मांजराचा खेळ दाखवण्यात आला आहे. मत्स्य (रवी दुबे) हा सतत एसीपी तेजराज सिंह(रवी किशन) यांना चकवा देत असतो, पण तेजराज यांनी या चतूर चोराला पकडण्यासाठी शपथ घेतलेली असते. आणि मत्स्य हा सुद्धा एसीपी तेजराज ला पकडून दाखव असं आव्हान करतो.
एकंदरच हा चोर पोलिसांचा खेळ बघणं रोमांचकारी आहे. ‘रवी दुबे’ या टिव्ही कलाकाराने पहिल्यांदाच इतकी मोठी भूमिका साकारली असून त्याने त्या भुमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. एसीपी तेजराज सिंहच्या भुमिकेत असलेल्या भोजपुरी स्टार ‘रवी किशन’ यांना तर आपण ओळखतोच. त्यांनी सुद्धा तोडीसतोड अभिनय केला आहे.
पियुश मिश्रा, जोया अफरोज, मधुर मित्तल, राजेश शर्मा आणि नावेद असलम या कलाकारांच्या सुद्धा यात प्रमुख भूमिका आहेत.
या सिरीज मध्ये थोड्या थोड्या वेळाने येणाऱ्या ट्विस्ट मुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद ही सिरीज ठेवते. सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन अशा लोकांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टींनी भरलेली ही सिरीज तुम्ही मॅक्स प्लेयर या प्लॅटफॉर्म वर अगदी विनामूल्य पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४✰ स्टार.
“जगभरून” च्या पसंतीस उतरलेल्या या सिरीज तुम्हाला आवडतात की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..