२०२१ मध्ये प्रदर्शित झालेले आणि लॉकडाऊन सुसह्य करणारे हे काही मराठी सिनेमे/ वेबसिरीज तुम्ही पाहीले नसतील तर जरूर बघा…
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 18, 2022 | 12:15 AM
“मनोरंजन” करण्यासाठी खरं तर खूप गोष्टी करण्यासारख्या असतात. पण सगळ्यात आधी आपल्या डोक्यात येतो तो “सिनेमा”. त्यातल्या त्यात सिनेमागृहात जाऊन तो बघणं म्हणजे एक वेगळीच मजा असते.
पण हा “कोरोना” आला काय आणि त्याने अख्ख्या जगात उलथापालथ घडवून आणली. मग सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघणं तर दूरच. पण घरात राहून सगळेच कंटाळलेले असताना लॉकडाऊन मध्ये सुद्धा “सिनेमा” नं मनोरंजन करायचं थांबवलं नाही.
कारण गेल्या दोन वर्षांपासून बरेच सिनेमे आणि काही वेबसिरीज ओटीटी या प्लॅटफॉर्म वर बघायला मिळतात. असेच काही २०२१ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म वर तसेच सिनेमागृहात प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आणि वेबसिरीज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे तुम्ही आता सुद्धा घरबसल्या बघू शकता.
१. पिकासो
वर्ष :- २०१९ कालावधी : – १ तास १४ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३. 6✰ / 5✰
शैली : – नाटक
लेखक : – अभिजित वारंग
दिग्दर्शक : – अभिजित वारंग
कलाकार : – प्रसाद ओक, अश्विनी मुकादम, समय तांबे
प्रदर्शित तारीख : – २८ सप्टेंबर २०१९
भाषा : – मराठी
देश : – भारत
“पिकासो” चित्रपट समीक्षा :-
हृदयाला स्पर्श करणारा “पिकासो” हा चित्रपट कोकणातील “दशावतार” ही लोककला जपू पाहणाऱ्या पांडुरंग (प्रसाद ओक) नावाच्या एका सामान्य माणसाची गोष्ट सांगणारा आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मनोरंजनाची इतकी आधुनिक साधनं आल्याने लोकांना पारंपरिक लोककलांमध्ये फारसा रस नाही. अशा वेळी एक अस्सल कलावंत त्याची कला जपण्यासाठी काय करतो हे या चित्रपटात पाहायला मिळतं. हीच कला पिढ्यानपिढ्या जपली जावी ही त्याची भावना, त्याची तळमळ हे सगळंच बघताना फार अस्वस्थ व्हायला होतं.
आपल्या मुलाची, गंधर्व ची (समय तांबे )आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकलेच्या स्पर्धेसाठी निवड झालेली असते आणि या स्पर्धेत पहिल्या तीन विजेत्यांना थेट स्पेनमध्ये म्हणजेच ‘पिकासो’ या कलाकाराच्या जन्मगावी जाऊन चित्रकला शिकण्याची संधी मिळणार असते. पण यासाठी प्रवेश शुल्क भरण्यासाठी पांडुरंग कडे पैसे नसतात. त्यात घरात आजारी बायको, आणि याच्या या दशावतार लोककलेतून मिळणारे तुटपुंजे पैसे अशा परिस्थितीत आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असलेली तळमळ प्रसाद ओक ने ज्या प्रकारे सादर केली आहे. ते बघून त्याच्या अभिनयाची ताकद दिसून येते.
१९ जानेवारी २०२१ रोजी ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला पिकासो हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट नक्की बघावा असा आहे. कोकणातील कथा असल्यामुळे कोकण दर्शन घडविणारा हा चित्रपट नक्कीच बघा. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४✰ स्टार.
२. झिम्मा
वर्ष :- २०२१ सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास १० मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३. ४ ✰ / 5✰
शैली : – नाटक
लेखक : – इरावती कर्णिक, हेमंत ढोमे (कथा)
दिग्दर्शक : – हेमंत ढोमे
कलाकार : – नम्रता अनप, अक्षता आपटे, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर
प्रदर्शित तारीख : – १९ नोव्हेंबर २०२१
भाषा : – मराठी
देश : – भारत
“झिम्मा” चित्रपट समीक्षा :-
एक हलकाफुलका, विनोदी अंगाने जाणारा पण आयुष्याबद्दल विचार करायला लावणारा हा झिम्मा सिनेमा. लॉकडाऊन नंतर प्रदर्शित झालेल्या काही मोजक्या चित्रपटांपैकी नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला हा एक. हेमंत ढोमे याच्या आधीच्या चित्रपटांपैकी उत्तम कथानक आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट.
या चित्रपटात सात नायिकांच्या मनाची अवस्था, प्रत्येकीचा वेगळा स्वभाव, आपल्याला काय हवंय आणि स्वतःला ओळखण्याचा प्रवास अतिशय सुंदररित्या दाखवला आहे. आयुष्यातील जबाबदाऱ्या पार पाडता पाडता जगायचं राहून जातं. आणि अशातच एक ट्रिप प्लान केल्यावर प्रवासाद या साऱ्या जणींना आयुष्यातला आनंद गवसल्या सारखं वाटतं. या सात जणींचा हा प्रवास बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला सुद्धा विचारात पाडणारा आहे.
लंडनमध्ये चित्रित केलेला हा चित्रपट बघताना लंडन सफारी करून आल्यासारखं नक्की वाटेल. निर्मिती सावंत, सुहास जोशी यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांचा सहज अभिनय बघताना मजा येते. सोनाली कुलकर्णी आणि क्षिती जोग या दोघींनी तर कमाल अभिनय केला आहे. सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, चैत्राली गुप्ते आणि अर्थातच चित्रपटातील वाटाड्या सिद्धार्थ चांदेकर या सगळ्यांनीच खूप सुंदर अभिनय केला आहे.
ॲमेझॉन प्राईमवर हा सिनेमा तुम्ही बघू शकता. एकदा तरी नक्कीच बघा. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४.२✰ स्टार.
३. बस्ता
वर्ष :- २०२१ सीबीएफसी :- यू कालावधी : – २ तास
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २ .५ ✰ / 5✰
शैली : – नाटक, विनोदी, फॅमिली
लेखक : – अरविंद जगताप
दिग्दर्शक : – तानाजी घाडगे
कलाकार : – सुबोध भावे, पार्थ भालेराव, रोहित चावण
प्रदर्शित तारीख : – २९ जानेवारी २०२१
भाषा : – मराठी
देश : – भारत
“बस्ता” चित्रपट समीक्षा :-
कोरोना आणि लॉकडाऊन मुळे प्रदर्शन लांबलेला हा चित्रपट “झी” ने प्रेक्षकांपर्यंत पोहचवला. तानाजी घाडगे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट समाजातील एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे.
आपल्या मुलीच्या लग्नाचा बस्ता घेऊन जात असताना ॲक्सिडंट होतो आणि तो टेम्पो पोलिसांच्या ताब्यात जातो. मग तिथून तो बस्ता चोरील जातो. मग तो मिळवण्यासाठी एका बापाला काय करावं लागतं हे बघताना सतत हतबल झालेला “बाप” बघायला मिळतो. समाजात आजही अशा चालीरीती आहेत की ज्यामुळे मुलीच्या वडिलांना नेहमीच असं हतबल होताना बघायला मिळतं.
एका वडील आणि मुलीच्या नात्याची ही सुंदर गोष्ट आहे. कथानक चांगलं असून सुद्धा चित्रपट कुठेतरी मागे पडल्यासारखा वाटतो. सायली संजीव, अक्षय टंकसाळे, सुहास पळशीकर, आणि इतर कलाकारांच्या भुमिका उत्तम झाल्या आहेत. पण तरीही चित्रपट थोडा रेंगाळल्यामुळे बघताना कंटाळा येऊ शकतो.
वडील मुलीच्या नात्यासाठी एकदा हा सिनेमा बघायला हरकत नाही. “झी 5” वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी २.५ ✰ स्टार.
४. समांतर २
वर्ष :- २०२१ कालावधी : – १८ – ३० मिनिटे (एक एपिसोड)
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३ .५ ✰ / 5✰
शैली : – नाटक, रहस्य, रोमांचक
लेखक : – अंबर हडप
दिग्दर्शक : – समीर विद्वांस
कलाकार : – स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज
प्रदर्शित तारीख : – १ जुलै २०२१
भाषा : – मराठी
देश : – भारत
“समांतर २” सिरीज समीक्षा :-
मार्च २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेली समांतर ही वेबसिरीज प्रेक्षकांना आवडली होती. मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित या सिरीज मध्ये स्वप्नील जोशी याने वेब च्या दुनियेत पदार्पण केले होते. जूलै २०२१ प्रदर्शित झालेला याच सिरीज चा समांतर २ हा दुसरा सिझन आहे.
दोन वेगवेगळ्या व्यक्तीचं आयुष्य मात्र एकाच हस्तरेखेवर आधारित आहे. म्हणजे यामध्ये एकाचा भूतकाळ हा दुसऱ्याचा भविष्यकाळ दाखवण्यात आला आहे. गूढ कथानक असलेल्या या सिरीज चं दिग्दर्शन अतिशय ताकतीचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले होते.
जास्त वाट बघायला न लावता वर्षभरानेच हा भाग प्रदर्शित झाला होता. पण पहिल्या भागातील सस्पेन्स कायम असल्यामुळे प्रेक्षक मात्र या भागाची वाट बघत होते. पण जेवढी उत्कंठा होती त्या मानाने या दुसऱ्या भागाने मात्र लोकांचा हिरमोड केला. समीर विद्वंस यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीज च्या कथानकामध्ये पण फारसा दम नव्हता.
सई ताम्हणकर , तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी आणि बऱ्याच वर्षांनी ज्यांचा अभिनय बघायला मिळाला ते नितीश भारद्वाज असे सगळे कलाकार परत एकत्र असून हा डाव मात्र फसल्यासारखा वाटतो. हिंदी वेबसिरीज शी तुलना करायची म्हणून काही सिन बघताना ते ओढून ताणून केल्यासारखे वाटतात. अश्लील शिव्या दिल्या म्हणजे रिअलस्टिक अभिनय वाटतो असं वाटतं म्हणून की काय शिव्यांचा अती वापर होताना दिसतो.
पण एकंदरच पहिल्या भागातील तो सस्पेन्स काय आहे हे जाणून घेण्यासाठी समांतर २ ही वेबसिरीज तुम्ही मॅक्स प्लेयर वर नक्कीच बघा. ओटीटी प्लॅटफॉर्म वर सगळ्यात जास्त पाहीली गेलेली ही एकमेव मराठी वेबसिरीज आहे. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३ ✰ स्टार.
५. “आणि काय हवं..?”
वर्ष :- २०१९ कालावधी : – १८ – ३० मिनिटे (एक एपिसोड)
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३ .५ ✰ / 5✰
शैली : – नाटक, प्रणय, विनोदी
कलाकार : – प्रिया बापट, उमेश कामत
प्रदर्शित तारीख : – १६ जुलै २०१९
भाषा : – मराठी
देश : – भारत
“आणि काय हवं..?” सिरीज समीक्षा :-
“आणि काय हवं ” या मॅक्स प्लेयर वर प्रदर्शित झालेल्या वेबसिरीज ला व पर्यायाने जुई (प्रिया बापट) आणि साकेत(उमेश कामत) यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. याच सिरीज चे पहीले दोन्ही सिझन लोकांना आवडले होते. म्हणूनच तिसऱ्या सिझनची प्रतिक्षा जास्त होती. पण पुन्हा लागलेल्या लॉकडाऊन मुळे या सिझनच्या शुटिंग दरम्यान बऱ्याच अडचणी येऊन सुद्धा हा सिझन रोजी प्रदर्शित झाला.
नोकरी करणारे नवरा बायको आणि कामावरून आल्यावर पण घरात तेच विषय आणि त्यातून होणारी चिडचिड, दुरावा हे सगळं पडद्यावर दाखवताना प्रिया आणि उमेश आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. दिवसभरातील जास्त वेळ हा कामाच्या ठिकाणी जातो मग अशा वेळी नवरा बायकोचं नातं फुलवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे सांगणारं हे “आणि काय हवं” चं तिसरं पर्व आहे. वरून नार्वेकर दिग्दर्शित ही सिरीज प्रेक्षकांना विशेष आवडली होती.
आपल्यातीलच एक वाटणाऱ्या जुई आणि साकेत ला बघताना बऱ्याच गोष्टींसोबत आपण रिलेट करतो. नातं कसं टिकवावं आणि ते बहरण्यासाठी काय करावं हे बघण्यासाठी तरी ही सिरीज नक्की बघा. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३.५ ✰ स्टार.
६. बेफाम
वर्ष :- २०२१ कालावधी : – १ तास ४१ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २ .५ ✰ / 5✰
शैली : – नाटक
लेखक : – विद्यासागर अध्यापक
दिग्दर्शक : – कृष्णा कांबळे
कलाकार : – सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले
प्रदर्शित तारीख : – २६ फेब्रुवारी २०२१
भाषा : – मराठी
देश : – भारत
“बेफाम” चित्रपट समीक्षा :-
नावाप्रमाणेच बेफाम हा चित्रपट बेफाम सुटल्यासारखा वाटतो. सुरूवातच कंटाळवाणी झाल्यामुळे हा चित्रपट बघताना शेवटपर्यंत उत्कंठा वाढत नाही की टिकत नाही. कथानक चांगलं असलं तरी उत्तम दिग्दर्शन नसेल तर मग ती कलाकृती फसते.
२०२१ साली प्रदर्शित झालेला हा बेफाम बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नाही. सिद्धार्थ चांदेकरनं एका बेफाम तरुणाची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. धरसोड वृत्ती आणि त्यामुळे आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर त्याचा होणारा परिणाम सिद्धार्थ ने आपल्या भुमिकेतून छान दाखवला आहे. सखी गोखले ने सुद्धा छान साथ दिली आहे. सीमा देशमुख आणि अभिनेते विद्याधर जोशी यांचा अनुभवी अभिनय पाहायला मिळतो.
झी 5 वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी २.५ ✰ स्टार.
७. बळी
वर्ष :- २०२१ कालावधी : – १ तास ४३ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३✰ / 5✰
शैली : – भयपट
लेखक : – स्वप्नील गुप्ता, अजित जगताप
दिग्दर्शक : – विशाल फुरिया
कलाकार : – स्वप्नील जोशी, पूजा सावंत
प्रदर्शित तारीख : – ९ डिसेंबर २०२१
भाषा : – मराठी
देश : – भारत
“बळी” चित्रपट समीक्षा :-
‘बाळा ये… मी तुला कायमचं बरं करीन’, हा डायलॉग ऐकून अंगावर भितीचा काटा आल्याशिवाय राहणार नाही. “बळी” हा एक भयपट असून मराठी मध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचे भयपट होऊ शकतात हे लपाछपी नंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
विशाल फुरिया दिग्दर्शित हा चित्रपट खरं तर शेअर्ड सायकोसिस या वैद्यकीय संकल्पनेवर आधारित आहे. एखाद्याला होणारे भास तसेच्या तसे दुसऱ्याला सुद्धा होऊ शकतात. हि मुळ संकल्पना घेऊन हा फॅमिली भयपट बनवण्यात आला आहे.
स्वप्नील जोशी याने नेहमीप्रमाणे मुलाची काळजी असणारा बाप उत्तम वठवला आहे. पुजा सावंतने सुद्धा चांगला अभिनय केला आहे. खरं कौतुक म्हणजे समर्थ जाधव आणि अभिषेक बचनकर या दोन मुलांचं. त्या दोघांनी पण लहान वयात चित्रपटाला अपेक्षित असा अभिनय केला आहे.
चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका हॉस्पिटलच्या समोरील इमारतीमध्ये घडणारा थरार, सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. भयपट पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग असतो, त्यांनी हा जरूर पहावा. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३ ✰ स्टार.
८. जून
वर्ष :- २०२१ कालावधी : – १ तास ३४ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.३ ✰ / 5✰
शैली : – नाटक
लेखक : – निखील महाजन
दिग्दर्शक : – वैभव खिस्टी, सुह्ररुद गोडबोले
कलाकार : – नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन, जितेंद्र जोशी
प्रदर्शित तारीख : – ३० जून २०२१
भाषा : – मराठी
देश : – भारत
“जून” चित्रपट समीक्षा :-
नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेला जून हा चित्रपट प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित हा चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टींमध्ये उजवा ठरला आहे. वरवर साधी सरळ दिसणारी कथा किती खोल अर्थाने भरलेली आहे हे चित्रपट पाहताना लक्षात येतं.
बऱ्याचदा आपल्या कृतीतून आपण न ठरवता नकळतपणे काही गोष्टी करतो, अर्थात ज्याचा परिणाम नक्कीच चांगला होत नाही. गंमत, मजा म्हणून केलेली एखादी गोष्ट एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. या परिस्थितीत ज्याच्यामुळे ही घटना घडलेली असते त्याचा तीला पश्चात्ताप होतो किंवा तेव्हा त्या व्यक्तीला होणारा मानसिक त्रास, हळवं झालेलं मन अशी एकंदर भावनिक गोष्ट दाखवणारा ‘जून’ हा चित्रपट आहे.
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, विचार करायला लावणारा जून हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे. फक्त लव्हस्टोरी, रोमान्स याच्याही पलीकडे या चित्रपटाची कथा आहे. नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन या दोघांचा अभिनय लाजवाब झालेला आहे.
प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४.५ ✰ स्टार.
९. पांडू
वर्ष :- २०२१ कालावधी : – २ तास ६ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३ ✰ / 5✰
शैली : – विनोदी
लेखक : – विजू माने
दिग्दर्शक : – विजू माने
कलाकार : – भाऊ कदम, कुशल भाद्रिके, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, प्राजक्ता माळी, प्रवीण तरडे
प्रदर्शित तारीख : – ३ डिसेंबर २०२१
भाषा : – मराठी
देश : – भारत
“पांडू” चित्रपट समीक्षा :-
कोरोना आणि लॉकडाऊन नंतर चित्रपट प्रदर्शनासाठी अनेक नियम आणि निर्बंध आले. तरीही झी स्टुडिओजने आपला ‘पांडू’ हा सिनेमा दणक्यात प्रदर्शित केला. आणि हाऊसफुल्ल चे बोर्ड लावून या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या चित्रपटात भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडीने अक्षरशः धमाल उडवून दिली आहे. लॉजिक बिजीक बाजूला ठेवून फारसा डोक्याचा वापर न करता फक्त हसण्यासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
पांडू चोरांना पकडायला काय काय करतो हे बघणं फार मजेदार आहे. हा चित्रपट तुम्ही “झी5” वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३✰ स्टार.
१०. काळे धंदे
वर्ष :- २०१९ कालावधी : – ४ तास
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५✰ / 5✰
शैली : – विनोदी
कलाकार : – निरंजन जवीर, महेश मांजरेकर, ओंकार रावूत , नेहा खान
प्रदर्शित तारीख : – २ ऑक्टोंबर २०१९
भाषा : – मराठी
देश : – भारत
“काळे धंदे” सिरीज समीक्षा :-
नावावरून गंभीर वाटत असली तरी ही एक विनोदी वेबसिरीज आहे. “झी 5” ॲपवर प्रदर्शित झालेली ही विकी या तरूण फोटोग्राफरची गोष्ट आहे. आयुष्यात घडणाऱ्या अप्रत्यक्ष घटनांमुळे त्यांचं आयुष्य कसं बदलत राहतं, गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून प्रयत्न करताना त्या अजून कशा बिघडतात हे या सिरीज मध्ये पाहायला मिळतं.
निव्वळ करमणूक म्हणून ही सिरीज बघायला हरकत नाही. महेश मांजरेकर, संस्कृति बालगुडे, नेहा खान आणि शुभंकर तावडे यांच्या मुख्य भूमिका ही वेबसिरीज झी 5 वर तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी २.५ ✰ स्टार.
तर मग यापैकी सगळ्यात आधी कोणता सिनेमा किंवा वेबसिरीज तुम्हाला बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. कोणता पाहीला असल्यास त्याबद्दल तुमचा अभिप्राय देखील जरूर कळवा.
धन्यवाद.
लेखक – आकांक्षा कोलते