२०२१ मध्ये प्रदर्शित झालेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीले नसतील तर जरूर बघा.! भाग – १
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 24, 2022 | 1:38 PM
कोरोनाचं सावट आता कमी झालंय तरीदेखील त्याने ज्याप्रकारे अख्ख्या जगाचं रहाटगाडं बदलून टाकलंय त्यातून सावरायला सगळ्यांनाच अजून वेळ लागतोय. चित्रपटसृष्टी सुद्धा याला अपवाद नाही. पण तरीसुद्धा लॉकडाऊन नंतर विशेषतः २०२१ च्या उत्तरार्धात बरेच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यातील काही चित्रपटांची नावं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
का म्हणून काय विचारताय.? तेव्हा प्रदर्शित झालेले हे चित्रपट तुम्ही आताही ओटीटी प्लॅटफॉर्म वर पाहूच शकता की! आणि उरलेली नावं लवकरचं!
१. सरदार उधम
वर्ष :- २०२१ सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास ४४ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३. ७ ✰ / 5✰
शैली : – नाटक, जीवनचरित्र, गुन्हेगारी
लेखक (पटकथा) : – शुभेंदू भट्टाचार्य, रितेश शाह
दिग्दर्शक : – शुजीत सरकार
कलाकार : – विकी कौशल, शौन स्कॉट, स्टेफन होगन
प्रदर्शित तारीख : – १६ ऑक्टोंबर २०२१
भाषा : – हिंदी
देश : – भारत
“सरदार उधम” चित्रपट समीक्षा :-
ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सरदार उधमसिंग या चित्रपटात विकी कौशल याने पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे.
१३ एप्रिल १९१९ रोजी झालेला “जालियनवाला बाग हत्याकांड” आणि जनरल डायरचं नाव ऐकलं तरी आतासुद्धा आपल्याला चिड येते. पण त्यावेळी हे सगळं प्रत्यक्ष पाहिलेल्या एका चार – पाच वर्षाच्या मुलाने तब्बल २१ वर्षांनी या घटनेचा बदला घेतला होता. तो मुलगा म्हणजेच “सरदार उधमसिंह”. आणि हा चित्रपट याच कथानकावर बेतलेला आहे.
खरं तर आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांड म्हटलं की जनरल डायर आठवतो. पण प्रत्यक्षात “फायर” हा आदेश जनरल डायर याने दिला होता असला तरी तत्कालीन पंजाब चे गव्हर्नर मायकेल फ्रान्सिस ओडवायर याच्या आदेशावरून हा हत्याकांड घडवण्यात आला होता. जालियनवाला बागेत हा जनसमुदाय हा रौलट कायद्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेला होता. आणि कोणतीही पूर्वसूचना न देता या जनसमुदायावर बेछूट गोळीबार करून मृतदेहांचा खच पाडला होता.
या सगळ्याचा राग उधमसिंग यांच्या मनात २१ वर्ष साचून होता. आणि शेवटी १३ मार्च १९४० रोजी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ची बैठक चालू असताना उधमसिंग यांनी ओडवायर वर भर सभेत गोळ्या झाडून आपला बदला पूर्ण केला होता. ज्यासाठी कालांतराने त्यांना लंडनमध्येच फाशी देण्यात आली होती.
एकंदरच एका क्रांतिकारकाच्या बलिदानाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाची मांडणी, अभिनय सगळ्याच गोष्टी उत्तम आहेत. १९१९ ते १९४० हा उधमसिंग यांचा थरारक जीवन प्रवास बघण्यासाठी हा चित्रपट जरूर बघा
हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४.५✰ स्टार.
२. शेरशहा
वर्ष :- २०२१ सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास १५ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३. ७ ✰ / 5✰
शैली : – ॲक्शन, नाटक, जीवनचरित्र,
लेखक : – संदीप श्रीवास्तवा
दिग्दर्शक : – विष्णूवर्धन
कलाकार : – सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शिव पंडित
प्रदर्शित तारीख : – १२ ऑगस्ट २०२१
भाषा : – हिंदी
देश : – भारत
“ शेरशहा ” चित्रपट समीक्षा :-
१२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने आवर्जून बघावा असा आहे. भारतीय सैन्याचा सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र ह्या पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर हा चित्रपट चित्रित करण्यात आलेला आहे. नावातच विक्रम असणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगील युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
१९९९ साली झालेल्या कारगील युद्धाची गाथा सांगणारा हा चित्रपट आहे. “शिखर ५१४०” ज्यावर पाकिस्तानी सैन्याचा ताबा होता आणि ते काबिज करण्यासाठी कॅप्टन विक्रम बत्रा यांना ऑर्डर मिळाली होती. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही हे शिखर काबीज केल्यानंतर आपल्या सैन्याला फिल्मी स्टाईलमध्ये “ये दिल मांगे मोर” असं म्हणतं ते सैन्याचा हुरूप वाढवताना दिसतात आणि “रिअल हिरो” म्हणजे काय हे आपल्याला कळतं.
भारतीय इतिहासातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या या मिशनला फत्ते करणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांना पाकिस्तानी सैन्याने दिलेलं शेरशाह हे कोड नेम (सांकेतिक नाव) होतं इतकी त्यांची दहशत होती.
दिग्दर्शक विष्णू वर्धन यांनी या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची ही शौर्यगाथा आणि त्यांची मनाला व्याकुळ करणारी प्रेमकहाणी दोन्हींचा मिलाप अगदी सहज आणि सुंदर चित्रबद्ध केला आहे.
अवघ्या चोविसाव्या वर्षी देशासाठी लढणाऱ्या आणि स्वतःचं बलिदान देणाऱ्या या जवानाची शौर्यगाथा नक्की बघा. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा आतापर्यंतचा हा सर्वात सुंदर चित्रपट असेल. कियारा आडवाणी हिने सुद्धा चांगली साथ दिली आहे. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४.५✰ स्टार.
३. “83”
वर्ष :- २०२१ सीबीएफसी :- यू कालावधी : – २ तास ४२ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५ ✰ / 5✰
शैली : – खेळ, नाटक, ऐतिहासिक
लेखक : – वसन बाला (पटकथा), संजय पुरण सिंग चौहान (पटकथा व कथा ), सुमित अरोरा (सवांद)
दिग्दर्शक : – कबीर खान
कलाकार : – रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, पंकज त्रिपाठी
प्रदर्शित तारीख : – २४ डिसेंबर २०२१
भाषा : – हिंदी
देश : – भारत
“ 83 ” चित्रपट समीक्षा :-
क्रिकेट या खेळावर भारतीयांचं तसं विशेष प्रेम. म्हणजे अक्षरशः क्रिकेटचं वेड असलेली एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असते. याच क्रिकेटप्रेमींसाठी दिग्दर्शक कबीर खान यांनी गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ डिसेंबर २०२१ मध्ये “83” हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करून सुखद अनुभव दिला होता.
कोरोनाचं सावट कमी झालं म्हणून वाट बघून अखेर २०२१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जी झळ पोहोचायची ती पोहोचलीच. कारण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच दिवसात पुन्हा निर्बंध घालण्यात आले होते.
भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपचा हा रोमांचकारी अनुभव मोठ्या पडद्यावर दाखवताना कबीर खान आणि सगळ्याच कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येते. या विश्वविजयात मोलाचा वाटा असणाऱ्या कपिल देव यांनी तर तेव्हा भारतीयाच्या मनावर राज्य केलं होत.
रणवीर सिंह आणि दिपिका पादूकोन यांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटाला चार चॉंदलावले आहेत. बरीच वास्तववादी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे. आतापर्यंत बातम्या, पुस्तकांमधून वाचलेल्या या ऐतिहासिक क्षणांना चित्रपटाच्या माध्यमातून बघताना तुम्हाला कसं वाटलं हे चित्रपट बघून नक्की कळवा.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४✰ स्टार.
४.मिमी
वर्ष :- २०२१ कालावधी : – २ तास १३ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५ ✰ / 5✰
शैली : – विनोदी, नाटक
लेखक : – लक्ष्मण उटेकर, रोहन शंकर समृद्धी पोरे
दिग्दर्शक : – लक्ष्मण उटेकर
कलाकार : – कृती सनन, पंकज त्रिपाठी, साई ताम्हणकर
प्रदर्शित तारीख : – २६ जुलै २०२१
भाषा : – हिंदी
देश : – भारत
“ मिमी ” चित्रपट समीक्षा :-
” मला आई व्हायचंय” या मराठी चित्रपटावर आधारित मिमी हा हिंदी चित्रपट २६ जूलै २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. २०११ मध्ये समृद्धी पोरे यांची मुळ कथा असलेल्या मला आई व्हायचंय या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे त्याच कथेवर आधारित चित्रपट बनवताना दिग्दर्शकाची जबाबदारी वाढली होती. पण ही जबाबदारी अगदी लिलया पार पाडत उतेकर यांनी या कथेला पूर्ण न्याय दिला आहे. याआधी सुद्धा त्यांनी इंग्लिश विंग्लिश सारखे सुपरहिट चित्रपट आपल्याला दिले आहेत.
मिमी या चित्रपटाची कथा “सरोगसी” या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारी आहे. क्रीती सेनन, पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर या तिघांनीही आळीपाळीने अभिनयाची फलंदाजी उत्तम केलेली आहे. पंकज त्रिपाठी हा या चित्रपटाचा बोनस पॉईंट आहे. आणि ए.आर. रेहमान यांचं संगीत या चित्रपटाला अजून वरती घेवून जातं.
उत्तर प्रदेशातील मिमी ही एक सामान्य मुलगी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरोगेट मदर होण्याचा निर्णय घेते. भानू (पंकज त्रिपाठी )याच्या मार्फत आलेलं परदेशी कुटुंब मिमी ला जेव्हा फसवून परत निघून जातं त्यानंतर समाजात वावरताना मिमीला काय काय प्रसंगांना सामोरे जावे लागते हे बघताना एका कसलेल्या दिग्दर्शकाची ताकद दिसून येते. कृतीने आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय या चित्रपटात केला आहे.
अतिशय गंभीर तरीही तेव्हढीच गंमतीशीर आणि हलक्याफुलक्या प्रसंगांनी रंगलेली “सरोगेट मदर” चं भावविश्व दाखविणारी “मिमी” ही कथा एकदा तरी नक्कीच बघा.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. तसेच जिओ सिनेमा वर सुद्धा हा चित्रपट विनामूल्य उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४✰ स्टार.
५.शिद्दत
वर्ष :- २०२१ सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास २६ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३ ✰ / 5✰
शैली : – प्रणय
लेखक : – धीरज रत्तन, पूजा सुर्ती, श्रीधर राघवन
दिग्दर्शक : – कुणाल देशमुख
कलाकार : – सन्नी कौशल, राधिका मदन, मोहित रैना
प्रदर्शित तारीख : – १ ऑक्टोंबर २०२१
भाषा : – हिंदी
देश : – भारत
“ शिद्दत ” चित्रपट समीक्षा :-
“सनी कौशल” आणि “राधिका मदन” यांची प्रमुख भूमिका असलेला शिद्दत हा चित्रपट ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात “प्रेमासाठी वाट्टेल ते” असं म्हणणाऱ्या नायकाची भेट होते.
प्रेमकथा आणि हिंदी सिनेमा हे तसं जुनं गणित.
काही गणितं फसली गेली तर काही लोकांना विशेष आवडली. पूर्वी प्रेमकहाणीवर आधारित चित्रपट म्हटलं की हिरो हिरोईन यांच्या प्रेमाला हिरोईन च्या वडिलांचा विरोध आणि मग हाणामारी ही ठरलेली स्टोरी असायची.
पण आता मात्र परिस्थिती आणि काळाशी सुसंगत अशा कथानकावर बेतलेले चित्रपट बघताना जास्त छान वाटतं. कुणाल देशमुख दिग्दर्शित शिद्दत हा चित्रपट त्यापैकी एक. या चित्रपटाची कथा,पटकथा, सिनेमॅटोग्राफी सगळं जुळून आलेलं आहे. स्पोर्ट्स कॅम्प च्या निमित्ताने एकत्र आल्यावर जग्गी(सनी कौशल) हा कार्तिकाच्या (राधिका मदन) हीच्या प्रेमात पडतो पण काही काळाने त्याला कळतं की तीचं लग्न ठरलेलं आहे.
पण हा तिच्या प्रेमात इतका वेडा झालेला असतो की काही करून त्याला तीला मिळवायचं असतं. आणि त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होते. प्रेमाची कबुली दिल्यावर कार्तिका काही अटी ठेवते. त्यानंतर ती त्याचं प्रेम स्विकारते का..? त्या अटी तो पूर्ण करू शकतो का.? त्याला त्याचं प्रेम मिळतं का हे बघण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी नक्कीच बघा.
डिस्ने हॉटस्टार प्लस वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३.५ ✰ स्टार.
६. धमाका
वर्ष :- २०२१ कालावधी : – १ तास ४३ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३✰ / 5✰
शैली : – नाटक, गुन्हेगारी, रोमांचक
लेखक : – राम माधवानी, पुनीत शर्मा
दिग्दर्शक : – राम माधवानी
कलाकार : – कार्तिक अर्यन, मोहम्मद मन्सूर, मृणाल ठाकूर
प्रदर्शित तारीख : – १९ नोव्हेंबर 2021
भाषा : – हिंदी
देश : – भारत
“ धमाका ” चित्रपट समीक्षा :-
२०२१ मध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले होते त्यापैकी काही चित्रपटांनाच प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. राम माधवानी दिग्दर्शित धमाका चित्रपट याबाबतीत लकी म्हणावा लागेल. कार्तिक आर्यन, मृणाल ठाकूर आणि अमृता सुभाष यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता.
ॲक्शन, थ्रिलर हा मुळ बाज असलेला हा चित्रपट एका नावाजलेल्या न्युज ॲंटरकडून त्याचा प्राईम टाईम शो काढून घेण्यात येतो आणि शिक्षा म्हणून रेडिओ जॉकी चं काम त्याच्याकडे सोपवण्यात येतं. हे काम करत असताना एक फोन कॉल येतो आणि धमाका होतो. यखच धमाक्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट.
स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी काहीही करणारी लेडी बॉस अमृताने सुंदर साकारली आहे. सुरूवातीपासून हा चित्रपट खिळवून ठेवतो, ही या चित्रपटाची जमेची बाजू. कार्तिक आर्यन चा अभिनय पाहण्याजोगा. सस्पेन्स थ्रिलर असं आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी धमाका हा “वन टाईम वॉच” म्हणून चांगला पर्याय आहे.
नेटफ्लिक्स वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३.५ ✰ स्टार.
लवकरच याच लेखाचा दुसरा भाग घेऊन तुमच्या भेटीला येऊ. तोपर्यंत यापैकी कोणता चित्रपट पहायला आवडेल ते कमेंट मध्ये जरूर सांगा.
धन्यवाद.
लेखक – आकांक्षा कोलते