FilmsFilms NewsHome

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट भाग – 2

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑक्टोबर 24, 2022 | 6:55 PM

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट तुम्ही पाहीले नसतील तर जरूर बघा.! भाग – २

मध्ये प्रदर्शित झालेले हे हिंदी चित्रपट bhag 1

मागील लेखात आम्ही २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सहा हिंदी चित्रपटांची नावं पाहीली होती, आज काही राहीलेले चित्रपट बघूया जे तुम्ही निदान एकदा तरी बघायला हवे.

१. २०० : हल्ला हो 

वर्ष :- २०२१  सीबीएफसी :- ए  कालावधी : – १ तास ५५ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६✰ / 5✰
शैली                    : –  गुन्हेगारी, रोमांचक, इतिहास
लेखक                  : – अभिजित दास, सार्थक दासगुप्ता, सौम्यजित रोय
दिग्दर्शक             : – सार्थक दासगुप्ता, अलोक बत्रा
कलाकार             : – दीप्ती अवलानी, सलोनी बत्रा, अपूर्व चौधरी, रिंकू राजगुरू
प्रदर्शित तारीख    : – २० ऑगस्ट २०२१
भाषा                    : – हिंदी

“२०० : हल्ला हो ”  चित्रपट समीक्षा :-

नागपूरमध्ये कस्तुरबा नगरमध्ये १३ ऑगस्ट २००४ रोजी घडलेल्या सत्यघटनेवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. “२००: हल्ला हो” या नावावरूनच अंदाज येतो चित्रपटात काय बघायला मिळणार. हा लढा आहे त्या २०० दलित स्त्रियांचा ज्यांनी अत्याचाराविरुद्ध पेटून उठून गुन्हेगाराला स्वतः शिक्षा दिली होती. या चित्रपटात एका महिलेच्या तोंडून “एक महिषासुर को मारेंगे तो दुसरा तैयार होगा” हा डायलॉग ऐकून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची भीषणता लक्षात येते जी आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून विचार करायला भाग पाडते.

“दलित समाज आणि अत्याचार” हे काही नवीन नाही. फार पूर्वीपासून दलित समाज हा उपेक्षित, वंचित राहीलेला आहे. हा सिनेमा हे सगळं समाजाचं प्रतिबिंब पुन्हा एकदा अधोरेखित करतो. सत्यकथेवर आधारित सिनेमा बनवताना त्यात मीठ मसाला न टाकता ती घटना जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहचवणं हे फार जिकिरीचं काम असतं. दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांनी ‘२०० हल्ला हो’ हा सिनेमा बनवून हे जिकीरीचे काम लिलया पार पाडलं आहे.

अमोल पालेकर यांना बऱ्याच वर्षांनी चित्रपटात पाहणं हा सुखद अनुभव आहे. रिंकू राजगुरू हिची या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. उपेंद्र लिमये यांचा अभिनय नेहमीप्रमाणे कमाल.

२००४ मध्ये नागपूर मध्ये “बल्ली चौधरी” या गुंडांच्या अत्याचारांना कंटाळून जवळपास २०० दलित महिला भर न्यायालयात त्याच्यावर सत्तरहून अधिक वार करत त्याचा खून करतात. आणि याच महिलांमधील पाच महिलांविरूद्ध खटला चालू होतो. या सगळ्यात राजकारणी, पोलिस यांच्या काय भूमिका असतील हे तुम्हाला सांगायला नकोच. दलित विरूद्ध उच्चवर्णीय हा वाद तसा जुनाच पण या घटनेने अख्ख्या जगाला दखल घ्यायला लावली होती. आता हा खटला काय.? पुढे काय निकाल लागतो हे सगळं पाहण्यासाठी हा सिनेमा जरूर बघा.

ऑगस्ट २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट तुम्ही “झी5” वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ४.५✰ स्टार.

 २. अंतिम : द फायनल ट्रूथ

वर्ष :- २०२१  सीबीएफसी :- यु / ए  कालावधी : – २ तास १८ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५✰ / 5✰
शैली                    : – ॲक्शन, नाटक, गुन्हेगारी
लेखक                  : – महेश मांजरेकर, अभिजित देशपांडे, सिद्धार्थ साळवी
दिग्दर्शक             : – महेश मांजरेकर
कलाकार             : – सलमान खान, आयुष शर्मा, महिमा मकवाना, सचिन खेडेकर
प्रदर्शित तारीख    : – २६ नोव्हेंबर २०२१
भाषा                    : – हिंदी

“अंतिम : द फायनल ट्रूथ”  चित्रपट समीक्षा :-

२०१८ साली आलेला मराठी चित्रपट “मुळशी पॅटर्न” हा खूप गाजला होता. प्रविण तरडे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे “अंतिम: द फायनल ट्रूथ”. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलमान खान आणि आयुष्य शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

जमिनमालक असलेला शेतकरी कमी मोबदल्यात आपल्या जमिनी धनदांडग्याना विकून स्वतः देशोधडीला लागतो. आपल्याच जमिनीत चाकरी करतो.

पुण्याच्या मार्केट यार्डात हमाल म्हणून काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला म्हणजेच राहुल (आयुष शर्मा) हे सारं सहन न झाल्याने हा मुलगा भू-माफिया बनतो.  परिस्थितीमुळे हतबल झालेल्या आणि दिवसेंदिवस गुंडप्रवृत्ती वाढत जाणाऱ्या राहुलची ही गोष्ट ‘अंतिम’मध्ये दाखवण्यात आली आहे.

ज्यांनी मुळशी पॅटर्न पाहीला त्यांच्यासाठी कथा नवीन नसली तरी सलमान चा खास फ्लेवर असलेला हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. नेहमी दबंग स्टाईल मध्ये दिसणारा सलमान खान या चित्रपटात वेगळा भासतो. यात त्याचा कथानकाला अनुसरून अभिनय बघायला मिळतो. एका पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेतील सलमान नेहमीपेक्षा जास्त भाव खाऊन जातो. आयुषने सुद्धा या चित्रपटात चांगली भूमिका साकारली आहे. राहुल आणि मंदा यांची लव्हस्टोरी उगीच घुसवल्यासारखी वाटते पण तरीही एकंदर सलमानचं वेगळेपण आणि महेश मांजरेकरांचा स्पेशल टच असलेला हा चित्रपट तुम्ही बघायलाच हवा.

हा चित्रपट तुम्ही “झी5” वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३.५✰ स्टार.

३. छोरी 

वर्ष :- २०२१  सीबीएफसी :- यु / ए  कालावधी : – २ तास ९ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९✰ / 5✰
शैली                    : – भयपट, नाटक, रोमांचक
लेखक                  : –  विशाल फुरिया, विशाल कपूर
दिग्दर्शक              : – विशाल फुरिया
कलाकार             : – नुश्रत्त भरुच्चा, मिता वसिष्ठ, सौरभ गोयल
प्रदर्शित तारीख    : – २६ नोव्हेंबर २०२१
भाषा                    : – हिंदी

“छोरी”  चित्रपट समीक्षा :-

एखाद्या इतर प्रादेशिक भाषेतील मुळ चित्रपटाचा हिंदी भाषेत रिमेक बनवणं हे बॉलिवूड साठी काही नवीन नाही. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झालेला “छोरी” हा सिनेमा सुद्धा लपाछपी या मराठी चित्रपटावर आधारित आहे. म्हणजेच लपाछपीचा हिंदी रिमेक म्हणजे छोरी.

ही एक भयकथा असून “नुसरत भरूचा” ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसते. भयचित्रपट म्हटलं की हॉरर, सस्पेन्स, थ्रिल हे सगळंच हवं. बघताना भिती वाटली तरी शेवटपर्यंत उत्कंठा वाढत गेली पाहिजे. आणि हे सगळं करण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे. काही किरकोळ गोष्टी सोडल्या तर सिनेमा उत्तम आहे.

एका् नवीन लग्न झालेल्या जोडप्याची म्हणजे हेमंत (सौरभ गोयल)आणि साक्षीची(नुसरत भरूचा) ही गोष्ट आहे. काही कारणास्तव सुरक्षेच्या दृष्टीने शहरातून ते गावी रहायला येतात. त्यात साक्षी गरोदर असते आणि ते जिथे राहत असतात तिथे अशा काही विचित्र, अतर्क्य गोष्टी घडायला सुरुवात होते की बघताना आपल्या अंगावर भितीचा काटा आल्याशिवाय राहत नाही. नुसरतने या चित्रपटासाठी केलेली विशेष तयारी तिच्या अभिनयातून दिसून येते.

हा एक गुढ भयपट असल्याकारणाने ती कथा सांगितली तर मजा निघून जाईल पण ही गोष्ट काय आणि अशा नक्की काय घटना घडतात हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहायला हवा.

ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३✰ स्टार.

 ४. हसीन दिलरूबा

वर्ष :- २०२१  सीबीएफसी :- यु / ए  कालावधी : – २ तास १६ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९✰ / 5✰
शैली                    : – नाटक, गुन्हेगारी, रहस्य, प्रणय
लेखक                  : – कणिका धिल्लोन
दिग्दर्शक              : – विनील मॅथीव
कलाकार             : – तापसी पन्नू, विक्रांत मॅसी, हर्षवर्धन राणे
प्रदर्शित तारीख    : – २ जुलै २०२१
भाषा                    : – हिंदी

“हसीन दिलरूबा”  चित्रपट समीक्षा :-

“पागलपन की हद से ना गुजरे, वो प्यार ही कैसा.?” असं म्हणणाऱ्या राणी(तापसी पन्नू) चा हा चित्रपट नावावरून प्रमेवेड्या जोडीची प्रेमकथा वाटू शकतो. पण जूलै २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला “हसीन दिलरूबा” हा चित्रपट थोडा वेगळा आहे.

आपल्याच नवऱ्याच्या खूनाविरूदध चालू असलेल्या खटल्यात तीची कहाणी रहस्यमय रितीने उलगडत जाते. पत्रिकेत मंगळ असल्यामुळे जे मिळालं ते पवित्र झालं असं म्हणून राणीच्या घरचे तीचं लग्न अतिशय साध्या सरळ असलेल्या रिशू (विक्रांत मेस्सी) सोबत लावून देतात. पण बोल्ड असलेल्या राणीचा संसार रिशू सोबत काही मार्गी लागत नाही. म्हणून राणी रिषूच्या मावसभावाच्या प्रेमात पडते. अशी ही कहाणी पुढे रंगत जाते.

घरातील सिलिंडरच्या स्फोटामुळे रिशूचा मृत्यू होतो की खरंच राणी त्याचा खून करते हे पाहणं रोमांचकारी आहे. एका कथा उपन्यासकार यांच्या प्रभावाखाली असलेल्या तापसीचे डायलॉग्स अप्रतिम आणि विचार करायला लावणारे आहेत. “संबंध तो मानसिक होते है, शारीरिक तो संभोग होता है!” असं बोलणारी राणी प्रेक्षकांना वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडते.

“हर कहानी के ना बोहोत पैलू होते हैं फरक बस ये होता हैं की कहानी सुना कौन रहा हैं….” हा राणीचा डायलॉग इथेही लागू होतो. आम्ही काही सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष चित्रपट बघणं जास्त उचित ठरेल, आणि तरचं या कथेचे बाकीचे पैलू तुम्हाला सापडतील.

तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे आणि पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेतील आदित्य श्रीवास्तव या सगळ्यांच अभिनय अफलातून झालेला आहे.

क्राईम, सस्पेन्स थ्रिलर अशा धाटणीचे चित्रपट बघणाऱ्यांना हा चित्रपट लवकर उलगडेल पण नक्कीच आवडेल. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३✰ स्टार.

५. पगलैट

वर्ष :- २०२१  सीबीएफसी :- यु  कालावधी : – १ तास ५५ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९✰ / 5✰
शैली                    : – नाटक, विनोदी
लेखक                  : – उमेश बिस्ट
दिग्दर्शक              : – उमेश बिस्ट
कलाकार             : – सायना मल्होत्रा, सयानी गुप्ता, शिबा चड्डा
प्रदर्शित तारीख    : – २६ मार्च २०२१
भाषा                    : – हिंदी

“पगलैट”  चित्रपट समीक्षा :-

काही चित्रपट हे जास्त मसालेदार नसले तरी त्याची कथा इतकी अर्थपूर्ण असते, त्याचा आशय इतका खोल असतो की तो संपूर्ण चित्रपट आपल्याला माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो. रोजचं ठरलेलं आयुष्य जगत असताना, समाजाने घालून दिलेल्या चौकटीत तेच तेच नियम, चालीरीती पाळताना आपण खोटं खोटं तर जगत नाही ना? असा प्रश्न उपस्थित करणारा पगलैट हा चित्रपट.

लखनऊच्या एका सामान्य अशा “गिरी कुटुंबाची ही गोष्ट. त्यांचा कमावता मुलगा आस्तिक हा लग्नानंतर  पाच महिन्यांतच सगळ्यांना सोडून जातो. आणि इथूनच पुढचे “ते तेरा” दिवस काय काय होतं हे हा सिनेमा दाखवतो.

या कुटुंबाची सुन संध्या(सान्या मल्होत्रा)आपला नवरा मेला आहे म्हणून स्वतःला खोलीत कोंडून घेते पण तीला नक्की कसं व्यक्त व्हावं हेच कळत नसतं. प्रत्येक वेळी रडलं म्हणजे दुःख साजर करता येतं असं नाही, असं संध्याचं म्हणणं आहे. मुळात एक सुशिक्षित, स्वतःचे विचार असणाऱ्या संध्याला पतीच्या निधनानंतर बरेच प्रश्न पडतात. नुसतं लग्नं झालं म्हणजे नाही तर मनं जुळायला हवीत पण नेमकं तेच का झालं नाही याचा शोध घेणं तीला महत्वाचं वाटतं.

चित्रपटात ट्विस्ट येतो जेव्हा सगळ्यांना कळतं की संध्याच्या नवऱ्याने पन्नास लाखांची पॉलिसी काढलेली असते आणि नॉमिनी म्हणून संध्याचं नांव असतं. या प्रसंगी सुरुवातीला लग्न झालेल्या मुलीची जबाबदारी सासरच्या मंडळींची असं म्हणणारे तीचे सख्खे आईवडील सुद्धा पैशांच्या मोहापायी बदलतात. या सगळ्याचं प्रसंगात संध्या, तीचे सासू सासरे त्यांची होणारी कुचंबणा, दुःख या सगळ्यावर संध्या काय तोडगा काढते..? ते पैसे घेऊन ती कुठे निघून जाते का.? हे सगळं पाहण्यासाठी पगैलेट हा मार्च २०२१ ला प्रदर्शित झालेला सिनेमा नक्कीच बघा.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३✰ स्टार.

 ६. तूफान

वर्ष :- २०२१  सीबीएफसी :- यु / ए   कालावधी : – २ तास ४३ मिनिटे
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९✰ / 5✰
शैली                    : – ॲक्शन, नाटक, खेळ
लेखक                  : – विजय मौर्य, अंजुम राजबली
दिग्दर्शक              : – राकेश मेहरा,
कलाकार             : – फरहान अख्तर, मृणाल ठाकूर, परेश रावल
प्रदर्शित तारीख    : – १६ जुलै २०२१
भाषा                    : – हिंदी

“तूफान”  चित्रपट समीक्षा :-

ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना विशेष प्रतिक्षा होती कारण त्याचा ट्रेलर. १६ जूलै २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला तूफान पसंती मिळाली होती. पण कधी कधी खूप अपेक्षा ठेवल्या की पदरी निराशा पडते असं थोडंफार या चित्रपटाच्या बाबतीत झालं होतं.

एका “बॉक्सर” च्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. बॉक्सिंग वर आधारित सिनेमे याआधीही येऊन गेले. स्पोर्ट्स किंवा बॉक्सिंग हा पाया असलेला चित्रपट अज्जू(फरहान अख्तर) आणि अनन्या (मृणाल ठाकूर)यांच्या लव्हस्टोरी मुळे बराच लांबला किंवा भरकटला आहे असं वाटतं.

मुंबईतील डोंगरी इथला अनाथ अजीज उर्फ अज्जू भाई परिस्थितीमुळे गुंडप्रवृत्ती कडे वळतो. पण अनन्या आयुष्यात आल्यावर ती त्याला चांगल्या मखर्गावर आणण्याचा प्रयत्न करते. त्याच्याकडे असलेल्या ताकदीचा बॉक्सिंग साठी चांगला उपयोग होईल असं सांगून त्यांचं मतपरिवर्तन करते. बॉक्सिंग च्या प्रशिक्षणासाठी नाना प्रभू हे गुरू म्हणून आयुष्यात येतात. आणि त्याचा प्रवास सुरू होतो.

पण नेहमीच्या ठरलेल्या कथानकानुसार पुढे जाऊन बऱ्याच अडचणी येतात. संघर्ष करावा लागतो. वैगरे वैगरे. पण या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे यातील कलाकार. फरहान अख्तर, परेश रावल, डॉ. मोहन आगाशे तसेच मृणाल ठाकूर या सगळ्यांचा अभिनय पाहण्याजोगा आहे. त्यामुळे हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही.

ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

रेटिंग २.८/५

चला आता पटापट कमेंट करून सांगा कोणता सिनेमा सगळ्यात आधी पहायला आवडेल.

धन्यवाद.

लेखक – आकांक्षा कोलते

Akanksha 20Kolte 20bio

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *