२०२२ मधील सुपर हिट दाक्षिणात्य चित्रपट ज्यांच्यासमोर बॉलिवूडची जादू सुद्धा फिकी पडली असे दमदार कंटेंट असलेले हे दाक्षिणात्य चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जानेवारी 29, 2023 | 04:09 PM
ज्यांच्यासमोर बॉलिवूडची जादू सुद्धा फिकी पडली असे दमदार कंटेंट असलेले हे दाक्षिणात्य चित्रपट तुम्ही पाहीलेत का? आपल्याकडील प्रेक्षकवर्ग हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा जेवढा चाहता आहे तेवढ्याच आवडीने तो दाक्षिणात्य चित्रपटांना सुद्धा दाद देतो. गेल्या काही वर्षांत तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दाक्षिणात्य चित्रपट हे “मुळ” धरून असतात. म्हणजे आपल्या प्रदेशावर, भाषेवर, संस्कृती, परंपरांवर त्यांचं किती प्रेम आहे हे प्रत्येक साऊथ इंडियन मुव्ही मध्ये दिसून येते. आज असेच २०२२ मध्ये प्रदर्शित झालेले दहा सुपरडुपर हिट चित्रपट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे तुम्ही हिंदी भाषेत पाहू शकता किंबहुना तुम्ही ते बघायलाच हवेत.

१. आर आर आर |
लेखक | के. व्ही. विजयेंद्र प्रसाद |
दिग्दर्शक | एस. एस. राजामौली |
कलाकार | एनटीआर ज्युनियर,रामचरण,अजय देवगण,आलिया भट,श्रीया सरण,मकरंद देशपांडे,रे स्टीव्हेन्सन,एलिसन |
संगीत | एम एम किरावानी |
प्रदर्शित तारीख | २४ मार्च २०२२ |
भाषा | तेलुगू |
“आर आर आर” चित्रपट समीक्षा :-
२०२२ हे वर्ष दाक्षिणात्य चित्रपटांसाठी नक्कीच विशेष आहे. म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांना भरभरून हे नक्की. कामाप्रती निष्ठा, कलेविषयी आदर आणि स्वतःच्या परंपरा, संस्कृतीशी जोडलेली नाळ ही दाक्षिणात्य चित्रपटांची खासियत. हेच परत एकदा सिद्ध करणारा चित्रपट म्हणजे आर आर आर म्हणजेच “राइज, रोर, रिवोल्ट”.
“आरआरआर” या चित्रपटाची कथा आहे १९२० साली घडणारी. आता तेव्हा ब्रिटिशांची जुलूमशाही होती हे काही वेगळं सांगायला नको. यात एक ब्रिटीश गव्हर्नर आणि त्याची पत्नी एका गोंड जमातीच्या मुलीला बळजबरीने गुलाम म्हणून घेऊन जातात. हि मुलगी म्हणजे माली. आता हिला सोडविण्यासाठी भिमा म्हणजे एनटीआर ज्युनियर थेट दिल्ली गाठतो आणि नाव बदलून राहत असतो. आता तिथं गेल्यावर त्याची मैत्री होते सिताराम म्हणजे रामचरण सोबत.
गोष्ट खरी सुरु होते जेव्हा सिताराम हा ब्रिटिश सैन्यातील पोलिस “भिमा” ला पकडण्यासाठी स्कॉटच्या पत्नीचं आव्हान स्विकारतो जेव्हा की त्याला माहीत नसतं त्याचा मित्र हाच भिमा आहे. आता पुढे काय आणि कसं होतं. माली सुटते का.? भिमा आणि सिताराम ची मैत्री टिकते का हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. राजमौली म्हणजे मोठ्या पडद्यावर साकारलेली भव्य दिव्य कलाकृती. हे तुम्हाला हा चित्रपट बघताना परत एकदा जाणवेल. आलिया भट्ट, अजय देवगण, मकरंद देशपांडे यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी लक्षात राहण्याजोग्या आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. डिस्नी हॉटस्टार वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
२. केजिएफ २ |
लेखक | प्रशांत नील |
दिग्दर्शक | प्रशांत नील |
कलाकार | यश, संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रविना टंडन, प्रकाश राज |
निर्माता | विजय किरगंदूर |
संगीत | रवी बसरूर |
प्रदर्शित तारीख | १४ एप्रिल २०२२ |
भाषा | कन्नड |
“केजिएफ २” चित्रपट समीक्षा :-
भारतीय सिनेमामध्ये नवीन इतिहास रचणारा हा सिनेमा म्हणजे “केजिएफ २”. बॉलिवूडच्या साम्राज्याला आव्हान देणारा हा चित्रपट म्हणू शकतो. कन्नड भाषेतील हा चित्रपट हिंदीत डब करण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही बघूच शकता. बऱ्याच जणांनी तर पाहीला पण असेल.
या चित्रपटात कथानक हे भव्यता आणि रंजकता या दोन्ही गोष्टींना पुरेपूर न्याय देताना दिसतं. यि चित्रपटाची कथा सांगण्यापेक्षा ती बघण्यातच खरी मजा आहे. ज्या पद्धतीने चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे ती जास्त रंजक आहे. ॲक्शन सीन्स, सिनेमॅटोग्राफी, अचूक कास्टींग , दिग्दर्शन , अभिनय सगळं कमाल आहे.
संजय दत्त याने ज्या पद्धतीने चित्रपटातील अधिरा हा व्हिलन साकारला आहे, त्याच्या जागी अजून कोणी आपण इमॅजिन करूच शकत नाही. आणि हे प्रत्येक पात्रासाठी लागू पडतं.
“केजिएफ’ या सोन्याच्या खाणीच्या मालकीवरून वाद आहेत. केजिएफच्या साम्राज्यावर स्वतःचं अधिपत्य मिळवण्यासाठी रॉकी आणि अधिरा यांच्यातील वादावर हा चित्रपट आधारित आहे पण या सगळ्यामागे उभी आहे ती “डार्क क्विन” रामिक सेन ज्या देशाच्या पंतप्रधान आहेत. रवीना टंडन हीने ही रामिक सेन अतिशय ताकदीने उभी केली आहे. “रॉकी” म्हणजेच यश हा चित्रपटाचा नायक की खलनायक हे तुम्हीच ठरवा. त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच. एकंदरच सगळ्याच बाबतीत चित्रपट सुपरहिट आहे. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे,नक्की बघा. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
३. जन गण मन |
लेखक | शरीस मोहम्मद |
दिग्दर्शक | डिजो जोस ॲन्टोनी |
कलाकार | पृथ्वीराज सुकुमारन, सूरज व ममता मोहनदास |
निर्माता | सुप्रिया मेनन , लिस्टीन स्टिफन |
संगीत | जेक्स बेजॉय |
प्रदर्शित तारीख | २८ एप्रिल २०२२ |
भाषा | मल्याळम |
” जन गण मन” चित्रपट समीक्षा :-
डिजो जोस ॲन्टोनी दिग्दर्शित ‘जन गण मन’ हा मल्याळी चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा एक असा ठराविक जॉनर नसून याला बरेच पैलू आहेत. राजनीती, क्राईम,ड्रामा, सस्पेन्स , थ्रिलर हे सगळं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. आपण जे ऐकतो बघतो त्यावर पटकन विश्वास ठेवून आपलं एक मत तयार करतो जे अर्थात काही क्षणांत बदलत सुद्धा. हेच या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाला सांगायचं आहे.
गोष्ट सुरु होते कर्नाटकातील एका विद्यापीठात. सबा म्हणजेच ममता मोहनदा ही प्राध्यापिका या विद्यापीठातील एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणाविरोधात आवाज उठवते म्हणून तिची सुद्धा हत्या करण्यात येते. याच खूनाचा शोध लावण्यासाठी इन्स्पेक्टर सज्जन कुमार म्हणजे सूरज या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. काहीच दिवसात सज्जन कुमार या चार गुन्हेगारांना शोधून काढतो. पण इथे कथा संपत नाही उलट इथे ती सुरू होते.
सबाला ज्यांनी जाळून मारलेलं असतं त्या चौघांची सुटण्याची शक्यता जास्त दिसताच सज्जन कुमार त्यांना त्याच ठिकाणी घेऊन जातो जिथे सबाचा खून केलेला असतो आणि तिथे त्यांचा एन्काउंटर करतो. आता हे सगळं प्रकरण कोर्टात जातं आणि वकील अरविंद सुब्रह्मण्यन म्हणजे पृथ्वीराज सुकुमारन एन्काउंटर झालेल्या युवकांची केस लढण्यासाठी उभा राहतो.
आता समाजाची सहानुभूती नक्कीच सज्जन कुमार च्या बाजूने असते पण असं काय घडतं की हेच लोक उलटसुलट चर्चा करून सज्जन कुमार ला व्हिलन ठरवू लागतात. हि केस कोण जिंकतं. पुढे काय होतं हे सगळं बघणं फार रोमांचकारी आहे. हे असं सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः हा चित्रपट बघून अनुभव घ्या. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार.
४. मेजर |
लेखक | अदिवी शेष |
दिग्दर्शक | शशी किरण टिक्का |
कलाकार | महेश बाबू, नम्रता शिरोडकर, अनुराग रेड्डी, शरद चंद्रा |
निर्माता | अदिवि शेष, सई मांजरेकर, सोभिता |
संगीत | श्रीचरण पकाला |
प्रदर्शित तारीख | २४ मे २०२२ |
भाषा | तेलुगु / हिंदी |
“मेजर” चित्रपट समीक्षा :-
२६/११ चा हल्ला. आठवलं तरी काळजाचा थरकाप उडतो आणि तेवढाच संताप सुद्धा होतो. अख्ख्या देशाला हादरवून टाकणारी ती रात्र होती. काळरात्र ठरलेल्या २६/११च्या हल्ल्यात अनेक जवान, पोलिस शहीद झाले. त्यापैकीच ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर उन्नीकृष्णन यांनीसुद्धा देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचं हे बलिदान मुंबईच्या किंबहुना देशाच्या इतिहासात कधीही न विसरण्यासारखं आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा जीवनपट उलगडणारा “मेजर” हा चित्रपट आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले NSG चे एकूण ५१ जवानांना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. २६/११ चा तो हल्ला आठवला तरी भीती, चीड, संताप अशा संमिश्र भावना दाटून येतात.
दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवि शेष याने “संदीप उन्नीकृष्णन” यांची मुख्य भूमिका साकारली असून अतिशय उत्तम अभिनय केला आहे. वैयक्तिक, वैवाहिक आयुष्य असतं, नातीगोती हे सगळं मागे टाकून जराही विचार न करता हे फक्त आणि फक्त देशासाठी जवान आपला प्राण गमवायला तयार होतात. आपण इथं समाधानाने बिनघोर आयुष्य जगू शकतो कारण कोणीतरी स्वतःच्या जीवावर उदार होऊन जवान म्हणून सीमेवर उभे असतात. जवान , सैनिक होतं हे इतकं सोपं नसतं. त्यांच्या आईवडिलांच्या मनाचा मोठेपणा यात बघायला मिळतो. एकंदरच प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट बघायला हवा. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार.
५. विक्रम |
लेखक | लोकेश कनगराज |
दिग्दर्शक | लोकेश कनगराज |
कलाकार | कमल हसन, विजय सेतुपती, फहाद फासील, नरेन, कालिदास जयराम, गायत्री शंकर, वासंती |
निर्माता | कमल हसन , आर. महेंद्रन |
संगीत | अनिरुद्ध रवीचंदर |
प्रदर्शित तारीख | २४ मे २०२२ |
भाषा | तमिळ |
“विक्रम” चित्रपट समीक्षा :-
३ जून २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या “विक्रम” या तमिळ चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की टॉलिवूड सुद्धा कुठे कमी नाही. कमल हसन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका सुद्धा कमल हसन आणि विजय सेतुपती यांच्या आहेत.
हा चित्रपट थ्रील, ॲक्शन, ड्रामा, सस्पेन्स या सगळ्याने पुरेपूर भरलेला आहे. ड्रग्स माफिया आणि पोलिस तसेच शहरात घडणाऱ्या विचित्र घटना, एकामागून एक होणारे खुन यावर चित्रपटाची कथा बेतलेली आहे. शहरातील उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना शोधून त्यांचे अशाप्रकारे खून होत असतात की जणू काही “खूनी” कोणता तरी बदला पूर्ण करतोय. प्रत्येक खून करताना तो चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचा मास्क लावून तो खून करतो. त्याचा शोध घ्यायलाच एक आता तो हे सगळे खुन का करतोय ते चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
कमल हसन यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. त्या सगळ्यांसाठी विक्रम हा चित्रपट म्हणजे नक्कीच मेजवानी असेल. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट उपलब्ध आहे.
६. ७७७ चार्ली |
लेखक | किरणराज के |
दिग्दर्शक | किरणराज के |
कलाकार | रक्षित शेट्टी, श्रीनगरी, राज बी शेट्टी |
संगीत | नोबीन पोल |
प्रदर्शित तारीख | १० जून २०२२ |
भाषा | कन्नडा |
“७७७ चार्ली” चित्रपट समीक्षा :-
हिंदी, तेलगू आणि तमिळ च्या तुलनेत कन्नड भाषेतील चित्रपट फारसे प्रेक्षक बघत नसत पण केजीएफ ने सगळी सुत्र बदलू टाकली असं म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शक किरणराज के दिग्दर्शित "७७७ चार्ली" हा सिनेमा १० जून रोजी प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी त्याला योग्य तो प्रतिसाद दिला. विशेषकरून श्वानप्रेमी प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त भावला.
ॲडव्हेंचर, कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटात रक्षित शेट्टी, श्रीनगरी, राज बी शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा एक श्वान आणि माणूस यांच्यातील भावबंध उलगडणारा चित्रपट आहे जो बघताना तुम्ही नक्कीच भावनाविवश व्हाल. धर्मा नावाच्या माणसाची ही गोष्ट आहे ज्या गोष्टीमध्ये "चार्ली" ची एन्ट्री झाल्यावर धर्माचं आयुष्य बदलून जातं. सकाळी उठून कामाला जाणे, आल्यावर इडली खाऊन झोपणे या व्यतिरिक्त आयुष्यात काहीच नाही, असं आयुष्य जगणाऱ्या धर्माच्या आयुष्यात चार्ली कशी येते.? कुठुन येते.? चित्रपटाच्या शेवटी महाभारतातील काही गोष्टींचा संदर्भ कसा आहे हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट जरूर बघा. अतिशय सुंदर अशी कलाकृती आहे. काही चित्रपट हे अनुभवायचे असतात, हा चित्रपट त्यापैकी एक. रक्षीत शेट्टी यांनी कमाल अभिनय केला आहे.
चित्रपटाची कथा अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने लिहीली गेली आहे. चार्लीचं अस्तित्व सुद्धा ज्या धर्माला आवडत नसतं तोच धर्मा चार्ली ला घेऊन नवीन प्रवासाला निघतो हे बघणं सुखावह आहे. बर्फाळ प्रदेशात त्यांना फिरताना बघून आपसूकच आपण भावूक होतो. तुम्हाला पाळीव प्राण्यांची आवड असो किंवा नसो हा चित्रपट सगळ्यांनीच अनुभव घ्यावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार.
७. रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट |
लेखक | आर. माधवन |
दिग्दर्शक | आर. माधवन |
कलाकार | आर माधवन, सिमरन बग्गा , रजित कपूर, शाहरुख खान |
निर्माता | आर. माधवन ,सरीता माधवन, विजय मूलान |
संगीत | सॅम सी. एस. |
प्रदर्शित तारीख | १ जुलै २०२२ |
भाषा | तमिळ |
“रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट” चित्रपट समीक्षा :-
आर. माधवन निर्मित, दिग्दर्शित रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट हा मुळ तमिळ भाषेतील चित्रपट १ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि तरीही उपेक्षित असणाऱ्या एका महान भारतीय वैज्ञानिकाची ही जीवनकहाणी आहे. जेष्ठ वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्यावर आधारित हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने पहावा असा आहे. या चित्रपटात फक्त नम्बी यांचा जीवनपट नसून इस्रोचा देखील प्रवास यात बघायला मिळतो.
‘इस्रो’ मध्ये शास्त्रज्ञ असणारे नम्बी स्कॉलरशिपवर विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रिन्स्टन’ विद्यापीठात शिकण्यासाठी जातात. आणि चक्क ‘नासा’ सारख्या संस्थेची ऑफर धुडकावून आपल्या देशप्रेमापोटी भारतात येतात. पण नासाची लाखोंची नोकरी सोडून इस्रो मध्ये दाखल होणाऱ्या याच वैज्ञानिकावर देशद्रोहाचा खटला चालतो.
रॉकेट निर्मितीचं तंत्रज्ञान त्यांनी पाकिस्तानला विकलं असा आरोप त्यांच्यावर केला जातो. अर्थात या सर्वांविरूद्ध ते कायद्याने लढतात. या कठीण परिस्थितीत त्यांच्या बाजूने खूप कमी लोक उभे राहतात. पण तरीही न डगमगता ते संघर्ष सुरू ठेवतात. नम्बी यांच्या वाट्याला आलेली अवहेलना बघून नक्कीच चीड येते. आर. माधवन याने अतिशय अभ्यासपूर्ण या चित्रपटाच्या कथेचं लिखाण केले आहे. नम्बींचा संपूर्ण संघर्ष राकेट्री मध्ये बघायला मिळतो. आर. माधवन याने निर्मिती , लेखन, दिग्दर्शन या सगळ्या बाजू सक्षमपणे सांभाळल्या आहेत. एकंदरच हा चित्रपट तुम्ही नक्की बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
८. गार्गी |
लेखक | हरीहरन राजू, गौतम रामचंद्रम |
दिग्दर्शक | गौतम रामचंद्रम |
कलाकार | साई पल्लवी |
संगीत | गोविंदा वसंता |
प्रदर्शित तारीख | १५ जुलै २०२२ |
भाषा | तमिळ |
“गार्गी” चित्रपट समीक्षा :-
१५ जुलै २०२२ रोजी सोनी लिव्ह वर प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट गार्गी हा २०२२ मधील अजून माईलस्टोन म्हणावा लागेल. साई पल्लवी हिची मध्यवर्ती भूमिका असलेला हा चित्रपट ट्विस्ट ने भरलेला आहे. बघताना लक्षात येतं की हा सिनेमा फक्त चित्रपटातील कथेपूरता मर्यादित नाही. तर समाजातील कितीतरी गोष्टींचा खुलासा करणारा हा चित्रपट आहे.
एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करणारी “गार्गी” हि एक मध्यमवर्गीय घरातील मुलगी आहे. खाऊन पिऊन सुखी असलेल्या या कुटुंबावर अचानक एक दिवस संकट येतं. एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गार्गी च्या वडिलांना अटक होते. आणि इथून खरा चित्रपट सुरू होतो. कोर्टातील केस उभी राहील्यावर तिच्या वडिलांची केस घेण्यासाठी कोणताच वकील तयार होत नाही. पण तरीही गार्गी हार मानत नाही.
ती तिच्या वडिलांना सोडवेल का.? हे बघण्यासाठी सोनी लिव्ह वर हा चित्रपट नक्की बघा. चित्रपटाच्या शेवटी जो क्लायमॅक्स येतो तो बघून तुमचे डोळे नक्कीच विस्फारले जातील. अभिनय, कथा, दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी जुळून आल्यामुळे चित्रपट अतिशय उत्तम बनलेला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार.
९. सीता रामन |
लेखक | राजकुमार कंदामुडी, हनु राघवपुडी |
दिग्दर्शक | हनु राघवपुडी |
कलाकार | दुलकर सलमान, मृणाल ठाकूर , रश्मिका मंदाना |
संगीत | विशाल चंद्रशेखर |
प्रदर्शित तारीख | ५ ऑगस्ट २०२२ |
भाषा | तेलुगु |
“सीता रामन” चित्रपट समीक्षा :-
‘सीता रामम’ हा तेलुगु चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. जो अर्थात तुम्ही आता ओटीटी प्लॅटफॉर्म वर हिंदी मध्ये सुद्धा पाहू शकता. दुलकर सलमान हा मल्याळम आणि तमिळ अभिनेता या चित्रपटात मुख्य म्हणजे रामाची भूमिका साकारत आहे, त्याच्यासोबत मृणाल ठाकूर ही अत्यंत सालस आणि सुंदर अशा सितेच्या भुमिकेत आहे.
सीता रामम ही अत्यंत हृदयस्पर्शी प्रेमकथा आहे. भारत-पाकिस्तानामध्ये १९७१ साली घडलेल्या युद्धावर आधारित आहे ही कथा आहे. त्यामुळे १९६० ते १९८० च्या दरम्यानचा काळ यात दाखवला आहे. राम आणि सीता यांच्या प्रेमकथेसोबत या दशकातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी पडद्यावर दाखवणारा सीता रामम हा चित्रपट आहे.
हैदराबाद आणि काश्मीर या शहरांची सुंदर सफर या चित्रपटात घडते. त्या वेळी रेडिओवर लेफ्टनंट रामची वीर कथा देशभरातील लोक ऐकत असतात. अनाथ म्हणून वाढलेल्या रामची कथा ऐकून लोकांना त्याच्याबद्दल आत्मियता, प्रेम, सहानुभूती वाटते आणि मग संपूर्ण देशभरातून लोक त्याला पत्र लिहू लागतात. आणि इथुनच सीता आणि रामची प्रेमकहाणी सुरू होते.
रामाला आपला पती मानणाऱ्या सीतालक्ष्मीचे पत्र रामला येतं. आणि नियमितपणे येऊ लागतं. जणू काही ती खरंच त्याची पत्नी आहे. आणि राम त्या पत्रांच्या प्रेमात पडून आपल्या सीतेला शोधण्यासाठी निघतो. तो तीला भेटतो का.? त्यांची प्रेमकहाणी कशी फुलते हे बघण्यासाठी चित्रपट नक्की बघा.
हि सगळी कथा समजते तो काळ १९८४ चा आहे. ज्यामध्ये लंडनमध्ये शिकणारी पाकिस्तानी मुलगी म्हणजेच रश्मिका मंदाना ही आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात येते. तिच्याकडे एक पत्र आहे जे रामने सीतालक्ष्मीसाठी लिहिलेले आहे. आता ते पत्र पाकिस्तानी अधिकाऱ्याकडे कसं जातं. ? रामचं शेवटचं पत्र सीतालक्ष्मीला मिळतं का.? हा अतिशय रोमांचक अनुभव आहे. थोडाफार सस्पेन्स यात बघायला मिळतो. चित्रपट लांबीला थोडा जास्त वाटू शकतो. पण हि प्रेमकथा एकदातरी अनुभवायला हवीच. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
१०. कार्तिकेय २ |
लेखक | चंदू मोंदेती |
दिग्दर्शक | चंदू मोंदेती |
कलाकार | निखिल सिद्धार्थ, अनुपम खेर, अनुपमा परमेश्वरन, श्रीनिवास रेड्डी , विवा हर्षा आणि आदित्य मेनन |
संगीत | कालभैरव |
प्रदर्शित तारीख | १३ ऑगस्ट २०२२ |
भाषा | तेलुगु |
“कार्तिकेय २” चित्रपट समीक्षा :-
चंदू मोंदेती यांनी दिग्दर्शित “कार्तिकेय २” हा तेलगू भाषेतील चित्रपट रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी खरं तर बॉलिवूड मधील सुपरस्टार मि. परफेक्शनिस्ट आमिर खान चा लालसिंग चढ्ढा सुद्धा प्रदर्शित झाला होता. परंतु आता प्रेक्षकांना फक्त सुपरस्टार नाही तर कंटेंट इंटरेस्टिंग हवा असतो. त्यामुळेच लालसिंगवर भारी पडलेला कार्तिकेय २ हा चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडला.
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘कार्तिकेय’ सिनेमाचा हा सीक्वल आहे. या चित्रपटात तेलगू अभिनेता निखिलसोबत अनुपमा परमेश्वरमने मुख्य भूमिका साकारली आहे. एका डॉक्टरच्या भुमिकेतील हा हिरो विज्ञानाची कास पकडून चालणारा आहे.पुजा , पाठ, हवन या गोष्टींवर त्याचा विश्वास नसल्यामुळे एकदा हॉस्पिटलमध्ये महापौरांकडूनच हवन चालू असलेलं न पटल्यावर तो त्यांच्या कानाखाली मारतो आणि त्यामुळे सस्पेंड होतो.
त्यानंतर मनाविरुद्धच स्वतःच्या आईला द्वारका नगरीत घेऊन जातो. लॉजिक लावून रहस्य शोधण्यात इंटरेस्ट असलेल्या कार्तिकेयला तिथं अनेक रहस्यांचा उलगडा होत जातो. द्वारकानगरीतील गोष्टी पौराणिक की ऐतिहासिक.? नेमकं काय याचा विचार करायला आपल्याला हा चित्रपट भाग पाडतो. श्रीकृष्णाचं कडं शोधण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. त्याचा शोध तो लावू शकेल का.? हे बघण्यासाठी चित्रपट बघायला हवा. व्हिएफएक्स, सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. श्रीकृष्णाच्या पौराणिक कथेचा आधार घेऊन बनवलेला हा चित्रपट तुम्ही झी फाईव्ह ॲप वर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
११. कांतारा |
लेखक | ऋषभ शेट्टी |
दिग्दर्शक | ऋषभ शेट्टी |
कलाकार | ऋषभ शेट्टी, अच्युत कुमार, सप्तमी गौडा, किशोर |
संगीत | बी. अजनीश लोकनाथ |
प्रदर्शित तारीख | ३० सप्टेंबर २०२३ |
भाषा | कन्नड |
“कांतारा” चित्रपट समीक्षा :-
२०२२ मध्ये सर्वाधिक चर्चा कोणत्या चित्रपटाची झाली असेल तर ती “कांतारा” या चित्रपटाची. मनोरंजन विश्वात सगळ्यात जास्त बोलबाला झालेला हा चित्रपट. ज्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच जातेय. हा मुळ कन्नड भाषेतील चित्रपट नंतर अजून पाच भाषांमध्ये डब करण्यात आला. “ऋषभ शेट्टी” हे या चित्रपटाचे सर्वेसर्वा असून चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि चित्रपटातील मुख्य भूमिका यांनी लिलया पार पाडली आहे.
साधारण १८४७ चा काळातील कर्नाटक या चित्रपटात पहायला मिळतं. माणसाला सुटणारी हाव ही किती त्याचा कसा नाश करू शकते हे दाखवणारा हा चित्रपट आहे.
एका राजानं त्याला मनःशांती मिळावी या निरपेक्ष भावनेने,ग्रामदेवता म्हणून पंजुरी देवतेला आपल्या घरी आणण्यासाठी त्या गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात जमीन दान केली होती. परंतु त्याचवेळी त्या देवाने राजाला असे सांगितले होते की, जर तू पुन्हा ती जमीन मागितली तर मात्र तुझा मृत्यू होईल. त्यानंतर कालांतराने १९७० च्या दशकात राजाच्या वंशातील एकाला त्या जमीनीची हाव सुटते. काही केल्या ती जमिन आपल्याला हवी असे त्याला वाटू लागते. आणि इथुन पुढे खरा संघर्ष सुरु होतो.
निसर्ग आणि माणूस यांच्यातील नातं यात पहायला मिळतं. माणसाला हाव सुटली तर तो काय करू शकतो आणि त्याचे परिणाम त्याला कसे भोगावे लागतात हे या चित्रपटात पहायला मिळतं. अभिनयाच्या बाबतीत अव्वल असलेला हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
१२. पोन्नियिन सेल्वन |
लेखक | इलांगो कुमारावेल |
दिग्दर्शक | चंदू मोंदेती |
कलाकार | चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या रॉय बच्चन, तृषा कृष्णन, शोभिता धूलिपाला, प्रकाशराज |
संगीत | कालभैरव |
प्रदर्शित तारीख | ३० सप्टेंबर २०२२ |
भाषा | तमिळ |
“पोन्नियिन सेल्वन” चित्रपट समीक्षा :-
कल्कि कृष्णमूर्ती यांनी १९५५ मध्ये लिहिलेल्या उपन्यास ‘पोन्नियिन सेल्वन’वर आधारित हा भव्य दिव्य चित्रपट बनवण्यात आला आहे. मणिरत्नम म्हणजे भव्यदिव्य हे समीकरण त्यांनी स्वतःच प्रस्थापित केले आहे. त्यामुळे या चित्रपटात सुद्धा सुद्धा भव्य सेट, कलाकारांची तगडी फौज, व्हिएफएक्स असं सगळंच बघायला मिळेल.
महाप्रतापी चोल राजा अरूलमोरीवर्मन यांच्या जीवनकार्यावर आधारित हा चित्रपट आहे. ज्यांनी खरं तर राजेंद्र प्रथम या नावाने चोल साम्राज्यावर राज्य केले होते. पोन्नियिन सेल्वन म्हणजे पोन्नी , याचाच अर्थ कावेरीचा मुलगा असा आहे. चोल साम्राज्य हे सुरूवातीला कावेरी नदीच्या काठावर वसलेलं होतं तिथून ते वाढत गेलं.
हा चित्रपट सत्य इतिहासावर आधारित आहे त्यामुळे फार मसाले न वापरता तो बनवला गेला आहे. राजघराण्यातील आतील राजकारण हा या चित्रपटाचा गाभा आहे. अर्थात चोल साम्राज्य हे शत्रू आणि अंतर्गत कारवायांपासून वाचवणं या भोवती चित्रपटाची कथा फिरते. चोल साम्राज्याची कथा अशी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी हा चित्रपट एकदा नक्कीच बघा. सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे. ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार याची शंभर टक्के हमी.
पण मित्रांनो बाहुबली सोबत तुलना करायला जाल तर ती चूक ठरू शकते. त्यामुळे एक स्वतंत्र कलाकृती म्हणून हा चित्रपट बघायला हवा. पुढचा भाग बघण्याची उत्सुकता नक्कीच वाटेल. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे.
हे पण वाचा –
मित्रांनो, वरीलपैकी कोणते चित्रपट बघायचे राहिले असतील तर बघून घ्या. आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा ते तुम्हाला कसे वाटले.