२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – १ | जानेवारी २०२२ – मार्च २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट
Written by : आकांक्षा कोलते
Updated : डिसेंबर 28, 2022 | 01:02 AM
१. 36 फार्महाउस |
दिग्दर्शक | राम रमेश शर्मा |
कलाकार | संजय मिश्रा, विजय राज, अमोल पाराशर, बरखा सिंह, अश्विनी कालसेकर आणि फ्लोरा सैनी |
प्रदर्शित तारीख | २१ जानेवारी २०२२ |
भाषा | हिंदी |
“36 फार्महाउस” चित्रपट समीक्षा :-
बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट प्रदर्शित होणार तर आधीपासूनच त्याचा बोलबाला असतो. तसा “३६ फार्महाऊस” या चित्रपटाचा देखील झाला होता. पण म्हणावा तसा चित्रपटात दम नव्हता. सुभाष घई यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन केले असले तरी या चित्रपटात त्यांचा ठरलेला फ्लेवर तर दिसत नाही. कथेच्या मानाने सुद्धा चित्रपट तेवढासा परिणामकारक दिसत नाही. सस्पेन्स आणि कॉमेडी चा तडका असलेली ही कथा दूरवर असलेल्या एका “३६ फार्महाऊस” या बंगल्यात घडत असते. खरं तर अगदीच वेळ जात नसेल तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला २ स्टार.
२. है तुझे सलाम इंडिया |
दिग्दर्शक | वनिश कुमार |
कलाकार | एजाज खान , स्मिता गोंदकर , आर्या बब्बर, सलमान भट्ट आणि कनवालप्रीत |
प्रदर्शित तारीख | २६ जानेवारी २०२२ |
भाषा | हिंदी |
“है तुझे सलाम इंडिया” चित्रपट समीक्षा :-
नावावरूनच लक्षात यायला हवं की देशप्रेम अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिनानिमित्त डिजिटल प्लॅटफॉर्म वर “हंगामा प्ले” वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आपल्या देशाचे खरे हीरो असलेल्या आपल्या भारतीय जवान आणि किसानांना मध्यभागी ठेवून कथा लिहिली आहे. आपल्या देशातील एकंदर राजकीय परिस्थिती, तरूणांची करण्यात येणारी मुस्कटदाबी यात बघायला मिळते. एजाज खान आणि स्मिता गोंदकर यांची मध्यवर्ती भूमिका यात बघायला मिळते. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. लूप लपेटा |
दिग्दर्शक | आकाश भाटिया |
कलाकार | तापसी पन्नू, ताहीर राज भसीन, राजेंद्र चावला, श्रेया धन्वंतरी |
प्रदर्शित तारीख | ४ फेब्रुवारी २०२२ |
भाषा | हिंदी |
“लूप लपेटा” चित्रपट समीक्षा :-
लूप लपेटा हा चित्रपट सोनी मॅक्स वर प्रदर्शित झाला होता. प्रेम माणसाला काहीही करायला भाग पाडते. तसंच काहीसं या चित्रपटात पहायला मिळतं सावित्रीने जसे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्याच धर्तीवर आधारित कथा या चित्रपटातील सावी आणि सत्यजित यांची पहायला मिळते. वेळेच्या चक्रात अडकलेली ही कथा रंजक आहे. अति विनोदामुळे बऱ्याचदा कंटाळा येतो. पण एकदा हा चित्रपट पहायला हरकत नाही. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
४. गेहराइयां |
दिग्दर्शक | शकून बत्रा |
कलाकार | दीपिका पादुकोण , अनन्या पांडे ,सिद्धांत चतुर्वेदी |
प्रदर्शित तारीख | ११ फेब्रुवारी २०२२ |
भाषा |
“गेहराइयां” चित्रपट समीक्षा :-
ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेला गहराइयां हा चित्रपट चांगलाच बॉयकॉट ट्रेंड मध्ये अडकला होता त्यामुळे दीपिका पादुकोण असून सुद्धा म्हणावा तसा या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मुळात चित्रपटाच्या कथेत फारसं काही नाविन्य नाही. प्रेमाचा त्रिकोण, त्यातली गुंतागुंत, आयुष्यातील महत्वाकांक्षा, त्यात यश-अपयश हेच सगळं या चित्रपटात पहायला मिळतं. दिग्दर्शनाच्या बाबतीत पण नवीन असं काही सापडत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
५. बधाई दो |
दिग्दर्शक | हर्षवर्धन कुलकर्णी |
कलाकार | राजकुमार राव,भूमी पेडणेकर |
प्रदर्शित तारीख | ११ फेब्रुवारी २०२२ |
भाषा | हिंदी |
“बधाई दो” चित्रपट समीक्षा :-
दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी याने बधाई दो या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी समाज मात्र अजूनही या लोकांना विकृती म्हणूनच बघतोय आणि याच समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा चित्रपट आहे. राजकुमार राव आणि भुमी पेडणेकर हे दोघंही अतिशय उत्तम कलाकार आहेत त्यामुळे उत्तम विषय, उत्तम पटकथा, उत्तम अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन अशी ही भट्टी चांगलीच जमून आली आहे. गे किंवा लेस्बिअन हा शिक्का बसल्यावर “माणूस” म्हणून जगताना किती त्रास होतो हे बघताना आपण अंतर्मुख होऊन जातो. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
६. अ थर्सडे |
दिग्दर्शक | बहजाद खंबाटा |
कलाकार | यामी गौतम, अतुल कुलकर्णी, नेहा धुपिया, डिंपल कपाडिया |
प्रदर्शित तारीख | १७ फेब्रुवारी २०२२ |
भाषा |
“अ थर्सडे” चित्रपट समीक्षा :-
डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेला अ थर्सडे हा चित्रपट जर तुम्ही अजून पाहीला नसेल तर तुम्ही फार उशीर केला आहे. लवकरात लवकर बघून टाका. यामी, अतुल कुलकर्णी, नेहा आणि डिंपल या सगळ्यांनीच उत्कृष्ट अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल काही सांगितलं तरी ते स्पॉइलर ठरेल. त्यामुळे हा चित्रपट जरूर बघा. नक्कीच आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
७. गंगुबाई काठीयावाडी |
दिग्दर्शक | संजय लीला भन्साळी |
कलाकार | आलिया भट्ट, अजय देवगण, शांतनू महेश्वरी, विजय राज, |
प्रदर्शित तारीख | २५ फेब्रुवारी २०२२ |
भाषा | हिंदी |
“गंगुबाई काठीयावाडी” चित्रपट समीक्षा :-
संजय लीला भन्साळी म्हटलं की काहीतरी भव्यदिव्य असंच आपण इमॅजिन करतो. पण हा चित्रपट म्हणजे एकप्रकारे बायोपिक आहे त्यामुळे वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट कामाठीपुरातील गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे. एका सुखवस्तू घरातील गंगा जेव्हा एका रमणिक नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याच्यासाठी घरातून पळून मुंबईत येते पण तोच रमणिक जेव्हा १००० रुपयांना तीला कामाठीपुऱ्यात नेऊन विकतो तेव्हा गंगाची गंगुबाई होते. हाच प्रवास म्हणजे हा चित्रपट. सेक्स वर्कर्सना समाजात सन्मान मिळावा आणि त्यांना त्यांचे मुलभूत कायदेशीर हक्क मिळावेत म्हणून गंगूबाई अख्ख्या समाजासोबत, राजकीय , सरकारी यंत्रणेविरूद्ध लढा देते केवळ त्यासाठी ती देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही जाऊन भेटते. खरं तर हा बायोपिक अजून छान होऊ शकला असता पण दिग्दर्शन आणि पटकथा या दोन्ही गोष्टी कमी पडल्या. पण आलिया भट्ट च्या अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावलेत म्हणून हा चित्रपट एकदा तरी बघायलाच हवा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट उपलब्ध आहे.
८. लव्ह हॉस्टेल |
दिग्दर्शक | शंकर रमण |
कलाकार | सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी, बॉबी देओल |
प्रदर्शित तारीख | २५ सप्टेंबर २०२२ |
भाषा | हिंदी |
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
नावावरून अंदाज लावायला जाल तर अजिबातच डोक्याला ताण देऊ नका. लव्ह हॉस्टेल या चित्रपटात लव्ह म्हणजे प्रेम हा कथेचा गाभा असला तरी यात बंदुकीच्या गोळ्या आणि रक्तपातच जास्त बघायला मिळतो. चित्रपटात एकाच वेळी इतक्या विषयांना स्पर्श केला आहे की “एक ना धड भाराभर चिंध्या” अशी अवस्था झाली आहे. नेहमीची ठरलेली “हिंदू मुस्लिम” अशी प्रेमात पडलेली जोडी, त्यात एका कुटुंबाला असलेली राजकीय पार्श्वभूमी आणि समाजातील मान सन्मान व तो टिकवण्यासाठी चाललेली धडपड अशी तीच ठरलेली पटकथा. या सगळ्यामुळे चित्रपट तसा फसलेलाच वाटतो. त्यातल्या त्यात अभिनय चांगला केल्यामुळे थोडा सुसह्य होतो. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
९. झुंड |
दिग्दर्शक | नागराज मंजुळे |
कलाकार | अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, किशोर कदम, भारत गणेशपुरे, अंकुश गेडाम, सायली पाटील |
प्रदर्शित तारीख | ४ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“झुंड” चित्रपट समीक्षा :-
नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन, कलाकार म्हणून अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू आणि अजय अतुल यांचं संगीत हे सगळं एकत्र म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच. नागपूर मधील समाजसेवक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. साध्या साध्या गोष्टी सुद्धा सहज न मिळणारा एक समाज आहे, ज्यांना मुलभूत गरजांसाठी सुद्धा झगडावं लागतं.त्यांचं झोपडपट्टी घडणारं आयुष्य कसं असतं हे पुन्हा एकदा नागराज यांनी त्यांच्या खास शैलीत आपल्याला दाखवलं आहे. प्रत्येक वेळी मोठमोठे डायलॉग वापरले म्हणजे ती कलाकृती दर्जेदार होते असं नाही हे नेहमीच नागराज यांनी सिद्ध केलं आहे. झोपडपट्टीतील मुलांना प्लास्टिकच्या डब्यामध्ये फुटबॉल टाकून खेळताना पाहिल्यावर विजय बारसे यांनी त्यांना मिळालेली बक्षिसाची रक्कम या मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यासाठी “स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेची उभारणी करण्यासाठी वापरली. त्याचीच ही गोष्ट. हा चित्रपट प्रत्येकाने बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार. झी फाइव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
१०. तूलसीदास ज्युनिअर |
दिग्दर्शक | मृदुल महेंद्र |
कलाकार | संजय दत्त, राजीव कपूर, वरुण बुद्धदेव आणि दिलीप ताहिल |
प्रदर्शित तारीख | ४ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“तूलसीदास ज्युनिअर” चित्रपट समीक्षा :-
हि कथा एका स्नूकर खेळणाऱ्या मुलाची असून आपल्या वडिलांच्या झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी तो काय करतो हे या चित्रपटात पहायला मिळते. त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे संजूबाबा अर्थात संजय दत्त याने. लहान मुलाची भूमिका वरूण बुद्धदेव याने अतिशय उत्तम साकारली आहे. या चित्रपटात दिवंगत कलाकार राजीव कपूर यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. खरं तल कोरोना येण्याआधी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण काही कारणास्तव तो रखडला आणि ४ मार्चला तो प्रदर्शित झाला.
११. राधेश्याम |
दिग्दर्शक | राधाकृष्ण कुमार |
कलाकार | प्रभास,पूजा हेगडे,भाग्यश्री पटवर्धन,सचिन खेडेकर,सत्यराज,मुरली शर्मा |
प्रदर्शित तारीख | ११ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“राधेश्याम” चित्रपट समीक्षा :-
प्रभास म्हटलं की त्याचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. राधेश्याम या चित्रपटात प्रभास हा मुख्य भूमिकेत आहे आणि नायिका म्हणून आहे पूजा हेगडे. विज्ञान, भविष्य, ज्योतिष अशा गोष्टींभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते. विज्ञानाची कास धरणारे कधीच कर्म आणि भविष्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि भविष्य ज्योतिष यावर विश्वास ठेवणारे कधीच शंभर टक्के विज्ञानावर विसंबून राहत नाहीत हेच या चित्रपटात पहायला मिळते. कितीही मोठे कलाकार असले तरी पटकथाच जर भरकटलेली असेल थर तो चित्रपट फसतोच. तेच झालंय राधेश्याम या चित्रपटाच्या बाबतीत. बघायचा असेल तर एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१२. द काश्मीर फाईल्स |
दिग्दर्शक | अतुल अग्निहोत्री |
कलाकार | मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर,पल्लवी जोशी , दर्शन कुमार, चिन्मय मंडलेकर आणि मृणाल कुलकर्णी |
प्रदर्शित तारीख | ११ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“द काश्मीर फाईल्स” चित्रपट समीक्षा :-
१९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या हल्ल्याच्या सत्यघटनेवर आधारीत “द कश्मीर फाइल्स” हा सिनेमा बराच वादविवादात अडकला होता तरीही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांनी केला आहे. समाजातील एका समुहाने हा चित्रपट डोक्यावर घेतला तर एका समुहाने या चित्रपटाला प्रचारकी चित्रपट ठरवलं. आता नक्की काय ते मात्र तुम्हीच ठरवा. वाद प्रतिवाद कितीही असले, किंवा सत्य असत्य घटना काही असल्या तरी एक कलाकृती म्हणून चित्रपट चांगला आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनयाची छाप पाडली आहे. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
१३. बच्चन पांडे |
दिग्दर्शक | फरहाद सामजी |
कलाकार | अक्षय कुमार, कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिस |
प्रदर्शित तारीख | १८ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“बच्चन पांडे” चित्रपट समीक्षा :-
“बच्चन पांडे” आणि अक्षय कुमार ही नावं वाचून लक्षात आले असेलच की चित्रपट काय असेल. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सरसकट कोणतेही चित्रपट करत सुटलेला असतो. त्यात साजिद नाडियादवाला म्हणजे लॉजिक वैगरे तर गुंडाळूनच ठेवायचं.
खरं तर २०१४ साली आलेल्या तमिळ चित्रपट ‘जिगरहाट्टा’ चा हा रिमेक आहे. बच्चन पांडे हाएक गुंड असून त्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याच काम एक फिल्ममेकर करतोय. त्यावरचाच हा चित्रपट. निव्वळ मनोरंजन म्हणून बघायचा असेल तर ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१४. जलसा |
दिग्दर्शक | सुरेश त्रिवेणी |
कलाकार | विद्या बखलन, शेफाली शाह, मानव कौल |
प्रदर्शित तारीख | १८ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“जलसा” चित्रपट समीक्षा :-
ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जलसा हा चित्रपट म्हणजे विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या अभिनयाची जुगलबंदी म्हणायला हवी. त्यात अजून भर म्हणजे मानव कौल. छोटासा रोल वाट्याला आहे खरा पण अभिनय म्हणजे काय हे या तिघांकडे बघून तुम्हाला कळेल. समाजातील स्वतःचं स्थान, इज्जत, नाव थोडक्यात आपलं “प्रेस्टीज” जपण्यासाठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम चित्रण असलेला हा चित्रपट आहे. स्वतःची निर्माण केलेली ओळख जेव्हा धोक्यात येते तेव्हा प्रसंगी नैतिकता बाजूला ठेवून माणूस काय करू शकतो हे विद्याने हुबेहूब साकारलं आहे. अतिशय सुंदर कलाकृती. फार मसाला न घालता दिग्दर्शकाला जे पोहोचवायचं आहे ते थेट पोहोचतं. त्यामुळे माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
१५. शर्माजी नमकीन |
दिग्दर्शक | हितेश भाटिया |
कलाकार | ऋषी कपूर, परेश रावल, जूही चावला |
प्रदर्शित तारीख | ३१ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“शर्माजी नमकीन” चित्रपट समीक्षा :-
” शर्माजी नमकीन” हा चित्रपट पाहण्याचं एकमेव कारण म्हणजे ऋषी कपूर आणि परेश रावल यांनी साकारलेली एकच व्यक्तिरेखा. म्हणजे ऋषी कपूर यांनी अपुरा केलेला चित्रपट परेश रावल यांनी पूर्ण केला आहे. दोघांनीही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भुमिकेला न्याय दिला आहे. कामातून निवृत्त होताना किंवा वार्धक्याकडे झुकताना त्या लोकांची मानसिकता, त्यांच्या अपेक्षा, इच्छा काय असतात. त्यात आजकालची पिढी आपल्या आईवडिलांना कळत – नकळतपणे स्वतःसाठी कशी अडकवून ठेवते याची जाणीव हा चित्रपट बघताना जाणवते. सर्व वयोगटातील लोकांनी हा चित्रपट बघायला हवा. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
हे पण वाचा –
मित्रांनो, शतक पार केलेल्या हिंदी चित्रपटांची नावं आणि रिव्ह्यू एका लेखामध्ये सांगणं केवळ अशक्य! म्हणूनच राहीलेले चित्रपट पुढिल लेखात. तोपर्यंत वरीलपैकी कोणते चित्रपट बघायचे राहिले असतील तर बघून घ्या. आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा ते तुम्हाला कसे वाटले.