FilmsFilms NewsHindiHome

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – 4 |ऑक्टोंबर २०२२ – डिसेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जानेवारी 22, 2023 | 02:00 PM

मित्रांनो, जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपटांची यादी आपण पहिल्या भागात पाहिली आहे. आणि दुसऱ्या भागात एप्रिल २०२२ – जून २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट समीक्षा आणि तिसऱ्या भागात जुलै २०२२ – सप्टेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपटांची थोडक्यात माहिती पाहिली. आता आपण ऑक्टोंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी पाहणार आहोत.

all Hindi films released in 2022 part 4 1
७५. मजा मा
२०२२. विनोदी, नाटक. २ तास १४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकआनंद तिवारी
कलाकारमाधुरी दीक्षित, गजराज राव, ऋत्विक भौमिक आणि बरखा सिंग
प्रदर्शित तारीख६ ऑक्टोबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

मजा मा” चित्रपट समीक्षा :-

ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेला माधुरी दीक्षितचा मजा मा हा चित्रपट प्रेक्षकांवर फारशी जादू करू शकलेला नाही. चित्रपट विनोदी, कौटुंबिक असला तरी एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. “समलैंगिकता” या विषयावर बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत पण या चित्रपटात चक्क एका लग्नाच्या वयाच्या मुलाची आई म्हणजेच माधुरी दीक्षित ही लेस्बिअन दाखवली आहे. आणि हे ऐन लग्न ठरण्याच्या वेळीच अनपेक्षित पद्धतीने समजल्यानंतर घरात काय गोंधळ होतो. ते लग्न होतं की नाही. पुढे नक्की काय होत हे बघण्यासाठी हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


76. गुडबाय
२०२२. विनोदी, नाटक. २ तास २२ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकविकास बेहल
कलाकारअमिताभ बच्चन, निना गुप्ता, रश्मिका मंदाना
प्रदर्शित तारीख७ ऑक्टोबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

गुडबाय” चित्रपट समीक्षा :-

अमिताभ बच्चन म्हटलं की चित्रपट आवर्जून बघणारा एक वर्ग असतो. त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा. एकमेकांपासून दूर राहणाऱ्या बाप लेकीचं नातं उलगडणारा हा चित्रपट आहे. खरं तर पूर्ण कुटुंबातील सगळ्याच नात्यांवर आधारित हा चित्रपट आहे. अमिताभ आणि निना यांची चारही मुलं या दोघांपासून दूर बाहेर राहत असतात. पण जेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू होतो आणि अंत्यसंस्कारासाठी घरी यावं लागतं तेव्हा ती येतात की नाही. आल्यावर त्यांचं वागणं कसं असतं वैगरे हे यात दाखवलं आहे. पटकथा अजून चांगली असती तर चित्रपट नक्कीच अजून चांगला झाला असता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


७७. नजर अंदाज
२०२२. विनोदी, नाटक. १ तास ४३ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकविक्रांत देशमुख
कलाकारकुमुद मिश्रा , दिव्या दत्ता , अभिषेक बॅनर्जी और राजेश्वरी सचदेव
प्रदर्शित तारीख७ ऑक्टोबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.1⭐/ ५

नजर अंदाज” चित्रपट समीक्षा :-

७ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेला नजर अंदाज हा चित्रपट म्हणजे एक उत्कृष्ट अभिनयाचा सुंदर अनुभव म्हणता येईल. कुमुद मिश्रा यांनी जे काही षटकार लगावले आहेत त्याला तोड नाही. एका अंध व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींभोवती फिरणारी ही कथ आहे. म्हणतात ना “नजर नही नजरिया चाहीए!” हे वाक्य इथे तंतोतंत लागू पडते. चित्रपटाच्या शेवटी तुम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टींचा विचार कराल हे नक्की. दिव्या दत्ता, अभिषेक बॅनर्जी या सगळ्यांचाच अभिनय कमाल! नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


७८. डॉक्टर जी
२०२२. नाटक. २ तास ४ मिनिटे. [ ए ]
दिग्दर्शकअनुभूती कश्यप
कलाकारआयुष्मान खुराना, रकुलप्रीत सिंह, शेफाली शाह
प्रदर्शित तारीख१४ ऑक्टोबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

डॉक्टर जी” चित्रपट समीक्षा :-

आयुषमान खुराना याने नेहमीच प्रेक्षकांना चांगला अनुभव दिला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून एखादा संदेश, एखादा विचार देणं ही पण त्याची खासियत. म्हणजे विकी डोनर , बाला हे चित्रपट पाहीले असतील तर तुमच्या लक्षात येईल. आता सुद्धा १४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या डॉक्टर जी या चित्रपटात सुद्धा आयुषमान याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात तो पेशाने डॉक्टर असलेल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आहे.
डॉ. उदय गुप्ता म्हणजेच आयुषमान. चुकून तो स्त्रीरोगतज्ज्ञ होतो. म्हणजे त्याला खरं तर हाडांचा डॉक्टर व्हायचं असतं पण त्याला ॲडमिशन मिळतं स्त्रीरोगतज्ञ या विभागातील. पण तिथं गेल्यावर त्याचं लाजणं, बाकीच्यांकडून होणारं त्याचं रॅगिंग, तो डॉक्टर म्हणून रूजू झाल्यानंतर पेशंट्सच्या प्रतिक्रिया हे सगळं बघताना हेच वाटत की अजूनही आपल्याकडे डॉक्टर च्या बाबतीत बरेच गैरसमज आहेत.
डॉक्टर हा डॉक्टर असतो. तो स्त्री आहे की पुरुष हे महत्वाचं नसतं हेच या चित्रपटातून दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. स्त्री पुरुष हा भेदभाव अधोरेखित करत डॉक्टरांचं आयुष्य कसं असतं त्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. विनोदी अंगाने जाणाऱ्या या चित्रपटात अजूनही बऱ्याच गोष्टी बारकाईने दाखवता आल्या असत्या. पण तरीही एकदा नक्की एन्जॉय करू शकता असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट उपलब्ध आहे.


७८. कोड नेम : तिरंगा
२०२२. ॲक्शन, रोमांचक, नाटक. २ तास १४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकरिभू दासगुप्ता
कलाकारपरिणीती चोप्रा, शरद केळकर, हार्डी संधू , रजीत कपूर
प्रदर्शित तारीख१४ ऑक्टोबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.४⭐/ ५

कोड नेम : तिरंगा” चित्रपट समीक्षा :-

एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सिक्रेट मिशन आणि रॉ एजंट यावर आधारित आतापर्यंत बरेच चित्रपट याआधी आले आहेत. हा चित्रपट सुद्धा एका महीला रॉ एजंट म्हणजेच दुर्गा सिंगची गोष्ट आहे. अर्थात परिणीती चोप्रा हीने ही भूमिका साकारली आहे. पण पटकथाच इतकी भरकटलेली आहे की चित्रपट शेवटपर्यंत पकड घेत नाही की तो शेवटपर्यंत बघावा इतकी उत्सुकता राहत नाही. एकंदरच संकलन असो की दिग्दर्शन, कथा पटकथा सगळ्याच गोष्टी अजून कैक पटीने चांगल्या प्रकारे दाखवता आल्या असत्या. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार. तरीही तुम्हाला हा बघायचा असेल तर नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता.


७९. रामसेतू
२०२२. ॲक्शन, साहसी, २ तास २३ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअभिषेक शर्मा
कलाकारअक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, नुश्रत भरुच्चा आणि सत्य देव
प्रदर्शित तारीख२५ ऑक्टोबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

रामसेतू” चित्रपट समीक्षा :-

बऱ्याचदा देशातील सामाजिक समस्या असतील किंवा धार्मिक मतभेद असतील या सर्वांचा राजकीय दृष्ट्या काय समाजावर परिणाम होतो किंवा ती परिस्थिती दाखवणारे बरेच चित्रपट येत असतात. रामसेतू हा चित्रपट सुद्धा तसाच आहे. अक्षय‌ कुमार एका पुरातत्व अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतो जो नास्तिक आहे. याच आर्यनला म्हणजेच अक्षयकुमार ला ‘सेतू समुद्रम’ प्रकल्पाच्या संशोधनासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. जिथं त्याला पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध करायचे आहे की, रामसेतू ही भगवान रामाच्या जन्मापूर्वीची निसर्गाची उत्पत्ती आहे म्हणजेच एक नैसर्गिक भौगोलिक जागा आहे. आता ते तो कसं सिद्ध करतो.? करतो की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघा. पण एकंदर अक्षय कुमारने फ्लॉप सिनेमे करण्याचा ध्यास घेतलाय असं वाटतं कारण हा चित्रपट सुद्धा अगदीच आला आणि गेला या कॅटेगरीत मोडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


८०. थॅंकगॉड
२०२२. विनोदी, कल्पनारम्य. २ तास १ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकइंद्र कुमार
कलाकारअजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा , रकुल प्रीत सिंग
प्रदर्शित तारीख२५ ऑक्टोबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

थॅंकगॉड” चित्रपट समीक्षा :-

इंद्र कुमार दिग्दर्शित “थॅंकगॉड” हा चित्रपट बघताना तुम्हाला नव्वदच्या दशकातील चित्रपटांचा फील नक्कीच येतो. पाप पुण्य, कर्म या सगळ्या गोष्टी आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत किंवा आपल्या कर्माचे हिशोब ठेवणारा कोणीतरी आहे याची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे.
रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारा आर्यन अचानक मृत्युच्या दारात पोहचल्यावर, चित्रगुप्त म्हणजेच अजय देवगण याची एन्ट्री होते. आता पुढे चित्रगुप्त आर्यनच्या पाप पुण्याचे हिशोब मांडणार मग ठरवणार आर्यन स्वर्गात पोहचणार की परत भुलोकात येणार. नव्वदच्या दशकातील सिनेमा यासाठी म्हटलं की फार डोकं न लावता लॉजिक वैगरे न लावता हा चित्रपट बघितला तर मनोरंजन नक्की होईल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे.


८१. तारा व्हर्सेस बिलाल
२०२२. २ तास ६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकसमीर शेख
कलाकारहर्षवर्धन राणे, सोनिया राठी
प्रदर्शित तारीख२८ ऑक्टोबर २०२२
भाषा
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

तारा व्हर्सेस बिलाल” चित्रपट समीक्षा :-

समर इक्बाल दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनिया राठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. सुरूवातीला एकमेकांसोबत न पटत नाही, वाद सुरू असतात आणि मग याचंच रूपांतर प्रेमात होतं. हे काही बॉलिवूड साठी नवीन नाही. तारा व्हर्सेस बिलाल या चित्रपटाची कथा सुद्धा अशीच काहीशी आहे. हर्षवर्धन राणे आणि सोनिया राठी या दोघांनीही चांगला अभिनय केला आहे. चित्रपटाबद्दल बरेच चांगले वाईट मिक्स रिव्ह्यू आहेत पण एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या अडीच स्टार. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट उपलब्ध आहे.


८२. फोन भूत
२०२२. विनोदी, भयपट. २ तास १६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकगुर्मीत सिंग
कलाकारसिद्धांत चतुर्वेदी, जॅकी श्रॉफ, ईशान खट्टर आणि कतरिना कैफ
प्रदर्शित तारीख४ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

फोन भूत” चित्रपट समीक्षा :-

सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर म्हणजेच या चित्रपटातील मेजर आणि गुल्लू या दोघांना एक सुंदर भूत भेटल्यावर काय होतं याची गोष्ट म्हणजे “फोन भूत”. हे भूत म्हणजे कतरीना कैफ. इतकं गोड भूत बघायला तर हा चित्रपट नक्कीच बघा. या तिघांसोबत अजून महत्त्वाचं पात्र खलनायक जॅकी श्रॉफ. कॉमेडी, हॉरर, ॲक्शन आणि हो सगळ्यात महत्त्वाचा रोमान्स हे सगळं तुम्हाला या चित्रपटात पहायला मिळेल. कतरीनाचा सुद्धा अभिनय करण्याचा प्रयत्न चांगला आहे. मनोरंजन म्हणून हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे.


८३. डबल एक्स एल
२०२२. विनोदी. २ तास ८ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकसतराम रमानी
कलाकारसोनाक्षी सिन्हा, हुमा कुरैशी, जहीर इकबाल, महत राघवेंद्र
प्रदर्शित तारीख४ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

डबल एक्स एल” चित्रपट समीक्षा :-

“बॉडी शेमिंग” या विषयावर आधारित आजकाल स्वतंत्र असे बरेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. कारण सुंदरतेची अख्खी व्याख्या बदलून टाकणारा हा प्रकार म्हणजे बॉडी शेमिंग. बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या बेढब शरीराची, जाड असण्याची लाज वाटते. तर काही वेळा अशा मुलींमध्ये आत्मविश्वास असला तरी समाज मात्र त्यांच्या जाड असण्याला , लठ्ठपणाला हसत असतो. याच मानसिकतेला चपराक देण्याचा प्रयत्न सतराम रमानी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. पण ती चपराक तेवढ्या ताकदीने त्यांना लगावता आली नाही हे चित्रपट बघताना लक्षात येतं. राजश्री आणि सायरा या दोन लठ्ठ मुलींची ही गोष्ट आहे. दोघीही आपापली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आलेल्या आहेत. तर त्यांची स्वप्ने पूर्ण होतात का.? त्यांच्या आयुष्यात प्रेम वैगरे या गोष्टी घडतात का हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघायला हवा. मधे मधे कंटाळा येऊ शकतो. इतक्या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट अजून दर्जेदार होऊ शकला असता. पण पटकथाच कुठेतरी कमी पडली हे जाणवतं. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


८४. मिली
२०२२. नाटक, रोमांचक. २ तास ७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकमुथुकुट्टी जेवियर
कलाकार जान्हवी कपूर, सनी कौशल, मनोज पाहवा, संजय सूरी, हसलीन कौर, राजेश जैस, अनुराग अरोरा
प्रदर्शित तारीख४ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५ ⭐/ ५

“मिली” चित्रपट समीक्षा :-

जान्हवी कपूर हिचा नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित झालेला मिली हा चित्रपट म्हणजे २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हेलेन’ या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. अर्थात या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा मुथुकुट्टी जेवियर यांनीच केलेलं आहे. कॅनडात जाण्यासाठी धडपड करणारी मिली ही एका रेस्टॉरंट मध्ये काम करत असते एट दिवस चुकून तिचा मॅनेजर तिला फ्रीजरमध्ये बंद करून निघून जातो. फ्रिजर रूममधील तापमान जवळपास मायनस १७ इतकं असतं. इतक्या कमी तापमानात जीव वाचवण्यासाठी मिली काय करते हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. जान्हवी कपूर हीचा आतापर्यंतचा हा सर्वोत्तम अभिनय म्हणावा लागेल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


८५. तडका
२०२२. विनोदी, प्रणय. २ तास ५७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकप्रकाश राज
कलाकारनाना पाटेकर, तापसी पन्नू, श्रिया सरन, अली फजल, राजेश शर्मा, लिलेट दुबे, नवीन कौशिक आणि मुरली शर्मा
प्रदर्शित तारीख४ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

तडका” चित्रपट समीक्षा :-

झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या “तडका” या चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश राज यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. तडका’ हा चित्रपट म्हणजे मल्याळम भाषेतील ‘सॉल्ट अँड पेपर’ चा हिंदी रिमेक आहे. ज्यामध्ये तुकाराम म्हणजेच नाना पाटेकर यांना वेगवेगळ्या रेसिपी बनवण्याचा छंद आहे. वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि खाणे हे त्यांचं आवडीचं काम. त्यांच लग्न ठरवण्याचा प्रयत्न हा युद्धपातळीवर सुरू आहे आणि ते मात्र प्रत्येक स्थळ क्षुल्लक कारणावरून नाकारत आहेत. थोडक्यात ही एक लग्नाची गोष्ट आहे.आता ते लग्न होतं की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा. कलाकारांची मांदियाळी बघता चित्रपट तेवढा दमदार झालेला नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


८६. रॉकेट गॅंग
२०२२. विनोदी, नाटक, कल्पनारम्य, २ तास १ मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शकबॉस्को लेस्ली मार्टिस
कलाकारआदित्य सील, निकिता दत्ता, सहज सिंग, मोक्षदा जेलखानी , जेसन थाम
प्रदर्शित तारीख११ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

रॉकेट गॅंग” चित्रपट समीक्षा :-

जग सोडून गेलेल्या पाच मुलांची ही गोष्ट आहे. डान्स इंडिया डान्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच या मुलांचा अचानक मृत्यू होतो. त्यामुळेच की काय या मुलांचा आत्मा हा एका बंगाल्यामध्ये कैद होतो. आणि नंतर याच बंगल्यामध्ये पाच तरुण राहायला येतात. इथूनच चित्रपटाची कथा सुरू होते. डान्स, हॉरर आणि कॉमेडी असं भन्नाट कॉम्बिनेशन या चित्रपटात पहायला मिळतं. अभिनयाच्या बाबतीत तर चित्रपट फारच उजवा आहे. हा असा चित्रपट आहे जो फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


८७. ऊंचाई
२०२२. साहसी, नाटक. २ तास ५३ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकसूरज बडजात्या
कलाकारअमिताभ बच्चन,अनुपम खेर,बोमन इराणी,डॅनी,परिणीती चोप्रा,नीना गुप्ता,नसिफा अली सोधी
प्रदर्शित तारीख११ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

ऊंचाई” चित्रपट समीक्षा :-

आपल्या एका मित्राचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार मित्रांच्या एका गिर्यारोहण प्रवासाची ही गोष्ट. अतिशय तगडी स्टारकास्ट घेऊन बनवलेला हा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर,बोमन इराणी आणि डॅनी हे चार मित्र वयाच्या अशा टप्प्यावर आहेत जिथे ते सांसारिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेले आहेत. आणि स्वतःसाठी जगत आहेत. सुखवस्तू घरातील या चौकडीचं म्हणजे या चार मित्रांच आयुष्य छान चालू असताना अचानक एक मित्र त्यांच्यातून निघून जातो. हे निघून जाणं अनपेक्षित असतं. त्यातच एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे जाण्याचं चौघांनी मिळून पाहीलेलं एक स्वप्न असतं. पण एक मित्र अचानक गेल्यामुळे हे स्वप्न पूर्ण होतं का.? बाकीचे मित्र पुढे काय करतात हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला हवा. अभिनयाबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


८८. मोनिका ओ माय डार्लिंग
२०२२. विनोदी, गुन्हेगारी, नाटक. २ तास ९ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकवासन बाला
कलाकारराजकुमार राव, हुमा कुरेशी, राधिका आपटे
प्रदर्शित तारीख११ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

मोनिका ओ माय डार्लिंग” चित्रपट समीक्षा :-

राजकुमार राव हा एक अतिशय उत्तम कलाकार आहे हे त्याने नेहमीच दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याचे चित्रपट नेहमीच बघण्यासारखे असतात. नोव्हेंबर मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हा डार्क कॉमेडी आणि सस्पेन्स अशा धाटणीचा चित्रपट आहे. कमी कष्टात आणि कमी वेळेत श्रीमंत व्हायला जाणाऱ्यांची नेहमीच फसगत होते. त्यात जर एखादी मुलगी तुमच्या आयुष्यात आली तर मग काम फत्तेच.


८९. थाई मसाज
२०२२. विनोदी. २ तास ४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकमंगेश हडवळे
कलाकारगजराज राव, दिव्येंदू शर्मा, राजपाल यादव
प्रदर्शित तारीख२५ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

थाई मसाज” चित्रपट समीक्षा :-

“थाई मसाज” ही एका आत्माराम नावाच्या सत्तर वर्षांच्या वृद्ध माणसाची गोष्ट आहे. आपल्याकडे समाजाने काही गोष्टी या ठरवून दिलेल्या आहेत आणि प्रत्येकजण त्या चौकटीत राहून जगण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की, एका विशिष्ट वयानंतर हे करू नये. ते करू नये. असंच वागावं, वैगरे वैगरे. म्हणजे आपण हे ठरवून मोकळे होतो की म्हताऱ्या माणसांच्या काही गरजा नसतात किंवा त्या नसाव्यात. अशाच समाजाच्या अपेक्षांचं ओझं बाळगणाऱ्या एका गृहस्थाची ही गोष्ट. ज्याला सत्तरीत सुद्धा शारीरिक गरज असं वाटतंय. त्यात त्याच्या आयुष्यात एन्ट्री होते संतुलन कुमार या तरुणाची. जो त्यांना त्यांच्या समस्येवर उपाय म्हणून थायलंड ला जाण्यासाठी सांगतो. आता हे आत्माराम थायलंड ला जातात का? तिकडे त्यांना काय अनुभव येतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. पटकथा आणि संवाद अजून चांगल्या प्रकारे लिहीता आले असते. विनोदी चित्रपट असला तरी फार खळखळून हसतोय असं काही होत नाही. एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


९०. दृश्यम २
२०२२. रहस्य. रोमांचक, नाटक. २ तास २५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअभिषेक पाठक
कलाकारअजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, इशिता दत्ता, श्रिया सरन
प्रदर्शित तारीख१८ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.4⭐/ ५

दृश्यम २” चित्रपट समीक्षा :-

प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला दृश्यम २ १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. अर्थात हा सिक्वेल असल्यामुळे आधीची गोष्ट पुढे चालू केली आहे. पण यात सात वर्षांनंतर अशी ही कथा आहे. आपल्याला म्हणजे ज्यांनी दृश्यम पहीला पाहीलेला आहे त्यांना माहीत आहेच की विजय साळगांवकर याने सॅमचा मृतदेह कुठे पुरून ठेवला आहे पण पोलिसांना मात्र अजून ते माहीत नाही. त्यांनी दाखवण्यापुरतं केस बंद केलेली असली तरी साळगांवकर कुटुंब अजूनही जाळ्यात अडकलेलं आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाची भुमिका आहे. यात तो गोव्याचे आयजी म्हणून नियुक्त झालेला आहे. आता हा नवीन आयजी खुनाचा शोध लावणार का? विजय साळगांवकर परत आपल्या कुटुंबाला या सगळ्यांपासून वाचवेल का.? पोलिसांना सॅम चा मृतदेह सापडेल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चित्रपटात मिळतील. मुळ तमिळ दृश्यम २ पाहीला असेल तर थोडासा भ्रमनिरास होऊ शकतो. पण एकंदर चित्रपट चांगला आहे. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


91. मिस्टर मम्मी
२०२२. विनोदी, नाटक. १ तास ३७. [ यु / ए ]
दिग्दर्शकशाद अली
कलाकाररितेश देशमुख, जेनिलिया डिसुझा आणि महेश मांजरेकर
प्रदर्शित तारीख१८ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.३⭐/ ५

मिस्टर मम्मी” चित्रपट समीक्षा :-

१८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला “मिस्टर मम्मी” हा चित्रपट शाद अली यांनी दिग्दर्शित केलेला आहे. ज्यांनी बंटी और बबली किंवा साथिया या सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे अशा दिग्दर्शकाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे हे समजल्यावर घोर निराशा होते. बऱ्याच जणांना चित्रपट चांगला, मनोरंजन करणारा वाटू शकतो अर्थात तुम्ही रितेश आणि जेनेलिया यांचे फॅन असाल तरच. कारण चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, विनोद, समाजासाठी एखादा संदेश वैगरे हे कुठेच दिसत नाही. अगदीच वेळ जात नसेल तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


९२. भेडिया
२०२२. भयपट, विनोदी. २ तास ३६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअमर कौशिक
कलाकारवरुण धवन,क्रिती सॅनन,अभिषेक बॅनर्जी,दीपक डोब्रियाल
प्रदर्शित तारीख१८ नोव्हेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“भेडिया” चित्रपट समीक्षा :-

अमर कौशिक दिग्दर्शित भेडिया हा चित्रपट भयपट असला तरी अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचा असा संदेश देणारा चित्रपट आहे. विकासाच्या नावाखाली माणसाने निसर्गाची जी काही हत्या केली आहे आणि अजूनही करत आहे याचा बदला निसर्ग घेतो. हेच या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाला आपल्याला सांगायचं आहे. “आज के जमाने में नेचर की किस को पड़ी हैं, हमारे लिए बाल्कनी में रखा गमला ही नेचर हैं।” या डायलॉग वरून लक्षात येतं की चित्रपटात नक्की काय दाखवायचं आहे. वरून धवण याची मुख्य भुमिका म्हणजे भेडिया ची भुमिका यात आहे. आता रस्ते बनवणारा कंत्राटदार भेडिया कसा बनतो हे बघण्यासाठी चित्रपट बघायला हवा. तुमच्या जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


९३. कला
२०२२. संगीत, इतिहास, नाटक. १ तास ५९ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअन्विता दत्त
कलाकारबाबिल खान , स्वस्तिका मुखर्जी
प्रदर्शित तारीख१ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५⭐/ ५

कला” चित्रपट समीक्षा :-

वर्षाच्या सरतेशेवटी का असेना पण एक उत्कृष्ट कलाकृती बघायला मिळतेय याचा आनंद आहे. “कला” हा चित्रपट अन्विता दत्त यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर, म्युझिकल अशा सगळ्याच जॉनरमध्ये हा चित्रपट फिट होतो. सगळेच कांगोरे अतिशय महत्त्वाचे. यातलं म्युझिक ऐकून तुम्हाला भिती वाटू शकते जी फार दुर्मिळ गोष्ट आहे. अभिनयाच्या बाबतीत तर पाच पैकी पाच स्टार. स्वस्तिका मुखर्जी हीने कला चं पात्र हुबेहूब साकारलं आहे. जी १९९५०-६० च्या दशकातील एक प्रसिद्ध गायिका आहे. खुद्द पंतप्रधान हिच्या गायनाचे चाहते आहेत. तरीही तिच्या स्वतःच्या आईला मात्र तिचा आवाज अजिबात ऐकायला आवडत नाही. आता इतक्या प्रसिद्ध गायिकेच्या मागे एक मोठी स्टोरी आहे. ती स्टोरी काय.? इतकी प्रसिद्धी कशी मिळाली.? पुढे काय होतं वैगरे हे बघण्यासाठी नेटफ्लिक्सची मदत घ्यावी लागणार. अजिबात चुकवू नये अशी दर्जेदार कलाकृती आहे. दिग्दर्शन, संगीत, अभिनय, सिनेमॅटोग्राफी सगळंच अप्रतिम. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.


९४. ॲन ॲक्शन हिरो
२०२२. ॲक्शन, विनोदी, गुन्हेगारी. २ तास १० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअनिरुद्ध ऐय्यर
कलाकारआयुषमान खुराना, जयदिप अहलावत
प्रदर्शित तारीख२ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

ॲन ॲक्शन हिरो” चित्रपट समीक्षा :-

२ डिसेंबरला प्रदर्शित झालेला ॲन ॲक्शन हिरो हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. या चित्रपटातील ‘डार्क कॉमेडी’ चांगली जमली आहे. चित्रपटाची कथा आहे एक सुप्रसिद्ध अभिनेता व्हर्सेस नेता. हो, एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजेच आयुषमान शुटिंगच्या निमित्ताने हरियाणा मध्ये जातो. तिथं त्याच्या आयुष्यात काय घडतं.? हरियाणामधील नेता म्हणजेच जयदिप अहलावत यांची एन्ट्री झाल्यावर दोघांमध्ये नक्की काय वाद आहे. या सगळ्यात सस्पेन्स पण आहे. एकंदरीत चित्रपट मनोरंजन करणारा आहे. दोघांनीही अभिनय उत्तम केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


९५. फ्रेडी
२०२२. रहस्य, प्रणय, नाटक. २ तास ४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकशशांक घोष
कलाकारकार्तिक आर्यन, आलीय एफ, करन पंडित
प्रदर्शित तारीख२ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

फ्रेडी” चित्रपट समीक्षा :-

सध्याच्या काळातील बॉलिवूडमधील मोजक्या चांगल्या अभिनेत्यांपैकी कार्तिक आर्यन हा एक अभिनेता. या चित्रपटात त्याने एका डेंटिस्ट ची भुमिका साकारली आहे. ज्याच नाव फ्रेडी आहे. लहानपणी स्वतःच्या आईवडिलांना डोळ्यासमोर मरताना पाहील्यामुळे त्याच्या मनावर आघात झालेला आहे. त्यामुळे तो आताही फार कोणाशी बोलत नाही. मुलींशी तर बोलणं त्याला जमत नाही. याच कारणामुळे आतापर्यंत त्याने बरेच नकार पचवले आहेत. याच फ्रेडीच्या आयुष्यात अचानक एक सुंदर मुलगी येते जी त्याला मनापासून आवडते. किंबहुना तिलाही तो आवडतो पण अडचण ही असते की तीचं लग्न झालेलं आहे. आता या फ्रेडीला त्याचं प्रेम मिळतं का.? कि त्याच्या आयुष्यात अजून काही वेगळं घडतं? साधा वाटणारा फ्रेडी अचानक का बदलतो. हे सगळे ट्विस्ट बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा. कार्तिक ने अतिशय छाप पाडणारा अभिनय यात केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. हॉटस्टार वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


९६. इंडिया लॉकडाऊन
२०२२. साहसी, नाटक. १ तास ५७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकमधुर भांडारकर
कलाकारप्रतीक बब्बर, सई ताम्हणकर, कविता अमरजीत, सानंद वर्मा, प्रकाश बेलवडी, आहना कुमरा, श्वेता बासू प्रसाद
प्रदर्शित तारीख२ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

इंडिया लॉकडाऊन” चित्रपट समीक्षा :-

२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केला आहे. खरं तर नावावरूनच चित्रपट कशाबद्दल आहे हे समजते. २०२० साली आलेल्या कोरोनाने अख्ख्या जगाला कसं वेठीस धरलं होतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यावेळी भारतातील लोकांचे हाल, तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा घेणारा हा चित्रपट आहे. यात हाय क्लास पायलट, उच्च मध्यमवर्गीय घरातील उतारवयातील जेष्ठ, फक्त पोटाची भूक भागविण्यासाठी स्वतःचं शरीर विकणाऱ्या वेश्या आणि रोजंदारीवर काम करणारा मजूर अशा चार वर्गांतील व्यक्तिरेखांच्या कथा आहेत. खरं तर कोरोनामुळे एकही कुटुंब असं शिल्लक नव्हतं की त्यावर परिणाम झाला नाही. या चित्रपटात अजून बरंच काही दाखवता आलं असतं. कोरोनाचे परिणाम आणि त्यामुळे केलेला लॉकडाऊन मुळे तेव्हाची परिस्थिती इतकी भयानक होती की अक्षरशः माणसाने माणुसकी सोडली होती. या सगळ्याची भीषणता, व्याप्ती चित्रपटात कमी दिसून येते. अभिनयाच्या बाबतीत पण कलाकारांना अजून बराच वाव होता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


९७. सलाम वेंकी
२०२२. नाटक. २ तास १७ मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शकरेवती
कलाकारकाजोल, विशाल जेठवा, प्रकाश राज, राहुल बोस, राजीव खंडेलवाल, आहना कुमरा, कमल सदाना, आमिर खान
प्रदर्शित तारीख९ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

सलाम वेंकी” चित्रपट समीक्षा :-

सलाम वेंकी हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट म्हणजे वेंकी नावाच्या मुलाची गोष्ट आहे. जो जगण्यासाठी नाही तर स्वतःच्या मरणासाठी धडपडतोय. होय! वेंकीला डिएमडी हा दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये त्याचा फार वेदनादायी मृत्यू अटळ आहे. पण तो येण्यापूर्वी स्वतःचे अवयव दान करून वेंकीला इच्छामरण हवे आहे. पण ते कायद्यानुसार गुन्हा असल्याने तो कायद्यासोबत लढतोय ते पण त्याच्या आईच्या मदतीने. काजोल हीने आईची भूमिका अतिशय सुंदर साकारली आहे. स्वतःच्या मुलाच्या मृत्यूसाठी कायदेशीर परवानगी मागणे यापेक्षा दुःखदायक काय असू शकतं. आता अशी परवानगी मिळते का? वेंकी अवयव दान करू शकतो का हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. एकंदर तुमच्या मनात चलबिचल निर्माण करणारा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


९८. वध
२०२२. गुन्हेगारी, रोमांचक, नाटक. १ तास ५० मिनिटे. [ ए ]
दिग्दर्शकजसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल
कलाकारसंजय मिश्रा, नीना गुप्ता, मानव विज, सौरभ सचदेवा, उमेश कौशिक, तान्या लाल
प्रदर्शित तारीख९ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

वध” चित्रपट समीक्षा :-

“वध” म्हणजेच राक्षस किंवा सैतानाला ठार मारणे. या चित्रपटाच्या बाबतीत एका राक्षसी, विकृती प्रवृत्तीच्या गुंडाचा खून ज्याप्रकारे दाखवला आहे तो “वध” आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता या जोडप्याने कसं बसं काबाडकष्ट करून कर्ज काढून आपल्या मुलाला परदेशी पाठवलेलं असतं आणि अर्थातच तो मुलगा आता लक्ष देत नसतो. मग हे जोडपं शिकवण्या वैगरे घेऊन कर्ज फेडणे, किंवा दैनंदिन व्यवहार चालवत आहेत. पण आता त्यांच्या आयुष्यात आता पांडे नावाचा गुंड येतो आणि संपूर्ण गोष्ट बदलून जाते. खरं तर हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असल्याने जास्त काही न सांगणं योग्य. एका मुंगीला सुद्धा न मारणारे हे मिश्रा कुटुंब खरचं कोणाचा खून कलत असेल का.? असेल तर ते या सगळ्यातून सही सलामत सुटतात का? या सगळ्याची उत्तरं “वध”मध्ये मिळतील. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


९९. मारीच
२०२२. गुन्हेगारी, रोमांचक, रहस्य. २ तास ६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकध्रुव लाथर
कलाकारतुषार कपूर, नसरूद्दीन शाह, राहुल देव, सिरत कपूर, दिपान्नीता शर्मा, अनिता हस्सनंदन
प्रदर्शित तारीख९ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

मारीच” चित्रपट समीक्षा :-

बऱ्याच कालावधीनंतर तुषार कपूर याने पुनरागमन केले आहे. ते पण स्वतः चित्रपटाची निर्मिती करून त्यात मुख्य भूमिका साकारली आहे. राजीव दीक्षित या पोलिस अधिकाऱ्याची तो भुमिका यात करत आहे. मुंबईतील एक मॉडेल आणि तीच्या मैत्रीणीच्या खुनाचा तपास करणारा हा पोलिस अधिकारी आहे. यांच्याच भोवती अख्ख्या चित्रपटाची गोष्ट आहे. सस्पेन्स, क्राईम जॉनरचा हा चित्रपट पाहील्यावर पश्चात्ताप होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अगदीच रिकामा वेळ आहे तर हा चित्रपट पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


१००. जोसेफ : बॉर्न इन ग्रेस
२०२२. नाटक. १ तास ४० मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शकसुशांत मिश्रा
कलाकारविक्टर बॅनर्जी, सुब्रत दत्त, अनामिका गोस्वामी
प्रदर्शित तारीख९ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

जोसेफ : बॉर्न इन ग्रेस” चित्रपट समीक्षा :-

हा चित्रपट उमाकांत महापात्रा यांच्या एका लघुकथेवर आधारित आहे. एका अनाथ मुलाची ही गोष्ट आहे. ज्याला त्याच्या सांभाळणाऱ्या मिशनरी डॉक्टर ने मनाविरुद्ध दुसरीकडे राहायला पाठवलं आहे. तो जेव्हा परत येतो तेव्हा तो उत्तम स्वयंपाकी असतो पण त्याला दारूचं व्यसन लागलेलं आहे. स्वतःचा भुतकाळ विसरण्यासाठी तो या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. त्यातून बाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत पण तो जोसेफ त्यातून बाहेर पडेल का हे चित्रपट पाहील्यावरच कळेल. कोणत्याही प्रकारचा मसाला नसल्यामुळे चित्रपट तुम्हाला शांत वाटेल. एकदा बघायला हरकत. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


१०१. ब्लर
२०२२. रोमांचक. २ तास ६ मिनिटे.
दिग्दर्शकअजय बेहल
कलाकारतापसी पन्नू, गुलशन देवैया
प्रदर्शित तारीख९ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

ब्लर” चित्रपट समीक्षा :-

“ज्युलिया’ज आइज” या स्पॅनिश भाषेतील चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. मेंदू बधीर करणारे सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. हि एक जुळ्या बहींणीची गोष्ट आहे. नैनीताल मधील एका बहीणीचा जी अंध असते तीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडतो नेमकं तेव्हाच दिल्लीतील बहीणीला तिच्या घशामध्ये श्वास अडकल्या सारखा वाटतो. इथूनच चित्रपटाची कथा सुरू होते. जी बहीण जिवंत आहे तिची सुद्धा नजर आता कमी होतेय. तीलि सगळं अंधुक दिसतंय. त्यातच तिच्या नवऱ्याचा सुद्धा खून होतो. आता हे सगळे खून कोण आणि का करतंय हे सगळं या चित्रपटात पहायला मिळेल. तापसी पन्नू चा अभिनय बघून नावीन्यपूर्ण असं काही जाणवत नाही. पण एक वेगळा विषय म्हणून चित्रपट बघू शकता. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


१०१. गोविंदा नाम मेरा
२०२२. विनोदी. रोमांचक. २ तास ११ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकशशांक खैतान
कलाकारविकी कौशल, भुमी पेडणेकर, कियारा आडवाणी
प्रदर्शित तारीख १६ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

गोविंदा नाम मेरा” चित्रपट समीक्षा :-

डिस्नी हॉटस्टार वर प्रदर्शित झालेला गोविंदा नाम मेरा हा चित्रपट म्हणजे मसाला घातलेला एंटरटेनमेंट करणारा चित्रपट आहे. गोविंदा नावाचा एक डान्सर, कोरिओग्राफर आहे ज्याचं त्याच्या बायकोसोबत बिलकुल पटत नाही. त्याची सुलू म्हणजेच कीयारा ही गर्लफ्रेंड आहे. गोविंदा चा एक सावत्र भाऊ आहे. या दोघांमध्ये प्रॉपर्टी वरून वाद आहेत. आता या गोविंदा वर बायकोच्या खूनाचा आळ कसा येतो , की खरंच तो गौरीचा म्हणजे भुमी पेडणेकर चा खून करतो का.? वैगरे अशी ही गोष्ट आहे. मनोरंजन करणारा चित्रपट नक्कीच आहे पण फार लॉजिक लावत नाही बसलात तरच. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


१०२. अजय वर्धन
२०२२. जीवनचरित्र. नाटक. १ तास ३६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकप्रगति अग्रवाल , अमित असीम
कलाकाररोमिल चौधरी, रुसलान मुमताज, अर्जुम्मन मुगल
प्रदर्शित तारीख१६ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

“अजय वर्धन” चित्रपट समीक्षा :-

भारतातील फेमस डेंटल सर्जन अजय आर्यन यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. लहानपणापासून हुशार आणि तल्लख बुद्धी असलेले अजय आर्यन यांचा डॉक्टर होईपर्यंतचा हा संघर्षमयी प्रवास आहे. परिस्थितीमुळे शिक्षण घेणं हे अतिशय अवघड असुनही मोठ्या भावाची साथ मिळते आणि ते सामान्य ते असामान्य असा प्रवास करतात. प्रगति अग्रवाल आणि अमित असीम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. हा एक नक्कीच प्रेरणादायी चित्रपट आहे जो तुम्ही बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


१०३. त्राहिमाम
२०२२. रोमांचक, नाटक. १ तास १४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शक दुष्यंत प्रताप सिंह
कलाकारअर्शी खान, पंकज बेरी, मुश्ताक खान
प्रदर्शित तारीख१६ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

त्राहिमाम” चित्रपट समीक्षा :-

१६ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘त्राहिमाम’ हा चित्रपट म्हणजे एका मजूरी करणाऱ्या महिलेवर अन्यायाची गोष्ट आहे. अर्शी खान हिने ही भुमिका साकारली आहे. राजस्थान मध्ये घडणारी ही कथा आहे. एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका महिलेवर तेथील कंत्राटदाराची वाईट नजर असते. त्यातूनच तिच्यावर बलात्कार होतो. पण तिची तक्रार ऐकून घ्यायला कोणी तयार नाही कारण वीटभट्टीचा मालक आणि पोलिस यांचं साटंलोटं आहे. आता तिला न्याय मिषतो की नाही हे चित्रपट पाहील्यावरच कळेल. कथेमध्ये फार काही नावीन्य नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


१०४. सर्कस
२०२२. विनोदी, नाटक. २ तास १९ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकरोहीत शेट्टी
कलाकाररणवीर सिंग,वरुण शर्मा,जॅकलिन फर्नांडिस,पूजा हेगडे,संजय मिश्रा,मुकेश तिवारी,मुरली शर्मा,जॉनी लिव्हर,सिद्धार्थ जाधव,टिकू तलसानिया,बृजेंद्र काला,अनिल चरणजित
प्रदर्शित तारीख१६ डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

सर्कस” चित्रपट समीक्षा :-

रोहीत शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कमी पडला आहे. सर्कस म्हटलं की खळखळून हसणार हे ठरलेलं असतं पण हा विनोदी चित्रपट असला तरी फार हसवणारा नक्कीच नाही. शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ नाटकावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. साधारण १९४० ते १९६० च्या दशकातील ही गोष्ट आहे. गोलमाल’ चित्रपटाला डोक्यात ठेवून ही ‘सर्कस’ सुरू होते. ‘रिश्ते खून से नहीं, परवरीश से बनते हैं.’ हे ब्रीदवाक्य इथेही आहे. भली मोठी कलाकारांची गॅंग आहे तरीही चित्रपट फार नव्हे अजिबातच जादू करत नाही. रोहित शेट्टी च्या चित्रपटांचे फॅन असाल तर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


१०५. देढ़ लाख का दुल्हा
२०२२. विनोदी, नाटक. २ तास ९ मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शकअभय प्रताप सिंह
कलाकारध्रुव छेड़ा, अखिलेंद्र मिश्रा, एहसान खान, हर्षिता कंवर, इश्तियाक खान‌ , अभय प्रताप सिंह
प्रदर्शित तारीख३० डिसेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.२⭐/ ५

देढ़ लाख का दुल्हा” चित्रपट समीक्षा :-

३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला देढ़ लाख का दुल्हा हा चित्रपट बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसेल किंबहुना तो माहीत असावा असं या चित्रपटात काहीच नाही. सिनेमाक्षेत्रात नशिब आजमावायला गेलेल्या एका तरुणाची ही गोष्ट आहे. त्याच्याकडे अचानक येणारे भरपूर पैसे हे संशयाचं मुळ आहे. पैशांमुळे जो तो त्याला जावई कसं करून घेता येईल हे बघतोय तरी त्याला दिड लाखाचा जावई का म्हणतायत हे चित्रपट पाहील्यावरच कळेल. तुमच्या रिस्कवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


हे पण वाचा –

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – १ | जानेवारी २०२२ – मार्च २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – २ | एप्रिल २०२२ – जून २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – 3 | जुलै २०२२ – सप्टेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

मित्रांनो, २०२२ मध्ये प्रदर्शित झालेले सगळेच चित्रपट कसे आहेत हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *