सस्पेन्स थ्रिलर, गुन्हेगारी वर असलेल्या काही गाजलेल्या हिंदी वेबसिरीज भाग – २
Written by : आकांक्षा कोलते
Updated : नोव्हेंबर 13, 2022 | 8:47 PM
कळत नसेल नक्की बघावं काय.? तर या ” सस्पेन्स थ्रिलर” सिरीज असू शकतात उत्तम पर्याय.
दिवसेंदिवस वाढत चाललेला वेबसिरीज चा प्रेक्षकवर्ग पाहता आता बऱ्याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर नवनवीन वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. आज आपण अशाच काही २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या “सस्पेन्स थ्रिलर” वेबसिरीज बघणार आहोत.
१. ग्रहण |
शैली | ॲक्शन, गुन्हेगार, रोमांचक, |
लेखक | अनूसिंग चौधरी, विभा सिंग, प्रतिक पयोधी, नवज्योत गुलाटी, रंजन चांडेल, शैलेंद्र कुमार झा |
दिग्दर्शक | रंजन चांडेल |
स्टारकास्ट | झोया हुस्सेन, पवन मल्होत्रा, अंशुमन पुष्कर, वामिका गब्बी |
प्रदर्शित तारीख | २४ जून २०२१ |
भाषा | हिंदी |
” ग्रहण” सिरीज समीक्षा :-
सत्यकथांवर आधारित ग्रहण ही वेबसिरीज आपल्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारी आहे. रंजन चांडेल दिग्दर्शित ही सिरीज सत्या व्यास यांच्या ” चौरासी” या कादंबरीवर आधारित असून शीख दंगलीचे संदर्भ या सिरीजमध्ये पाहायला मिळतात.
कथेच्या सुरुवातीलाच अम्रिता सिंग नावाच्या कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारीची एन्ट्री होते आणि दमदार अभिनयाच्या मेजवानी सोबत एक दमदार कथा पहायला मिळते.
साधारण १९८० – १९८४ च्या काळातील ही कथा आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर झारखंड मधील बोकारो स्टिल या शहरात १९८४ मध्ये शीखविरोधी दंगे उसळले होते. शीख आणि हिंदी भाषिक यांच्यातील वैमनस्याचा फायदा घेऊन ही दंगल घडवून आणली होती. शीखांची अख्खी घरं च्या घरं जाळली गेली होती, त्यांच्या कतली झाल्या होत्या. आणि या सगळ्या भुतकाळाचा संबंध आपल्या कथेतील नायिकेच्या आयुष्यात कसा आहे हे बघणं फार रोमांचकारी आहे.
सत्ताधारी पक्षाचा मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेता यांच्यातील राजकीय वैमनस्यातून बोकारो स्टील सिटीमध्ये १९८४ ला झालेल्या शीख विरोधी दंगलींची पुन्हा एकदा चौकशी लागते. शीख असल्यामुळेच जाणूनबुजून त्या चौकशी समितीमध्ये अमृता सिंगला प्रमुख नेमलं जातं. जस जशी चौकशीमधील पुरावे पुढे येऊ लागतात तसं अमृता प्रश्नचिन्हांच्या जाळ्यात अडकते कारण दंगल घडवणारा म्होरक्या म्हणून तिच्या वडिलांचा जुना तरुणपणीचा फोटो तिच्या समोर येतो आणि ती हादरून जाते.
राजकारणात टिकून राहण्यासाठी अतिशय घाणेरड्या आणि खालच्या पातळीवर जाऊन नेते आणि त्यांचे स्थानिक पातळीवर काम करणारे कार्यकर्ते धार्मिक दंगल कशी घडवून आणतात हे दाखवताना दिग्दर्शक रंजन चांडेल यांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर केला आहे. हे सगळं बघताना आपण थेट त्या काळात जाऊन पोहचतो.
वर्तमान आणि भुतकाळातील कथा एकत्र दाखवताना कथेची पकड मजबूत ठेवणं आणि कथेमध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं हे दिग्दर्शकासोबत कलाकारांसाठी सुद्धा आव्हान असते पण या सिरीज मधील सगळ्याच कलाकारांनी हे आव्हान लिलया पार पाडलं आहे.
दंगलीपूर्वी घडलेली एक प्रेमकहाणी सुद्धा यात दाखवण्यात आली आहे ज्यामध्ये एक शीख मुलगी आणि हिंदी भाषिक तरुण आहे. हा तोच तरूण आहे जो पुढे जाऊन दंगली मध्ये पुढाकार घेतो आणि हा तोच तरूण आहे जो वर्तमानातील आयपीएस अधिकारी अम्रिता सिंग चे वडील आहेत. ही नक्की काय गुंतागुंत आहे आणि अम्रिता या सगळ्याचा शोध कसा लावेल, या सगळ्यातून ती वडिलांना वाचवेल की आपलं कर्तव्य बजावेल? हे सगळं पाहण्यासाठी ही सिरीज नक्की बघा. हॉटस्टार वर ही सिरीज तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या सिरीज ला पाच पैकी साडेचार स्टार.
२. नोव्हेंबर स्टोरी |
लेखक | इंद्रा सुब्रमण्यम |
दिग्दर्शक | इंद्रा सुब्रमण्यम |
स्टारकास्ट | तमन्ना भाटिया, जी. एम. कुमार, पशूपती , नंदीनी |
प्रदर्शित तारीख | २० मे २०२१ |
भाषा | तमिळ, हिंदी |
“ नोव्हेंबर स्टोरी” सिरीज समीक्षा :-
मे २०२१ मध्ये प्रदर्शित झालेली "नोव्हेंबर स्टोरी" ही एक तमिळ भाषेतील थ्रिलर व शेवटपर्यंत सस्पेन्स टिकवणारी वेबसिरीज तुम्ही पाहीली नसेल तर एका उत्कृष्ट कलाकृतीला बघण्यापासून तुम्ही मुकला आहात असं म्हणावं लागेल.
एक प्रसिद्ध लेखक गणेशन( जि. एम कुमार) आणि त्याने लिहीलेली एक रोमांचकारी रहस्यमय पण अपुर्ण अशा कथेच्या भोवताली घडणाऱ्या घटनांवर ही सिरीज चित्रित केली गेली आहे. लेखकाच्या कथेमध्ये असलेले खुन जेव्हा प्रत्यक्षात सुद्धा होतात तेव्हा खरा आपल्या बुद्धीचा कस लागतो.
अनुराधाचे वडील गणेशन यांना अल्झायमर हा आजार असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर आपली कथा पुर्ण करायची असते पण तेव्हाच नेमका त्यांच्याच नावावर असलेल्या एका जुन्या बंद असलेल्या घरात एका महिलेचा खून होतो आणि अशा काही गोष्टी घडायला सुरुवात होते की एका ठिकाणी लेखक हाच खरा खुनी आहे असं वाटतं.
गणेशन यांची मुलगी अनुराधा (तमन्ना भाटिया) ही सुद्धा अतिशय तल्लख बुद्धी असलेली एक कंम्प्युटर इंजिनिअर आहे आणि अशाच गुंतागुंतीच्या असलेल्या पोलीस केसेस सोडवण्यासाठी तीची मोठी मदत होत असते. नेमकं तिच्या ऑफीस मधून सुद्धा एक पोलिस रिपोर्ट गहाळ झाला आहे आणि तो शोधण्याची जबाबदारी सुद्धा अनुराधा वर आहे. महत्वाचं म्हणजे तिच्या ऑफीस मधील डाटा कोणीतरी हॅक करून हा रिपोर्ट चोरला आहे.
या वेबसिरीजमधील महत्वाची आणि दाद द्यावी अशी गोष्ट म्हणजे दोन वेगवेगळ्या कथा समांतर चालु आहेत पण एकमेकांना धरून आहेत. त्यातील दुवा एकच आहे. तुम्हाला जर तुमच्या बुद्धीला चालना देऊन खुनी कोण असा अंदाज लावायला आवडत असेल तर ही सिरीज नक्की बघा.
सगळ्यांचे साधे सहज नैसर्गिक अभिनय, उत्तम बॅकग्राऊंड म्युझिक, गुंतवून ठेवणारी रहस्यमय कथा अशा सगळ्या गोष्टींमध्ये उजवी असणारी ही सिरीज तुम्ही डिस्नी हॉटस्टार वर हिंदी भाषेत तुम्ही बघू शकता.
३. मुंबई डायरीज २६/११ |
लेखक | संयुक्थ चावला शेख, अणु सिंघ चौधरी |
दिग्दर्शक | निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विस |
स्टारकास्ट | मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, मृण्मयी देशपांडे, प्रकाश बेलावाडी, सत्यजित दुबे,, श्रेया धनवंत्री, नताशा भारद्वाज |
प्रदर्शित तारीख | ९ सप्टेंबर २०२१ |
भाषा | हिंदी |
” मुंबई डायरीज २६/११” सिरीज समीक्षा :-
नावावरूनच लक्षात आलं असेल ही सिरीज नक्की कोणत्या प्रसंगांवर आधारित आहे. २६.११.२००८ सखली झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण आणि जखमा आजही ताज्या आहेत. या हल्ल्यावर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित झाले पण ही सिरीज त्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किंवा त्यांचा लढा दाखवणारे चित्रपट आपण पाहीले आहेत. वृत्तवाहिन्यांनी सुद्धा तेव्हा हल्ल्यातील बरेच प्रसंग कव्हर केले होते.
पण हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांची बाजू दाखविणारी ही सिरीज बघताना मेंदू बधीर झाल्याशिवाय राहणार नाही.
सिरीजची सुरूवात एका सरकारी रुग्णालयात होते. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जखमी लोकांचा जीव वाचवण्यासाठी तहान भुक विसरून तळमळीने काम करणाऱ्या नर्सेस, वॉर्डबॉय, डॉक्टर या सगळ्यांवर चित्रित केलेली ही सिरीज त्यांच्या कार्याची आपल्याला दखल घेण्यास भाग पाडते. खरं तर त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी या सिरीजची निर्मिती करण्यात आली असली तरी सिरीज बघताना याचा दिग्दर्शकाला विसर पडल्याचे जाणवते. बऱ्याचदा न पटणारे प्रसंग दाखवले गेलेले आहेत.
मोहीत रैना व कोंकणा सेन सोबत सगळ्याच कलाकारांनी अभिनयाची बाजू उचलून धरली असली तरी कथानकात गोंधळ दिसून येतो. सत्य घटनेवर आधारित कलाकृती सादर करताना काही गोष्टी अतिरंजित दाखवल्या गेल्या की मनाला पटत नाही. नेमकं तेच या सिरीजच्या बाबतीत झालं आहे. त्यामुळे माझ्याकडून या सिरीज ला ५✰ पैकी ३✰ स्टार.
४. द लास्ट आवर |
लेखक | अनुपमा मिंझ, अमित कुमार |
दिग्दर्शक | अनुपमा मिंझ, अमित कुमार |
स्टारकास्ट | संजय कपूर, शहाना गोस्वामी, कर्म टक्पा, रायमा सेन, शायली कृष्णण |
प्रदर्शित तारीख | १४ मे २०२१ |
भाषा | हिंदी, इंग्रजी |
“ द लास्ट आवर” सिरीज समीक्षा :-
आसिफ कपाडिया निर्मित आणि अमित कुमार यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीज रहस्यांनी व्यापलेली आहे. ईशान्येकडील पहाडी भागात एका शहरात जेथे तीन वर्षांत मोजून पाच खूनही झाले नाहीत, तिथे एकामागून एक खुनांची मालिका सुरू झाली आहे. आणि या खुन्याचा शोध घेण्याचं काम मुख्य पोलिस अधिकारीच्या भुमिकेतील संजय कपूर म्हणजेच अरुप हे घेत आहेत. आपल्या पत्नीचा(रायमा सेन) एका ॲक्सिडंटमध्ये मृत्यू झाल्यानंतर मुंबईवरून बदली होऊन ते या शहरात आले आहेत.
या सिरीजमध्ये असलेला नायक म्हणजेच देव (कर्म टक्पा) याच्याकडे एक विलक्षण शक्ती आहे, तो मृत आत्म्यासोबत बोलू शकतो. मृत्यू होण्यापूर्वीचा एक तासात काय झालं हे तो आत्मा देवला सांगू शकतो आणि हाच या कथेचा मुळ गाभा आहे.
देव हा पहाडी भागात असणाऱ्या झाकरी जमातीतील असून या लोकांकडे त्याचं रक्षण करण्यासाठी दैवी शक्ती मिळालेली असते. मृत व्यक्तीच्या शेजारी झोपून त्या व्यक्तीच्या आयुष्यात मरण्यापूर्वीच्या एक तासात काय झालं आहे हे देव स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतो. या कथेतील खलनायक म्हणजे यमु नाडू (रॉबिन तमांग) हा अतिशय कपटी असून त्याच्याकडे सुद्धा एक दैवी शक्ती आहे ज्यामुळे तो भविष्यात घडणाऱ्या घटना पाहू शकतो आणि म्हणूनच त्याला देव कडे असलेली शक्ती सुद्धा हवी आहे.
या कथेतील चौथं आणि महत्वाचं पात्र म्हणजे परी(शायली कृष्ण). परीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिला विचित्र आवाज ऐकू येत असतात आणि ती अदृश्य अशा कोणासोबत तरी बोलताना दिसते. ती कोणाशी बोलत असते किंवा तिला कोणाचे आवाज ऐकू येतात हे पण रहस्यचं आहे. उंचचं उंच पहाडांमध्ये घडणाऱ्या या अकालनीय गोष्टींचा छडा लावण्याची जबाबदारी डिसीपी अरुप पूर्ण करू शकेल का.? या खुनांचा शोध लावण्यासाठी देव च्या दैवी शक्तीचा उपयोग होतो का.? अरुपची पत्नी मेल्यावर सुद्धा देवला का दिसते.? असे अनेक प्रश्न पडतात.
सुरूवातीला रोमांचकारी रहस्यमयी वाटणारी ही कथा पुढे सरकल्यावर थोडी कंटाळवाणी वाटते पण प्रश्नांची उत्तरे न सापडल्याने बघण्यासाठी भाग पाडते.
नेहमीपेक्षा वेगळी कथा, सुपरनॅचरल अभिनय, उत्तम लोकेशन असलेल्या या सिरीजच्या दुसऱ्या सिझची प्रेक्षकांना प्रतिक्षा असणार यात शंकाच नाही. ॲमेझॉन प्राईम विडीओ वर ही सिरीज तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या सिरीजला पाचपैकी ३.५ स्टार.
५. मुकेश जासूस |
लेखक | हीना डिसूजा, सजल कुमार, बिक्रमजीत सिंह व दिगांत व्यास |
दिग्दर्शक | हीना डिसूजा आणि दिगंत व्यास |
स्टारकास्ट | राहुल बग्गा, परितोष त्रिपाठी, पूनम ढिल्लों, राजेश्वरी सचदेव, रुचि मालवीय व अनामिका शुक्ला। |
प्रदर्शित तारीख | ७ मे २०२१ ते २६ मे २०२१ |
भाषा | हिंदी |
“ मुकेश जासूस ” सिरीज समीक्षा :-
आता जासूस म्हटलं की एक गंभीर आवाजातील बॅकग्राऊंड म्युझिक आणि तसाचं प्रसंग डोळ्यासमोर येतो. पण हॉटस्टार क्विक्स वर प्रदर्शित झालेली मुकेश जासूस ही वेबसिरीज थोडी वेगळी आहे. या सिरीज मध्ये खुन, गुप्तहेरी, सस्पेन्स असला तरी या सगळ्याला एक विनोदी तडका देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
"मुकेश जासूस" एकूण वीस एपिसोड असलेली ही एक मिनी वेबसिरीज आहे कारण प्रत्येक एपिसोड फक्त दहा ते पंधरा मिनिटे इतक्या लांबीचा आहे.
मुकेश नावाच्या एका बोगस वकीलाला वकिली सोडून गुप्तहेर म्हणुन काम करावं लागतं आणि पहिल्यांदाच जेव्हा त्याच्याच भागातील खुनाच्या शोधाची केस हातात मिळते तेव्हा खरी सिरीज रंगत जाते. या सगळ्यात त्याचा मित्र (परितोष त्रिपाठी)त्याच्या सोबत असतो जो स्वतः पण एक बोगस वकील म्हणून काम करत असतो.
सुरूवातीला विनोदी अंगाने जाणारी ही कथा पुढे सरकताना रोमांचकारी होत जाते. मुकेश आणि त्याचा मित्र खुनी शोधून काढत असतील का हे बघण्यासाठी ही मिनी सिरीज नक्की बघा.
काही सिनेमे किंवा वेबसिरीज चांगल्या असून देखील प्रमोशन अभावी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. मुकेश जासूस त्यापैकीच एक. सगळ्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. पुनम ढिल्लौं बऱ्याच दिवसांनी काम करताना दिसत आहेत. रुची मालवियाने सुद्धा अभिनय चांगला केला आहे. सगळेच कलाकार त्याच्या त्याच्या भुमिकेत फिट बसले आहेत. डायलॉग, सिनेमॅटोग्राफी अशा बऱ्याच गोष्टींमध्ये सिरीज अजून चांगली होऊ शकली असती. तरी माझ्याकडून या सिरीज ला ३.५ स्टार.
“जगभरून” च्या पसंतीस उतरलेल्या या सिरीज तुम्हाला आवडतात की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.