वर्षाच्या सुरुवातीलाच ,१४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट म्हणजे "स्टोरी ऑफ लागीरं". रोहित राव नरसिंगे यांच लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात संजय खापरे या कलाकाराची मुख्य भूमिका आहे.
एका गावातील ही प्रेमकथा आहे. अर्थातच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात संजय खापरे यांच्यासह रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. "राजकारण, प्रेमकहाणी आणि त्यातून होणारा प्रेमाला विरोध हे काही नवीन नाही त्यामुळे या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
कॉफी या चित्रपटात तुम्हाला प्रेमाचा त्रिकोण बघायला मिळेल. स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, आणि कश्यप परुळेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सुद्धा १४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. प्रेमकहाणी किंवा प्रेमाचा त्रिकोण वैगरे हे काही नवीन नाही पण प्रत्येक कलाकृती सादर करताना काहीतरी वेगळं, नवीन करण्याचा प्रयत्न केला जातो तोच नितीन कांबळे यांनीसुद्धा केलेला आहे.
नितीन कांबळे दिग्दर्शित या चित्रपटाला माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
३. नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा
२०२२ गुन्हेगारी / रोमांचक / नाटक. १ तास ५२ मिनिटे.[ ए ]
लेखक
महेश मांजरेकर
दिग्दर्शक
महेश मांजरेकर
स्टारकास्ट
छाया कदम, रोहित हळदीकर, प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, आणि कश्मिरा
“नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” चित्रपट समीक्षा :-
२०२२ च्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित "नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा".
परीस्थिती माणसाला किती हतबल बनवते किंवा तसाच प्रसंग असेल तर माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी अतिशय गंभीरपणे चित्रित केले आहे. महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन नेहमीच थक्क करणारं आणि विचार करायला लावणारं असतं. जेष्ठ लेखक जयंत पवार यांच्या 'वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा' या पुस्तकातील कथेवर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट बघताना "लालबाग परळ" या चित्रपटाची आणि गिरणी कामगारांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण दोन्ही कथांची पार्श्वभूमी एकच आहे.
छाया कदम, रोहित हळदीकर, प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, आणि कश्मिरा या कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. पण काही गोष्टींमध्ये चित्रपट रेंगाळलेला दिसतो. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
४. झोंबिवली
२०२२. भयपट / विनोदी / नाटक. २ तास १४ मिनिटे.[ यु / ए ]
“झोंबिवली” चित्रपट समीक्षा :- एखादा भयपट विनोदी असू शकतो का.? तर उत्तर हो असं आहे. रोजी प्रदर्शित झालेला झोंबिवली हा चित्रपट भयपट असला तरी विनोदी अंगाने जाणारा आहे. “झॉम्बी” हा विदेशी भुताचा प्रकार आता तसा सगळ्यांनाच माहीत आहे. अफ्रिकेत जन्म झालेल्या या झॉम्बीचं आगमन चक्क डोंबिवलीत कसं झालं.? का झालं.? डोंबिवलीमध्ये आल्यावर ते नक्की काय करतात हे पाहण्यासाठी तुम्हाला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित झोंबिवली हा चित्रपट बघावा लागेल. अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी या तिघांच्या मुख्य भूमिका असल्या तरी बाकी सगळ्याच कलाकारांनी अभिनयाची छाप पाडली आहे. मेकअप, तांत्रिक गोष्टी सगळ्या चांगल्या असल्या तरी कमकुवत कथानकामुळे चित्रपट म्हणावा इतका दमदार नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.मरिठीमधील एक वेगळा प्रयोग म्हणून एकदा हा सिनेमा बघायला हरकत नाही. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या समस्या,दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आत्महत्या या सगळ्यावर भाष्य करणारे आतापर्यंत बरेच चित्रपट येऊन गेले. तरीही समाजव्यवस्थेला जाग येत नाही.
अशाच समाजव्यवस्थेवर आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित "फास" हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अविनाश कोलते दिग्दर्शित या चित्रपटाच्या नावावरूनच लक्षात येतं की एकंदर चित्रपटाचं कथानक काय असेल. कमलेश सावंत, पल्लवी पालकर यांनी शेतकरी जोडप्याची भुमिका साकारली आहे. ज्यामध्ये बळीराम (कमलेश सावंत) याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी गावात आलेला पोलिस अधिकारी म्हणून उपेंद्र लिमये या कलाकाराची वर्णी लागली आहे.
कथा आणि कलाकार उत्तम असले तरी दिग्दर्शनाची बाजू कमजोर झाली आहे. चित्रपट चांगला असूनही प्रमोशन कमी पडल्यामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहचला नाही. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
ही कथा आहे लक्ष्मीची. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी वैधव्य आलेल्या लक्ष्मीचा हा जीवनप्रवास बघताना अनेक नात्यांचे पैलू उलगडताना दिसतात. स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवला असला तरी विधवा पुनर्विवाहाला समाजात हळूहळू मान्यता मिळत होती तेव्हाचा हा काळ.
वडिलांच्या शब्दाबाहेर नसलेली लक्ष्मी वडिलांच्या सांगण्यावरून अंतू भटजी या वडिलांच्या वयाइतक्या व्यक्तीसोबत लग्न करते. पण पहिल्या पत्नीला न विसरलेले अंतू भटजी लक्ष्मीला पत्नी म्हणून स्विकारतील का.? नाही तर स्त्री म्हणून असलेल्या लक्ष्मीच्या गरजा ती कशी पूर्ण करते किंवा तीची काय घुसमट होते हे बघण्यासाठी हा चित्रपट जरूर बघा. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला माझ्याकडून चार स्टार.
७. लोच्या झाला रे
२०२२. विनोदी / प्रणय. १ तास ४९ मिनिटे. [ यु ]
लेखक
परितोष पेंटर
दिग्दर्शक
परितोष पेंटर, रवी अधिकारी
स्टारकास्ट
अंकुश चौधरी, वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे
रोजी प्रदर्शित झालेला हा विनोदी चित्रपट "पती सगळे उचापती" या मराठी नाटकावर आधारित आहे. अंकुश चौधरी, वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बघताना तुम्ही खळखळून हसाल याची गॅरंटी आहे. पण जर तुम्ही डोकं लावून लॉजिक वैगरे शोधण्याचा प्रयत्न केलात तर मात्र निराश व्हालं. पण मनोरंजन म्हणून एकदा हा सिनेमा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
दिग्दर्शक मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेला सोयरिक हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. सोयरिक या शब्दावरूनच लक्षात येते की कथानक काय असेल.
आपला महाराष्ट्र नाही म्हटलं तरी अजूनही जातीपातीच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. आणि मग लग्न ठरवताना किंवा सोयरिक बघताना हीच जातपात सगळ्यात आधी पाहीली जाते. प्रेमविवाह असेल तेव्हा जातीतील सोयरिक नसेल किंवा स्थळ तोलामोलाचं नसेल तर मात्र विरोध केला जातो. हे चित्र अजूनही दिसतं. ग्रामीण भागात तर याचा पगडा अजून जास्त. हेच सगळं मोठ्या पडद्यावर दाखवणारा हा चित्रपट आहे. नितीश चव्हाण आणि मानसी भवळकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला तीन स्टार.
९. का रं देवा
२०२२. प्रणय / नाटक. २ तास ४ मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शक
रंजीत जाधव
स्टारकास्ट
मयूर लाड, मोनालिसा बागल
प्रदर्शित तारीख
११ फेब्रुवारी २०२२
भाषा
मराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २ .२⭐/ ५
“का रं देवा.” चित्रपट समीक्षा :-
या चित्रपटात मयूर लाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्या प्रेमाचं समीकरण पहायला मिळेल. रंजीत जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना खास आवडली आहेत. साधारण प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाचं लेखन सुद्धा रंजीत जाधव यांनी केले आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
२०२२ साली प्रदर्शित झालेले आणि "जगभरून फिल्म्स” च्या यादीत असलेले हे काही चित्रपट तुम्ही नक्की बघा. पुढचा भाग घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही आधी पाहीले आहेत हे कमेंट करून नक्की सांगा.
पावनखिंडीतील लढाई म्हटलं की आपल्याला आठवतात ते बाजीप्रभू देशपांडे. आणि त्यांचं स्मरण हे व्हायलाच हवं पण आपल्या बलिदानाने पावनखिंड अजरामर करण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे सोबत अजून काही मावळे लढले होते ते म्हणजे "बांदल". बांदलसेना हे नाव बऱ्याच लोकांना आतापर्यंत माहीत नव्हतं पण ते या चित्रपटाच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचलं. आणि याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना जातं.
दिग्पाल यांनी शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचं शिवधनुष्य उचललं आणि ते तेवढ्याच समर्थपणे पेललं आहे. अजय पुरकर, अंकीत मोहन, प्राजक्ता माळी, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक कलाकृतीला न्याय दिला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
कोरोना आणि लॉकडाउन मुळे उद्योगधंद्यांसोबत अजून कोणाला फटका बसला असेल तर तो लग्न ठरलेल्या पण लॉकडाऊन मुळे रखडलेल्या जोडप्यांना. अशाच एका जोडप्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे "लकडाउन बी पॉझिटिव्ह".
महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
कल्पेश भांडारकर यांनी पहिल्यांदाच "चाबूक" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला असून यात समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी होणाऱ्या धावपळीत किंवा प्रयत्नांच्या नादात हातच्या बऱ्याच गोष्टी निसटत जातात आणि ते कळत सुद्धा नाही. असंच काहीसं या चित्रपटातील नायकाच्या बाबतीत होतं. नातेसंबंधावर भाष्य करणारा हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२२ ला प्रदर्शित झाला होता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
सचिन कुंडलकर दिग्दर्शित पॉंडिचेरी हा चित्रपट एकमेव आणि पहिलाच असा मराठी चित्रपट आहे जो पूर्णपणे स्मार्टफोन वर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर , वैभव तत्ववादी , अमृता खानविलकर , नीना कुलकर्णी , महेश मांजरेकर , गौरव घाटणेकर , आणि तन्मय कुलकर्णी या कलाकारांची वर्णी लागली आहे. चित्रपटात कलाकारांचा सहभाग हा महत्त्वाचा असतोच पण या चित्रपटात तेवढाच महत्त्वाचा सहभाग आहे तो 'पॉंडिचेरी' या शहराचा. या शहराची सफर करण्यासाठी आणि या चित्रपटातील प्रेमकहाणी बघण्यासाठी "प्लॅनेट मराठी" या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
१४. वन फोर थ्री
२०२२. ॲक्शन, प्रणय, नाटक. २ तास २७ मिनिटे. [ यु / ए ]
ग्रामीण भागातील जातव्यवस्थेवर आधारित चित्रपट तसे बरेच येतात. त्यात पण एका विशिष्ट जातीतील मुलाचं उच्च जातीच्या मुलीवर प्रेम करणं. आणि ते मिळवण्यासाठी काहीही करणं. मार खाणं. मार देणं. एकंदरच दाक्षिणात्य चित्रपटांना कॉपी करत तो सिनेमा रंगवणं हे आता नवीन नाही. वन फोर थ्री पण त्यातलाच एक. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. चित्रपट अगदीच सुमार असल्याने माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२०२२ मध्ये खरचं चित्रपट एकापाठोपाठ एक असे प्रदर्शित होत होते. त्यात ब्लॅक कॉमेडी असलेले किंवा कॉमेडी थ्रिलर अशा धाटणीचे चित्रपट बऱ्यापैकी आले होते. "झटका" हा चित्रपट त्यापैकी एक. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या एका प्रेमीयुगुलाची ही गोष्ट. अचानक त्यांना एक मृतदेह सापडतो आणि इथून चित्रपट सुरू होतो. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या एका मृतदेहामुळे त्यांच्या नात्यातील खरेपणा, चढउतार, त्यांच्या आयुष्यात नंतर काय काय झालं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. या चित्रपटाचा झटका तुम्हाला कितपत लागेल ही शंका आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१६. एकच नंबर…सुपर….
२०२२. प्रणय / विनोदी / नाटक. २ तास ७ मिनिटे.[ यु / ए ]
टकाटक च्या यशानंतर आता दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि अभिनेता प्रथमेश परब यांच्या जोडीची कमाल धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. प्रथमेश सोबतच मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी असे बरेच कलाकार या चित्रपटात आहेत.
मिलिंद कवडे यांनी याआधी पण उत्तम सिनेमे बनवले आहेत आणि आ सिनेमा सुद्धा दिग्दर्शनाच्या बाबतीत उत्तमच आहे. एक धमाल चित्रपट म्हणून एकदा हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
२०२२ साली प्रदर्शित झालेले आणि “जगभरून फिल्म्स” च्या यादीत असलेले हे काही चित्रपट तुम्ही नक्की बघा. पुढचा भाग घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही आधी पाहीले आहेत हे कमेंट करून नक्की सांगा.