FilmsFilms NewsHindiHome

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – 3 | जुलै २०२२ – सप्टेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जानेवारी 29, 2023 | 08:14 PM

मित्रांनो, जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपटांची यादी आपण पहिल्या भागात पाहिली आहे. आणि दुसऱ्या भागात एप्रिल २०२२ – जून २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट समीक्षा व त्यांची थोडक्यात माहिती पाहिली. आता आपण जुलै २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी पाहणार आहोत.

all Hindi films released in 2022 part 3 1

४१. राष्ट्र कवच ओम
२०२२. ॲक्शन, रोमांचक. २ तास १५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शककपिल वर्मा
कलाकारप्रकाश राज,आदित्य रॉय कपूर,संजना सांघी,जॅकी श्रॉफ,आशुतोष राणा
प्रदर्शित तारीख१ जुलै २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

राष्ट्र कवच ओम” चित्रपट समीक्षा :-

स्पेशल फोर्सचा कमांडो असलेला ओम (आदित्य रॉय कपूर) एका खास कामगिरीवर आहे. आणि एका बाजूला त्याच्या वडिलांना देशद्रोही ठरवलं आहे. जे अणुबॉम्बपासून बचाव करणारी यंत्रणा बनवून व ती घेऊन ते देशातून फरार झालेले आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे. आणि हाच आरोप ओमला खोडून काढायचा आहे. म्हणूनच तो त्या ‘राष्ट्र कवच’ नामक यंत्रणेच्या शोधात असतो. याच कथेभोवती सिनेमा फिरतो. आशुतोष राणा आणि प्रकाश राज यांच्या सुद्धा यात मुख्य भूमिका आहेत. सिनेमाच्या शेवटी असणारा ट्विस्ट अनपेक्षित आहे. आदित्य रॉय कपूर याचा अभिनय नेहमीप्रमाणेच चांगला आह. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. कथा, पटकथा,दिग्दर्शन या सगळ्यात चित्रपट कमी पडतो. पहायचा असल्यास झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


४२. रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट
२०२२. ॲक्शन, नाटक. २ तास ३७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकआर. माधवन
कलाकारआर माधवन,सिमरन बग्गा , रजित कपूर, शाहरुख खान 
प्रदर्शित तारीख१ जुलै २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८⭐/ ५

रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट” चित्रपट समीक्षा :-

देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि तरीही उपेक्षित असणाऱ्या एका महान भारतीय वैज्ञानिकाची ही जीवनकहाणी आहे. जेष्ठ वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्यावर आधारित हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने पहावा असा आहे. हा फक्त नम्बी यांचा जीवनपट नसून इस्रोचा देखील प्रवास यात बघायला मिळतो. 
         नासा ची लाखोंची नोकरी सोडून इस्रो मध्ये दाखल होणाऱ्या वैज्ञानिकावर देशद्रोहाचा खटला चालतो. रॉकेट निर्मितीचं तंत्रज्ञान त्यांनी पाकिस्तानला विकलं असा आरोप केला जातो. आणि या कठीण परिस्थितीत त्यांच्या बाजूने खूप कमी लोक उभे राहतात. पण तरीही न डगमगता ते संघर्ष सुरू ठेवतात. तोच संघर्ष राकेट्री मध्ये बघायला मिळतो. आर. माधवन याने निर्मिती , लेखन, दिग्दर्शन या सगळ्या बाजू सक्षमपणे सांभाळल्या आहेत. एकंदरच हा चित्रपट तुम्ही नक्की बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.


४३. खुदा हाफिज : चॅप्टर २ अग्निपरीक्षा
२०२२. रोमांचक, नाटक. २ तास २९ मिनिटे. [ ए ]
दिग्दर्शकफारुख कबीर
कलाकारविद्युत जामवाल,शिवालिका ओबेरॉय
प्रदर्शित तारीख८ जुलै  २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

दा हाफिज : चॅप्टर २ अग्निपरीक्षा” चित्रपट समीक्षा :-

   “खुदा हाफिज” हा चित्रपट २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला होता. “खुदा हाफिज : चॅप्टर २ अग्निपरीक्षा” हा त्याच चित्रपटाचा पुढील भाग. पण हा चित्रपट एक स्वतंत्र कथा म्हणून तुम्ही पाहू शकता. कथा लैंगिक शोषण , महिलांवरील होणारा अत्याचार, प्रशासनाची दुटप्पी भूमिका, नाकर्तेपणा आणि या सगळ्याचा फायदा घेणारे राजकारणी या सगळ्याभोवती फिरते. विद्युत हा अतिशय हरहुन्नरी कलाकार असून देखील म्हणावा तितका प्रसिद्धी झोतात आला नाही हे दुर्दैव म्हणावं. एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट तुम्ही झी फाईव्ह या ॲप वर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


४४. हिट : द फर्स्ट केस 
२०२२. सस्पेन्स, रोमांचक. २ तास १६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकशैलेश कोलानू 
कलाकारराजकुमार राव, सान्या मल्होत्रा, शिल्पा शुक्ला, संजय नार्वेकर, मिलिंद गुणाजी, दलिप ताहिल
प्रदर्शित तारीख१५ जुलै २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

हिट : द फर्स्ट केस” चित्रपट समीक्षा :-

मुळ तमिळ भाषेतील चित्रपटाचा रिमेक असलेला   “हिट : द फर्स्ट केस”  सस्पेन्स थ्रिलर बनवण्याचा प्रयत्न थोडा फसला आहे. चित्रपटाची कथा मुळात रंजक आणि रहस्यमय असायला हवी तर चित्रपट चांगला होतो. पण नेमकं हेच इथे घडताना दिसत नाही. एका मुलीच्या गायब होण्यापासून कथा सुरू होते खरी पण पटकथा इतकी गुंतागुंतीची आहे की चित्रपट गरज नसताना वाढवलाय असं वाटतं. अगदीच कंटाळा आलाय आणि वेळ असेल तर एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


४६. जादुगर
२०२२. विनोदी, नाटक. २ तास ४७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकसमीर सक्सेना 
कलाकारजितेंद्र कुमार , आरुषी शर्मा , मनोज जोशी , जावेद जाफरी 
प्रदर्शित तारीख१५ जुलै २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

जादुगर” चित्रपट समीक्षा :-

वेबसिरीज “पंचायत” फेम जितेंद्र कुमार याची मुख्य भूमिका असलेला जादुगर ची फार जादू चालली नाही. क्रिडाविषयक असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला होता. फुटबॉल आणि जादू या दोन मुख्य विषयांभोवती कथा फिरत राहते. बघण्यासारखं असं या चित्रपटात फार काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार. 


४७. जुदा होके भी
२०२२. रोमांचक, नाटक. १ तास ५९ मिनिटे. [ ए ]
दिग्दर्शकविक्रम भट्ट
कलाकारअक्षय ओबेराय, एंद्रिता रे, मेहेरझान मझदा, जिया मुस्तफा
प्रदर्शित तारीख१५ जुलै २०२२
भाषा
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.६⭐/ ५

जुदा होके भी” चित्रपट समीक्षा :-

काही चित्रपट बघितल्यावर आपण तो का बघीतला असा पश्चात्ताप होतो. तसं हा चित्रपट पाहिल्यानंतर होऊ शकतं. विक्रम भट्ट दिग्दर्शित “जुदा होके भी” हा एक भयपट आहे. विक्रम भट्ट यांची ही भट्टी सपशेल फसलेली आहे. अभिनय, व्हिएफएक्स इफेक्ट, गाणी सगळ्याचीच बोंब आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


४८. शाब्बाश मिथू
२०२२. खेळ. नाटक. २ तास ३६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकश्रीजित मुखर्जी
कलाकारतापसी पन्नू,विजय राज
प्रदर्शित तारीख१० जून  २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

शाब्बाश मिथू” चित्रपट समीक्षा :-

श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित “शाब्बाश मिथू” हा भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. मितालीने एकुण २३ वर्षे भारताचं प्रतिनिधित्व केलं. या चित्रपटात मितालीचा सुरुवातीपासूनचा प्रवास, संघर्ष या चित्रपटात पहायला मिळतोच पण त्याच बरोबर भारतीय क्रिकेट महिला संघाला कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. किंवा त्यांना कशी दुय्यम वागणूक मिळते हे सुद्धा बघायला मिळतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या भारतीय महिला संघातील महीलांना साध्या स्वतःच्या जर्सी साठी सुद्धा झगडावं लागलं होतं यातच सगळं आलं. चित्रपट अजून खुलवता आला असता. पण काही गोष्टी टाळल्या गेल्या असं बघताना बऱ्याचदा वाटतं. पण तरीही एकदा तरी नक्कीच हा सिनेमा वेळ काढून बघा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. 


४९. आरके
२०२२. नाटक. १ तास ३५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकरजत कपूर
कलाकारमल्लिका शेरावत, कुब्रा सैत, रणवीर शौरी, मनु ऋषी चढ्ढा, चंद्रचूर राय, अभिजित देशपांडे, अभिषेक शर्मा
प्रदर्शित तारीख२२ जुलै २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.७⭐/ ५

आरके” चित्रपट समीक्षा :-

आरके चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर मल्लिका शेरावत हिचं तुम्हाला दर्शन होणार आहे. ही कथा आहे एका दिग्दर्शकाची. आता ती काय आहे हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. कथा – पटकथा थोडी किचकट आणि गुंतागुंतीची आहे त्यामुळे बघताना कंटाळा येऊ शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार


५०. शमशेरा
२०२२. ॲक्शन, साहसी. २ तास ३९ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शककरण मल्होत्रा
कलाकाररणबीर कपूर, वाणी कपूर, रोनित रॉय , सौरभ शुक्ला
प्रदर्शित तारीख२२ जुलै २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

शमशेरा” चित्रपट समीक्षा :-

तब्बल चार पाच वर्षांनंतर रणबीर कपूर शमशेरा या चित्रपटातून पदार्पण करतोय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या ज्या म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात पूर्ण झाल्या नाहीत. रणबीर ने त्याचे शंभर टक्के दिले असले तरी कथा पटकथा चं तेवढ्या ताकदीची नसल्याने चित्रपट फारसा परिणामकारक दिसत नाही. 
         ब्रिटीश काळातील “काझा” हे एक काल्पनिक शहर या कथेतील महत्त्वाचा भाग आहे. आश्रयाच्या शोधात काझाला पोहचलेल्या खमेरन लोकांना तेव्हा तिथले स्थानिक उच्चवर्णीय लोक स्वीकारत नाहीत तेव्हा मग त्यांचा सरदार शमशेरा आपल्या साथीदारांना सोडवण्याच्या प्रयत्नात आपला जीव देतो. आणि परत पंचवीस वर्षांनी शमशेरा सारखा दिसणारा त्याचा मुलगा परत मैदानात उतरतो तेव्हा खरी कथा सुरू होते. तो स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करेल की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


५१. एक व्हिलन रिटर्न्स
२०२२. प्रणय, रोमांचक. २ तास १० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकमोहित सुरी 
कलाकारजॉन अब्राहम,अर्जुन कपूर,दिशा पटनी,तारा सुतारिया,जे. डी. चक्रवर्ती
प्रदर्शित तारीख२९ जुलै २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

एक व्हिलन रिटर्न्स” चित्रपट समीक्षा :-

आजकाल सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली लेखक दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीही दाखवत सुटलेत असं हा चित्रपट पाहील्यावर तुम्हाला सुद्धा जाणवेल. विकृती म्हणून नक्की काय दाखवायचं याचं भान न उरल्याने मोहीत सुरी यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या माथी मारला आहे. आधीच्या व्हिलन पेक्षा हा व्हिलन विकृत आणि बोअरिंग आहे हे चित्रपट बघून कळेलच. अर्जुन कपूर याचे हावभाव अख्ख्या चित्रपटात सारखेच वाटतात. असो, तुमच्या रिस्क वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५२. गुड लक जेरी
२०२२. गुन्हेगारी, नाटक. २ तास २८ मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शकसिद्धार्थ सेनगुप्ता
कलाकारजान्हवी कपूर,मिता वशिष्ठ,समता सुदीक्षा,दीपक डोबरीयाल,नीरज सूद
प्रदर्शित तारीख२९ जुलै  २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

गुड लक जेरी” चित्रपट समीक्षा :-

तमिळ चित्रपट ‘कोलामाऊ कोकिला’ या चित्रपटाचा हा रिमेक असला तरी तो नव्याने मांडण्यात दिग्दर्शक सिद्धार्थ सेनगुप्ता यशस्वी झाले आहेत. आयुष्यात बऱ्याचदा एक छोटीशी घटना पण अख्खं आयुष्य बदलवून टाकते. तेच या चित्रपटात पहायला मिळतं. पंजाब मध्ये स्थायिक झालेल्या मुळच्या बिहारी कुटुंबाची ही गोष्ट आहे. गंभीर असली तरी विनोदी शैलीत मांडलेली ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. डिझ्ने हॉटस्टार वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


५३. ऑड कपल
२०२२. नाटक. १ तास ५५ मिनिटे.
दिग्दर्शक जय बसंतू सिंह
कलाकारजय राज, सुचित्रा कृष्णमूर्ती, प्रणाती प्रकाश राथ, दिव्येंदू
प्रदर्शित तारीख२ ऑगस्ट २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

ऑड कपल” चित्रपट समीक्षा :-

प्रशांत जोहरी दिग्दर्शित ऑड कफल ही एक साधी सरळ मनोरंजन करणारी कथा आहे. फार मसाला नाही, ढिच्यांक गाणी नाही. दोन जोडपी आणि त्यांचं एकमेकांच्या जोडीदारावर असणारं प्रेम हा या कथेचा पाया आहे. आता नेमकं कोण कोणावर प्रेम करतयं.? कोणाचं लग्न कोणाशी होतं.? का होतं.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चित्रपट बघताना मिळतीलच. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


५४. डार्लिंग्ज
२०२२. नाटक २ तास १४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकजसमीत के. रीन
कलाकारआलिया भट,शेफाली शहा,विजय वर्मा,रोशन मॅथ्यू,विजय मौर्य,राजेश शर्मा,किरण करमरकर,संतोष जुवेकर
प्रदर्शित तारीख५ ऑगस्ट  २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

डार्लिंग्ज” चित्रपट समीक्षा :-

डार्लिंग्ज हे नाव ऐकून आपण वेगळे अंदाज बांधतो पण चित्रपट वेगळा आहे. स्त्रियांचा होणारा छळ, मारहाण या विषयावर चित्रपट बेतलेला असला तरी सरसकट सगळे पुरुष वाईट नसतात हे उत्तमप्रकारे दाखवण्यात आले आहे. बद्रु म्हणजे आलिया भट्ट आणि तिची आई शेफाली शाह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे चित्रित करण्यात आल्या आहेत. पण बऱ्याच ठिकाणी चित्रपट संथ वाटतो. खूप वेळा लावलेले अंदाज बरोबर निघतात. पण तरीही एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


५५. लाल‌सिंग चढ्ढा
२०२२. नाटक, प्रणय. २ तास ३९ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअद्वैत चंदन
कलाकारआमिर खान, करिना कपूर खान, नागा चैतन्य
प्रदर्शित तारीख११ ऑगस्ट २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

लाल‌सिंग चढ्ढा” चित्रपट समीक्षा :-

  मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान चा हा चित्रपट बॉयकॉट ट्रेंड च्या फेऱ्यात चांगलाच अडकला होता. खरं तर १९९४ झाली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गंप’ या अमेरिकन सिनेमाचा अधिकृत भारतीय रिमेक आहे. हा चित्रपट तेव्हाची तत्कालीन परिस्थिती, घडामोडी यांच्यावर आधारित होता. त्यामुळे त्याचा रिमेक बनवताना काही गोष्टी बदलणे गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे सतत तुलना होत राहते. आणि लाल सिंग चढ्ढा ही कलाकृती अपूर्ण वाटते. आमिर खान पिके च्या भुमिकेतून बाहेर पढला नाही असा भास बऱ्याचदा होतो. 
      चित्रपटात अगदी १९८३ ते २०१४ – १५ पर्यंत चा काळ डोळ्यासमोर उभा केला आहे.  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या, किंवा लालकृष्ण अडवाणी यांची अयोध्या यात्रा, ते अगदी मुंबईवरील २६/११चा हल्लाहे सगळं या चित्रपटात पहायला मिळतं. एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता


५६. रक्षाबंधन 
२०२२. नाटक, परिवार. २ तास. [ यु ]
दिग्दर्शकआनंद राय 
कलाकारअक्षय कुमार, भुमी पेडणेकर , शाहजमीन कौर, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत, सादिया खतीब 
प्रदर्शित तारीख११ ऑगस्ट २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

रक्षाबंधन” चित्रपट समीक्षा :-

अक्षय कुमार म्हटलं की जास्त करून विनोदी चित्रपट असंच समिकरण झालंय. रक्षाबंधन हा चित्रपट तसा विनोदी अंगाने जाणारा असला तरी एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. हुंडाबळी या कुप्रथेविरूद्ध आवाज उठवणारा हा चित्रपट आहे. दिल्लीतील चांदणी चौकात पाणीपुरी विकणारा लाला केदारनाथ आणि त्याच्या चार बहिणी या चित्रपटातील मुख्य भूमिका आहेत. आणि अर्थातच लालाची प्रेयसी सपना. बहीणीच्या लग्नासाठी लाला काय काय करतो आणि इतकं करूनही त्याच्या बहीणीचा हुंड्यासाठी जीव जातो तेव्हा त्याला काय वाटतं हे सगळं बघताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. एकंदर एका चांगल्या विषयावर आधारित हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


५७. दोबारा 
२०२२. नाटक, रोमांचक. २ तास १२ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअनुराग कश्यप 
कलाकारतापसी पन्नू, सास्वता चटर्जी, राहुल भट्ट, नासर, हिमांशी चौधरी, पावैल गुलाटी
प्रदर्शित तारीख१९ ऑगस्ट २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

दोबारा” चित्रपट समीक्षा :-

२०१८ मध्ये आलेल्या ‘मिराज’ या स्पॅनिश चित्रपटावर आधारित दोबारा हा सिनेमा आहे. अनुराग कश्यप हा नेहमीच उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवत असतो. त्यामुळे काही वेगळं, हटके असं बघायचं असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. टाईमट्रॅवल या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट आहे. कथा पुण्यातील हिंजवडी येथील एका खुनाची आहे. आता तापसी चा त्या खुनाशी काय संबंध, किंवा तीला आता जे दिसतंय ते खरं कि नक्की काय असे बरेच प्रश्न पडतात. कारण हा चित्रपट म्हणजे तापसीला दिसणाऱ्या घटनांवर आहे. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर या जॉनरचा असून देखील यात विकृत, हिंसाचाराचा अतिरेक वैगरे असं काही बघावं लागत नाही. या चित्रपटातील मिस्ट्री काय आहे हे बघण्यासाठी चित्रपट जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. 


५८. लायगर 
२०२२. प्रणय, ॲक्शन. २ तास १८ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकपुरी जगन्नाथ
कलाकारविजय देवरकोंडा, राम्या क्रिष्णन, अनन्या पांडे, रोनीत रॉय, मकरंद देशपांडे, चंकी पांडे, विशू रेड्डी, माइक टायसन
प्रदर्शित तारीख२५ ऑगस्ट २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.७⭐/ ५

लायगर ” चित्रपट समीक्षा :-

  प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या चित्रपटात बघण्यासारखं काही नाही हे सांगण्यासाठी लिहिण्या इतपत सुद्धा काही नाही. अनन्या पांडे हीचा अभिनय बघणं म्हणजे एक प्रकारची शिक्षा, जी तुम्हाला या चित्रपटाच्या निमित्ताने भोगावी लागते. एक बडा स्टार असला म्हणजे चित्रपट सुपरहिट होतो असं नाही. हा चित्रपट म्हणजे ना कथेचा थांगपत्ता ना अभिनयाचा अशी गत आहे. नक्की काय दाखवायचं आहे हे पुरी जगन्नाथ यांना स्वतःलाच शेवटपर्यंत कळलेलं नाही. हा चित्रपट तुम्ही तुमच्या हिंमतीवर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार. 


५९. होली काऊ
२०२२. विनोदी, नाटक. १ तास ३० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकसाई कबीर
कलाकारसंजय मिश्रा , सादिया सिद्दीकी, तिग्मांशु धूलिया , नवाज़ुद्दीन सिद्दीकी
प्रदर्शित तारीख२६ ऑगस्ट २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.२⭐/ ५

होली काऊ” चित्रपट समीक्षा :-

संजय मिश्रा लिखित आणि दिग्दर्शित होली काउ हा चित्रपट रोजी प्रदर्शित झाला होता. “होली काऊ” या चित्रपटाची कथा एका हरवलेल्या गायीभोवती फिरते. सलीम अंसारी या माणसाची अचानक एका रात्रीत गाय हरवते. आणि तीला शोधण्यासाठी तो‌ जीवाचं रान करतोय. अगदी पोलीस ते राजकारणी सगळ्यांची मदत मागताना दिसतोय. पण आपल्या समाजाची मानसिकता बघता त्यांचं नाव सलीम म्हणून लोकं त्याच्यावरच संशय कसा घेतात किंवा सलीम ला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे सांगणारा हा चित्रपट आहे. बरंच काही सांगणिरा आणि समाजाच्या संकुचित मानसिकतेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. एकदा बघायला हरकत नाही. फार काही अपेक्षा न ठेवता बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


६०. कटपुतली
२०२२. रहस्य. २ तास १४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकरणजीत तिवारी
कलाकारअक्षय कुमार , रकुलप्रीत सिंग , चंद्रचूड
प्रदर्शित तारीख२ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

कटपुतली” चित्रपट समीक्षा :-

२०१८ साली प्रदर्शित झालेला “रतसासन” हा तमिळ चित्रपट प्रचंड लोकप्रिय आणि गाजला होता. कटपुतली हा त्याचाच हिंदी रिमेक. एखाद्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनवताना प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि कटपुतली ने सगळ्यांचाच अपेक्षाभंग केलेला आहे. एकापाठोपाठ होणारे खुन कसे होतात आणि ते कोण करतंय याचा छडा आपला अक्षय भाऊ कसे लावतात हे या चित्रपटात पहायला मिळतं. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असला तर पार्श्वसंगीत सुद्धा साजेसं असावं जे इथे नाही. अक्षय आणि रकुल प्रित ची लव्ह स्टोरी बळेच प्रेक्षकांच्या माथी मारलीय असं वाटतं. एकंदरच रतसासन हा मुळ चित्रपट तुम्ही पाहीला असेल तर हा चित्रपट तुमची निराशा करू शकतो. आणि जर मुळ तमिळ चित्रपट पाहिला नसेल तर कटपुटली एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


६१. ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा
२०२२. ॲक्शन, साहसी. २ तास ४७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअयान मुखर्जी
कलाकाररणबीर कपूर , आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय.
प्रदर्शित तारीख९ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा” चित्रपट समीक्षा :-

मुळात कथा पटकथा जर दमदार नसेल तर चित्रपटाचं बजेट कितीही असूद्या, चित्रपट फसतोच. ब्रह्मास्त्र च्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. चारशे कोटीचं बजेट आणि तब्बल पिच वर्षांची मेहनत घेऊनही अयान मुखर्जी आपल्याला निराश करतो हेच खरं. शिवा आणि ईशाचं नातं आणि त्यामागचा इतिहास , रहस्य हे सगळं सुरुवातीला फार इंटरेस्टिंग वाटतं पण पुढे मात्र गोंधळ सुरू होतो. बरं हा गोंधळ एका भागात संपत नाही त्यामुळे नक्की काय प्रकार हे बघण्यासाठी पुढील भागाची वाट पाहत राहणं क्रमप्राप्त. आणि कदाचित तिसऱ्या भागाची सुद्धा. आता तुमची ही सगळी तयारी असेल तर हा भाग बघायला हरकत नाही. काही सीन्स पुरता थ्रीडी इफेक्ट वैगरे बरे झाले आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६२. जहाँ चार यार
२०२२. विनोदी, नाटक. २ तास ६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शककमल‌ पांडे
कलाकारस्वरा भास्कर , मैहर विज, शिखा तलसानिया,‌ पूजा चोपडा
प्रदर्शित तारीख१६ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.१⭐/ ५

जहाँ चार यार” चित्रपट समीक्षा :-

मध्यमवर्गीय घरातील चुल आणि मुल सांभाळणाऱ्या चार बायकांची ज्या मैत्रिणी आहेत, ही त्यांची गोष्ट आहे. या चौघी ठरवून मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडल्यावर थट्टामस्करी करता करता काही गोष्टी गंभीर होत जातात. या दरम्यान त्यांना स्वतःचं अस्तित्व, ओळख वैगरे अशा गोष्टी जाणवतात. खरं तर नवीन असं काही सापडत नाही या चित्रपटात. तुम्ही फार धाडसी असाल तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. चित्रपट पाहील्यावर पश्चात्ताप होणार याची खात्री देऊ शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


६३. जोगी
२०२२. नाटक, रोमांचक. १ तास ५६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअली अब्बास जफर
कलाकारदिलजीत दोसांझ, कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अय्युब, अमायरा दस्तूर आणि हितेन तेजवानी
प्रदर्शित तारीख१६ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.२⭐/ ५

जोगी” चित्रपट समीक्षा :-

दिल्लीमध्ये १९८४ साली झालेल्या दंगलीवर आधारित हा चित्रपट आहे. तेव्हा झालेली हिंसा ,जाळपोळ लोकांचे झालेले हाल हे सगळं बघताना मन अस्वस्थ होतं. चित्रपटाची कथा ही मैत्री, प्रेम या धाग्यांवर बांधलेली आहे. बघायला गेलं तर तीन मित्रांची ही गोष्ट आहे. एक शीख, एक हिंदू एक मुसलमान असे हे तीन मित्र आहेत. चित्रपटाची सुरुवात ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या हिंसक घटनांनी सुरू होते. हिंसा, जाळपोळ, रक्ताचा थरार यात घडणारं माणुसकीचं दर्शन हे सगळंच अंगावर शहारा आणारं आहे. कथा, पटकथा,अभिनय आणि दिग्दर्शन अशा सगळ्याच बाबतीत हा चित्रपट उजवा आहे. त्यामुळे दिलजीतचा हा चित्रपट तुम्ही जरूर बघा. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


६४. मट्टो की सायकल
२०२२. नाटक. १ तास ३५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकप्रकाश झा
कलाकारएम. गानी , आरोही शर्मा , डिम्पी मिश्रा
प्रदर्शित तारीख१६ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

मट्टो की सायकल” चित्रपट समीक्षा :-

दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या चांगल्या सिरीज , चित्रपट आपण पाहीलेच आहेत पण हा त्यांचा पहिला चित्रपट आहे की ज्यामध्ये ते स्वतः अभिनय करत आहेत. त्यांनी या चित्रपटात “मट्टो” ही मुख्य भूमिका साकारली आहे. मट्टो हा रोजंदारीवर काम करणारा एक साधा गरीब मजूर आहे जो त्याच्या आवडत्या सायकल वरून रोज कामासाठी शहरात जात असतो. हा चित्रपट अशाच मजूर, कामगारांचं आयुष्य उलगडणारा आहे. जास्त मेहनत तर जास्त पैसे असं असतं तर किती बरं झालं असतं. असं नेहमीच मला वाटतं पण हा चित्रपट बघून ही भावना दृढ होते. कष्टाच्या मानाने या मजूरांना त्याचा मोबदला मिळत नाही. तरीही गरज म्हणून ही माणसं जीव कष्ट करत असतात. हा चित्रपट बऱ्याच विषयावर विचार करायला लावणारा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


६५. मिडल क्लास लव्ह स्टोरी
२०२२. विनोदी, नाटक, प्रणय. २ तास १६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकरत्ना सिन्हा
कलाकारईशा सिंग , काव्या थापर , प्रीत कमानी , मनोज पाहवा
प्रदर्शित तारीख१६ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

मिडल क्लास लव्ह स्टोरी” चित्रपट समीक्षा :-

मिडल क्लास लव्ह स्टोरी हा चित्रपट रत्ना सिन्हा यांनी दिग्दर्शित केला असून ईशा सिंग, काव्या थापर आणि प्रीत कमानी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. कौटुंबिक मुल्यांना महत्त्वाचं स्थान देणारा हा चित्रपट आहे. नावाप्रमाणेच मध्यमवर्गीय कुटुंबाची ही गोष्ट आहे. कथेतील मुख्य पात्र म्हणजेच प्रीत कमानी ही ने साकारलेली भूमिका ही आजच्या युवा पिढीचं नेतृत्व करणारी आहे. कथा अजून सुंदर प्रकारे दाखवता आली असती. चित्रपटाच्या नावात लव्ह स्टोरी असली तरी ही स्टोरी इतकी मनाला भावत नाही. तरी एकदा पहायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६६. सरोज का रिश्ता
२०२२. विनोदी, नाटक. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअभिषेक सक्सेना
कलाकारसना कपूर, गौरव‌ पांडे , कुमुद मिश्रा
प्रदर्शित तारीख१६ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

सरोज का रिश्ता” चित्रपट समीक्षा :-

“सरोज का रिश्ता” हा चित्रपट म्हणजे हास्याची मेजवानी म्हणावी लागेल. अशी मेजवानी जी समाजरूपी शरीराला आवश्यक आहे. आजकाल सगळ्याच मुलींना ” झीरो फिगर” हवी असते. अगदी मुलांना सुद्धा लग्नासाठी बारीक, चवळीच्या शेंगेसारख्याच मुली हव्या असतात. अशा सगळ्याच मुलामुलींचे डोळे खाडकन उघडवणारा हा चित्रपट आहे. खरं तर यि चित्रपटाची गंमत तो बघण्यातच आहे. चित्रपटातील मुख्य पात्र सना म्हणजेच सरोज आणि तीचे वडील म्हणजेच कुमुद मिश्रा यांचं नातं हसवत हसवत डोळ्यात पाणी आणणारं आहे. असे वडील प्रत्येक मुलीला मिळावेत असं मनोमन वाटून जातं. एकंदरच मनोरंजन करणारा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.



६७. सिया
२०२२. नाटक. १ तास ५७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकमनीष मुंद्रा
कलाकारविनीत कुमार सिंह , पूजा पांडे
प्रदर्शित तारीख१६ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

सिया” चित्रपट समीक्षा :-

समाजातील समस्यांवर आधारित बरेच सिनेमे बनवले जातात. अशाच पैकी एक म्हणजे सिया. बलात्काराविषयी आपल्याकडे अजूनही समाजात एक पाप म्हणून बघीतलं जातं. खरं तर यात पिडीत मुलीची काही चुक नसताना तीला जे भोगावं लागतं ते किती वेदनादायी असू शकतं हेच या चित्रपटाच्या निमित्ताने दाखवण्यात आले आहे. एका अख्ख्या कुटुंबाची वाताहत यात होत असते. न्याय व्यवस्था, समाज या सगळ्यांमध्ये ते कुटुंब अक्षरशः भरडल जातं. समाजाला आरसा दाखवणारा हा चित्रपट जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


६८. अतिथी भुतो भवः
२०२२. विनोदी, नाटक, प्रणय. १ तास ५४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकहार्दिक गज्जर
कलाकारप्रतीक गांधी, जॉकी श्रॉफ ,शर्मीन सेगल ,दिविना ठाकूर
प्रदर्शित तारीख२३ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.२⭐/ ५

अतिथी भुतो भवः” चित्रपट समीक्षा :-

हॉरर कॉमेडी या पठडीतील हा चित्रपट असून हार्दिक गज्जर यांनी दिग्दर्शन केलं आहे. हॉरर, कॉमेडी सोबत रोमॅंटिक अंदाज सुद्धा यात आहे. जॉकी श्रॉफ, प्रतीक गांधी या दोघांनी चांगलख अभिनय केला आहे. एक हलकाफुलका चित्रपट म्हणून एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


६९. बबली बाउन्सर
२०२२. विनोदी, नाटक. १ तास ५८ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकमधुर भांडारकर
कलाकारतमन्ना भाटिया,अभिषेक बजाज,साहिल वैद्य,सौरभ शुक्ला
प्रदर्शित तारीख२३ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

बबली बाउन्सर” चित्रपट समीक्षा :-

२०१९ मध्ये घडणारी ही कथा आहे. हरियाणाच्या एका गावातील ही गोष्ट. ज्या गावातील प्रत्येक घरातील एक पुरुष हा पहेलवान आहे. बरेचसे पुरुष तर दिल्लीत बाउन्सर म्हणून नोकरी करणखरे. अशातच आपल्या चित्रपटाची नायिका बबली म्हणजेच तमन्ना ही सुद्धा दिल्ली मध्ये बाऊन्सर म्हणून नोकरी करायला जाते. ते सुद्धा घरच्यांचा विरोध असताना. आता ती का जाते.? तीचं कोणावर प्रेम असतं.‌? वैगरे अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चित्रपटात सापडतील. या चित्रपटाच्या निमित्ताने मधुर भांडारकर यांनी बऱ्याच काळानंतर पदार्पण केले आहे. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट न चुकवण्यासारखाच आहे. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


७०. चुप : रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट
२०२२. गुन्हेगारी, रोमांचक, प्रणय. २ तास १५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकआर. बल्की
कलाकारसनी देओल,पूजा भट,दुलकीर सलमान,श्रेया धन्वंतरी,सरन्या पोनवान्नन
प्रदर्शित तारीख२३ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

चुप : रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट” चित्रपट समीक्षा :-

चित्रपटाचं एखाद्याला किती वेड किती पॅशन असू शकतं हे सांगणारा हा चित्रपट आहे. चित्रपटांचं परीक्षण हे डोळसपणे केलं नाही, सर्वांगाने विचार करून केलेलं नाही म्हणून त्या परीक्षकांचेच ओळीने खून होतात. ही ‘चुप’ची कथा आहे. खुन, सस्पेन्स थ्रिलर असा हा चित्रपट असला तरी कथेला बरेच कांगोरे आहेत. पटकथा उत्तम असल्याने चित्रपटाचा दर्जा नक्कीच वाढलाय. सनी देओल, श्रेया धन्वंतरी या सगळ्यांचे अभिनय उत्तम. एकदा तरी नक्कीच बघा. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडतात त्या लोकांनी तर आवर्जून बघावा. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


७१. धोखा : राऊंड द कॉर्नर
२०२२. गुन्हेगारी, रोमांचक. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शककूकी गुलाटी
कलाकारआर माधवन, खुशाली कुमार, दर्शन कुमार आणि अपारशक्ती खुराना
प्रदर्शित तारीख२३ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.२⭐/ ५

धोखा : राऊंड द कॉर्नर” चित्रपट समीक्षा :-

एक आतंकवादी पोलिसांच्या ताब्यातून सुटुन पळून जातो व एका घरात घुसून एका महीलेला ओलीस ठेवतो. इथून कथा सुरू होते आणि तुमच्या मेंदुचा ताबा घेते. सस्पेन्स थ्रिलर च्या लिस्टमधील हा अजून एक चित्रपट. आर. माधवन आणि अपार शक्ती खुराना , दर्शन कुमार या सगळ्यांचे अभिनय उत्तम. हा चित्रपट बघताना शेवटपर्यंत कळत नाही कोण गुन्हेगार, कोण दोषी आणि कोण निर्दोष. आणि हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


७२. इश्क पश्मीना
२०२२. प्रणय. २ तास. [ यु / ए ]
दिग्दर्शकअरविंद पांडे
कलाकारभविन भानूशाली , मालती चाहर
प्रदर्शित तारीख२३ सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

इश्क पश्मीना” चित्रपट समीक्षा :-

इश्क पश्मीना ही एक प्रेमकहाणी आहे. ज्यामध्ये दोन प्रेमी काही कारणांमुळे एकमेकांना दुरावतात ज्यामध्ये नायक श्रीमंत घरातील दाखवला आहे. त्यामुळे त्याच्या घरच्यांचं हे ठाम मत आहे की त्याची प्रेयसी ही त्याल धोका देऊन त्याचे पैसे घेऊन पळून गेली आहे. आता ती खरंच पळून गेली आहे की त्याच्या घरच्यांनीच तीला गायब केलं आहे. की अजून काही घडलं आहे हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला बघावा लागेल. सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे. एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


७३. प्लॅन ए प्लॅन बी
२०२२. विनोदी, प्रणय. १ तास ४५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकशशांक घोष
कलाकाररितेश देशमुख और तमन्ना भाटिया
प्रदर्शित तारीख३० सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.६⭐/ ५

प्लॅन ए प्लॅन बी” चित्रपट समीक्षा :-

डिजिटल प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे प्लॅन ए प्लॅन बी. याच चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख याने डिजिटल प्लॅटफॉर्म वर पदार्पण केले आहे, तेही नेटफ्लिक्स या अतिशय लोकप्रिय अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवर. चित्रपटाबद्दल बोलायचं तर नवीन असं काहीच या चित्रपटात पहायला मिळत नाही. चित्रपट पाहील्यावर पश्चात्ताप होण्याची शक्यता जास्त. तीच तीच घासून पुसून गुळगुळीत झालेली गोष्ट. बाकी पण बघावं असं विशेष काही नाही. एक जोड्या बनवणारी आहे म्हणजेच तमन्ना तर रितेश हा घटस्फोट घेऊन देणारा वकील. दोघांचं ऑफिस एकाच मजल्यावर इतकी ही कॉमन स्टोरी. बघायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही अर्थात नेटफ्लिक्स वर‌पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


७४. विक्रम वेधा
२०२२. ॲक्शन, गुन्हेगारी, नाटक. २ तास ४० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकपुष्कर-गायत्री
कलाकारहृतिक रोशन, सैफ अली खान , राधिका आपटे
प्रदर्शित तारीख३० सप्टेंबर २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

विक्रम वेधा” चित्रपट समीक्षा :-

बराच चर्चेत असलेला हृतिक आणि सैफचा हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. पुष्कर-गायत्री यांनी दिग्दर्शित केलेला मुळ तमिळ चित्रपट विक्रम वेधा या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक. कथा, पटकथा, संवाद सगळं अगदी जसच्या तसं. विक्रम वेताळ ची गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. तोच या चित्रपटाचा गाभा. वेधा जो गँगस्टर आहे म्हणजेच हृतिक रोशन, विक्रमला जो स्पेशल टास्क फोर्सचा पोलिस अधिकारी आहे म्हणजेच सैफ अली खानला जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा प्रत्येक वेळी एक – एक कथा सांगतो आणि त्या कथेवर आधारित एक प्रश्न विचारत असतो. चोर पोलीसाची ही गोष्ट बघण्यासारखी मनोरंजक नक्कीच आहे. पण मुळ तमिळ चित्रपट जर तुम्ही पाहीला असेल तर हा चित्रपट बघताना तुलना होण्याची शक्यता आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.

हे पण वाचा –

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – १ | जानेवारी २०२२ – मार्च २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – २ | एप्रिल २०२२ – जून २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – 4 |ऑक्टोंबर २०२२ – डिसेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

मित्रांनो, शतक पार केलेल्या हिंदी चित्रपटांची नावं आणि रिव्ह्यू एका लेखामध्ये सांगणं केवळ अशक्य! म्हणूनच राहीलेले चित्रपट पुढिल लेखात. तोपर्यंत वरीलपैकी कोणते चित्रपट बघायचे राहिले असतील तर बघून घ्या. आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा ते तुम्हाला कसे वाटले.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *