२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हे दहा हिंदी सुपरहिट चित्रपट तुम्ही बघायलाच हवेत!
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जानेवारी 22, 2023 | 3:27 PM
“It is Quality rather than Quantity that matters”. म्हणजेच काय तर क्वान्टिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची. पण नेमकं बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक हे सुत्र विसरले असावेत. कारण २०२२ मध्ये शंभरहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले खरे पण त्यातले बघण्यालायक फारच कमी. त्यात पण बॉयकॉट ट्रेंडचा बऱ्याच चित्रपटांना फटका बसला. त्यामुळे खरे चांगले कोणते , कोणते बघायला हवेत, हा सगळा गोंधळच आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला २०२२ मध्ये प्रदर्शित झालेले असे दहा चित्रपट सांगणार आहोत जे तुम्ही बघायलाच हवेत.
१. द काश्मीर फाईल्स |
लेखक | विवेक अग्निहोत्री, सौरभ पांडे |
दिग्दर्शक | विवेक अग्निहोत्री |
कलाकार | मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर,पल्लवी जोशी , दर्शन कुमार, चिन्मय मंडलेकर आणि मृणाल कुलकर्णी |
निर्माता | तेज नारायण अगरवाल, अभिषेक अगरवाल, पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री |
संगीत | रोहीत शर्मा |
प्रदर्शित तारीख | ११ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“द काश्मीर फाईल्स” चित्रपट समीक्षा :-
१९९० मधील काश्मिर मध्ये झालेला काश्मिरी पंडींताचा अमानुष छळ आणि त्यांच तिथून जीव वाचवण्यासाठी केलेलं स्थलांतर,पलायन यावर आधारित हा चित्रपट आहे. हा भारताच्या राजकारणातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. ‘रलिव, सलिव या गलिव’ ही घोषणा ऐकून आजही काश्मिरी पंडितांचा थरकाप उडतो. ‘रलिव, सलिव या गलिव’ म्हणजे ‘एकतर धर्म बदला किंवा पळून जा किंवा वेदनादायक मृत्यूसाठी तयार व्हा. ‘ काश्मिरी पंडितांच्या यातनांचं आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं चित्रण करणारा ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा पडद्यावर दाखवण्याची हिंमत अतुल अग्निहोत्री यांनी केली आहे. कारण हा अतिशय नाजूक आणि वादाचा विषय नक्कीच आहे. त्यामुळेच १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या हल्ल्याच्या सत्यघटनेवर आधारीत “द कश्मीर फाइल्स” हा सिनेमा बराच वादविवादात अडकला होता तरीही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांनी केला आहे. समाजातील एका समुहाने हा चित्रपट डोक्यावर घेतला तर एका समुहाने या चित्रपटाला प्रचारकी चित्रपट ठरवलं. आता नक्की काय ते मात्र तुम्हीच ठरवा. वाद प्रतिवाद कितीही असले, किंवा सत्य असत्य घटना काही असल्या तरी एक कलाकृती म्हणून चित्रपट चांगला आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनयाची छाप पाडली आहे. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
२. रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट |
लेखक | आर. माधवन |
दिग्दर्शक | आर. माधवन |
कलाकार | आर माधवन,सिमरन बग्गा , रजित कपूर, शाहरुख खान |
निर्माता | आर. माधवन ,सरीता माधवन, विजय मूलान |
संगीत | सॅम सी. एस. |
प्रदर्शित तारीख | १ जुलै २०२२ |
भाषा | हिंदी |
“रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट” चित्रपट समीक्षा :-
आर. माधवन निर्मित, दिग्दर्शित रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट हा चित्रपट १ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि तरीही उपेक्षित असणाऱ्या एका महान भारतीय वैज्ञानिकाची ही जीवनकहाणी आहे. जेष्ठ वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्यावर आधारित हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने पहावा असा आहे. या चित्रपटात फक्त नम्बी यांचा जीवनपट नसून इस्रोचा देखील प्रवास यात बघायला मिळतो. ‘इस्रो’ मध्ये शास्त्रज्ञ असणारे नम्बी स्कॉलरशिपवर विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रिन्स्टन’ विद्यापीठात शिकण्यासाठी जातात. आणि चक्क ‘नासा’ सारख्या संस्थेची ऑफर धुडकावून आपल्या देशप्रेमापोटी भारतात येतात. पण नासाची लाखोंची नोकरी सोडून इस्रो मध्ये दाखल होणाऱ्या याच वैज्ञानिकावर देशद्रोहाचा खटला चालतो. रॉकेट निर्मितीचं तंत्रज्ञान त्यांनी पाकिस्तानला विकलं असा आरोप त्यांच्यावर केला जातो. अर्थात या सर्वांविरूद्ध ते कायद्याने लढतात. या कठीण परिस्थितीत त्यांच्या बाजूने खूप कमी लोक उभे राहतात. पण तरीही न डगमगता ते संघर्ष सुरू ठेवतात. नम्बी यांच्या वाट्याला आलेली अवहेलना बघून नक्कीच चीड येते. आर. माधवन याने अतिशय अभ्यासपूर्ण या चित्रपटाच्या कथेचं लिखाण केले आहे. नम्बींचा संपूर्ण संघर्ष राकेट्री मध्ये बघायला मिळतो. आर. माधवन याने निर्मिती , लेखन, दिग्दर्शन या सगळ्या बाजू सक्षमपणे सांभाळल्या आहेत. एकंदरच हा चित्रपट तुम्ही नक्की बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
३. कौन प्रवीण तांबे? |
लेखक | किरण यज्ञोपवीत |
दिग्दर्शक | जयप्रद देसाई |
कलाकार | श्रेयस तळपदे, अंजली पाटील |
निर्माता | शीतल भाटिया, सुदीप तिवारी |
संगीत | साई-पीयूष |
प्रदर्शित तारीख | १ एप्रिल २०२२ |
भाषा | हिंदी |
“कौन प्रवीण तांबे?” चित्रपट समीक्षा :-
“कौन है प्रवीण तांबे?” तुम्हाला पण हा प्रश्न पडलाय का.? पडला असेल तर किंवा तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर जरूर हा चित्रपट बघायला हवा. आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल, ध्येय गाठायचं असेल तर ते मिळवण्यासाठी “वय” हे तुमचं कारण असूच शकत नाही हे सिद्ध करणारा क्रिकेटपटू म्हणजे प्रवीण तांबे. प्रवीण तांबे म्हणजे एक असा अवलिया ज्याने वेळेला सुद्धा चॅलेंज दिलं आणि ते जिंकलं सुद्धा. राहुल द्रविडने संधी दिल्यामुळे प्रविण तांबे या अस्सल मुंबईकर खेळाडूने वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आणि या संधीचं सोन करतं प्रवीण तांबेने बरेच विक्रम आपल्या नावावर शिक्कामोर्तब केले. वयाची चाळीशी उलटलेल्या प्रवीण तांबेचा हा प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्रविणला क्रिकेटची विशेष आवड. पण संसार आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता स्वतःचं स्वप्न त्याला बाजूला ठेवावं लागतं. पण क्रिकेटला देव मानून त्या खेळाची उपासना करणाऱ्या प्रविणच्या आयुष्यात अखेरीस राहुल द्रविड याची कृपा होते. २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्स मधून क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रविणने २०१४ च्या आयपीएलचा सीजन खऱ्या अर्थाने गाजवला.
या सीजनमध्ये तो राजस्थानसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात त्याची ओळख निर्माण झाली. हा अतिशय प्रेरणादायी असा चित्रपट आहे. श्रेयस तळपदे याने अतिशय समर्पक अभिनय केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार. डिस्नी हॉटस्टार वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
४. झुंड |
लेखक | नागराज मंजुळे |
दिग्दर्शक | नागराज मंजुळे |
कलाकार | अमिताभ बच्चन, आकाश ठोसर |
निर्माता | भुषण कुमार, क्रिशन कुमार, नागराज मंजुळे, संदिप सिंग, राज हिरेमठ, सवीता राज हिरेमठ, गार्गी कुलकर्णी, मीना अरोरा |
संगीत | अजय – अतुल |
प्रदर्शित तारीख | ४ मार्च २०२२ |
भाषा | हिंदी |
“झुंड” चित्रपट समीक्षा :-
४ मार्च२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला झुंड हा चित्रपट म्हणजे असा चित्रपट जो बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल करू शकला नाही आणि इथेच लोक फसले. कारण याचा दर्जा हा कलेक्शन वरून ठरवणं हाच मुळात या चित्रपटावरील अन्याय आहे. नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन, कलाकार म्हणून अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू आणि अजय अतुल यांचं संगीत हे सगळं एकत्र म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच.विशेष म्हणजे या चित्रपटातील झोपडपट्टीतील दाखवलेली मुलं. हे हीरे आहेत हे नक्की. त्यांचा अभिनय अतिशय नैसर्गिक आहे. ना कोणता मेकअप ना कोणती स्टाईल. जे आहे, जसं आहे तसच्या तसं पडद्यावर दिसतं. नागपूर मधील समाजसेवक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. साध्या साध्या गोष्टी सुद्धा सहज न मिळणारा एक समाज आहे, ज्यांना मुलभूत गरजांसाठी सुद्धा झगडावं लागतं. त्यांचं झोपडपट्टीतील आयुष्य कसं असतं हे पुन्हा एकदा नागराज यांनी त्यांच्या खास शैलीत आपल्याला दाखवलं आहे. झोपडपट्टीत जन्माला येणं हा काही गुन्हा नाही आणि ते कोणाला ठरवता पण येत नाही. पण आयुष्यभर तिथे रहायचं की नाही हे मात्र हातात असतं. पण लहानपणापासून ज्या वातावरणात ही मुलं मोठी होतात, त्यांना ज्या प्रकारची संगत मिळते तसंच त्यांचं आयुष्य घडतं. प्रत्येक वेळी मोठमोठे डायलॉग वापरले म्हणजे ती कलाकृती दर्जेदार होते असं नाही हे नेहमीच नागराज यांनी सिद्ध केलं आहे. झोपडपट्टीतील मुलांना प्लास्टिकच्या डब्यामध्ये फुटबॉल टाकून खेळताना पाहिल्यावर विजय बारसे यांनी त्यांना मिळालेली बक्षिसाची रक्कम या मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यासाठी “स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेची उभारणी करण्यासाठी वापरली. त्याचीच ही गोष्ट. लहानमोठ्या चोऱ्या करणारे, खिसे कापणारी ही झोपडपट्टीतील मुलं फुटबॉल खेळतात का आणि चोरी करण्याची त्यांची सवय सुटते का? त्यांचं आयुष्य बदलत का? हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा. हा चित्रपट प्रत्येकाने बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार. झी फाइव्ह ॲप वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
५. मेजर |
लेखक | अदिवी शेष |
दिग्दर्शक | शशी किरण टिक्का |
कलाकार | महेश बाबू, नम्रता शिरोडकर, अनुराग रेड्डी, शरद चंद्रा |
निर्माता | अदिवि शेष, सई मांजरेकर, सोभिता |
संगीत | श्रीचरण पकाला |
प्रदर्शित तारीख | २४ मे २०२२ |
भाषा |
“मेजर” चित्रपट समीक्षा :-
२६/११ चा हल्ला. आठवलं तरी काळजाचा थरकाप उडतो आणि तेवढाच संताप सुद्धा होतो. अख्ख्या देशाला हादरवून टाकणारी ती रात्र होती. काळरात्र ठरलेल्या २६/११च्या हल्ल्यात अनेक जवान, पोलिस शहीद झाले. त्यापैकीच ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर उन्नीकृष्णन यांनीसुद्धा देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचं हे बलिदान मुंबईच्या किंबहुना देशाच्या इतिहासात कधीही न विसरण्यासारखं आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा जीवनपट उलगडणारा “मेजर” हा चित्रपट आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले NSG चे एकूण ५१ जवानांना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. २६/११ चा तो हल्ला आठवला तरी भीती, चीड, संताप अशा संमिश्र भावना दाटून येतात.
दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवि शेष याने “संदीप उन्नीकृष्णन” यांची मुख्य भूमिका साकारली असून अतिशय उत्तम अभिनय केला आहे. वैयक्तिक, वैवाहिक आयुष्य असतं, नातीगोती हे सगळं मागे टाकून जराही विचार न करता हे फक्त आणि फक्त देशासाठी जवान आपला प्राण गमवायला तयार होतात. आपण इथं समाधानाने बिनघोर आयुष्य जगू शकतो कारण कोणीतरी स्वतःच्या जीवावर उदार होऊन जवान म्हणून सीमेवर उभे असतात. जवान , सैनिक होतं हे इतकं सोपं नसतं. त्यांच्या आईवडिलांच्या मनाचा मोठेपणा यात बघायला मिळतो. एकंदरच प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट बघायला हवा. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार.
६. कला |
लेखक | अन्विता दत्त |
दिग्दर्शक | अन्विता दत्त |
कलाकार | बाबिल खान , स्वस्तिका मुखर्जी |
निर्माता | कर्णेश शर्मा |
संगीत | अमित त्रिवेदी |
प्रदर्शित तारीख | १ डिसेंबर २०२२ |
भाषा | हिंदी |
“कला” चित्रपट समीक्षा :-
“कला” हा चित्रपट नावाप्रमाणेच कला आणि कलाकार यांच्याभोवती गुंफलेला चित्रपट आहे. “संगीत” ही कला म्हणजे एक साधना. वर्षानुवर्षांची तपस्या. हा चित्रपट सुद्धा अशाच कला नावाच्या गायिकेवर आधारित आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या काही मोजक्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणजे कला. वर्षाच्या सरतेशेवटी का असेना पण एक दर्जेदार कलाकृती बघायला मिळतेय याचा आनंद आहे. “कला” हा चित्रपट अन्विता दत्त यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर, म्युझिकल अशा सगळ्याच जॉनरमध्ये हा चित्रपट फिट होतो. सगळेच कांगोरे अतिशय महत्त्वाचे. यातलं म्युझिक ऐकून तुम्हाला भिती वाटू शकते जी फार दुर्मिळ गोष्ट आहे. अमित त्रिवेदी यांनी अतिशय सुंदर असं म्युझिक दिलेलं आहे. बिखरने का मुझको शौक ही बडा है हे गाणं तर अतिशय सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे. अभिनयाच्या बाबतीत तर पाच पैकी पाच स्टार. स्वस्तिका मुखर्जी हीने कला चं पात्र हुबेहूब साकारलं आहे. जी १९९५०-६० च्या दशकातील एक प्रसिद्ध गायिका आहे. खुद्द पंतप्रधान हिच्या गायनाचे चाहते आहेत. पण ही प्रसिद्धी, हे यश तिला अगदी सहज नक्कीच मिळालेलं नाही. त्यामागे तिची अपार मेहनत तर आहेच पण अजूनही बरंच काही आहे जे या चित्रपटाचं सार आहे. इतक्या प्रसिद्ध गायिकेच्या आईला मात्र तिचा आवाज अजिबात ऐकायला आवडत नाही. ती तिच्याशी साधं बोलत सुद्धा नाही. आता यामागे , इतक्या प्रसिद्ध गायिकेच्या मागे एक मोठी स्टोरी आहे. ती स्टोरी काय.? इतकी प्रसिद्धी कशी मिळाली.? पुढे काय होतं वैगरे हे बघण्यासाठी नेटफ्लिक्सची मदत घ्यावी लागणार. अजिबात चुकवू नये अशी दर्जेदार कलाकृती आहे. दिग्दर्शन, संगीत, अभिनय, सिनेमॅटोग्राफी सगळंच अप्रतिम. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
७. बधाई दो |
लेखक | सुमन अधिकारी, हर्षवर्धन कुलकर्णी, अक्षत |
दिग्दर्शक | हर्षवर्धन कुलकर्णी |
कलाकार | राजकुमार राव,भूमी पेडणेकर |
निर्माता | विनीत जैन |
संगीत | हितेश सोनिक |
प्रदर्शित तारीख | ११ फेब्रुवारी २०२२ |
भाषा | हिंदी |
“बधाई दो” चित्रपट समीक्षा :-
आपण कितीही पुढारलेल्या विचारांचे असलो तरी अजूनही आपल्याकडे समलैंगिक संबंधांना “पाप” याच नजरेतून पाहिलं जातं. या विषयावर उघडपणे बोलायला सुद्धा लोक लाजतात. पण दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी याने मात्र “बधाई दो” या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी समाज मात्र अजूनही या लोकांना विकृती म्हणूनच बघतोय आणि याच समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा चित्रपट आहे. समलिंगी लोकांना एकमेकांबद्दल असणारं आकर्षण, प्रेम हे तेवढंच नैसर्गिक असत जेवढं एका पुरुष आणि स्त्री मधे असतं. हेच या चित्रपटात पहायला मिळतं. विनोदी अंगाने जाणारा हा चित्रपट अतिशय गंभीर विषयावर भाष्य करणारा आहे. राजकुमार राव आणि भुमी पेडणेकर हे दोघंही अतिशय उत्तम कलाकार आहेत त्यामुळे उत्तम विषय, उत्तम पटकथा, उत्तम अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन अशी ही भट्टी चांगलीच जमून आली आहे. गे किंवा लेस्बिअन हा शिक्का बसल्यावर “माणूस” म्हणून जगताना किती त्रास होतो हे बघताना आपण अंतर्मुख होऊन जातो. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
८. गंगुबाई काठीयावाडी |
लेखक | हुसैन झैदी |
दिग्दर्शक | संजय लीला भन्साळी |
कलाकार | आलिया भट्ट, अजय देवगण, विजयराज |
निर्माता | जयंतीलाल गडा, संजय लीला भन्साळी |
संगीत | संजय लीला भन्साळी, अंकीत बल्लारा, संचीत बल्लारा |
प्रदर्शित तारीख | २२ फेब्रुवारी २०२२ |
भाषा | हिंदी |
“गंगुबाई काठीयावाडी” चित्रपट समीक्षा :-
संजय लीला भन्साळी म्हटलं की काहीतरी भव्यदिव्य असंच आपण इमॅजिन करतो. पण हा चित्रपट म्हणजे एकप्रकारे बायोपिक आहे त्यामुळे वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. संजय लीला भन्साळी यांनीच या चित्रपटाची कथा आणि गाणी सुद्धा लिहीली आहेत. काही अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर हा चित्रपट आलिया आणि सगळ्याच कलाकारांसाठी जरूर बघायला हवा. हा चित्रपट कामाठीपुरातील गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे. एका सुखवस्तू घरातील गंगा जेव्हा एका रमणिक नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याच्यासाठी घरातून पळून मुंबईत येते पण तोच रमणिक जेव्हा १००० रुपयांना तीला कामाठीपुऱ्यात नेऊन विकतो तेव्हा गंगाची गंगुबाई होते. हाच प्रवास म्हणजे हा चित्रपट. सेक्स वर्कर्सना समाजात सन्मान मिळावा आणि त्यांना त्यांचे मुलभूत कायदेशीर हक्क मिळावेत म्हणून गंगूबाई अख्ख्या समाजासोबत, राजकीय , सरकारी यंत्रणेविरूद्ध लढा देते केवळ त्यासाठी ती देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही जाऊन भेटते. गंगुबाई ची माफिया गंगूबाई कशी होते. हा प्रवास अजून चांगला दाखवता आला असता. खरं तर हा बायोपिक अजून छान होऊ शकला असता पण दिग्दर्शन आणि पटकथा या दोन्ही गोष्टी कमी पडल्या. पण आलिया भट्ट च्या अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावलेत. आणि विजयराज यांच्याबद्दल तर काय बोलावं. “ना मर्द ना नारी” पर सबपे भारी” हे त्यांनी भुमिकेतून सुद्धा सिद्ध केलं आहे. अजय देवगण ला छोटा रोल वाट्याला आहे खरा पण तो सुद्धा दमदार झालेला आहे. म्हणून हा चित्रपट एकदा तरी बघायलाच हवा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट उपलब्ध आहे.
९. अनेक |
लेखक | अनुभव सिन्हा |
दिग्दर्शक | अनुभव सिन्हा |
कलाकार | आयुषमान खुराना, अँड्रिया केव्हिचुसा, मनोज पाहवा, जे. डी. चक्रवर्ती |
निर्माता | भुषण कुमार, क्रिशन कुमार, अनुभव सिन्हा |
संगीत | मंगेश धाकडे |
प्रदर्शित तारीख | २७ मे २०२२ |
भाषा | हिंदी |
“अनेक” चित्रपट समीक्षा :-
भारताचा “ईशान्य” भाग. भारतात असुनही भारतात नसल्यासारखा. खरं तर आपल्याकडूनच या भागाला उपेक्षित ठेवलं जातं. अनुभव सिन्हा आणि आयुषमान यांनी याआधीही एकत्र काम केले आहे. दोघंही आपापल्या क्षेत्रात चोख आणि चोखंदळ. अनुभव सिन्हा दिग्दर्शित अनेक म्हणजेच “ANEk” हा चित्रपट सगळ्यांनाच आवडेल असं नाही. पण ज्यांना विषयाचं गांभीर्य आहे किंवा दर्जेदार कंटेंट बघण्याची सवय आहे त्यांना हा चित्रपट नक्की आवडेल. भारताच्याच मात्र आजही ‘भारताबाहेर’ समजल्या जाणाऱ्या ईशान्य प्रांताची गोष्ट सांगणारा “अनेक” हा चित्रपट आहे. ईशान्य भारतात राहणाऱ्या लोकांना स्वतंत्र व्हायचं आहे पण काही जण आहेत की त्यांना आपण भारतीय आहोत हे पटवून द्यायचं आहे. अमन म्हणजे आयुष्यमान खुराणा हा एक अंडर कव्हर एजंट असतो. याला ईशान्येकडील राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने फुटीरवादी संघटनांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलेलं असतं. तिथे एका मोठ्या फुटीरवादी संघटनेचा म्होरक्या टायगर सांगा (डोरेन्द्र) याच्यासोबत भारत सरकारला शांतता करार करायचा असतो पण तिथल्याच “जॉन्सन” नावाचा एका हिंसाचारी गटाला हा शांतता करार नको आहे. पण आता ते का आणि कसं हे चित्रपटात कळेल. अनुभव सिन्हा याची स्वतःची अशी एक दिग्दर्शनाची अनोखी पद्धत आहे. आयुषमान ला घेऊन केलेला आर्टिकल १५ जर तुम्ही पाहीला असेल तर ते तुमच्या लक्षात येईलच. हा चित्रपट सुद्धा त्याच धाटणीचा आहे. जरूर बघावा असा चित्रपट. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
१०. ॲन ॲक्शन हिरो |
लेखक | निरज यादव |
दिग्दर्शक | अनिरुद्ध ऐय्यर |
कलाकार | आयुषमान खुराना, जयदिप अहलावत |
निर्माता | भुषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद रॉय |
संगीत | पराग छाब्रा |
प्रदर्शित तारीख | २ डिसेंबर २०२२ |
भाषा | हिंदी |
“ॲन ॲक्शन हिरो” चित्रपट समीक्षा :-
२ डिसेंबरला प्रदर्शित झालेला ॲन ॲक्शन हिरो हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. या चित्रपटातील ‘डार्क कॉमेडी’ चांगली जमली आहे. चित्रपटाची कथा आहे एक सुप्रसिद्ध “अभिनेता” व्हर्सेस “एक राजकीय नेता”. बरं यातील राजकीय नेत्याला हा हिरो सुरूवातीला आवडत असतो. पण शुटिंगच्या निमित्ताने हा हिरो म्हणजेच आयुषमान खुराना जेव्हा हरियाणा मध्ये जातो तेव्हा मात्र हा राजकीय नेता म्हणजे जयदीप अहलावत हा त्याच्या जीवावर उठतो. त्या दोघांमध्ये जीवघेणी दुश्मनी सुरू होते. हरियाणामधील नेता म्हणजेच जयदिप अहलावत यांच्या आयुष्यातील एकमेव ध्येय म्हणजे या ॲक्शन हिरो ला संपवणे हेच असते. या सगळ्यात सस्पेन्स तर आहेच. भुरा सोलंकी या नेत्याला असं वाटतंय की आपल्या छोट्या भावाचा खून हा मानव या ॲक्शन हिरो ने केला आहे. आता तो खरंच त्याने केला आहे की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघायला हवा. निरज यादव याने ज्या पद्धतीने ही कथा लिहिली आहे ती फारच रंजक आहे. पुढे काय होणार याचा अजिबात अंदाज लावता येत नाही आणि लावला तरी तो अचूक नसतोच. आणि हेच या कथेचं यश आहे. आपण बऱ्याच हिरो, हिरोईन ना फॉलो करतो. त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला नेहमीच आकर्षण वाटतं पण याच कलाकारांचं खरं आणि पडद्यामागील आयुष्य नक्की कसं असू शकतं हे सांगणारा हा चित्रपट आहे. एकंदरीत चित्रपट मनोरंजन करणारा आहे. आयुषमान आणि जयदीप या दोघांनीही अभिनय अतिशय उत्तम केला आहे. त्यामुळे माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन तीन स्टार.
हे पण वाचा –
तर मित्रांनो, जगभरून ने हे दहा चित्रपट तुम्ही पाहीले आहेत की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नसतील पाहीले तर लवकरच ओटिटी प्लॅटफॉर्म वर जा आणि हे चित्रपट जरूर बघा.