HomeFilmsFilms NewsHindiHindiFilmsWriterAkanksha

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जून 21, 2023 | 12:01 AM

काही म्हणा पण गेली २-३ वर्ष जरा बॉलिवूडला उतरती कळा लागली होती हे खरंय. लॉकडाऊन काय किंवा नंतर काय बॉलिवूडचा करिष्मा जरा फिका पडत चालला आहे. याला आता कारणं पण बरीच आहेत म्हणा. प्रेक्षकांना आता नुसताच मसाला किंवा आयटम साँग वैगरे असे तडके फारसे रूचत नाही. त्यात हल्ली साऊथ इंडियन चित्रपटांनी प्रेक्षकांना जणू भुरळ घातली आहे. भरीस भर नवीन आलेला बॉयकॉट ट्रेंड. या सगळ्याचा हिंदी चित्रपटसृष्टीला वाईट फटका बसला आहे. म्हणूनच आता २०२३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला दमदार कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि तशी सुरूवात सुद्धा झालेली आहे. या लेखात आपण मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट बघणार आहोत.

March 2023 HIndi movie list
१. गुलमोहर
२०२३. नाटक, परिवार. २ तास १२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक अर्पिता मुखर्जी, राहुल वी चिटेला
दिग्दर्शकराहुल चितेला
कलाकारशर्मिला टागोर , मनोज वाजपेयी , सिमरन , सूरज शर्मा , कावेरी सेठ , उत्सवी झा , जतिन गोस्वामी , चंदन रॉय, अमोल पालेकर
निर्माताविकेश भूटानी , शुजात सौदागर, राहुल चिटेला
प्रदर्शित तारीख३ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

गुलमोहर” चित्रपट समीक्षा :-

दिल्लीतील “गुलमोहर ” नावाचा प्रशस्त जुना बंगला आणि त्या बंगल्यात नांदणाऱ्या तीन पिढ्यांची ही गोष्ट आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमात बऱ्याच वर्षांनी शर्मिला टागोर यांनी कमबॅक केलं आहे.
फुलून गेल्यानंतर विखुरलेल्या गुलमोहराच्या पाकळ्यांसारखी अवस्था नात्यांची झाली आहे. कधी काळी छान घट्ट असलेली ही नाती आता सैल होत चालली आहेत. प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि स्वतंत्र कुटुंब हवंय.
शर्मिला टागोर म्हणजेच कुसूम या घरातील मुख्य सदस्य असून त्यांची मुलं आणि नातवंडे असा मोठा परिवार त्या संभाळत असतात. पण आता सगळेच हा बंगला सोडून आपापल्या मार्गाने जाणार हे माहीत असल्यावर ते जाण्यापूर्वी एकदा सगळे मिळून तिथे एकत्रितपणे रंगपंचमी साजरी करावी अशी त्यांची इच्छा असते. दुरावलेली नाती त्या निमित्ताने एकत्र यावीत असं त्यांना वाटत असतं. हे सगळंच खूप हळूवारपणे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
कलाकार आणि कथा चांगली असली तरी पटकथा मात्र संथ वाटते. एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. डिस्नी हॉटस्टार वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. इन कार (In Car)
२०२३. नाटक, रोमांचक. १ तास ४६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक हर्षवर्धन
दिग्दर्शकहर्षवर्धन
कलाकारमनीष झंझोलिया, संदीप गोयत, सुनील सोनी, ज्ञान प्रकाश
निर्माताअंजुम कुरैशी , साजिद कुरैशी
प्रदर्शित तारीख३ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : –२.६⭐/ ५

इन कार (In Car)” चित्रपट समीक्षा :-

नावाप्रमाणेच क्राइम जॉनरचा हा चित्रपट इन कार म्हणजेच कारच्या आत चित्रित केला गेला आहे. या चित्रपटाचं अर्ध्याहून अधिक चित्रिकरण कार मध्ये करण्यात आलं आहे. हरयाणा मधील ही गोष्ट असून दोन भाचे आणि त्यांचा मामा यांनी जबरदस्तीने एका कार चालकाला थांबवून त्याच्या कारमध्ये घुसले आहेत. आणि याच कारमध्ये ते एका मुलीला किडनॅप करून आपल्यासोबत घेऊन जात असतात. या संपूर्ण प्रवासात ते अतिशय घाणेरड्या शिव्या देत असतात. त्या मुलीला त्रास देत असतात. ती जिवाच्या आकांताने या सगळ्यातून सुटू पाहत असते पण ते काही करून तिला पकडून ठेवतात.
आता ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटते का.? त्या गुंडांचं काय होत.? ते पकडले जातात का? हे सगळं बघण्यासाठी आणि मुख्य भूमिकेत असलेल्या रितिका सिंह हिच्या अभिनयासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. आता हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.


३. तू झूटी मैं मक्कार
२०२३. विनोदी, प्रणय. २ तास ४५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक राहुल मोदी, लव रंजन
दिग्दर्शकलव रंजन
कलाकाररणबीर कपूर, श्रद्धा कपूर, डिंपल कपाडिया, बोनी कपूर
निर्मातालव रंजन
प्रदर्शित तारीख८ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

तू झूटी मैं मक्कार” चित्रपट समीक्षा :-

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आठ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. प्रेम, कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच श्रद्धा कपूर आणि रणबीर यांनी एकत्र काम केले आहे.
आजकाल लोकांना क्राइम , ॲक्शन , मसाला असलेले चित्रपट जास्त आवडतात. त्या चित्रपटासारखा हा चित्रपट नसून तो एक रोमॅंटीक लव्हस्टोरी असलेला कॉमेडी चित्रपट आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


४. मिसेस बॅनर्जी व्हर्सेस नॉर्वे
२०२३. नाटक, जीवनचरित्र. २ तास १४ मिनिटे. [ यु ]
लेखक समीर सतिजा, अशिमा छिब्बर, राहुल हंडा
दिग्दर्शकअशिमा छिब्बर
कलाकारराणी मुखर्जी, नीना गुप्ता, जिम सार्भ
निर्मातामोनिशा अडवाणी, निखिल अडवाणी, मधू भोजवानी
प्रदर्शित तारीख१७ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

मिसेस बॅनर्जी व्हर्सेस नॉर्वेर” चित्रपट समीक्षा :-

‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असून चित्रपटाचं दिग्दर्शन अशिमा छिब्बर यांनी केलं आहे. सागरिका भट्टाचार्य या भारतीय महिलेच्या एका लढ्याची ही कथा आहे.
नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका भारतीय जोडप्याचं चौकोनी सुखी कुटुंब असतं. पण नॉर्वे सरकारच्या कायद्याप्रमाणं, देबिका चॅटर्जी या आपल्या मुलांची योग्य काळजी घेत नसल्याचा अहवाल तेथील ‘चाइल्ड वेल्फेअर बोर्ड’ कडून दिला जातो. आणि याच सबबीखाली तिच्या दोन्ही मुलांना तिच्या परवानगी शिवाय त्या मुलांचा ताबा बोर्डाकडे दिला जातो. आणि ती सज्ञान होईपर्यंत तीथेच राहणार.
त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी सागरिका भट्टाचार्य ही नॉर्वे सरकारविरोधात कशी लढा देते हे बघण्यासाठी हा चित्रपट जरूर बघावा. राणी मुखर्जी हीने पुन्हा एकदा स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


५. झ्विगॉटो
२०२३. नाटक. १ तास ४५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक त्रिविक्रम श्रीनिवास
दिग्दर्शकनंदिता दास
कलाकारकपिल शर्मा,शहाना गोस्वामी,स्वानंद किरकिरे,गुल पनाग,सयानी गुप्ता
निर्माताभुषण कुमार, क्रिशन कुमार, अमन गिल, अल्लू अरविंद, एस.राधा क्रिष्णन, कार्तिक आर्यन
प्रदर्शित तारीख१७ फेब्रुवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

झ्विगॉटो” चित्रपट समीक्षा :-

दिग्दर्शिका नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट समाजाचं प्रतिबिंब म्हणावा लागेल. कोरोनानंतर नोकऱ्या गमावल्यानंतर लोकाची काय अवस्था झाली हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्या काळात समाजातील श्रमिक वर्गाची जास्त वाताहत झाली.
लॉकडाउनमध्ये असंच स्वतःची नोकरी गमावल्यानंतर घर चालवण्यासाठी डिलिव्हरी बॉय ची नोकरी करणारा मानस सिंह या कथेचा नायक आहे. एका फुड डिलिव्हरी कंपनी साठी काम करत असताना दिवसाला दहा ऑर्डर पूर्ण करण्यासाठीची मेहनत, पाच स्टार मिळवण्यासाठी चाललेली धडपड, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या मुलांना किती काम करावं लागतं हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हे बघून तरी आपला नक्कीच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा.
कपिल शर्मा, शहाना यांचा अभिनय उत्तम आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६. एम आय नेक्स्ट.?
२०२३. गुन्हेगारी. १ तास २५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक कृतिका रामपाल
दिग्दर्शकराहत काझमी
कलाकारअनुष्का सेन, अलावा नीलू डोगरा, अहमद हैदर, पूजा दरगान , मीर सरवर अहम
निर्मातातारीक खान, राहत काझमी, झेबा साजीद
प्रदर्शित तारीख१७ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

“एम आय नेक्स्ट.?” चित्रपट समीक्षा :-

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटना ऐकुन स्त्रिया अजूनही असुरक्षित आहेत हे आपल्याला माहीत आहेच. हा चित्रपट अशाच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा आहे.
जम्मू मधील हनी नावाच्या एका चौदा वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराची ही गोष्ट. शाळेत असताना अचानक चक्कर आल्यावर हनी व तिच्या आईवडिलांना कळतं की तिला दिवस गेले आहेत. त्यानंतर तो बलात्कार असला तरी पोलिस केस न‌ करता गर्भपात करणं शक्य नाही
पण तिच्या आईला ही बातमी पसरू द्यायची नाहीय. शपण नाइलाजाने अशातच एका महिला वकिलाची मदत घेतली जाते व केस कोर्टात उभी राहते.
पण कोर्ट मात्र या गर्भपाताला मान्यता देत नाही. आता नक्की ही मान्यता का मिळत नाहीय.? बलात्कार नक्की कोणी केला आहे.? गर्भपाताला मान्यता मिळते का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. हा चित्रपट झी फाइव्ह वर उपलब्ध आहे.
विषय व कथा खूप चांगली आहे पण ती मांडताना तेवढ्या ताकदीने मांडली गेली नाही. माझ्याकडून याला तीन स्टार.


७. चोर निकल के भागा
२०२३. रोमांचक, नाटक. १ तास ५० मिनिटे.
लेखक सिरज एहमद, अमर कौशिक, राजकुमार गुप्ता
दिग्दर्शकअजय सिंग
कलाकारयामी गौतमी, सनी कौशल
निर्मातादिनेश, अमर कौशिक
प्रदर्शित तारीख२४ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

चोर निकल के भागा” चित्रपट समीक्षा :-

यामी गौतमी आणि सनी कौशल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
अंकीत सेठी म्हणजे सनी हा एक मोठा उद्योजक असून तो प्रचंड कर्जात बुडालेला असतो. आणि म्हणुनच त्याला पैशांची गरज असते. त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊन कोट्यवधी रुपयांचे हिरे चोरण्याचा प्लॅन करतो. त्यासाठी तो हवाई सुंदरी असलेल्या नेहा ग्रोवर म्हणजेच यामी गौतमीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. इतक्यावरच न थांबता तो तिच्याशी लग्न करून त्यांना बाळ सुद्धा होणार असतं. पण असं काही घडतं की सगळा प्लॅन उलटा होतो.
ज्या विमानात हिरे चोरायचा प्लॅन असतो तेच विमान हायजॅक होतं. आता ते कोण करतं? अंकीत सेठीला हिरे मिळतात का.? नेहाला त्यांचं खरं रूप समजत का. हे सगळं चित्रपट पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


८. भीड
२०२३. नाटक. १ तास ५४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक अनुभव सिन्हा, सौम्या तिवारी, सोनाली जैन
दिग्दर्शकअनुभव सिन्हा
कलाकारराजकुमार राव,भूमी पेडणेकर,आशुतोष राणा,पंकज कपूर,दिया मिर्झा,कुमुद मिश्रा
निर्माताअनुभव सिन्हा
प्रदर्शित तारीख२४ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

भीड” चित्रपट समीक्षा :-

दिग्दर्शक अनुभव सिन्हा हा नेहमीच सामाजिक व्यवस्थेवर किंवा समाजातल्या महत्त्वांच्या मुद्द्यांवर विचार करायला भाग पाडणारे चित्रपट बनवत असतो. “भीड” सुद्धा त्यापैकीच एक.
कोरोनाने अख्ख्या जगाला जेव्हा वेठीस धरले होते तेव्हा समाजातील सर्वात गरीब लोकांची, मजूर वर्गाची काय अवस्था झाली होती हे भेदकपणे मांडणारा हा चित्रपट आहे. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात सुखवस्तू वर्गातील आणि मध्यमवर्गीय कुटुंबाना सुद्धा म्हणावी तशी झळ पोहोचली नाही पण हातावर पोट असणारा श्रमिक वर्ग मात्र पार होरपळून निघाला, हे सारं य चित्रपटात बघायला मिळतं.
शहराकडून गावाकडे जाणाऱ्या श्रमिक वर्गाची काय ससेहोलपट झाली हे मुख्यपणे बघायला मिळतं. तिथे प्रवेशनाक्यावर सूर्यकुमार सिंह टिकस म्हणजेच राजकुमार राव हा चेकपोस्ट चा इन्चार्ज असतो. लोकांना अडवताना, त्यांच्यावर दबाव आणताना माणूस म्हणून असणारी त्याची घुसमट खूप काही बोलून जाते. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात सुद्धा जाती धर्मावरून केलेलं राजकारण. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा घेतलेला गैरफायदा, सामाजिक विषमता हे सगळं दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडलं आहे.
जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


९. ऑपरेशन मेफेअर
२०२३. गुन्हेगारी, रोमांचक. १ तास ५६ मिनिटे. [ ए ]
लेखक ॲन्थनी, सुदिप्तो सरकार
दिग्दर्शकसुदिप्तो सरकार
कलाकाररितिका शेबर, जिमी शेरगील, अंकुर भाटिया
निर्मातासुशांतो सरकार
प्रदर्शित तारीख२४ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

ऑपरेशन मेफेअर” चित्रपट समीक्षा :-

क्राइम, सस्पेन्स थ्रिलर जॉनरचे चित्रपट म्हणजे आजकालच्या प्रेक्षकांची पहिली पसंती असते. हा चित्रपट सुद्धा अशाच जॉनरचा आहे.
लंडन मध्ये घडणारी ही कथा आहे. एक सायको सिरियल किलर मुलींना एका विशिष्ट पद्धतीने मारत सुटला आहे. खरं तर अशा चित्रपटांची हीच मजा असते की हा सिरियल किलर कोण आहे हे शोधून काढणं. इनव्हेस्टीगेशन करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. आणि हाच सस्पेन्स असतो. पण या चित्रपटात मात्र दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या मेंदूला ताण न द्यायचं ठरवल्यामुळे किलर कोण आहे हे आधीच सांगुन टाकलंय.त्यामागचं कारण सुद्धा आधीच स्पष्ट केले आहे.
त्यामुळे हा चित्रपट शेवटपर्यंत बघावा असं यात काही नाही. तुमचा वेळ वाया गेला तरी फरक पडणार नसेल तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


१०. कंजूस मक्खिचूस
२०२३. नाटक, परिवार. १ तास ५६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक विपुल मेहता
दिग्दर्शकविपुल मेहता
कलाकारकुणाल खेमू, श्‍वेता त्रिपाठी, पीयूष मिश्रा, अलका अमीन, राजू श्रीवास्तव
निर्मातादिपक मुकुट, सृष्टी शर्मा, कुशाग्र शर्मा
प्रदर्शित तारीख२४ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

कंजूस मक्खिचूस” चित्रपट समीक्षा :-

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हा चित्रपट एका कंजूस माणसाची गोष्ट आहे. कुणाल खेमू ही भुमिका साकारत आहे.
लखनऊ मध्ये घडणारी ही गोष्ट आहे. जमुना प्रसाद हा एक अतिशय कंजूस माणूस असून आईवडिलांपसून बायको मुलगा सगळेच कंजुसपणाला कंटाळलेले आहेत. पण तो हा सगळा कंजुसपणा आपल्या आईवडिलांना चारधाम यात्रेला जाता यावं म्हणून करत असतो ज्याचा कोणालाच पत्ता नसतो.
पैसे साठवून तो आईवडिलांना चारधाम यात्रेला पाठवतो तिकडे ढगफुटी होते आणि त्याचे आईवडील हरवतात. पुढे काय होतं ते बघायला चित्रपट बघणं गरजेचं आहे. हा चित्रपट झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे पण दिग्दर्शन आणि पटकथा कुठेतरी कमी पडल्याचं जाणवत. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


११. गॅसलाईट
२०२३. रहस्य. रोमांचक. १ तास ५१ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक पवन कृपलानी
दिग्दर्शकपवन कृपलानी
कलाकारसारा अली खान, विक्रांत मेस्सी, चित्रांगदा सिंग
निर्मातारमेश तौरानी, अक्षय पुरी
प्रदर्शित तारीख२४ मार्च २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

गॅसलाईट” चित्रपट समीक्षा :-

गॅसलाईट हा चित्रपट हॉटस्टार वर प्रदर्शित झाला आहे. सस्पेन्स थ्रिलर, क्राइम अशा धाटणीचा हा चित्रपट असून सारा अली खान हीने पहिल्यांदाच अशी धीरगंभीर भुमिका साकारली आहे.
मीशा म्हणजेच सारा अली खान ही तब्बल १५ वर्षांनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या घरी गुजरातला परतते. पण जेव्हा ती येते तेंव्हा तीचे वडीलच घरी नसतात. त्यांचं असं न सांगता गायब होणं तिला खटकतं आणि ती त्यांचा शोध घ्यायला लागते.
मीशा ही अपंग असते त्यामुळे तीला व्हीलचेअर बसूनच सगळा शोध घ्यावा लागतो. या सगळ्यात तिला तिच्या सावत्र आईवर आणि तिच्या बॉडीगार्ड वर संशय असतो.
आता मीशाचे वडील कुठे असतात. ती त्यांचा शोध घेते का.? त्यांचं कोणी काही केलंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात मिळतील.
संपूर्ण चित्रपट काळोखात चित्रित केल्यासारखा वाटतो. त्यामुळे बघताना कंटाळवाणा वाटू शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.

    तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. 
Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *