HomeFilmsFilms NewsHindiWriterAkanksha

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जुलै 9, 2023 | 05:23 PM

हल्ली साऊथ इंडियन चित्रपटांनी प्रेक्षकांना जणू भुरळ घातली आहे. भरीस भर नवीन आलेला बॉयकॉट ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला वाईट फटका बसला आहे. म्हणूनच आता २०२३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला दमदार कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि तशी सुरूवात सुद्धा झालेली आहे. पण खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. आता या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. चला तर मग मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आज या लेखात आपण बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला कळवा.

May 2023 Hindi movie list 2
१. मदर तेरेसा ॲन्ड मी
२०२३. नाटक. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक कमल मुसले
दिग्दर्शककमल मुसले
कलाकारबनिता संधू , जैकलीन फ्रिट्ची कॉर्नाज , दीप्ति नवल , विक्रम कोचर , ब्रायन लॉरेंस , हीर कौर , केविन मेन्स
निर्माताकमल मुसले
प्रदर्शित तारीख५ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

मदर तेरेसा ॲन्ड मी” चित्रपट समीक्षा :-

कमल मुसले लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित “मदर तेरेसा ॲन्ड मी” हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. आता नाव वाचून लक्षात आलंच असेल चित्रपटाची कथा कशावर आधारित असेल.
जवळपास १९४० चा काळ चित्रपटात दाखविण्यात आला आहे. जेव्हा मदर तेरेसा यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात कलकत्त्यामधे केली होती. परिस्थितीने गांजलेल्या गरीब लोकांना मदत, रुग्णांची सेवा अशी बरीच कामे त्या करत होत्या. चित्रपटाची कथा यावरच बेतलेली आहे.
चित्रपटाची पटकथा मदर तेरेसा यांच्या सोबतच कविता नावाच्या मुलीवर सुद्धा अवलंबून आहे. एकीकडे मदर तेरेसा यांच्या विचारांचा प्रभाव समाजातील लोकांवर होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कविता ही भारतीय वंशाची लंडनमध्ये राहणारी मुलगी लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे मानसिक द्वंद्वात अडकली आहे असं दाखवलं आहे.
बाकी जाणून घेण्यासाठी चित्रपट बघणं गरजेचं आहे. चित्रपटाची कथा ही अजून सुटसुटीत होऊ शकली असती ज्यामुळे चित्रपट इतका लांबला नसता. बाकी त्यावेळचा काळ दाखविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. अफवाह
२०२३. नाटक, रोमांचक. २ तास ६ मिनिटे. [ ए ]
लेखक सुधीर मिश्रा, निसर्ग मेहता, शिवा बाजपाल
दिग्दर्शकसुधिर मिश्रा
कलाकारभुमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी, सुमीत व्यास, शारीब हाश्मी
निर्माताअनुभव सिन्हा
प्रदर्शित तारीख५ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

अफवाह” चित्रपट समीक्षा :-

भुमी पेडणेकर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणजे अभिनयाची जुगलबंदी म्हणावी लागेल. हीच जुगलबंदी तुम्हाला अफवाह या चित्रपटात पहायला मिळते.
धर्माचं राजकारण आणि मिडिया द्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम हा चित्रपटाचा मुख्य विषय आहे.
परदेशातून परतलेल्या नवाजुद्दीन सिद्दिकी याची आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. भुमी हि एका बड्या, प्रतिष्ठित राजकारणी वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तीचे वडील तिला योग्य अशाच एका राजकारणात मुरब्बी तरुणाशी विवाह ठरवत आहेत पण जो विवाह भुमीला मान्य नाही. म्हणून ती पळून जाते. या सगळ्यात तिला नवाजुद्दीन भेटतो तो तिला मदत करतो.
इथेच खरा ट्विस्ट येतो. भुमी ही हिंदू असून नवाज हा मुस्लिम धर्माचा असतो. त्यामुळे भुमीचा होणारा नवरा या दोघांच्या धर्माच्या नावाखाली लव जिहाद चा ठपका लावून नवाजने भुमीला पळवून नेले अशी अफवा पसरवतो. ही अफवा वाऱ्यासारखी पसरते. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र चित्रपट बघावा लागेल. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.
चित्रपट सुरूवातीला थोडासा रेंगाळलेला, कंटाळवाणा वाटतो पण नंतर मात्र कथा चांगलीच पकड घेते. त्यात सगळ्यांचा अभिनय तर जबरदस्त झाला आहे. नवाजुद्दीन आणि भुमीच्या अभिनयासाठी तरी हा चित्रपट नक्कीच बघा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


३. द केरला स्टोरी
२०२३. गुन्हेगारी, नाटक. २ तास १८ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक सुर्यपाल सिंग, सुदिप्तो सेन, विपुल अमृतलाल शाह
दिग्दर्शकसुदिप्तो सेन
कलाकारअदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी, सिद्धी इदनानी
निर्माताविपुल अमृतलाल शाह
प्रदर्शित तारीख५ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.३⭐/ ५

“द केरला स्टोरी” चित्रपट समीक्षा :-

“द केरला स्टोरी” हा सर्वाधिक चर्चा झालेला चित्रपट सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे.
“लव्ह जिहाद” धर्मांतर आणि दहशतवाद हा या चित्रपटाचा पाया आहे. केरळमधील हिंदू व ख्रिश्चन धर्माच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करून मुस्लिम धर्माचा स्वीकार करायला लावून दहशतवादी कारवायांमध्ये सामिल करून घेणे यावर हा चित्रपट बेतलेला आहे.
पॅरामेडिकल कॉलेज मध्ये शिकणाऱ्या चार मुलींची हि कथा आहे. यातील मुख्य पात्र शालिनी म्हणजेच अदा शर्मा हि अशीच कम्युनिस्ट पक्षाच्या एका नेत्याची मुलगी असते. ती मुस्लिम धर्माच्या एका मुलाच्या प्रेमात पडते यातच तिची हॉस्टेल मधील एक मैत्रीण असिफा तीचा ब्रेन वॉश कलत असते. हिंदू व इतर धर्मापेक्षा इस्लाम धर्म हा किती श्रेष्ठ आहे हे पटवून देत असते. खरं तर हा त्यांचा प्लॅन असतो. यात शालिनी फसते. लग्न करून ती इस्लाम धर्म स्वीकारते. पण नंतर कशी ती फसवली जाते व इसिस ची दहशतवादी बनते हे ती स्वतः पोलिसांनी पकडल्यानंतर सांगते.
तिच्यासारख्या असंख्य मुलींची कथा यात दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे असं निर्माते व दिग्दर्शक यांचं म्हणणं आहे. पण बऱ्याच लोकांनी, पक्षांनी याचा विरोध केला आहे. हा एक प्रपोगंडा असल्याचं देखील म्हटलं जात होतं पण हा चित्रपट चांगला चालला.
एक कलाकृती म्हणून हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघू शकता. त्यात सत्य किती आणि तथ्य किती हे मात्र तुम्हीच ठरवा. एकंदर चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, अभिनय यासाठी एक कलाकृती म्हणून या चित्रपटाला तीन स्टार.


४. छत्रपती
२०२३. ॲक्शन, नाटक. २ तास ४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक व्हि. विजयेंद्र प्रसाद
दिग्दर्शकव्हि. व्हि. विनायक
कलाकारबेल्लामकोंडा साई, नुसरत भरूचा, शरद केळकर
निर्माताजयंतीलाल गाडा, धवल गाडा, अक्षय गाडा
प्रदर्शित तारीख१२ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

छत्रपती” चित्रपट समीक्षा :-

१२ मे रोजी प्रदर्शित झालेला छत्रपती हा चित्रपट २००५ साली आलेल्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचा नायक बेल्लामकोंडा याने या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा हिंदी चित्रपट व्हि. व्हि. विनायक यांनी दिग्दर्शित केला आहे.
खरं तर दहा बारा वर्षांपूर्वी खुद्द एस एस राजमौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा रिमेक बनवताना थोडी जास्त मेहनत घ्यायला हवी होती. तेव्हाची कथा ही तशीच्या तशी उचलून त्यावर चित्रपट बनवणं म्हणजे प्रेक्षकांना गृहीत धरण्यासारखं आहे.
पाकिस्तान फाळणीनंतर भारतात आलेले रिफ्युजी आणि त्यांची फरफट यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचा नायक शिवा म्हणजेच बेल्लामकोंडा साई हा सुद्धा आपल्या आई आणि भावापासून वेगळा होऊन हरवून रिफ्युजी कॅम्प आला आहे. तो आईचा शोध घेता घेता तिथल्या लोकांचा कसा मसीहा होतो वैगरे अशी ही कथा. खरं तर चित्रपटात बघण्यासारखं फार काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार. तुमच्या रिस्कवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.


५. म्युझिक स्कूल
२०२३. नाटक. संगीत. २ तास १० मिनिटे. [ यु ]
लेखक पापाराव बियाला
दिग्दर्शकपापाराव बियाला
कलाकारशर्मन जोशी, श्रिया सरन , प्रकाश राज, शान
निर्मातापापाराव बियाला, दिल राजू
प्रदर्शित तारीख१२ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

म्युझिक स्कूल” चित्रपट समीक्षा :-

हल्ली स्पर्धेच्या युगात टाकायचं तर त्याची सुरुवात ही बालपणापासूनच म्हणजे शाळेपासूनच होते. चढाओढ आणि स्पर्धा या नादात नुसतं पुस्तकी ज्ञान देण्यावर भर असतो. या सगळ्यात इतर खेळ, छंद, कला हे दुय्यम स्थानावर राहतात. याच धर्तीवर हा चित्रपट आहे.
श्रिया सरण ही संगीत शिकवणारी शिक्षिका एका शाळेत संगीताला महत्त्व दिलं जावं, मुलांना संगीताची गोडी लागावी म्हणून प्रयत्न करत असते पण शाळेतील व्यवस्थापन मात्र याकडे फार लक्ष देत नाही. म्हणूनच तिचा मित्र शर्मन जोशी तिला तिची स्वतःची संगीत शाळा चालू करण्यासाठी प्रोत्साहन देतो. जो स्वतः शिक्षक असतो व अभिनय शिकवण्याचं काम करत असतो.
आता तिच्या शाळेत मुलं येतात का.? पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. संगीत हा गाभा असलेल्या या चित्रपटात एकुण बारा गाणी आहेत पण तरीही ती इतकी खास परत परत ऐकावीत अशी नाहीत. एकंदर चित्रपटाची भट्टी म्हणावी तशी जमलेली नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६. आयबी७१
२०२३. साहसी. रहस्य. १ तास ५७ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक सहार क्वेझ, संकल्प रेड्डी, वासुदेव रेड्डी
दिग्दर्शकसंकल्प रेड्डी
कलाकारविद्युत जामवाल, अनुपम खेर
निर्माताविद्युत जामवाल
प्रदर्शित तारीख१२ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

आयबी७१” चित्रपट समीक्षा :-

भारत – पाकिस्तान युद्ध, कारवाया यांवर आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट येऊन गेले आहेत. तरीही प्रत्येक चित्रपट हा आपण अतिशय आवडीने आणि आदराने बघतो.
१९७० साली पाकिस्तान चीनसोबत मिळून भारतावर हल्ला करण्याची योजना गुप्तपणे आखत होता. त्याआधी दोन्ही युद्धामध्ये झालेल्या पराभवाचा बदला पाकिस्तानला घ्यायचा होता. आणि म्हणूनच चीनशी हातमिळवणी करून भारताविरुद्ध कट शिजत होता.
आता हा हल्ला थांबवण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी भारताकडे पुरेसा वेळ नव्हता. अशा परिस्थितीत फक्त आणि फक्त हवाई क्षेत्रातील मार्ग रोखून धरणे हा एकच पर्याय उरला होता. पण ते इतकं सोपं नव्हतं. भारतीय एजंट या सगळ्या परिस्थितीत काय मार्ग काढतात हे बघणं खूप रोमांचकारी आहे. हा अनुभव प्रत्येक भारतीयाने जरूर घ्यावा.
विद्युत जामवाल, अनुपम खेर तसेच इतर कलाकारांनी अभिनय अतिशय उत्तम केला आहे. त्यावेळचा काळ देखील सुंदररित्या दाखविण्यात आला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


७. कटहल : एक जॅकफ्रुट मिस्ट्री
२०२३. विनोदी, नाटक. १ तास ५५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक यशवर्धन मिश्रा , अशोक मिश्रा
दिग्दर्शकयशवर्धन मिश्रा
कलाकारसान्या मल्होत्रा, अनंत व्ही. जोशी, राजपाल यादव , नेहा सराफ
निर्माताशोभा कपूर , एकता कपूर, गुनीत मोंगा, अचिन जैन
प्रदर्शित तारीख१२ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

कटहल : एक जॅकफ्रुट मिस्ट्री” चित्रपट समीक्षा :-

कटहल हा चित्रपट १२ मे रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आहे. हलकाफुलका मनोरंजन करणारा व्यंगात्मक विनोदी म्हणू शकतो असा हा चित्रपट आहे.
सान्या मल्होत्रा हि या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. सब इन्स्पेक्टर महीमा बसोर अशी तिची भुमिका आहे.
चित्रपटाची कथा वरवर दोन फणसांभोवती फिरताना दिसते. आमदार असलेल्या मुन्नालाल पटेरिया म्हणजे विजय राज यांनी बागेतील दोन फणसांची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली असून ते फणस शोधण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर महीमा वर आली आहे. गंमत अशी आहे की ते फणस साधेसुधे आपल्या देशातील नसून मलेशियातील एका वेगळ्या जातीचे आहेत. त्या फणसांचे लोणचे घालून मुख्यमंत्र्यांच्या घरी पाठववायचं आहे जेणेकरून मुन्नालाल यांना राजकारणात फायदा होईल.
कथेमध्ये ट्विस्ट येतो जेव्हा फणसांचा शोध लावता लावता आमदारांच्या घरातील माळ्याची मुलगी गायब असल्याचं लक्षात येतं. आता पुढे काय होतं. महिमा फणस शोधते की मुलगी.? तिच्यासमोर अजून कोणती रहस्य उलगडतात..? हे सगळं बघण्यासाठी हा हलकाफुलका चित्रपट तुम्ही जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. सान्या मल्होत्रा, राजपाल, विजय राज सगळ्यांचा अभिनय उत्तम झाला आहे


८. आजम
२०२३. रहस्य, नाटक. २ तास. [ यु / ए ]
लेखक श्रवण तिवारी
दिग्दर्शकश्रवण तिवारी
कलाकारजिमी शेरगील, अभिमन्यू सिंह, इंद्रनील सेनगुप्ता, गोविंद नामदेव, रजा मुराद
निर्माताटि. बी. पटेल
प्रदर्शित तारीख१९ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

आजम” चित्रपट समीक्षा :-

जिमी शेरगील हा खरं तर एक चांगला गुणी अभिनेता आहे. पण त्याच्या वाट्याला चांगल्या भूमिका खूप कमी आल्या. आता बऱ्याच काळानंतर आजम या चित्रपटात जिमी शेरगील मुख्य आणि मध्यवर्ती भुमिकेत दिसत आहे.
मुंबई आणि अंडरवर्ल्ड दुनिया हे नातं सांगायला नको. मुंबईवर राज्य करावं अशी महत्वाकांक्षा असलेले कितीतरी डॉन आले आणि गेले. हेच सांगणारा हा चित्रपट आहे. आजम म्हणजे शूर.. पराक्रम गाजवून जिंकणारा.
मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन नवाब खान शेवटच्या घटका मोजत असताना आता पुढे ही गादी कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित होतो. त्या स्पर्धेत तसे बरेच उभे आहेत पण चित्रपटाचा नायक जावेद म्हणजेच जिमी शेरगील याला मात्र हि स्वतःला अंडरवर्ल्डचा शहेनशहा व्हायचं आहे.
आतापर्यंत या काळातील बरेच चित्रपट येऊन गेले. तर या चित्रपटात नवीन काय हे मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. चित्रपटात उगीच गाण्यांचा भरणा नाही की नको तेव्हा मारामारीचे एक्सट्रा सीन्स नाही. त्यामुळे चित्रपट बघताना कंटाळा येत नाही. सगळ्यांचा अभिनय सुद्धा छान आहे. ॲक्शन, मारामारी, अंडरवर्ल्डची दुनिया हे असे चित्रपट बघायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


९. 8A.M. मेट्रो
२०२३. नाटक. १ तास ५६ मिनिटे. [ यु ]
लेखक श्रुती भटनागर, राज राचकोंडा
दिग्दर्शकराज राचकोंडा
कलाकारसैयामी खेर, गुलशन देवैया, उमेश कामत, निमिशा नायर
निर्माताकिशोर गंजी, राज राचकोंडा
प्रदर्शित तारीख१९ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

8A.M. मेट्रो” चित्रपट समीक्षा :-

आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी घडतच राहतात पण वाईट गोष्टीच , आठवणीच धरून राहीलं तर आयुष्य कंटाळवाणं होऊन जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्या वाईट घटना या घडतच असतात. पण प्रत्येक वेळी कोणीतरी समजून घेणारं जवळ असेलच असं नाही अशा वेळी मानसिक आधार हवा असतो आणि तो नाही मिळाला तर घुसमट होत राहते. हीच घुसमट व्यक्त करणारा हा चित्रपट आहे.
ज्यांना ॲक्शन, मसाला असलेले चित्रपट किंवा थ्रिलर सस्पेन्स असे चित्रपट आवडतात तर अशा लोकांसाठी हा चित्रपट अजिबात नाही. हा चित्रपट अतिशय संवेदनशील असून बऱ्याच नाजूक विषयावर भाष्य करणारा आहे.
आपल्या गरोदर बहिणीच्या मदतीला नांदेड वरून हैदराबादला जात असलेली इरावती म्हणजे सैयामी ही ट्रेनच्या प्रवासाला अतिशय घाबरत असते. अशातच या प्रवासात तिची ओळख एका अनोळखी पुरूषासोबत होते. त्यांच्या छान गप्पा रंगतात. त्यांच्यात मैत्री होते. आकर्षण निर्माण होतं. पण हे दोघंही विवाहित असतात. आता या प्रवासात पुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र चित्रपट बघावा लागेल.
एक अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय खूप सुंदररित्या मांडला गेला आहे. बऱ्याचदा संवादापेक्षा शांतता खूप बोलून जाते हे प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट जरूर बघावा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१०. कच्चे लिंबू
२०२३. नाटक. परिवार. १ तास ४६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक शरण्य राजगोपाल, सुकन्या सुब्रमण्यम, नीरज पांडे, शुभम योगी
दिग्दर्शकशुभम योगी
कलाकारराधिका मदन, रजत भरमेचा, आयुष
निर्माताज्योती देशपांडे, नेहा आनंद
प्रदर्शित तारीख२३ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : –२.४⭐/ ५

कच्चे लिंबू” चित्रपट समीक्षा :-

मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांची ही गोष्ट आहे. आकाश म्हणजे रजत हा क्रिकेटप्रेमी असतो. त्याला क्रिकेटचं भयंकर वेड असतं पण त्याच्या वडिलांना मात्र ते पटत नसतं. त्याने एखादी बडी नोकरी करावी असंच त्यांना वाटत असतं.
आकाश ची बहिण अदिती हिला सुद्धा क्रिकेट आवडत असतं. याचवर चित्रपटाची कथा आधारित आहे. एकदा खुद्द सचिन तेंडुलकर आकाशचा व्हिडिओ बघतात शेअर करतात व त्यांच्या सोसायटीमध्ये टुर्नामेंट भरवतात. यावरूनच आकाश आणि अदिती मध्ये भांडणं होतात आणि त्यांच्यात एकमेकांना चॅलेंज दिलं जातं की कोण जिंकणार.आता कोण जिंकणार हे बघण्यासाठी तुम्हाला सुद्धा चित्रपट बघावा लागेल.
ज्यांना ॲक्शन, मसाला असलेले चित्रपट किंवा थ्रिलर सस्पेन्स असे चित्रपट आवडतात तर अशा लोकांना हा चित्रपट अजिबात आवडणार नाही. पण क्रिकेटप्रेमी लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


११. सिर्फ एक बंदा काफी है
२०२३. नाटक, रोमांचक. २ तास १२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक दीपक किंगरानी
दिग्दर्शकअपूर्व सिंह कार्की
कलाकारमनोज वाजपेयी, विपिन शर्मा, सुर्य मोहन कुलश्रेष्ठ, अदीती सिन्हा, विवेक टंडन
निर्माताविनोद भानुशाली
प्रदर्शित तारीख२३ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.४⭐/ ५

सिर्फ एक बंदा काफी है” चित्रपट समीक्षा :-

झी फाईव्ह वर प्रदर्शित झालेला सिर्फ एक बंदा काफी है हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट या श्रेणीत मोडतो. २०१३ साली आसाराम बापू या भोंदू बाबाला बलात्काराच्या आरोपाखाली झालेली अटक आणि आजन्म कारावासाची शिक्षा हा प्रवास दाखवणारा हा चित्रपट आहे.
सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. आपल्या आजारी मुलीला एका बुवाकडे घेऊन गेल्यावर तिच्यावर अत्याचार होतो. पण या बुवाचं प्रस्थ इतकं मोठं असतं की त्या मुलीची केस घ्यायला वकील तयार नसतात पत अशातच पुनम सोलंकी हे मात्र प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने हि केस लढतात. मात्र ती केस कशाप्रकारे जिंकतात हे बघणं गरजेचं आहे त्यासाठी हा चित्रपट झी फाईव्ह वर नक्की बघा.
मनोज वाजपेयी याच्या अभिनयाबद्दल काय बोलावं.? माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.


१२. जोगिरा सारा रा रा
२०२३. नाटक. २ तास १ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक गालिब असद भोपाली
दिग्दर्शककुषाण नंदी
कलाकारनवाजुद्दीन सिद्दिकी, नेहा शर्मा, महाक्षय चक्रवर्ती, संजय मिश्रा
निर्मातानईम सिद्दिकी, किरण श्रॉफ
प्रदर्शित तारीख२६ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

जोगिरा सारा रा रा” चित्रपट समीक्षा :-

नवाजुद्दीन सिद्दिकी हा विनोदी भूमिकेत तसा कमी दिसतो. त्याचा हा चित्रपट मात्र पूर्णपणे विनोदी आहे.
ही गोष्ट आहे जोगी नावाच्या एका इव्हेंट मॅनेजरची ज्याची स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. जो नेहमी जुगाड करून काम चालवत असतो. अर्थात हा जोगी म्हणजे चित्रपटाचा नायक नवाजुद्दीन सिद्दिकी आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या जोगीने आतापर्यंत कित्येकांची लग्न लावून दिलेली आहेत पण खरा ट्विस्ट येतो जेव्हा डिंपल नावाची मुलगी त्याच्या आयुष्यात येते.हि स्वतःचं लग्न मोडण्यासाठी त्याला सांगते पण असं काही होतं की जोगीलाच तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली जाते. आता हा सगळा प्रकार नक्की काय ते मात्र चित्रपटातच कळेल.
एकंदर चित्रपट थोडा फसलेला वाटतो. संजय मिश्रा यांनी अभिनय उत्तम केला आहे. बाकी चित्रपटात खास बघण्यासारखं फार काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.

    तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

आणखीन काही संबधित लेख वाचा

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *