मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑगस्ट 6, 2023 | 08:53 PM
आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
२०२२ चा शेवट वेड या चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावून केला. तर २०२३ ची सुरुवात दणक्यात झालीय का ते आपण बघूया. आज आम्ही तुम्हाला मध्ये जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट सांगणार आहोत.
१. बलोच |
लेखक | नागराज मंजुळे |
दिग्दर्शक | प्रकाश जनार्दन पवार |
कलाकार | प्रविण तरडे, स्मिता गोंदकर, अमोल कागणे,अशोक समर्थ |
निर्माता | महेश करवंदे, जीवन जाधव, दत्ता काळे, गणेश शिंदे,जितेश मोरे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे |
प्रदर्शित तारीख | ५ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“बलोच” चित्रपट समीक्षा :-
पानीपतची लढाई म्हटलं की मराठ्यांचा पराभव ही एक गोष्ट जास्त बोचते. खरं तर मराठ्यांनी पूर्ण ताकदीनिशी तो लढा दिला होता पण भौगोलिक परिस्थिती असेल किंवा इतर गोष्टी प्रतिकुल असल्यामुळे ती लढाई मराठ्यांना जिंकता आली नव्हती. हा पराभव झाल्यानंतर काही मराठा मावळ्यांना गुलाम म्हणून बलुचिस्तानमध्ये घेऊन जाण्यात आले होते. तिथे गुलामीत असूनसुद्धा मराठ्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी दिलेल्या लढ्याची गाथा म्हणजे “बलोच” हा चित्रपट.
प्रवीण तरडे हे एका मराठा सुभेदाराच्या भुमिकेत असून त्यांची मध्यवर्ती भूमिका आहे. या चित्रपटात त्यांच्या पूर्वायुष्यातील थोडा काळ दाखवण्यात आला आहे. पानिपतच्या लढाईला जाण्यापूर्वी काय काय तयारी केली गेली, किंवा त्यांचं वैवाहिक आयुष्य असेल पण या गोष्टी थोडक्यात दाखवल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं.
चित्रपट हा संपूर्ण पानीपतची लढाई आणि त्यानंतर चा काळ यावर आधारित आहे. गुलाम म्हणून बलुचिस्तानमध्ये असताना मराठ्यांवर काय अत्याचार करण्यात आले, त्यांना काय काय सहन करावं लागलं याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण त्याही परिस्थितीत मराठे अन्यायाविरुद्ध लढतच राहिले. हि त्याचीच कथा. एकदा तरी हा चित्रपट नक्कीच बघावा.
गाणं किंवा सुभेदार आणि बायको यांच्यातील सीन्स कमी करता आले असते. पण एकंदर चित्रपट बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. सरी |
लेखक | के. एस अशोक |
दिग्दर्शक | के. एस अशोक |
कलाकार | रितिका श्रोत्, मृणाल कुलकर्णी, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर |
निर्माता | डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल |
प्रदर्शित तारीख | ५ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“सरी” चित्रपट समीक्षा :-
एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे दोघं आणि मधेच येणारा तिसरा आणि मग होणारं प्रेमाचं त्रिकुट हा विषय हिंदी वा मराठी चित्रपटांसाठी नवीन नाही. त्यातल्या त्यात काहीतरी वेगळं नवीन ॲड करत असे भरमसाठ चित्रपट येत राहतात. सरी हा चित्रपट देखील त्यातलात एक.
लेखक दिग्दर्शक के. एस. अशोक यांनी या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. यापूर्वी हाच चित्रपट त्यांनी कन्नड मध्ये दिया नावाने काढला होता. परंतु त्यांचा मराठीतील प्रयत्न थोडासा फसला असं म्हणावा लागेल.
दिया म्हणजेच रितिका आणि रोहित म्हणजेच अजिंक्य यांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम असतं. काही कारणाने त्यांची ताटातूट होते पण ते पुन्हा एकत्र येतात परंतु अचानक रोहीतचा अपघात होतो व तो कायमसाठी हे जग सोडून गेला असं दियाला कळतं. ती कसंबसं यातून सावरते आणि तिच्या आयुष्यात आदी म्हणजे पृथ्वी अंबर येतो. व त्यांची प्रेमकहाणी सुरू होते.
आता रोहित खरंच मरण पावलाय का.? तो पुन्हा दियाच्या आयुष्यात येतो का.? शेवटी कोणाचं प्रेम खरं.? कोण कोणाला भेटतं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच मिळतील.
तसा ठिकठाक असलेला हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही. फार ट्विस्ट वैगरे काही नाहीत. बऱ्याचदा पुढे काय होणार याचा अंदाज लावता येतो. अभिनय सुद्धा बरा म्हणू शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
३. तेंडल्या |
लेखक | सचिन जाधव, नचिकेत वाईकर |
दिग्दर्शक | सचिन जाधव, नचिकेत वाईकर |
कलाकार | फिरोज शेख, अमन कांबळे, ओमकार गायकवाड, स्वप्निल पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे |
निर्माता | सचिन जाधव, चैतन्य काळे |
प्रदर्शित तारीख | ५ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“तेंडल्या” चित्रपट समीक्षा :-
“तेंडल्या” नाम ही काफी हैं. सचिन तेंडुलकर हा कित्येक क्रिकेटप्रेमी लोकांसाठी अक्षरशः देव आहे. असंच त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या दोन भक्तांची कथा म्हणजे तेंडल्या चित्रपट.
नव्वदच्या दशकात सचिन तेंडुलकरची एक वेगळीच क्रेझ होती. अर्थात अजूनही ती तशीच आहे. पण त्या काळात टिव्ही सारखी माध्यमं कमी होती. ग्रामीण भागात तर क्वचित कोणाकडे तरी टिव्ही. मग सचिन तेंडुलकर ची मॅच वैगरे असेल तर ज्याच्या घरी टिव्ही त्याच्याकडे तुफान गर्दी. हाच काळ चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
गज्या हा अस्सल क्रिकेटप्रेमी आणि सचिनचा भक्त वडापची गाडी चालवत असतो. त्याला असं याच्या त्याच्या पाया पडून कोणाकडे तरी जाऊन मॅच बघण्यापेक्षा स्वतःचा टिव्ही घ्यावा असं वाटत असतं तर दुसरीकडे तेंडल्या हा उत्तम क्रिकेट खेळणारा सचिन चा भक्त त्याला एमआरएफ ची बॅट विकत घेऊन दुसऱ्या टिमला हरवायचं आहे. पण दोघांची आर्थिक परिस्थिती यांच्या स्वप्नांच्या आड येतेय. तर चित्रपटात हेच बघायचं आहे की या दोघांची स्वप्न पूर्ण होतात आणि कशी.
पूर्णपणे ग्रामीण भागातील ही नव्वदच्या दशकातील कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. काही ठिकाणी सोडलं तर चित्रपटात काही कमी नाही. कलाकार नवीन असले तरी अभिनय उत्तम आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
४. मराठी पाऊल पडते पुढे |
लेखक | स्वप्निल मयेकर |
दिग्दर्शक | स्वप्निल मयेकर |
कलाकार | चिराग पाटील, सिद्धी पाटणे |
निर्माता | प्रकाश बाविस्कर |
प्रदर्शित तारीख | ५ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“मराठी पाऊल पडते पुढे” चित्रपट समीक्षा :-
अनेक संकटांचा सामना करून व्यवसायात उंच भरारी घेतलेल्या एका खान्देशी तरुणाची अनेकांना प्रेरणा देणारी ही एक कथा आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे त्याचं कारण म्हणजे इथले उद्योगधंदे, व्यवसाय. पण यातील नव्वद टक्के हे व्यवसायिक हे अमराठी लोक आहेत.
एखाद्या मराठी माणसाला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी त्याला अवघड झालं आहे. अशाच पटकथेवर हा चित्रपट आधारित आहे. शिव हा खान्देशी तरूण नोकरी साठी मुंबईत येतो. पण त्याला तिथे स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे पण त्यावेळी त्याला अमराठी लोकांनी केलेल्या विरोधात पाय घट्ट रोवून उभं राहावं लागतं.
शिव या सगळ्याच सामना करतो का.? तो स्वतःला सिद्ध करतो का.? एक मराठी माणूस एक यशस्वी उद्योजक बनतो का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघा.
चित्रपटाची कथा, संवाद, दिग्दर्शन हे अजून चांगल्या प्रकारे करता आलं असतं तर चित्रपट थोडा प्रभावी झाला असता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
५. चौक |
लेखक | देवेंद्र गायकवाड |
दिग्दर्शक | देवेंद्र गायकवाड |
कलाकार | उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे |
निर्माता | विशाल चांदणे, दिलीप लालासाहेब पाटील |
प्रदर्शित तारीख | १४ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“चौक” चित्रपट समीक्षा :-
प्रत्येक शहरात असणारा चौक हा त्या शहराचा, त्या भागाचा केंद्रबिंदू असतो. अशाच पुण्यातील एका चौकात ऐन गणपती विसर्जनाच्या वेळी घडलेली एक घटना या चित्रपटात पहायला मिळते.
राजकारण आणि गुन्हेगारी विश्व यांच जरा जवळचं नातं. चौक हा चित्रपट याच नात्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. नगरसेवक असलेल्या टायगर म्हणजे उपेंद्र लिमये याचा बाल्या म्हणजे अक्षय हा भाऊ आहे. गुंड प्रवृत्तीच्या बाल्याचं गणपती विसर्जनाच्या वेळी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष आणि त्याच्या मित्रांसोबत सोबत भांडण होतं. या भांडणात बाल्याच्या सगळ्यांसमोर कानाखाली वाजवली जाते. आणि इथुनच गोष्ट सुरु होते. खरं तर अगदी स्थानिक पातळीवर सुद्धा राजकारण किती घाणेरड्या प्रकारे केलं जातं आणि यात तरूण पिढी किती आणि कशी भरडली जाते हे दाखवणारा हा चित्रपट म्हणजे आरसा आहे.
बाल्याला याचा बदला घ्यायचा असतो. त्यातून अजून भांडणं वाढतात. याचा अर्थातच राजकारणासाठी पूरेपूर फायदा करून घेतला जातो. पण यख सगळ्यात बाल्याचा खून होतो. आता हा खून कोण करतं.? पुढे काय होतं ते बघायला चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटात सगळे मुरब्बी कलाकार असल्याने चित्रपट चांगल्या प्रकारे पडद्यावर कमाल करतो. हा चित्रपट बघताना मुळशी पॅटर्न या चित्रपटाची आठवण येईल. कथा, पटकथा, संवाद, अभिनय आणि दिग्दर्शन या सगळ्यालाच माझ्याकडून तीन स्टार.
६. ऑटोग्राफ…एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी |
लेखक | अश्विनी शेंडे, बगवाडकर, सतीश राजवाडे |
दिग्दर्शक | सतीश राजवाडे |
कलाकार | अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानिटकर, मानसी मोघे |
निर्माता | संजय छाब्रिया, अश्विन आंचन |
प्रदर्शित तारीख | १४ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“ऑटोग्राफ…एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी” चित्रपट समीक्षा :-
१४ मे रोजी स्टार प्रवाह या मनोरंजन वाहिनी वर प्रदर्शित झालेला “ऑटोग्राफ एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी” हा एकमेव पहिला वहीला चित्रपट आहे जो दूरचित्रवाणी या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
अंकुश चौधरी, उर्मिला कानिटकर आणि अमृता खानविलकर अशी चांगली स्टारकास्ट घेऊन सतीश राजवाडे यांनी पुन्हा एकदा एक वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.
आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अचानक भेटलेली माणसं सुद्धा खास जागा निर्माण करतात. कमी काळासाठी ती आयुष्यात असली तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी या चिरंतन असतात असंच काहीसं सांगणारा हा चित्रपट आहे. आपल्या भुतकाळाचा, आपल्या पूर्वायुष्याचा परिणाम हा भविष्यावर होत असतोच. जुन्या आठवणींचे, गोष्टींचे संदर्भ कुठे ना कुठे लागत राहतात. आयुष्यात नवीन नाती निर्माण झाली तरी जुनी माणसं, जुनी नाती ही सहसा तुटत नाहीत. हेच या चित्रपटात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सतीश राजवाडे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या दिग्दर्शनाचं वेगळेपण दाखवून दिलं आहे.
प्रत्येक जण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो. असंच प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट जरूर बघावा. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
७. दिल बेधुंद |
लेखक | गुड्डू देवांगन |
दिग्दर्शक | संतोष फुंडे |
कलाकार | साक्षी चौधरी, हंसराज जगताप, जयेश चव्हाण |
निर्माता | शिवम पाटील |
प्रदर्शित तारीख | १९ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“दिल बेधुंद” चित्रपट समीक्षा :-
हल्ली मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच नुकसान होत आहे अशी चर्चा असते. पण काही वेळा काही सुमार चित्रपटांना स्क्रीन मिळून सुद्धा असे चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात अयशस्वी ठरतात आणि त्याचाच फटका चांगल्या चित्रपटांना होतो.
१९ मे रोजी प्रदर्शित झालेला दिल बेधुंद हा चित्रपट अशाच एका घासून पुसून गुळगुळीत झालेल्या पटकथेवर आधारित आहे. एका मुलाला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या शिक्षिकेवर प्रेम होतं. याबद्दल तिला विचारल्यावर ती एक अट सांगते. राजूने दहावीच्या परीक्षेत पूर्ण गावात पहिलं येऊन दाखवायचं. आता राजू ही अट पूर्ण करतो का. आणि जर हो तर जान्हवी त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे.
तुमचा वेळ वाया घालवायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट ओटीटी वर आल्यावर पाहू शकता. बाकी चित्रपटात बघण्यासारखी अशी एकही गोष्ट नाही. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार
८. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत |
लेखक | चेतन सागडे |
दिग्दर्शक | चेतन सागडे |
कलाकार | ऐश्वर्या दौंड, आदित्यराजे मराठे, अनिल नगरकर |
निर्माता | आदित्यराजे मराठे |
प्रदर्शित तारीख | १९ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत” चित्रपट समीक्षा :-
नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की बैलगाडी शर्यतीवर आधारित हा चित्रपट आहे. आदित्यराजे मराठे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ते स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
सरकारने बंदी घालण्यात आलेली बैलगाडी शर्यत ही शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची असते हे चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
एका गावातील ही कथा आहे. आपल्या वडिलांनी मुलासारखं प्रेम केलेल्या एका बैलाचा आदित्य हा तरूण राग करत असतो. अशातच त्याला बैलगाडी शर्यतीचं वेड डोक्यात घुसतं परंतु सरकारने या शर्यतीवर बंदी घातली आहे आणि काही राजकारणी सुद्धा ही शर्यत होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. याच राजकारण्यांमधील आणि आदित्य मधील संघर्षाची ही कथा आहे.
ही शर्यत होते की नाही.? आदित्य त्यात भाग घेतो की नाही.? हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास हा चित्रपट तुम्हाला आवडेल की नाही शंका आहे. अभिनय, दिग्दर्शन ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
९. गेट टुगेदर |
लेखक | चेतन सागडे |
दिग्दर्शक | सचिन धोत्रे |
कलाकार | इम्रान तांबोळी, संजना काळे, एकनाथ गीते, श्रेया पासळकर |
निर्माता | समीर गोंजारी, संजय गोंजारी |
प्रदर्शित तारीख | २६ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“गेट टुगेदर” चित्रपट समीक्षा :-
गेट टुगेदर म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा. अशाच आठवणी जाग्या करणारा गेट टुगेदर हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित झाला होता परंतु जास्त स्क्रीन न मिळाल्यामुळे तो फार लोकांना माहित नाही.
आयुष्यात पहिल्यांदा प्रेमाची जाणीव होते ती म्हणजे शाळेत. जेव्हा प्रेम म्हणजे काय हे कळतही नसतं. पण ती हुरहूर, ते आकर्षण, ती ओढ पुन्हा त्या तीव्रतेने नंतर जाणवत नक्कीच नाही. शाळा कॉलेज मध्ये जुळणारं प्रेम हे यशस्वी होतच असं नाही पण त्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात तशाच बंदीस्त असतात कायम.
अशाच एका प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देईल इतकं नक्की. एका गेट टुगेदरच्या निमित्ताने भेटल्यावर चित्रपटाची नायिका आणि नायक यांच्यातील प्रेमकथा उलगडत जाते. त्यामुळे नक्की काय गोष्ट आहे हे तुम्ही स्वतः च बघा. कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१०. डिजॅंगो जेडी |
लेखक | हरदीप सचदेव, रोहित भागवत |
दिग्दर्शक | हरदिप सचदेव |
कलाकार | हरदीप सचदेव, रोहित भागवत |
निर्माता | रोहित भागवत, हरदिप सचदेव |
प्रदर्शित तारीख | २६ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“डिजॅंगो जेडी” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाचं नाव वाचून हा मराठी चित्रपट आहे का हा तुम्हाला प्रश्न पडेल पण हो हरदीप सचदेव दिग्दर्शित हा एक मराठी चित्रपट आहे. गौरी नलावडे व अभिनव सावंत यांच्या प्रमुख भूमिका असून हा एक प्रेमपट आहे.
एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये चालणारं राजकारण, चढाओढ आणि त्याचा वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम या चित्रपटात ठळकपणे बघायला मिळतो. चित्रपटाचा नायक जेडी हा एका नवीन ऑफिस मध्ये इंटर्न म्हणून रूजू होतो पण त्याच्याकडे आत्मविश्वास खूप कमी असतो. तो सतत दबावाखाली काम करत असतो. त्यातच ऑफिसमध्ये चालणारं राजकारण वैगरे याचा त्याच्यावर परिणाम होत असतो.
या सगळ्यात त्याला हर्षिता म्हणजे गौरी मदत करत असते. आता या दोघांमध्ये प्रेम होतं का वैगरे हे बघण्यासाठी चित्रपट बघा. खरं तर या चित्रपटात बघण्यासारखं किंवा शेवटपर्यंत चित्रपट खिळवून ठेवेल असं काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
११. रावरंभा |
लेखक | प्रताप गंगावणे |
दिग्दर्शक | अनुप जगदाळे |
कलाकार | शंतनू मोघे, अशोक समर्थ, ओम भुतकर, मोनालिसा बागल, संतोष जुवेकर |
निर्माता | शशिकांत शीला भाऊसाहेब पवार |
प्रदर्शित तारीख | २६ मे २०२३ |
भाषा | मराठी |
“रावरंभा” चित्रपट समीक्षा :-
रावरंभा हा एक ऐतिहासिक प्रेमपट आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट वाटला तेवढा अपेक्षा पूर्ण शकला नाही असं म्हणावं लागेल. कथा चांगली असली तरी पटकथा संवाद सुद्धा त्यिच तोडीचे असले की चित्रपट चांगला बनतो. नेमकं हेच गणित इथे चुकलं आहे.
स्वराज्यात बहालोलखान धुमाकूळ घालत होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना त्याचा वध करण्यासाठी आदेश दिला होता. याच कामात प्रतापरावांनी चित्रपटाचा नायक रावजी म्हणजेच ओम भुतकर याला साथीदार म्हणून निवडतात. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनीच रावजीची प्रतापरावांचा अंगरक्षक म्हणून निवड केलेली असते.
कामगिरी फत्ते करून परत आल्यावर राव रंभाच्या प्रेमात पडतो पण रंभावर प्राण्यांचा व्यापार करणाऱ्या जालिंदरची वाईट नजर असून तो तिला कैद करतो. आता राव रंभाला सोडवतो का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. इतिहास म्हणून हा चित्रपट नक्कीच बघावा. शंतनु मोघे हे जनमानसांत रखजे म्हणून लोकप्रिय आहेत. यात सुद्धा त्यांची भूमिका उत्तम झाली आहे. ओम भुतकरने अजून मेहनत घ्यायला हवी होती असं वाटतं. बाकी मोनालिसा, प्रतापराव गुजर म्हणून अशोक समर्थ यांच्या भूमिका सुद्धा सुंदर पार पडल्या आहेत.
एकंदर एकदा पहावा असा हा चित्रपट आहे. पण अजून हा चित्रपट चांगला करता आला असता हेही तेवढंच खरं. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
हे पण वाचा :-
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.