HomeHindiHindiFilmsWriterAkanksha

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 6, 2023 | 10:36 PM

हल्ली साऊथ इंडियन चित्रपटांनी प्रेक्षकांना जणू भुरळ घातली आहे. भरीस भर नवीन आलेला बॉयकॉट ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला वाईट फटका बसला आहे. म्हणूनच आता २०२३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला दमदार कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि तशी सुरूवात सुद्धा झालेली आहे. पण खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. आता या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. चला तर मग जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आज या लेखात आपण बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला कळवा.

June 2023 hindi movie list
१. जरा हट के जरा बच के
२०२३. विनोदी, नाटक, प्रणय. २ तास १२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक लक्ष्मण उतेकर
दिग्दर्शकलक्ष्मण उतेकर
कलाकारविकी कौशल, सारा अली खान, नीरज सूद, राकेश बेदी, आकाश खुराना
निर्मातादिनेश विजन, ज्योती देशपांडे
प्रदर्शित तारीख५ जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

जरा हट के जरा बच के” चित्रपट समीक्षा :-

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित जरा हट के जरा बच के हा चित्रपट कॉमेडीचा तडका असलेला एका प्रेमकथेवर आधारित आहे. विकी कौशल आणि सारा अली खान ही जोडी या चित्रपटात पहायला मिळते.
इंदौर शहरातील एका जोडप्याची ही गोष्ट आहे. एकत्र कुटुंबात राहत असल्यावर घरात भांड्याला भांडं लागून आवाज हा होतोच. त्यातही बायकांचं एकमेकींशी पटणं थोडं अवघडच असतं.
हेच चित्र या चित्रपटात पहायला मिळतं. सुन सौम्या म्हणजेच सारा अली खान हिच्यासोबत घरातील कपिलची मामी हिचा काही कारणांवरून भांडणं होतं. आणि मग सौम्या ला आपण स्वतंत्र राहावं असं वाटतं पण त्यासाठी घर कुठून आणायचं हा प्रश्न असतो. मग कपिल आणि सौम्या ला एका सरकारी योजनेबद्दल कळतं पण कपिलच्या नावावर आधीच एक घर असल्याकारणाने तो या योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही.
तेव्हा एक एजंट त्या दोघांना घटस्फोट घेण्याचा सल्ला देतो जेणेकरून सौम्या हि महिलांच्या राखीव कोट्यातील घरासाठी पात्र होऊ शकते. आणि एकदा का घर मिळालं की ते पुन्हा लग्न करू शकतात. आता घटस्फोट घेण्यासाठी घरच्यांसमोर काय नाटक करतात. त्यांचा घटस्फोट होतो का.? पुढे काय होतं ते बघायला चित्रपट बघावा लागेल बरं का!
विकी कौशल व इतर कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. सारा अली खान हीने अजून मेहनत घेतली पाहिजे हे प्रेक्षक म्हणून वाटत राहतं. बाकी चित्रपटात भारी असं काही नाही पण एकदा पाहायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. मुंबईकर
२०२३. नाटक, रोमांचक. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक लोकेश कनगराज, हिमांशू सिंह, अमित जोशी, आराधना शाह
दिग्दर्शकसंतोष सिवन
कलाकारविजय सेतुपती, विक्रांत मेस्सी, हृदू हारून , तान्या मानिकतला, सचिन खेडेकर
निर्मातारिया शिबू, ज्योती देशपांडे
प्रदर्शित तारीख२ जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

मुंबईकर” चित्रपट समीक्षा :-

साऊथचे चित्रपट हिंदी मध्ये रिमेक बनवण्याचा हल्ली ट्रेंड आलाय. मुंबईकर हा चित्रपट सुद्धा मुळ चित्रपट मानगरम या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे याआधी विविध भाषांमध्ये डब चित्रपट आले आहेत.
विजय सेतुपती यांनी या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटात पदार्पण केले परंतु हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित न होता जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
मुंबईकर म्हटल्यावर मुंबईतील अंडरवर्ल्ड दुनिया, गुंडगिरी, मारामारी हे सगळं ओघाने आलंच. याच सगळ्यावर आधारित हा चित्रपट थ्रिलर असला तरी कॉमेडी अंगाने जाणारा आहे.
उत्तरप्रदेश मधील एक तरुण शिक्षण पूर्ण करून मुंबईत नोकरी शोधायला येतो. नोकरी मिळाल्यावर त्या आनंदात पार्टी करायला गेलेला असतो. तिथे अजून एक तरुण असतो ज्याला काही गंड मारायला म्हणून आलेले असतात पण चुकून आपले युपीचे भैया या सगळ्या मॅटर मध्ये फसतात. पुढे काय होतं ते बघायला अर्थात चित्रपट बघणं गरजेचं आहे.
खरं तर अनेक कथा एकाच वेळी या चित्रपटात पहायला मिळतात ज्यांचा एक समान धागा आहे. असे चार तरूण ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही , एकमेकांना ओळखत पण नाहीत अशा चार तरूणांची ही कथा आहे. असं काय होतं की हे सगळे एकत्र येतात.? यांच्यातील समान धागा कोणता.? नक्की काय सस्पेन्स आणि ट्विस्ट आहे हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा. सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे. पटकथा अजून रंजक दाखवता आली असती पण एकंदर एकदा पहावा असा हा चित्रपट नक्कीच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


३. ब्लड डॅडी
२०२३. ॲक्शन, रोमांचक. २ तास १ मिनिट. [ ए ]
लेखक अली अब्बास जफर, आदित्य बासू, सिद्धार्थ गरीमा
दिग्दर्शकअली अब्बास जफर
कलाकारशाहिद कपूर, रोनीत रॉय, संजय कपूर, डायना पेंटी, राजीव खंडेलवाल
निर्माताज्योती देशपांडे, गौरव बोस, सुनील खेत्रपाल, हिमांशू किशन मेहरा, सुशील चौधरी
प्रदर्शित तारीख५ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

ब्लड डॅडी” चित्रपट समीक्षा :-

ड्रग्स माफिया आणि एनसीबी अधिकारी यांच्यातील उंदीर मांजराचा खेळ हा हिंदी चित्रपटांसाठी काही नवीन नाही. ड्रग्सची तस्करी, गुन्हेगारी विश्व आणि पोलीस, एनसीबी या सगळ्यावर आधारित बरेच चित्रपट, वेबसिरीज आतापर्यंत आल्या आहेत. ब्लडी डॅडी हा चित्रपट सुद्धा याच विषयावर आधारित आहे.
कोरोनाच्या महामारीनंतर दिल्लीतील गुन्हेगारी घडामोडी वाढल्या आहेत यख पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे. सुमेर आझाद म्हणजेच शाहिद कपूर हा एक एनसीबी अधिकारी असून त्याने जवळपास पन्नास कोटी रुपयांचा ड्रग्स चा माल पकडला आहे. आणि सिकंदर चौधरी म्हणजेच रोनीत रॉय हा माल परत मिळवण्यासाठी सुमेर याच्या मुलाचं अपहरण करतो व माल परत देण्यासाठी धमकी देतो.
सुमेर याचा घटस्फोट झालेला असून तो एकटाच आपल्या मुलाला सांभाळत असतो. आता सुमेर हा आपल्या मुलाला वाचवेल की सिकंदर आणि त्याच्या साथीदारांचा पर्दाफाश करेल का, नक्की काय सस्पेन्स आहे हे बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे.
ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्यामानाने चित्रपट अपेक्षा पूर्ण करत नाही. एका एनसीबी अधिकाऱ्याच्या भुमिकेत शाहिद कपूर जरा जास्तच पॉश वाटतो. इतर पात्र पण उगीच भरणा म्हणून घेतल्यासारखी वाटतात. दिग्दर्शन पण सुमार म्हणावं लागेल. खरं तर हा चित्रपट एका फ्रेंच चित्रपटाची कॉपी करून केलेला आहे पण ती कॉपी सुद्धा नीट करता आली नाही असं वाटतं. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


४. आदिपुरूष
२०२३, इतिहास, नाटक, ॲक्शन. २ तास ५९ मिनिटे. [ यु ]
लेखक ओम राऊत, मनोज मुंतशीर
दिग्दर्शकओम राऊत
कलाकारप्रभास, क्रीती सनन
निर्माताभुषण कुमार, क्रिष्णण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार, राजेश नायर
प्रदर्शित तारीख१६ जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

आदिपुरूष” चित्रपट समीक्षा :-

जवळपास सहाशे कोटी रुपये व्हिएफएक्स वर खर्च करून बनवण्यात आलेला आदिपुरूष हा चित्रपट किती आणि कसा आपटलाय हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल जास्त काही न बोललेचं बरं.
सोन्याची काळी कुट्ट दाखवलेली लंका, लहानपणापासून चित्रपट , सिरियल मध्ये बघण्यात किंवा वाचनात आलेली एका रांगेत असलेली रावणाची दहा तोंड इथे मात्र चक्क एकावर एक दिसतात. राम सीतेचा एकंदर पेहराव याबद्दल तर काय बोलावं हा प्रश्न आहे.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर प्रभास हा विसरला असावा की तो रामाची भुमिका साकारत आहे. चेहऱ्यावर क्वचितच हास्य दिसतं त्याउलट चेहरा पूर्ण चित्रपटात गंभीर आणि रागीटच दिसतो.
संवादाच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको. संवाद ऐकून या चित्रपटाला परवानगी कशी मिळाली हा प्रश्न पडतो. हनुमानाच्या तोंडचे डायलॉग म्हणजे एखाद्या टपोरी गुंडाचे डायलॉग वाटतात.
तुम्ही म्हणाल कथा तर सारखीच असेल जे की आतापर्यंत आपण रामायण वाचलंय किंवा पाहिलंय पण तसं नाहीय बरं का. कितीतरी प्रसंग गायब झालेत किंवा बदलले गेलेत. ओम राऊत याने नक्की काय विचार करून किंवा पौराणिक कथांचा काय अभ्यास करून हा चित्रपट बनवला आहे हे विचार करण्यासारखं आहे. त्यामुळे हा चित्रपट न बघण्यातच शहाणपण आहे. माझ्याकडून तरी या चित्रपटाला एक स्टार.


५. आय लव्ह यू
२०२३. नाटक, रोमांचक, प्रणय. १ तास ३३ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक निखिल महाजन
दिग्दर्शकनिखिल महाजन
कलाकाररकूल प्रीत सिंह, अक्षय ओबेरॉय, पावेल गुलाटी
निर्माताज्योती देशपांडे, गौरव बोस, सुनील खेत्रपाल
प्रदर्शित तारीख१२ जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

आय लव्ह यू” चित्रपट समीक्षा :-

२००७ साली प्रदर्शित झालेल्या “P2” या इंग्रजी चित्रपटाचा रिमेक म्हणजे आय लव्ह यू हा चित्रपट. मराठी दिग्दर्शक निखिल महाजन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.
ट्रेलर जेवढा चांगला वाटला होता तेवढा हा चित्रपट नक्कीच खास नाही. एका कार्पोरेट ऑफिस मध्ये घडणारी ही कथा आहे. सत्या म्हणजेच रकूलप्रीत ही एका उच्च पदावर कार्यरत असते. तीच्याच सोबत काम करणाऱ्या विशाल म्हणजेच अक्षय ओबेरॉय सोबत तीची प्रेमकहाणी फुलतेय खरी पण हे सगळं राकेश म्हणजेच पावेल गुलाटी याला सहन होत नाहीय. कारण राकेशला सत्या ही आवडत असते आणि इतर कोणासोबत तो तिला बघूच शकत नाही.
एके रात्री सत्या हिला तिच्याच केबीन मध्ये बांधून लॉक करून ठेवण्यात येतं आणि इथुनच खऱ्या स्टोरीला सुरूवात होते. रागामुळेच सिक्युरिटी विभागात कार्यरत असणारा विशाल सत्या हिला बंद करतो की अजून कोण हे चित्रपटात कळेल. मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये रात्री कोणीच नसताना किती भयानक वाटत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. अशा वेळी सत्या एकटीच तिथे अडकून पडलेली असते. आता पुढे नक्की काय होतं. तिला कोण सोडवतं.? की विशाल तिच्यासोबत काय करतो हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही बघू शकता जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तोही अगदी विनामूल्य.
निखिल महाजन यांनी या आधी केलेल्या काही चित्रपटांमुळे हा चित्रपट चांगला असेल अशी अपेक्षा इथे चुकीची ठरते. अभिनयाच्या बाबतीत पण फार खास असं काही सांगण्यासारखं नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


६. १९२० हॉरर्स ऑफ हार्ट
२०२३. नाटक, परिवार. २ तास ३ मिनिटे. [ ए ]
लेखक महेश भट्ट, सहृता दास
दिग्दर्शककृष्णा भट्ट
कलाकारअविका गौर, राहुल देव, बरखा बिष्ट, दानिश पंडोर, अवतार गिल
निर्माताविक्रम भट्ट, राज किशोर खवारे, राकेश जुनेजा, श्वेतांबरी भट्ट
प्रदर्शित तारीख२३ जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

१९२० हॉरर्स ऑफ हार्ट” चित्रपट समीक्षा :-

नावावरूनच लक्षात आलं असेल की हा एक भयपट आहे. महेश भट्ट यांचा “राज” हा भयपट चांगलाच गाजला होता. आता त्यांचीच मूलगी कृष्णा भट्ट हीने सुद्धा १९२० हॉरर्स ऑफ हार्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन करत या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
कथेबद्दल बोलायचं झालं तर मेघना नावाच्या एका मुलीभोवती ही गोष्ट फिरते. आपल्या वडिलांनी केलेली आत्महत्या आणि त्यासाठी आपल्याच आईला ती जबाबदार मानत असते. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्याबद्दल आणि तिचा प्रियकर अर्जूनबद्दल आपल्या वडिलांना सांगणार असते पण नेमकं त्याचदिवशी तिचे वडील आत्महत्या करतात. यासाठी तिची सोडून गेलेली आईच जबाबदार आहे हे कळल्यावर ती बदला घेण्यासाठी पेटून उठते. व तीची आई राधिका ,तीचा नवरा आणि तिची सावत्र बहीण अदीती याना संपवण्यासाठी ती हरप्रकारे प्रयत्न करते. ती सगळ्यात जास्त तीची सावत्र बहीण अदितीला टार्गेट करते.
ज्ञ पण तिच्या शरीरात जेव्हा वडील धीरज यांचा आत्मा प्रवेश करतो तेव्हा बऱ्याच गोष्टींचा उलगडा मेघनाला होतो. तिला सत्य कळल्यावर ती काय करते.? तीची बहिण या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडते का हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. सर्वात महत्त्वाचं खरंच या सगळ्याला तिची आई जबाबदार आहे का.? की अजून वेगळं काही कारण आहे हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
१९२० चा काळ दाखवण्यात आला आहे परंतु तो काळ पडद्यावर मांडण्यात प्रयत्न कमी पडलेले दिसतात. चित्रपटातील मुख्य पात्र मेघना हिचा अभिनय कुठेतरी कमी पडल्याचं जाणवतं. एकंदरीत हा भयपट प्रेक्षकांना घाबरवण्यात कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


७. टिकू वेड्स शेरू
२०२३. नाटक, प्रणय, १ तास ५१ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक साई कबीर, अमित तिवारी
दिग्दर्शकसाई कबीर
कलाकारनवाजुद्दीन सिद्दिकी, अवनीत कौर
निर्माताकंगणा राणावत
प्रदर्शित तारीख२३ जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

टिकू वेड्स शेरू” चित्रपट समीक्षा :-

कंगणा राणावत हिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत टिकू वेड्स शेरू हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम वर २३ जून रोजी प्रदर्शित केला आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अवनीत कौर यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेला हा चित्रपट कॉमेडी ड्रामा म्हणता येईल.
शेरू म्हणजेच नवाजुद्दीन हा एक ज्युनिअर आर्टिस्ट असतो अर्थात इतर आर्टिस्ट सारखाच तो त्याचं नशीब आजवामून बघायला मुंबईत आलेला असतो. पण त्याला हवं तसं यश मिळत नसतं. तो कर्ज काढून निर्मिती क्षेत्रात काही होतं का तेही प्रयत्न करतो पण तिथेही त्याचं नशीब फुटकं निघतं उलट कर्ज मात्र डोक्यावर राहतं.
काही दिवसांनी टिकूचं स्थळ शेरूला लग्नासाठी येतं ज्यामध्ये त्याला हुंड्याची जवळपास दहि लाख इतकी रक्कम मिळणार असते. टिकूला पण अभिनेत्री बनायचं असतं म्हणून मुंबई गाठायची असते आणि यापेक्षा चांगली संधी कोणती म्हणून ती पण तयार होते. पण तिचा बॉयफ्रेंड असतो ज्याचा पासून तिला दिवस गेलेले असतात. आता ट्विस्ट असा येतो की तिचा बॉयफ्रेंड तिला फसवतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
दिग्दर्शन अजून जास्त चांगल्या प्रकारे करता आलं असतं. अभिनय उत्तमच आहे. पण मुळात कुठेतरी कथा कमजोर वाटते त्यामुळे एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


८. आसेक
२०२३. भयपट. १ तास ४६ मिनिटे.
लेखक सरीम मोमीन
दिग्दर्शकसरीम मोमीन
कलाकारसोनाली सैगल, वरदान पूरी, सिद्धांत कपूर
निर्मातामोहान नदार
प्रदर्शित तारीख२३ जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“आसेक” चित्रपट समीक्षा :-

आजकाल जिओ सिनेमावर इतके चित्रपट आणि सिरिज येत असतात पण त्यांचं प्रमोशन न झाल्याने प्रेक्षकांना माहीतच नसतं की कोणकोणते चित्रपट जिओ सिनेमा प्रदर्शित करत आहे .
असाच एक चित्रपट म्हणजे आसेक २३ जून रोजी जिओ सिनेमा वर प्रदर्शित झाला आहे. ये साली आशिकी या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकलेल्या वरदान पूरीने पुन्हा एकदा स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हा चित्रपट भयपट असला तरी तो भुताचा चित्रपट नाही. मग तुम्ही म्हणाल की मग तो भयपट कसा तर आता ते तर चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. हि रोनी नावाच्या एका तरुणाची कथा आहे. प्रियंका ही त्याची गर्लफ्रेंड असते पण काही कारणाने त्यांचं ब्रेकअप होतं. आणि नंतर रोनीच्या आयुष्यात एक दुसरी मुलगी येते.
पण त्यानंतर रोनीसोबत अशा काही अकल्पित आणि विचित्र घटना घडायला सुरुवात होते की रोनीचं आयुष्य होत्याचं नव्हतं होतं. रोनीला वाटत असतं की हे प्रियंकाच घडवून आणत आहे. आता रोनीचा हा अंदाज खरा आहे की अजून काही कारण आहे हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.
काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शक सरीम मोमीन यांनी केला आहे. तुम्हाला हॉरर मुव्ही बघायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


९. सत्यप्रेम की कथा
२०२३. प्रणय, नाटक. २ तास २६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक कलण श्रीकांत शर्मा
दिग्दर्शकसमीर विद्वांस
कलाकारकार्तिक आर्यन, कियारा अडवाणी , गजराज राव, सुप्रिया पाठक
निर्मातासाजीद नादियावाला, किशोर अरोरा, शरीन मंत्री
प्रदर्शित तारीख२९ जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

सत्यप्रेम की कथा” चित्रपट समीक्षा :-

बरेच दर्जेदार मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक समीर विद्वांस यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे असं म्हणता येईल. २९ जूनला प्रदर्शित झालेला हा चित्रपट तीन आठवड्यांनी सुद्धा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी झाला आहे.
सत्यप्रेम (कार्तिक आर्यन) म्हणजेच सत्तू आणि कथा(कियारा अडवाणी) यांची ही कथा आहे. कथा हि एक अतिशय श्रीमंत कुटूंबातील मुलगी असते. तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेल्याच्या दुःखात ती असते आणि तेव्हाच तिला सत्तूचं स्थळ लग्नासाठी येतं. सत्तू हा कथा हिच्या प्रेमात पडलेलाच असतो. आणि सत्तू हा वकिलीच्या परिक्षेत नापास झालेला असतो त्यामुळे त्याच्या घरच्यांना कसंही करून त्याचं लग्न लावून द्यायचं असतं.
कथा ही लग्नासाठी तयार नसते तरीही तिचं सत्तुसोबत लग्न होतं पण नंतर मात्र असं एक रहस्य उलगडतं की त्यांच्या आयुष्यात सगळी उलथापालथ होऊन जाते. आता ते रहस्य काय हे बघण्यासाठी लवकरात लवकर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा.
कार्तिक आणि कियारा दोघांचाही पडद्यावरचा वावर अतिशय उत्तम आहे. ही फक्त एक प्रेमकथा नसून बऱ्याच गोष्टींमधून या चित्रपटात एक संदेश देण्यात आला आहे. समाजात होणारे बलात्कार थांबवण्यासाठी मुलींच्या कपड्यांवर बंधनं घालण्याची आवश्यकता नाही तर विकृत विचारांना ठेचणं गरजेच आहे हे हा चित्रपट अधोरेखित करतो. एकंदरच हा चित्रपट नक्कीच जाऊन बघू शकतामाझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१०. लस्ट स्टोरी २
२०२३. नाटक, प्रणय. [ ए ]
लेखक आर. बल्की, कोंकणा सेन शर्मा , सुजय घोष, अमित शर्मा , सौरभ चौधरी, ऋषी
दिग्दर्शकआर. बल्की, कोंकणा सेन शर्मा , सुजय घोष, अमित शर्मा
कलाकारनीना गुप्ता , काजोल, अमृता सुभाष, अंगद बेदी, विजय वर्मा, तमन्ना भाटिया , मृणाल ठाकूर
निर्माताअशी दुआ, रॉनी स्क्रुवाला
प्रदर्शित तारीख२३ मे २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

लस्ट स्टोरी २” चित्रपट समीक्षा :-

लस्ट स्टोरी २ हा वेब चित्रपट २९ जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. खरं तर अशा आशयाचे चित्रपट हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणं जास्त शहाणपणाच ठरतं.
चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या या चार वेगवेगळ्या कथा आहेत. या कथांबद्दल जास्त काही न सांगणं उचित ठरेल. प्रत्येक कथा ही वेगळा विषय, आशय आणि काहीतरी वेगळं सांगू पाहणारी आहे. पण “वासना” हा या चार कथांमधील कॉमन दुआ आहे. पण वासना म्हणजे केवळ शारीरिक संबंध नव्हे तर त्या पलिकडे बरंच काही असतं. नवरसांचा या चित्रपटात योग्य वापर केल्याचं दिसून येतं.
एका कथेमध्ये नीना गुप्ता ही आपल्या नातीला सांगू पाहते की एखादी कार घेताना पण आपण टेस्ट ड्राइव्ह घेतो मग लग्न करताना हे लॉजिक काही नाही. लग्न टिकण्यासाठी फक्त मन जुळणं पुरेस नाही तर शारीरिक संबंध चांगले असणं आवश्यक आहे असं या आजीचं म्हणणं आहे.
तर दुसऱ्या कथेत एका उच्चभ्रू वर्गातील एकटी राहणारी महिला (तिलोत्तमा) आणि तिच्याकडे घरकामासाठी येणारी महिला (अमृता सुभाष) यांची ही कथा आहे. एके दिवशी अचानक घरी आल्यावर तिलोत्तमाला जे काही दिसतं त्यावर हि कथा आधारित आहे. आता ते काय ते चित्रपटातच कळेल.
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्या कथेत प्रेम, वासना, बदला सगळंच पहायला मिळतं. नात्यातील विश्वास, फसवणूक, चिटिंग आणि त्यात शेवटी असणारा ट्विस्ट या कथेत पहायला मिळतो.
तर काजोल आणि कुमुद मिश्रा यांची कथा एक वेगळा संदेश आणि अनुभव देते. शारीरिक शोषण हा या कथेचा गाभा आहे .
एकंदर हा चित्रपट बोल्ड सीन्स, इंटीमेट सीन्स या सगळ्यांनी भरलेला आहे. तरी नक्कीच चारही कथा एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


११. सार्जेंट
२०२३. नाटक. रोमांचक. २ तास ३ मिनिटे.
लेखक प्रवाल रमण
दिग्दर्शकप्रवाल रमण
कलाकाररणदीप हुड्डा, सपना पब्बी, आदिल हुसैन
निर्माताअजय राय, मोहीत छाबडा, ज्योती देशपांडे
प्रदर्शित तारीख३० जून २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

सार्जेंट” चित्रपट समीक्षा :-

प्रवाल रमण लिखित आणि दिग्दर्शित सार्जेंट हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला खरा पण प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल काही कल्पनाच नाही. मराठी चित्रपट बाईपण भारी देवा या चित्रपटाने अशी काही जादू केलीय की सध्या याच चित्रपटाची जास्त हवा आहे. त्यामुळे रणदीप हुड्डा सारख्या दमदार कलाकाराचा सार्जेंट फारसा चर्चेत नाही.
असो, कलाकार कितीही मोठा किंवा चांगला असला तरी कथा, पटकथाच जर सुमार असेल तर अशा चित्रपटांना प्रेक्षक रेड फ्लॅग दाखवून मोकळे होतात. सार्जेंट हा चित्रपट असाच काहीसा आहे. एक इमानदार कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी निखिल शर्मा म्हणजेच रणदीप याची ही कथा आहे. आपल्या आईच्या मृत्यूला आपले वडील जबाबदार आहेत हे मानणारा निखिल आधीच मनाने खचलेला आहे त्यात त्याला शारिरीक दुखापत होते म्हणून त्याची केस दुसरे अधिकारी हैदर अली यांच्याकडे सोपविण्यात येते.
त्यात अंमली पदार्थांची तस्करीच्या केसमध्ये अयशस्वी झाल्याने त्याचं प्रमोशन होत नाही ही धुसफूस त्याच्या डोक्यात असतेच त्यामुळे सतत चिडचिड करणारा निखिल शर्मा सहकारी हैदर अली सोबत पण तसाच वागतो परंतु हैदर अली मात्र प्रत्येक अडचणीच्या वेळी निखिल सोबत असतो.
खरं तर हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर प्रकारचा आहे पण चित्रपटातून या दोन्ही गोष्टी गायब आहेत. मुळ कथाच भरकटलेली असल्याने चित्रपटात बघण्यासारखं फार काही नाही. तुमच्याकडे फ्री वेळ असेल तर तुम्ही हा चित्रपट बघू शकता. जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


हे पण वाचा :-

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *