HindiHindi BiopicHomeMarathiMarathi FilmsWriterAkanksha

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 7, 2023 | 12:26 AM

    आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. 
   २०२२ चा शेवट वेड या चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावून केला. तर २०२३ ची सुरुवात दणक्यात झालीय का ते आपण बघूया. आज आम्ही तुम्हाला जून महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट सांगणार आहोत. 

June 2023 marathi movie list
१. फकाट
२०२३. ॲक्शन, विनोदी, नाटक. २ तास १४ मिनिटे.[ यु / ए ]
लेखक मनीष चंद्र भट
दिग्दर्शकश्रेयस जाधव
कलाकारहेमंत ढोमे , सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, रसिका सुनील, अनुजा साठे
निर्मातानीता जाधव
प्रदर्शित तारीख५ मे २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

फकाट” चित्रपट समीक्षा :-

मराठी चित्रपटसृष्टीचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की एकापाठोपाठ इतके चित्रपट प्रदर्शित होतात की प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेपर्यंत, अधिक शोज लागेपर्यंत दुसरा नवाकोरा चित्रपट हजर असतो. त्यामुळे आधीचा चित्रपट कितीही चांगला असला तरी तो काही दिवसांतच गायब होतो. हेच फकाट या चित्रपटासोबत देखील झालं आहे.
श्रेयस जाधव यांनी दिग्दर्शित केलेला फकाट या चित्रपटात कॉमेडी, दोन मित्रांची अतुट मैत्री, प्रेम, याचसोबत दहशतवाद, राजकारण, देशप्रेम या सगळ्या गोष्टी पहायला मिळतात. कॉमेडी तडका असलेला हा चित्रपट बऱ्याच गोष्टींवर उजेड टाकण्याचा प्रयत्न करतो.
देशप्रेमावर आधारित हा संवेदनशील चित्रपट असला तरी कॉमेडी असल्यामुळे फार डोकं लावून लॉजिक वैगरे वापरून हा चित्रपट बघायचा नाहीय. हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांनी याआधीही एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा ही जोडी तेवढीच धमाल घेऊन आली आहे. एका गावात सुरू झालेली दोन मित्रांची ही गोष्ट पार पाकिस्तान मध्ये जाऊन पोहचते. दारूचं व्यसन असलेले हे दोन मित्र शहरात मिलिटरी जॉईन करायची या उद्देशाने येतात पण त्यांचं सिलेक्कशन न झाल्याने ते तसं न करता ते टॅक्सी ड्रायव्हर आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असतात. पण घरच्यांसाठी मात्र ते मिलिटरी मध्ये आहोत असं दाखवत असतात.
खरी स्टोरी हि आहे की नुसताच टाइमपास करणाऱ्या या दोघांना एक एलओसी ची हायली कॉन्फिडेन्शिअल फाईल मिळते. आता आपलं आयुष्य सुधारण्यासाठी ते ती फाईल विकून पैसे कमवायचा विचार करतात. पाकिस्तान विरुद्ध हल्ला करण्याबाबतची माहिती त्या फाईलमधे असते. आता ती पाकिस्तान ला विकायची पण कशी आणि ते विकतात हा सगळा प्रवास, सगळा गोंधळ म्हणजे “फकाट”.
या सगळ्यात त्यांना काय काय आव्हानं येतात, राजकारणी नेते, आर्म पेडलर पाकिस्तानी एजंट वैगरे अशा बऱ्याच जणांना भेटायला लागल्यावर त्यांच्या लक्षात येतं की हे वाटतं तेवढं सोपं नाही. पण आता या सगळ्या चक्रव्यूहातून ते कसे बाहेर पडतात. ती फाईल पाकिस्तानला पोहचते का.? पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे.
हेमंत आणि सुयोग यांची धमाल कॉमेडी नक्कीच हसवणारी आहे. रसिका व अनुजा यांना मिळालेले रोल पण त्यांनी चांगले केले आहेत. अविनाश नारकर यांच्याबद्दल बोलायचं तर तेया चित्रपटाचा हिरो आहेत असं म्हणावं लागेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. अजून तरी हा चित्रपट ओटीटी वर आला नाहीय त्यामुळे जवळच्या चित्रपटगृहात उपलब्ध असेल तर नक्कीच बघू शकता.


२. बटरफ्लाय
२०२३. नाटक, परिवार. २ तास ४ मिनिटे. [ यु ]
लेखक विभावरी देशपांडे
दिग्दर्शकमीरा वेलणकर
कलाकारमधुरा वेलणकर, अभिजित साटम, महेश मांजरेकर, प्रदिप वेलणकर, राधा धरणे, सोनिया परचुरे
निर्माताअजित भुरे, मधुरा वेलणकर, अभिजित साटम
प्रदर्शित तारीख५ मे २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

बटरफ्लाय” चित्रपट समीक्षा :-

उडवायला धूळ सारी कळत नकळत साचलेली….एक फुंकर पुरे असते आपण आपली घातलेली…” या गाण्याच्या ओळीतच चित्रपटाचं सार आहे.
गृहिणी म्हणजे फक्त घर सांभाळणारी बाई. घरातील माणसं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत राहणारी स्त्री म्हणजे एक गृहिणी. जिला स्वतःला बरंच काही आवडत असतं, बरंच काही करायचं असतं पण तीची आवड, तीचे छंद, तीचं अस्तित्व कायमचं दुय्यम स्थानावर. कारण घरातील प्रत्येक सदस्य तीला गृहीत धरत असतो. बटरफ्लाय हा चित्रपट अशाच असंख्य गृहीणींचं प्रतिनिधित्व करणारा चित्रपट आहे.
मेघा म्हणजे मधुरा वेलणकर ही मध्यवर्ती भुमिकेत असून अर्थात ती एक गृहिणी आहे. स्वयंपाक करायला आवडत असणारी, गाण्याची गोडी असलेली मेघा जमेल तशा वेगवेगळ्या शिकवण्यांना जाते पण परत घरातीलच अडचणी इतक्या असतात की प्रत्येक वेळी तिला ती शिकवणी अर्धवट सोडावी लागते. त्यामुळे घरच्यांसाठी तीचं हे नेहमीच झालेलं असतं पण त्यांच्या लक्षात येत नाही की असं का होतं.
खरं तर चित्रपटाची वेगळी अशी काही कथा नाही पण ज्याप्रकारे चित्रपटाचे संवाद, पटकथा लिहिली गेलीय त्यात नक्कीच वेगळेपण जाणवतं. मीरा वेलणकर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असला तरी उत्तम दिग्दर्शन केले आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाने, प्रत्येक मुला मुलींनी बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


३. मुसंडी
२०२३. नाटक. २ तास १ओ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक गोवर्धन डोलताडे
दिग्दर्शकशिवाजी दोलताडे
कलाकाररोहन पाटील, गायत्री जाधव, सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तानाजी गालगुंडे, अरबाज शेख
निर्मातागोवर्धन दोलताडे, शशिकांत टिंगरे
प्रदर्शित तारीख९ जून २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

“मुसंडी” चित्रपट समीक्षा :-

वरती म्हटल्याप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीचं खरच आणि सोबतच मराठी प्रेक्षकांचं हे दुर्दैव आहे की मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही. निर्माता, दिग्दर्शक, कलाकार या सगळ्यांची मेहनत आणि पैसा अक्षरशः दावणीला लागतो जोपर्यंत स्क्रीन मिळत नाही.
९ जून रोजी प्रदर्शित झालेला मुसंडी हा चित्रपट प्रदर्शित झाला परंतु तो नक्की कुठे लागलाय, शोज कुठे आहेत हेच कळत नव्हतं. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांचा हिरमोड झाला. मुसंडी हा चित्रपट ग्रामीण भागातील मुलं आणि स्पर्धापरीक्षा यावर आधारित आहे. बरीच ग्रामीण भागातील मुलं ही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवस रात्र झटत असतात. मेहनत करतात. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झटत असतात परंतु सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. त्यात बऱ्याच अडचणी येतात. हा चित्रपट अशाच मुलांचं प्रतिनिधित्व करणारा आहे.
राधा आणि गणेश यांची प्रेमकहाणी सुद्धा यात बघायला मिळते. राधाच्या वडिलांचं स्वप्नं असतं की राधाने मोठी साहेबीन व्हावं. गणेश चा सुद्धा राधाला पूर्ण पाठिंबा असतो. पण राधाच्या आयुष्यात वेगळंच वादळ येतं.? आता ते काय किंवा त्यांचं हे स्वप्न राधा पूर्ण करते का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
ग्रामीण भागातील चित्रिकरण बघताना छान वाटतं. दिग्दर्शन अजून जास्त चांगल्या प्रकारे व्हायला हवं होतं. कलाकारांनी अभिनय चांगला केला असून मात्र काही ठिकाणी थोडा कमी पडल्यासारखा वाटतो. सैराट मधील मित्रांची जोडी इथेही बघायला मिळते. एकंदर स्पर्धापरीक्षा आणि आव्हानं या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा हा चित्रपट एकदा तरी पहायला हवा. मात्र त्यासाठी तुम्हाला तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल तोपर्यंत वाट बघावी लागेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


४. विठ्ठल माझा सोबती
२०२३. नाटक, परिवार. २ तास. [ यु ]
लेखक संदिप मनोहर नवरे
दिग्दर्शकसंदिप मनोहर नवरे
कलाकारअरूण नलावडे, संदिप पाठक
निर्मातापल्लवी माळेकर
प्रदर्शित तारीख९ जून २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

विठ्ठल माझा सोबती” चित्रपट समीक्षा :-

महाराष्ट्र आणि विठ्ठल हे नातं इतकं खास आणि घट्ट आहे की महाराष्ट्रातील भक्तांना विठू हा त्यांचा सखा वाटतो. याच भक्तांसाठी खास आषाढी एकादशीच्या दरम्यान प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे विठ्ठल माझा सोबती.
नावावरून लक्षात येतं की या चित्रपटात विठ्ठल आणि त्याच्या भक्ताची गोष्ट असणार. या चित्रपटात अरूण नलावडे यांनी एका गर्भश्रीमंत उद्योजकाची भुमिका साकारली आहे. तर प्रशांत म्हणजे आशय कुलकर्णी आणि ललिता म्हणजे अश्विनी कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलांची भुमिका साकारली आहे.
दादासाहेब देशमुख हे यशस्वी उद्योजक असले तरी त्यांचा मुलगा आणि जावई मात्र ऐतखाऊ आहेत. काही कामधंदा न करता नुसतंच आयतं खाणाऱ्या या जावयाचा आणि मुलाचा दादासाहेब यांना मनस्ताप होत असतो पण यावर उपाय काय करावा हे त्यांना कळत नसतं. अशातच दादासाहेब यांच्या आयुष्यात विठ्ठल नावाची व्यक्ती येते आणि त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. विठ्ठलाच्या भुमिकेत संदिप पाठक हे इतके रमलेले दिसतात की ते ही भूमिका अक्षरशः जगले असावेत.
अभिनेत्री दिव्या पुंगावकर हिने सुद्धा विठ्ठल भक्ताच्या भुमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. एकंदर हा चित्रपट विठ्ठलाच्या भक्तिरसाने भारलेला आहे. चित्रपटाची कथा थोडी संथ वाटते.‌ दिग्दर्शनात सुद्धा हा चित्रपट कमीच पडला आहे. पण एकदा तरी बघावा असा हा चित्रपट नक्कीच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


५. आधारवड : एक प्रेमकथा
२०२३. नाटक, प्रणय. २ तास १० मिनिटे. [ यु ]
लेखक सुरेश झाडे – भावसार
दिग्दर्शकसुरेश झाडे – भावसार
कलाकारसमृद्धी शिमगे, रोहीत हंचाटे , शक्ती कपूर, राखी सावंत, अतुल परचुरे, आणि सयाजी शिंदे
निर्माताराजकुमार हंचाटे
प्रदर्शित तारीख२३ जून २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.७⭐/ ५

आधारवड : एक प्रेमकथा” चित्रपट समीक्षा :-

आधारवड एक प्रेमकथा असं या चित्रपटाचं नाव असलं तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय या चित्रपटात मांडण्यात आला आहे. राजकुमार हंचाटे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सयाजी शिंदे, अतुल परचुरे, शक्ती कपूर असे अनुभवी कलाकार असून समृद्धी शिमगे आणि रोहित हंचाटे यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
या चित्रपटात नयना म्हणजेच समृद्धी शिमगे आणि श्रवण म्हणजेच रोहीत हंचाटे यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे . पण चित्रपटाचा मुख्य विषय काय असेल तर आजकालच्या कुटुंबपद्धतीमुळे होणारे परिणाम. हल्ली सगळेच आईवडील आपल्या मुलांना शिकवतात त्याही पेक्षा त्यांचं आयुष्यचं त्यात जातं असं म्हणावं लागेल.
स्वतःच्या भविष्याची सोय करून ठेवण्यापेक्षा, आपल्या म्हातारपणाची तरतूद करून ठेवण्यापेक्षा आईवडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करतात. त्यांचं संगोपन, शिक्षण, त्यांचा संसार हेच आयुष्यभर करत राहतात.पण ही मुलं मात्र स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि आईवडील म्हातारे झाले की मात्र त्यांची वृद्धाश्रमात रवानगी करतात. कटू असलं तरी याच सत्य परिस्थिती वर भाष्य करणारा आणि महत्वाचा संदेश देणारा हा चित्रपट आहे. आयुष्यात नाती, जोडलेली माणसं खूप महत्वाची असतात हे सांगणारा हा चित्रपट आहे. सगळ्यांनी आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे.
दिग्दर्शनाची बाजू थोडी मजबूत असते आणि काही नवख्या कलांकारांचा अभिनय उत्तम असता तर हा चित्रपट अजून चांगला झाला असता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात जाऊन बघायला मिळेल की नाही शंका आहे त्यामुळे तो ओटीटी वर किंवा टिव्ही वर येण्याची वाट पहावी लागणार.


६. बाईपण भारी देवा
२०२३. नाटक, विनोदी. २ तास १७ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक वैशाली नाईक
दिग्दर्शककेदार शिंदे
कलाकाररोहीणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दिपा परब, शरद पोंक्षे
निर्मातामाधुरी भोसले, बेला शिंदे, अजित भुरे
प्रदर्शित तारीख३० जून २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.७⭐/ ५

बाईपण भारी देवा” चित्रपट समीक्षा :-

सध्या सगळीकडेच धुमाकूळ घातलेला एकमेव चित्रपट म्हणजे बाईपण भारी देवा. बाईपण किती भारी असतं हे दोन्ही अर्थांनी (खूप छान आणि अवघड सुद्धा) सांगणारा हा चित्रपट आहे. प्रेक्षकांचा विशेषतः महिलांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
कारण हा चित्रपटच मुळात स्त्रियांचं भावविश्व उलगडून सांगणारा, त्यांची दुखरी नस सांगणारा, त्यांची हळवी आणि न दिहणारी बाजू मांडणारा चित्रपट आहे. खरं तर हा चित्रपट फक्त स्त्रियांसाठी नसून समस्त पुरुषांनी सुद्धा तो आवर्जून बघावा असा आहे.
अख्खं बालपण एकत्र मजेत घालवलेल्या सहा बहिणींची ही कथा आहे. ज्या बहिणींमध्ये आता काही ना काही कारणांनी मनात दुरावा निर्माण झाला आहे पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात ओलावा नक्कीच आहे.
आता या बहीणी एका मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा बऱ्याच वर्षांनी एकत्र येतात. तेव्हा त्यांच्यातील नातं पुन्हा बहरतं पण मनातील गैरसमज , वर्षानुवर्ष असलेली अढी जाईपर्यंत जो प्रवास किंवा जे प्रसंग दाखवले आहेत ते बघताना तुम्ही कधी रडता हे तुमचं तुम्हालाच कळत नाही. तर क्षणात एखादा विनोदी प्रसंग बघून खळखळून हसणं सुद्धा आवरत नाही. हा सहा बहिणींचा चित्रपट असला तरी हा चित्रपट बघताना तुम्हाला तुमची दुरावलेली नाती आठवतील इतकं नक्की.
रोजच्या आयुष्यात एका स्त्रीला कितीतरी मानसिक द्वंद्वातून आणि शारीरिक अडचणीतून जावं लागतं पण ती हे सगळं हसत हसत करत असते. स्त्रीयांना चाळीशीनंतर येणारा मोनोपॉझ असेल किंवा आई न होता आल्याचं आयुष्यभर जपलेलं दुःख असेल ही सगळी घुसमट केदार शिंदे यांनी अप्रतिमरित्या पडद्यावर मांडली आहे. लेखिका वैशाली नाईक यांनी मुळातच या चित्रपटाचं उत्तम आणि दर्जेदार लिखाण केले आहे. केदार शिंदे यांनी याआधीही बरेच चांगले चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत.
या चित्रपटातील कलाकारांनी केलेल्या अभिनयाबद्दल तर बोलण्यासारखं काही नाहीचं. कोण उजवं आणि कोण डावं हे ठरवणं अवघड आहे. सगळ्याच बहिणींनी कमाल अभिनय केला आहे. सुकन्या कुलकर्णी यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घाबरट, बुजऱ्या स्त्री ची भुमिका उत्तम वठवली आहे. अंगात कला असुनही फक्त सासऱ्याच्या धाकामुळे आयुष्यभर ती कला विसरून नुसतं चुल करणाऱ्या आजही असंख्य गृहीणी आहेत या सगळ्यांचं प्रतिनिधित्व सुकन्या कुलकर्णी यांनी केलं आहे.
हा चित्रपट फक्त एक गोष्ट नाही तर खूप काही सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांनी स्वतःसाठी जगायला हवं हे सांगतो. मनात आलेलं मळभ वेळीच दूर करावं हे सांगतो. स्वतःच्या पायावर उभं रहायला हवं हे सांगतो. काही तीन चार गोष्टी सोडल्या तर हा चित्रपट सर्वगुणसंपन्न आहे असं म्हणता येईल. अजुनही चित्रपटगृहात हा चित्रपट दणक्यात चालू आहे तुम्ही जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.

हे पण वाचा :-

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

    तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.
Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *