ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
*ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : डिसेंबर 9, 2023 | 11:16 PM
आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आपण आतापर्यंत सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहीले आहेत. आज आपण या लेखात ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले चित्रपट पाहुया.

१. अंकुश |
लेखक | नामदेव मुरकुटे |
दिग्दर्शक | निशांत नथाराम धापसे |
कलाकार | दिपराज घुले, केतकी माटेगावकर, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उद्गिरकर, रूतुजा बागवे, गौरव मोरे |
निर्माता | राजाभाऊ आप्पाराव घुले |
प्रदर्शित तारीख | ६ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | मराठी |
“अंकुश” चित्रपट समीक्षा :-
राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी निर्मिती केलेल्या अंकुश या चित्रपटात त्यांचाच मुलगा दिपराज घुले हा प्रमुख भूमिकेत आहे. सोबत केतकी माटेगावकर ही नायिकेच्या भूमिकेत आहे.
हा चित्रपट इतका प्रचंड ट्रोल झाला की तो बॉक्स ऑफिसवर पुर्णपणे आपटला. या चित्रपटातील गाण्यांचं पार स्विझरलँड मध्ये शूटिंग झालं. प्रमोशनसाठी बराच खर्च केला गेला परंतु इतकं करूनही चित्रपट फ्लॉप झाला. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचा नायक दिपराज याला ना धड ॲक्टिंग येते, ना लूक, ना डान्स त्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला. त्यात कथा पण काही फार नवीन किंवा विशेष नाही.
एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा ज्याची बरीच स्वप्न आहेत. परंतु त्याला मग नेहमीप्रमाणे गुंड, राजकारणी यांचा त्रास, त्यातून तो कसा मार्ग काढतो वैगरे टिपिकल तिच स्टोरी. त्यामुळे चित्रपटात इतर मोठे कलाकार असून सुद्धा चित्रपट चालला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर सुद्धा प्रेक्षक बघतील की नाही ही शंकाच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
२. आत्मपॅम्फ्लेट |
लेखक | परेश मोकाशी ,आशिष बेंडे |
दिग्दर्शक | आशिष बेंडे |
कलाकार | मानस तोंडवळकर, ओम बेंडखळे, खुशी हजारे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे, केतकी सराफ |
निर्माता | कानुप्रिया ए अय्यर, मधुगंधा कुलकर्णी, शारिक पटेल, भूषण कुमार, आनंद एल. राय, कृष्ण कुमार |
प्रदर्शित तारीख | ६ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | मराठी |
“आत्मपॅम्फ्लेट” चित्रपट समीक्षा :-
२०२३ मध्ये बरेच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही अगदीच फ्लॉप तर काही चांगला कंटेट घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले. त्यापैकी एक म्हणजे आत्मपॅम्फ्लेट. परेश मोकाशी लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट तुम्हाला तुमच्या बालपणातील आठवणी आठवून देणारा आहे.
आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की लहानपणी आपण हे तेव्हा असं केलं असतं तर बरं झालं असतं. किंवा असं वागलो नसतो तर आता काही वेगळं असतं परंतु आपण तेव्हाच्या त्या परिस्थितीला जबाबदार ठरवून आपण कसे योग्य होतो याचं समर्थन करून स्वतःला हिरो ठरवत असतो. हेच या कथेचं सार आहे.
आशिष बेंडे हा शाळकरी मुलगा प्रेमात पडतो. त्याच्याच शाळेतील सृष्टी नावाची मुलगी जेव्हा चुकून त्याचा हात पकडते तेव्हा तो स्पर्श त्याला खास वाटतो. आणि तिचं प्रेम मिळवण्यासाठी तो जे जे शक्य ते सारं करत असतो. खरं तर प्रेम म्हणजे काय हे कळण्याचं सुद्धा ते वय नसतं परंतु ती अशी काहीतरी भावना असते जी तुम्हाला सारं विसरायला लावते.हा चित्रपट बघताना तुम्हाला तुमचे शाळेतील दिवस आठवतील हे नक्की. परेश मोकाशी आणि आशिष बेंडे यांनी सुंदररित्या या कथेला सादर केले आहे. सिनेमागृहात जर तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर ओटीटी वर आल्यावर नक्की बघा. २०२३ मधील मराठी चित्रपटांपैकी एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून हा चित्रपट तुम्ही जरूर बघावा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
३. सासुबाई जोरात |
लेखक | सिद्धार्थ प्रभाकर ढगे |
दिग्दर्शक | सिद्धार्थ प्रभाकर ढगे |
कलाकार | सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे |
निर्माता | सिद्धार्थ प्रभाकर ढगे |
प्रदर्शित तारीख | ६ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | मराठी |
“सासुबाई जोरात” चित्रपट समीक्षा :-
पुर्वी सासु सुनांची भांडणं , सासू जावयाची एकमेकांवर चाललेली कुरघोडी असे चित्रपट प्रेक्षकांना आवडायचे,अगदी दहा एक वर्षापूर्वी सुद्धा असे चित्रपट चालायचे. परंतु आता काळ बदलला आहे हे काही निर्माते दिग्दर्शक यांच्या लक्षात येत नसावं. म्हणूनच कदाचित सिद्धार्थ ढगे यांनी सासुबाई जोरात हा चित्रपट काढला असावा. परंतु तो कधी कुठे प्रदर्शित झाला हे कोणालाच माहीत नाही.
मोहन जोशी, सयाजी शिंदे, उषा नाईक, संदीप पाठक यांसारखे चांगले कलाकार असून सुद्धा हा चित्रपट अगदीच आपटला. मुळात तीच जुनी कथा. सासुबाई श्रीमंत आणि गरीब, शेतकरी घरातील जावई आणि मग त्या जावयाचा सासुकडून होणारा छळ. ही अत्यंत जुनी आणि घासून पुसून गुळगुळीत झालेली कथा. दिग्दर्शन सुद्धा सुमारच. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर सुद्धा नाही पाहीला तरी चालण्यासारखा हा चित्रपट. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
४. डाक |
लेखक | महेश नेने |
दिग्दर्शक | महेश नेने |
कलाकार | अश्विनी काळसेकर, संजीवनी जाधव, अनिकेत केळकर, प्रणाली धुमाळ, गुरू दिवेकर, वेदांगी कुलकर्णी, सिद्धांथ मुळे, ओमकार राणे, भूमी शिरोडकर, किर्ती आडारकर |
निर्माता | रतिश तावडे, महेश नेने |
प्रदर्शित तारीख | १३ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | मराठी |
“डाक” चित्रपट समीक्षा :-
महाराष्ट्रात आजही कितीतरी विचित्र अघोरी प्रथा चालू आहेत. त्यातलीच एक डाक ही प्रथा. याच प्रथेवर आधारित हा चित्रपट असून १३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने अश्विनी काळसेकर यांनी बऱ्याच काळानंतर मराठी मध्ये काम केलं आहे.
एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर बाराव्या दिवशी एक विधी केला जातो, ज्यामध्ये त्याच्या आत्म्याला बोलावलं जातं. आणि विचारलं जातं की त्याचा मृत्यू कशामुळे झाला. याच धर्तीवर हा चित्रपट असून ही एक मर्डर मिस्ट्री असलेला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा चांगली आहे परंतु दिग्दर्शन म्हणावं तसं नसल्यामुळे चित्रपट तेवढा परिणामकारक नाही. परंतु या चित्रपटातून इतरही बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकदा बघायला हरकत नाही असा हा भयपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
५. जर्नी |
लेखक | सचिन दाभाडे, रवींद्र मथाधिकारी |
दिग्दर्शक | सचिन दाभाडे |
कलाकार | मिलिंद दस्ताने, सुनील गोडबोले, ओमकार गोवर्धन, |
निर्माता | सचिन दाभाडे |
प्रदर्शित तारीख | १३ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | मराठी |
“जर्नी” चित्रपट समीक्षा :-
६. दिल दोस्ती दिवानगी |
लेखक | दीपक तारकर |
दिग्दर्शक | शिरीष राणे |
कलाकार | कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, विजय पाटकर, सुरेखा कुडची, प्रदीप वेलणकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी |
निर्माता | राजेंद्र राजन |
प्रदर्शित तारीख | १३ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | मराठी |
“दिल दोस्ती दिवानगी” चित्रपट समीक्षा :-
कॉलेज, कॉलेजमधील मित्र मैत्रिणींचा ग्रुप आणि त्यातच होणारा प्रेमाचा गुंता या अशा विषयांवर इतके चित्रपट, मालिका येत असतात की कथा इकडून तिकडून सारखीच असते. हा चित्रपट सुद्धा असाच आहे.
कॉलेज कॉलेजमधील एक ग्रुप आहे, ज्यांच्यामध्ये प्रेमाचा त्रिकोण, चौकोन पार षटकोन आहे. त्यातून मग एक जण आपल्या प्रेमाचा त्याग करून जिच्यावर प्रेम आहे तिचं लग्न मित्रासोबत लावून देतो. पण पुढे त्या दोघांचा
खून होतो. आता हा खून कोणी केला हे बघण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा.
चित्रपटाची कथा, बांधणी म्हणावी तशी परिणामकारक नाही. शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट अपयशी ठरतो. आधीच प्रेमाचा गुंता त्यात मर्डर मिस्ट्री. एकंदर सस्पेन्स असलेला चित्रपट बघताना सस्पेन्स संपल्यावर जास्त प्रश्न उपस्थित करतो.
ठिकठाक म्हणावा असा हा चित्रपट आहे. दिग्दर्शन, लोकेशन्स सिनेमॅटोग्राफी सगळंच ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दीड स्टार.
७. बॉईज ४ |
लेखक | ऋषिकेश कोळी |
दिग्दर्शक | विशाल देवरूखकर |
कलाकार | पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे, गिरीश कुलकर्णी, रितिका श्रोत्री |
निर्माता | लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया |
प्रदर्शित तारीख | १३ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | मराठी |
“बॉईज ४” चित्रपट समीक्षा :-
बॉईज १, २, आणि बॉईज ३ तरच तुम्ही पाहीले असतील हा चित्रपट तुम्ही बघू शकता असं काही नाहीय. आधीच्या तिन्ही चित्रपटांची कथा आधीच्या कथांना धरून असायची. या चित्रपटात सुद्धा धैर्या, ढुंग्या आणि कबीर याच मित्रांची गोष्ट आहे. यात आता कबीर धैर्या आणि ढुंग्या सोबत भांडण करून लंडनला गेला आहे.
एकीकडे आता धैर्या आणि ढुंग्याला माफी मागावी वाटतं म्हणून ते फोन करतात परंतु तेव्हा कबीर भाव खातो त्यामुळे आता ते दोघं बदला घेण्यासाठी लंडनला जातात. पुढे काय होतं ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
अभिनय बेर्डे, गौरव मोरे यांच्या भूमिका सोडल्या तर चित्रपटात फार बघण्यासारखं असं काही नाही. विनोदाच्या नावाखाली काहीही फालतू डायलॉग आहेत. अश्लील विनोदांचा भडिमार केला म्हणजे चित्रपट विनोदी होतो असं नाही हे दिग्दर्शकाच्या लक्षात यायला हवं होतं. पहिल्या तीन चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट ठिकठाक म्हणू शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
८. इंटरनॅशनल फालमफोक |
लेखक | एल आर साळुंखे |
दिग्दर्शक | धीरज दिलीप गुरव |
तारांकित | तानाजी गालगुंडे, सुरेश विश्वकर्मा, योगेश खिलारे |
निर्माता | धीरज गुरव, योगेश खिलारे |
प्रदर्शित तारीख | २७ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | मराठी |
“इंटरनॅशनल फालमफोक” चित्रपट समीक्षा :-
मराठी मध्ये बऱ्याचदा चांगला विषय असुनही फक्त बजेट नसतं म्हणून एक दर्जेदार कलाकृती बनवताना बंधनं येतात. तरीही काही दिग्दर्शक आपला सिनेमा आपल्या परीने प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न धीरज गुरव आणि योगेश खिलारे यांनी केला आहे. निर्माता मिळत नसताना त्यांनी लोकवर्गणीतून म्हणता येईल असा हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.
आपली मराठी भाषा केव्हाही सरस आणि महान असते, तिच्यासमोर उगीच इंग्रजीला अवास्तव महत्त्व देण्याची गरज नाही हे सांगणारा हा चित्रपट आहे. पुर्वी एका चित्रपटात दादा कोंडके यांनी फालमफोक हा शब्द वापरला होता. त्यावरूनच या चित्रपटाचं नाव इंटरनॅशनल फालमफोक असं ठेवलं आहे.
तानाजी गालगुंडे, योगेश खिलारे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. एका गावात घडणारी ही गोष्ट आहे. जिथे एक शिकलेला तरूण आलेला असतो जो गावातील लोकांना इंग्रजी भाषेचं महत्व सांगत असतो व त्यांना शिकवायला सुरुवात करतो. पण पुढे काय होतं हे या चित्रपटात पहायला मिळेल.
कमी ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असल्यामुळे तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल तेव्हा तुम्ही तो बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हे पण वाचा :-
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
