HomeHindi

नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : डिसेंबर 25, 2023 | 05:08 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. आज नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट या लेखात आपण बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला कळवा.

Hindi movie list release in Nov 2023. Hindi movie reviews and information
१. आंख मिचोली
२०२३. विनोदी, नाटक. २ तास २४ मिनिटे. [ यु ]
लेखक जितेंद्र परमार
दिग्दर्शकउमेश शुक्ला
कलाकारपरेश रावल, शरमन जोशी, अभिमन्यु दसानी, मृणाल ठाकुर, दिव्या दत्ता, विजय राज, दर्शन जरीवाला , अभिषेक बनर्जी, ग्रुशा कपूर निर्माता :- आशीष वाघ , उमेश शुक्ला
प्रदर्शित तारीख३ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

आंख मिचोली” चित्रपट समीक्षा :-

उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केलेला ऑंखमिचोली हा चित्रपट विनोदी असला तरी मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडून दाखवणारा चित्रपट आहे. पण हल्ली प्रेक्षकांना मसाला असलेले, ॲक्शन, थ्रिलर चित्रपट आवडतात त्यामुळे हा कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेवर विनोदी पद्धतीने भाष्य करणारा चित्रपट कितपत आवडेल ही शंका आहे.
पंजाब मधील नवजोत सिंह(परेश रावल) यांच्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. हे एक अतिशय विनोदी कुटुंब असून या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा अनोखा आहे. स्वतः नवजोत सिंह हे कमालीचे विसरभोळे आहेत. तर नवजोत सिंह यांचा मोठा मुलगा हा थोडा बहीरा असतो तर छोटा मुलगा हरभजन ला बोलताना अडखळत बोलण्याची सवय. मुलगी पारो हिला रातांधळेपणा आहे. अशी प्रत्येकाची काही ना काही तऱ्हा आहे.
साधी सरळ हलकीफुलकी अशी ही कथा आहे. कथेमध्ये ट्विस्ट येतो जेव्हा पारोचं लग्न जमवण्यासाठी स्विझरलँड वरून आलेल्या रोहीत पटेल आणि त्याच्या मामख मामींसमोर पारोचा रातांधळेपणा लपवण्याचा प्रयत्न केला जातो. आता तो ट्विस्ट काय हे चित्रपट बघितल्यावर कळेल. या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या समाजात, कुटुंबात जे घडतं तेच दाखवल गेलं आहे. आपल्याकडे सुद्धा लग्न जुळावं म्हणून थोड्या फार प्रमाणात गोष्टी लपवणं, खोटं बोलणं हे होतंच. त्यातून पुढे काय समस्या निर्माण होतात किंवा होऊ शकतात हे या चित्रपटात पहायला मिळतं. सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन प्ले , संगीत, सगळं ठिकठाक आहे. साधा, सरळ अख्ख्या कुटुंबाने एकत्रित पाहता येईल असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. द लेडी किलर
२०२३. रोमांचक, प्रणय. २ तास ५ मिनिटे. [ ए ]
लेखक पवन सोहनी, मयंक तिवारी, अजय बहल
दिग्दर्शकअजय बहल
कलाकारभूमी पेडणेकर, अर्जुन कपूर, मृत्युंजय पांडे
निर्माताभूषण कुमार, कृष्ण कुमार , शैलेश आर. सिंह
प्रदर्शित तारीख३ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

द लेडी किलर” चित्रपट समीक्षा :-

जास्तीत जास्त फ्लॉप चित्रपट देणारा हिरो असा एखादा ॲवॉर्ड द्यायचा झाल्यास तो नक्कीच अर्जुन कपूर ला मिळेल. खरं तर हिरो म्हणावं का हा सुद्धा प्रश्नच आहे. असो, नेहमीच ट्रोल होणारा अर्जुन कपूर अर्थातच यावेळी सुद्धा ट्रोल झाला आहे. पण यावेळी फक्त तो एकटाच नाही तर सोबत भुमी पेडणेकर आणि दिग्दर्शक अजय बहल हे सुद्धा ट्रोल झाले आहेत.
चित्रपट पाहिल्यानंतर तो अर्धवट प्रदर्शित का बरं केला असावा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. मधे मधे सीन्स टाकायचे राहीले की प्रेक्षकांनी स्वतःची कल्पनाशक्ती लढवून दाखवावी म्हणून ते मुद्दाम टाकले नाहीत का असा प्रश्न पडतो. एकंदरच चित्रपटाची कथा, बांधणी, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स सगळंच करायचं म्हणून केलेलं वाटतं.
कथेमध्ये सुद्धा फारसं नाविन्य नाही. भुमी पेडणेकर ही एका मोठ्या हवेलीत तिच्या वडिलांसोबत(?)राहत असते. वडिलांसोबत शरीरसंबंध ठेवावे लागतात अशी तिची काय मजबुरी असते किंवा ते खरच तिचे वडील असतात का हे शेवटपर्यंत कळत नाही. अर्जुन कपूर अर्थातच हीरोप्रमाणे तिला वाचवायला येतो. पण तो तरी कथेचा नायक असतो की नाही हे सुद्धा स्पष्ट होत नाही. त्यात अर्जुन कपूरचा अभिनय तुम्हाला इतका संभ्रमात पाडेल की आपण हा चित्रपट का बघतोय असा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो.
हल्ली चित्रपटात सीन ची गरज म्हणून जे इंटीमेट सीन्स टाकतात ते बघून तर सेन्सॉर बोर्ड नक्की काय करत असेल अशी शंका येते. असो, अशा इंटीमेट, बोल्ड सीन्स चा नको तेवढा भडीमार करून चवचोथा नसलेल्या या चित्रपटात बघण्यासारखं असं काहीच नाही त्यामुळे तुम्ही हा चित्रपट नाही बघितला तर बरं होईल. माझ्याकडून या चित्रपटाला अर्धा स्टार.


३. लकिरें
२०२३. रोमांचक, नाटक. २ तास ४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक दिलीप शुक्ला , दुर्गेश पाठक , सूर्या सक्सेना
दिग्दर्शकदुर्गेश पाठक
कलाकारआशुतोष राणा , बिदिता बाग , गौरव चोपड़ा , टिया बाजपेयी , मुकेश भट्ट , राजेश जैस, अदिति दीक्षित, अमन वर्मा
निर्मातानवल के टंडन , कविता पाठक , दिनेश कुमार
प्रदर्शित तारीख३ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

लकिरें” चित्रपट समीक्षा :-

आपल्याकडे लग्नसंस्थेला इतकं महत्त्व दिलं जातं की लग्नानंतर पत्नी ही पतीची वैयक्तिक मालकीची वस्तू असून तिच्यावर त्याचा पूर्ण हक्क आहे असा सगळ्यांचा ठाम समज आहे. तिने काय करावं, काय करू नये हे पतीच्या परवानगी वर अवलंबून असतं. इतकच काय तर शरीरसंबंध सुद्धा पतीची इच्छा असेल तर होणार मग भले पत्नीची इच्छा असो वा नसो. पण हे मनाविरुद्ध, इच्छा नसतानाही पत्नीसोबत बळजबरीने केला जाणारा शरीरसंबंध म्हणजे एक प्रकारचा बलात्कार असतो. हेच या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक दुर्गेश पाठक यांनी केला आहे. अतिशय संवेदनशील आणि महत्वाच्या नाजूक अशा विषयावर आधारित हा चित्रपट तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
चित्रपटाची कथा काव्या अग्निहोत्री(टिया बाजपेयी) हीच्या वैयक्तिक आयुष्यातील नाजूक विषयावर आधारित आहे. काव्या अग्निहोत्री ही आपल्या नवऱ्याविरूदध, विवेक अग्निहोत्री(गौरव चोपडा) विरूद्ध बलात्काराची तक्रार दाखल करते. केस कोर्टात जाते. आता काव्याची केस गीता विश्वास(बिदीता बाग) तर विवेकच्या बाजूने दुधारी सिंह(आशुतोष राणा) हे वकील म्हणून केस लढत असतात. आता केस कोण जिंकतं. कोणाच्या बाजूने निकाल लागतो हे तर चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. परंतु हा चित्रपट तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल.
आशुतोष राणा यांनी नेहमीप्रमाणे उत्तम काम केलं आहे. त्यांची संवादफेक, शुद्ध हिंदी ही आणखी एक जमेची बाजू. काही कलाकारांचा अभिनय अजून चांगला होऊ शकला असता. तरीही एकदा हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


४. हुकुस बुकुस
२०२३. खेळ. नाटक. २ तास ११ मिनिटे. [ यु ]
लेखक रणजीत सिंह मशियाना , विपुल पटेल , जगतार एस कलवाना
दिग्दर्शकविनय भारद्वाज , सौमित्र सिंह
कलाकारअरुण गोविल , दर्शील सफारी, गौतम सिंह विग,वाशु जैन, नायशा खन्ना, सज्जाद डेलाफ्रूज, मीर सरवर
निर्मातारवीना ठाकुर , विनय भारद्वाज
प्रदर्शित तारीख३ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

हुकुस बुकुस” चित्रपट समीक्षा :-

काश्मीर फाईल्स या विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटात आपण तेव्हाच्या कश्मिरी पंडितांची काय अवस्था झाली होती. तेव्हा त्यांना काय काय सहन करावं लागलं होतं हे पाहिलं. आता या चित्रपटात आताचा काश्मीर कसा आहे, आताची परिस्थिती काय आहे किंवा कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर मधील परिस्थिती बदलली आहे की नाही यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
काश्मीर म्हटल्यावर दहशतवाद वैगरे असेल असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. चित्रपटाची कथा वडील मुलाच्या सुंदर भावनिक नात्यावर आधारित आहे. यात कश्मिरी पंडितांची संघर्षानंतर झालेली एकजुट आणि आपला धर्म, संस्कृती, परंपरा जपण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न दिसतात. काश्मीर मधील एक पंडीत राधेश्याम हे त्यापैकीच एक. त्यांच्या मुलाला क्रिकेट ची आवड असते तर राधेश्याम यांना नऊ वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीवर एक मंदिर उभारायचं आहे पण ती जागा आता एका मॉल साठी देण्यात आली असून ती जागा मिळवण्यासाठी राधेश्याम यांचे प्रयत्न चालू असतात. सरकारी यंत्रणा, आमदार या सगळ्यांकडे ते आपला प्रस्ताव घेऊन जातात. परंतु एक ट्विस्ट असा येतो की त्या जागेवर एक क्रिकेट टुर्नामेंट भरवली जाईल त्यांना ही तेव्हा जमीन मिळू शकते जर त्यांच्या मुलाची टिम क्रिकेट मॅच मध्ये जिंकेल.
तर त्यांचा मुलगा मॅच जिंकतो का..? जमिन मिळते का.? की वडील मुलाच्या नात्यात अजून काही होतं हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाचा पुर्वार्ध थोडा संथ वाटतो, मध्यांतरा नंतर थोडी कथा पकड घेते. वडील मुलाच्या नात्यांचं भावनिक विश्व दिग्दर्शक यांनी चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे. काश्मीर मध्ये चित्रिकरण करून सुद्धा म्हणावं तसं काश्मिरचं सौंदर्य बघायला मिळत नाही. असो, एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


५. यूटी ६९
२०२३. नाटक, जीवनचरित्र. १ तास ५७ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक राज कुंद्रा , विक्रम भट्टी और शाहनवाज अली
दिग्दर्शकशाहनवाज अली
कलाकारराज कुंद्रा , कुमार सौरभ , गणेश देवकर, महेश डी घग्ग , नामांतर राजेंद्र कांबले , गौरव मिश्रा
निर्माताएस वी एस स्टूडियो
प्रदर्शित तारीख३ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

यूटी ६९” चित्रपट समीक्षा :-

युटी ६९ हे असं चित्रपटाचं नाव वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की याचा अर्थ काय तर युटी म्हणजे अंडर ट्रायल आणि ६९ हा जेलमधील कैदी नंबर ६९ आहे. आता हा कोणाचा नंबर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, हा चित्रपट हिंदी सेलिब्रिटी राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती
त्यावर आधारित आहे. त्यामुळे राज कुंद्रा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नव्हते परंतु ते जेलमध्ये होते तेव्हा त्यांचा कैदी नंबर ६९ असा होता.
राज कुंद्रा यांना २०२१ मध्ये अटक झाली तेव्हापासून ते त्यांची सुटका होईपर्यंतचा प्रवास किंवा तो काळ यावर हा चित्रपट बेतलेला आहे. आणि या चित्रपटातून स्वतः राज कुंद्रा यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक आणि निर्माता सोडल्यास चित्रपटाची संपूर्ण टीम नवीन आहे. प्रत्येकाचा हा पहिला वहीला चित्रपट आहे. परंतु राज कुंद्रा यांचा अभिनय नक्कीच चांगला झाला आहे. इतरही कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. चित्रपटाचं शुटिंग करण्यासाठी तयार केलेला जेल सुद्धा हुबेहूब उभारला आहे. बघताना जाणवत नाही की हा सेट आहे.
परंतु चित्रपटाची पटकथा आणि संवाद फारसे परिणाम साधत नाही त्यामुळे चित्रपट ठिकठाक झाला आहे. चित्रपटात जेलमध्ये एकंदर काय वातावरण असतं. कैद्यांना काय वागणूक मिळते किंवा त्यांचं आयुष्य कसं असतं हे बघायला मिळतं. बऱ्याच कैद्यांना जामीन मंजूर होऊन सुद्धा पैसे नसल्यामुळे ते तुरुंगातच खितपत पडून असतात. अशा बऱ्याच तुरुंगात असलेल्या कैद्यांबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी या चित्रपटात कळतात. राज कुंद्रा यांनी तुरुंगात घालवलेले एकुण ६३ दिवस कसे होते यावरच हा चित्रपट आहे. नवीन टीमचा एक प्रयत्न म्हणून या कलाकृती कडे पाहिलं तर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


६. थ्री ऑफ अस
२०२३. नाटक. परिवार. १ तास ३९ मिनटे. [ यु / ए ]
लेखक ओंकार अच्युत बर्वे, अर्पिता चटर्जी, अविनाश अरुण धावरे, वरुण ग्रोवर
दिग्दर्शकअविनाश अरुण धावरे
कलाकारजयदीप अहलावत, शेफाली शाह, स्वानंद किरकरे, कादंबरी कदम, रसिका अगाशे, ओजस्वी बेरडे , राधा धारणे
निर्माताबन्नी वास , सरिता पाटिल , संजय राउतरे
प्रदर्शित तारीख३ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५⭐/ ५

थ्री ऑफ अस” चित्रपट समीक्षा :-

थ्री ऑफ अस हे नाव जरी इंग्रजी असलं तरी या हिंदी चित्रपटाचा आत्मा मात्र मराठी आहे. म्हणजे हि एक अतिशय सुंदर तरल कथा कोकणात घडतेय असं दाखवलं आहे. यातील जी पात्रं आहेत ती मराठी आहेत.
आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा आपण जगलेलं आयुष्य डोळ्यासमोर येतं. हवेहवेसे वाटणारे क्षण पुन्हा जगावेसे वाटतात.साधारण पन्नाशी उलटली की आपलं तारूण्य, बालपण आठवतं, त्या काळात पुन्हा जावं वाटतं. याच भावना पडद्यावर उलगडून दाठवणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटातील मुख्य पात्र शैलजा (शेफाली शाह) हीला डिमेंन्शिया हा आजार आहे आणि म्हणूनच तिला तिची संपूर्ण स्मृती जाण्यापूर्वी काही राहून गेलेले तर काही ठरवलेले सुंदर क्षण पुन्हा जगायचे आहेत. म्हणून ती आपला नवरा दिपंकर(स्वानंद किरकीरे) सोबत कोकणात जाते. तिथे तिचा जुना मित्र प्रदीप (जयदीप अहलावत) भेटतो. आणि त्यांना जाणवतं की वय सरलं, आयुष्य सरलं तरी मनाच्या एका कोपऱ्यात त्या जुन्या भावना तशाच आहेत. हे सगळं इतक्या सुंदररित्या पडद्यावर मांडण्यात आलं आहे की या भावना तुमच्या तुमच्या वाटतील.
जयदीप अहलावत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक असा अभिनयाची छाप पाडली आहे. शेफाली शाह नेहमीप्रमाणे उत्तम. स्वानंद यांनी सुद्धा सुंदर पात्रं साकारलं आहे. अतिशय सुंदर असलेला हा चित्रपट काही ठिकाणी बोरिंग वाटू शकतो, परंतु कोकणातील नयनरम्य दृश्यं, छान लोकेशन, उत्कृष्ट अभिनय, चांगली कथा, चांगलं दिग्दर्शन या सगळ्यांमध्ये काही गोष्टी नजरेआड करू शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


७. शास्त्री विरुद्ध शास्त्री
२०२३. नाटक. परिवार. २ तास २० मिनिटे. [ यु ]
लेखक अनु सिंह चौधरी, शिबोप्रोसाद मुखर्जी, नंदिता रॉय
दिग्दर्शकनंदिता रॉय, शिबोप्रोसाद मुखर्जी
कलाकारपरेश रावल, शिव पंडित, मिमी चक्रवर्ती, कबीर पाहवा, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष, मनोज जोशी
निर्माताकेविन वाज , अजित अंधारे
प्रदर्शित तारीख३ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ०.०⭐/ ५

शास्त्री विरुद्ध शास्त्री” चित्रपट समीक्षा :-

शास्त्री विरूद्ध शास्त्री हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झालेल्या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. नंदिता रॉय आणि शिबोप्रोसाद मुखर्जी यांनी बंगाली चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते आणि आता हिंदी चित्रपट सुद्धा या दोघांनीच दिग्दर्शित केलेला आहे.
ही एक अतिशय सुंदर, संवेदनशील अशी कथा आणि विषय आहे. पाचगणी येथे सात वर्षाचा यमन हा आपल्या आजी आजोबांसोबत राहत असतो. त्याचे आईवडील मल्लिका आणि मल्हार हे मुंबईत कामानिमित्त राहत असतात. आठवड्यातून एकदा ते यमन भेटायला जात असतात. सगळं काही सुरळीत चालू असताना मल्हार ला अमेरिकेत नोकरीची संधी मिषत असते. आणि इथे खऱ्या चित्रपटाला सुरुवात होते.
मल्हार आपल्या मुलाला घेऊन अमेरिकेत जायचं ठरवतो. परंतु हा निर्णय यमनचे आजोबा , मनोहर शास्त्री यांना पटलेला नसतो. यमध कुणाजवळ राहणार, त्याची कस्टडी कोणाला मिळावी हा वाद इतका पेटतो की मल्हार विरूद्ध मनोहर शास्त्री अशी केस कोर्टात जाते.
आता पुढे काय होतं, यमन कोणाजवळ राहतो, कोर्ट काय निकाल देणार हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल. परेश रावल, नीना कुलकर्णी, मनोज जोशी, अमृता सुभाष या सगळ्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.
सध्या मुलांचं पालकत्व आणि त्यांचा सांभाळ करणं वाटतं तेवढं सोपं नाही. फक्त जन्माला घातलं म्हणजे मुलांवर आपला अधिकार असतो असं नाही. तसंच आजी आजोबांना यांचा नातवंडांच्या आयुष्यात किती अधिकार असू शकतो. या सगळयावर भाष्य करणारा हा एक उत्तम सिनेमा आहे. जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


८. पिप्पा
२०२३. ॲक्शन, वॉर. नाटक. २ तास १९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक रविंदर रंधावा, तन्मय मोहन, राजा कृष्णा मेनन
दिग्दर्शकराजा कृष्णा मेनन
कलाकारईशान खट्टर, प्रियांशु पैन्युली, मृणाल ठाकुर, चंद्रचूड़ राय,अर्जुन सिंह दुहन, इनामुल हक, सोनी राजदान
निर्मातारॉनी स्क्रूवाला,सिद्धार्थ रॉय कपूर
प्रदर्शित तारीख१० नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

पिप्पा” चित्रपट समीक्षा :-

“पिप्पा” हा चित्रपट खरं तर चित्रपटगृहात प्रदर्शित व्हायला हवा होता पण ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या ‘द बर्निंग चैफीज’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असून राजा कृष्ण मेनन यांनी सुंदर दिग्दर्शन केले आहे.
१९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाची आणि त्याआधीची पार्श्वभूमीची अनोखी आणि आजपर्यंत कोणाला माहीत नसलेली युद्धगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. ईशान खट्टर याने कॅप्टन बलराम सिंह यांची भूमिका साकारली आहे. भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान झालेल्या गरीबपुरच्या युद्धात बलराम सिंह यांचं तसंच त्यांच्या मोठ्या भावाचं मोठं योगदान आहे. इतकंच नव्हे तर त्यांची बहीण सुद्धा गोपनीय माहिती, संदेश डिकोड करण्याचं काम करत असे. हे सगळं या चित्रपटात सुद्धा दाखवण्यात आलं आहे.
बलराम सिंह हे आपल्या भावाप्रमाणे किंवा बहीणी सारखे फार तल्लख नव्हते, त्यामुळे त्यांना त्याबद्दल नेहमीच ऐकून घ्यावं लागत असे. परंतु एक वेळ अशी येते की बलराम सिंह हे स्वतःला सिद्ध करून दाखवतात. पुर्व पाकिस्तान आणि उर्वरित पाकिस्तान यांच्यातील वाद आणि युद्ध सुरू झाल्यानंतर बरेचसे पाकिस्तानी भारतात आश्रयाला आले. या सगळ्यात भारताने बांगलादेश म्हणजेच पुर्व पाकिस्तान यांना मदत केली. या युद्धात भारताची पहिली पाण्यावर तरंगणारी युद्ध टॅंक पिप्पा हीचं नेतृत्व बलराम सिंह यांनी केलं होतं.
हे युद्ध जिंकण्यात आणि बांगलादेशची निर्मिती होण्यात या टॅंक चा आणि ब्रिगेडियर बलराम सिंह यांचं खूप मोठं योगदान आहे. याचीच गाथा सांगणारा हा चित्रपट आहे. नक्की बघावा असा हा चित्रपट आहे. इशान खट्टर, प्रियांशू यांचा अभिनय उत्तम आहे. एअरलिफ्ट सारखा चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांनी सुंदर दिग्दर्शन केले आहे. सिनेमॅटोग्राफी स्क्रीन प्ले संगीत सगळं छान आहे. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.


९. टायगर ३
२०२३. ॲक्शन, नाटक, रहस्य. २ तास ३० मिनिटे. [ यु / ए ]
लेखक आदित्य चोपड़ा, श्रीधर राघवन, अंकुर चौधरी
दिग्दर्शकमनीष शर्मा
कलाकारसलमान खान,कटरीना कैफ, इमरान हाशमी, आशुतोष राणा, शाहरुख खान, ऋतिक रोशन
निर्माताआदित्य चोपडा
प्रदर्शित तारीख१२ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

टायगर ३” चित्रपट समीक्षा :-

चित्रपट कसाही असला तरी सलमान खान हे नाव पुरेसं असतं बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालण्यासाठी. सलमान खानचा स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्याचे कसेही असले तरी चित्रपट चालतात. टायगर ३ हा ऐन दिवाळीत प्रदर्शित झालेला चित्रपट बऱ्यापैकी चालला.
आधीच्या चित्रपटाची कथा पुढे घेऊन या चित्रपटाची कथा लिहिण्यात आलेली आहे. टायगर(सलमान) आणि झोया(कैटरीना कैफ) यांना आता एक मुलगा आहे. आणि पाकिस्तानी असलेला परंतु पाकिस्तानचा शत्रू आतिश रहमान(इम्रान हाश्मी) पासून आपल्या बायकोला, मुलाला आणि पाकिस्तान चे प्रधानमंत्री, पाकिस्तान ची लोकशाही यांना वाचवण्यासाठी आता टायगर पाकिस्तान मध्ये गेलेला आहे. पाकिस्तान हा शत्रू देश असंच आपण पाकिस्तान कडे बघतो परंतु तसं नसून ठराविक संघटना या आपल्या शत्रू आहेत आणि असं समजून वागलं तर भारत पाकिस्तान संबंध शांततापूर्ण असतील असं या चित्रपटाच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी केला आहे.
पठाण मध्ये सलमान शाहरुख ला वाचवायला येतो तर टायगर ३ मध्ये ही परतफेड शाहरुख पुर्ण करतो. ऋतिक रोशन यांचं सुद्धा या चित्रपटात दर्शन होतं. एकंदर ॲक्शन सीन, दमदार डायलॉग यांचा भरपूर भरणा आहे. सलमानने यावेळी दिग्दर्शक मनीष शर्मा यांचं ऐकलेलं दिसतंय. मनोरंजन करणारा चित्रपट आहे. त्यात तुम्ही सलमान खान चे फॅन असाल तर कदाचित तुम्ही हा चित्रपट पाहिला असेलच. असो, माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


१०. अपूर्वा
२०२३. नाटक. रोमांचक. १ तास ३५ मिनिटे.
लेखक निखिल नागेश भट्ट
दिग्दर्शकनिखिल नागेश भट्ट
कलाकारतारा सुतारिया, राजपाल यादव,अभिषेक बनर्जी, सुमित गुलाटी,आदित्य गुप्ता, धैर्य करवा
निर्मातामुराद खेतानी
प्रदर्शित तारीख१५ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

अपूर्वा” चित्रपट समीक्षा :-

अनुष्का शर्मा हिचा “एनएच १०” हा चित्रपट जर तुम्हाला आठवत असेल आणि तो आवडला होता असेल तर तारा सुतारिया हिची मध्यवर्ती भुमिका असलेला अपूर्वा हा चित्रपट सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. हॉटस्टार वर प्रदर्शित झालेला हा चित्रपट मुराद खेतानी यांची निर्मिती असून निखिल नागेश भट्ट यांनी तो दिग्दर्शित केला आहे.
एका मुलीला चार गुंड अपहरण करून पळवून नेतात, आणि ती स्वतःची सुटका करून घेण्यासाठी जीवाचं रान करते. बस्स, या इतक्याच गोष्टीवर संपूर्ण चित्रपट बेतलेला आहे. अपूर्वा म्हणजेच तारा ही आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला जात असते. त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याला सरप्राइज द्यायचा तिचा प्लॅन असतो परंतु रस्त्यातच चार गुंड तिचं अपहरण करतात. या चार गुंडापैकी एक म्हणजे जुगनू. राजपाल यादव याने जुगनू ही भूमिका साकारली असून त्याने हे सिद्ध केलं आहे की तो फक्त विनोदी अभिनेता नसून तो एक उत्कृष्ट कलाकार आहे.
सुमित गुलाटी, आदित्य गुप्ता यांनी सुद्धा चांगला अभिनय केला आहे. अभिषेक बॅनर्जी याचा मात्र अभिनय एकाच पठडीतील वाटतो. दिग्दर्शन उत्तम आहे. तारा हीने सुद्धा भुमिकेला योग्य तो न्याय दिला आहे.
चित्रपटाची कथा हिंसक वाटली तरी अतिशय रंजक पद्धतीने ती पुढे सरकते. फार लांबड न‌ लावता ती थोडक्यात आटोपल्यामुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवते. गुंडांच्या तावडीतून ही अपूर्वा स्वतःला सहिसलामत सोडवते का हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


११. खिचड़ी २ – मिशन पांथुकिस्तान
२०२३. विनोदी. २ तास १ मिनिट. [ यु ]
लेखक आतिश कपाड़िया
दिग्दर्शकआतिश कपाड़िया
कलाकारसुप्रिया पाठक कपूर,राजीव मेहता,अनंग देसाई, वंदना पाठक, जमनादास मजेठिया, कीर्ति कुल्हारी
निर्माताविनीत जैन, जमनादास मजेठिया
प्रदर्शित तारीख१७ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

खिचड़ी २ – मिशन पांथुकिस्तान” चित्रपट समीक्षा :-

आतिश कपाडिया यांनी दिग्दर्शित केलेला खिचडी२ हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा, पटकथा आतिश कपाडिया यांनीच लिहीली आहे. परंतु ही कथा आणि चित्रपटाची ही खिचडी मात्र काही कपाडिया यांना नीटशी जमलेली नाही.
१३ वर्षांपूर्वी खिचडी हा चित्रपट आला होता आणि प्रेक्षकांना तो आवडला सुद्धा होता. परंतु खिचडी २ हा चित्रपट मात्र प्रेक्षकांना फारसा रूचलेला नाही. कथेमध्ये एक काल्पनिक देश आहे ज्याचं पांथुकीस्तान असं नाव आहे. या देशाचा एक हुकुमशहा आहे, तो म्हणेल तसंच सगळं तिथं घडत असतं. तेथील स्त्रीयांना कसलंच स्वातंत्र्य नाही. तर खरी चित्रपटाची कथा अशी आहे की या हुकुमशहाने एका भारतीय वैज्ञानिकाचं अपहरण केलेलं आहे आणि त्याला सोडवण्यासाठी पारेख परिवार पांथुकीस्तानला गेलेला आहे. कारण या परिवारातील प्रफुल्ल हा सदस्य हुबेहूब त्या हुकुमशहा सारखा दिसतो. आता हे पारेख कुटुंब पांथुकीस्तानला जाऊन काय खिचडी शिजवतं हे तर तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
चित्रपटाची कथा आणि पटकथाच कंटाळवाणी असल्यामुळे चित्रपट म्हणावं तसं मनोरंजन करत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


१२. सब मोह माया है
२०२३. नाटक. २ तास १० मिनिटे. [ यु / ए ]
लेखक अलोक शुक्ला
दिग्दर्शकअभिनव पारिक
कलाकारशरमन जोशी, अन्नू मलिक, स्पृहा जोशी
निर्माताविनोद भानूशाली, कमलेश भानुशाली
प्रदर्शित तारीख१८ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

सब मोह माया है” चित्रपट समीक्षा :-

आपल्या देशात आरक्षण हा मुद्दा किती ज्वलंत आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. नाही नाही, हा चित्रपट आरक्षण या विषयावर आधारित नाही परंतु आरक्षण, गरीबी, योग्यता, नोकरी, या सगळ्यांबद्दल विचार करायला लावणारा नक्कीच आहे.
अभिनव पारीक यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ना चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर. हा चित्रपट झी अनमोल या वाहिनीवर १८ नोव्हेंबर संध्याकाळी सात वाजता प्रसारित करण्यात आला.
सब मोह माया है हा चित्रपट वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणारा तर आहेच पण बऱ्याच सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा आहे.
उज्जैन मधील रामनरेश मिश्रा आणि त्यांचा मुलगा पियुष या बापलेकाची ही गोष्ट आहे. रामनरेश मिश्रा ही भूमिका अन्नू मलिक यांनी साकारली असून त्यांच्या मुलाची, पियुषची भुमिका शरमन जोशी याने केली आहे. दोघंही अभिनयात उत्तम आहेत त्यामुळे कथा प्रेक्षकांपर्यंत अगदी अलगद पोहचते. या चित्रपटात आपली मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी हीने सुद्धा मिळालेली भुमिका सुंदररित्या पार पाडली आहे.
रामनरेश मिश्रा हे जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करत असतात परंतु ते आता निवृत्त होणार आहेत आणि पियुष अजून नोकरी शोधत आहे. पियुष स्वतःच्या पायावर उभं राहून साधी नोकरी मिळवू शकत नाही यावरून सर्वसामान्य घरात बापलेकांत जे वाद होतात ते इथेही होत असतात. पियुषला नोकरी न मिळणं, त्याची होणारी चीडचीड, बाप म्हणून रामनरेश यांना हतबल वाटणं या सगळ्या भावना इतक्या उत्कटतेने दाखवल्या गेल्या आहेत की आपल्या आजूबाजूला असलेले‌ कित्येक पियुष आणि रामनरेश आपल्या डोळ्यासमोर येतात.
शेवटी एक कल्पना सुचते की निवृत्ती पुर्वी जर मृत्यू झाला तर अनुकंपा तत्त्वावर पियुष ला नोकरी मिळू शकते. आता ही कल्पना रामनरेश प्रत्यक्षात आणतात का.? पियुषला नोकरी मिळते का.? बाप लेकाचं नातं फुलतं की बिघडतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात मिळतील. पुन्हा कधी टेलिव्हिजन वर आला तर एकदा हा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


१३.फर्रे
२०२३. रोमांचक. नाटक. १ तास ५४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक अभिषेक यादव, सौमेंद्र पाढी
दिग्दर्शकसौमेंद्र पाढी
कलाकारअलीजेह, साहिल मेहता, जेन शॉ, प्रसन्ना बिष्ट, रोनित बी रॉय,जूही बब्बर सोनी, शिल्पा शुक्ला
निर्माताअतुल अग्निहोत्री, अलविरा खान, सुनीर खेत्रपाल, वाई रविशंकर, नवीन येरनेनी
प्रदर्शित तारीख२४ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

फर्रे” चित्रपट समीक्षा :-

‘फर्रे’ हा चित्रपट थायलंड मधील ‘बॅड जिनियस’ या चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटातून अलीजेह अग्निहोत्री हीने पदार्पण केलं आहे. अलीजेह ही सलमान खान याची भाची तर निर्माते, कलाकार अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. “स्टार किड्स” म्हणजेच कलाकारांची मुलं ही त्यांच्याकडे असलेल्या अभिनय कौशल्यामुळे न येता फक्त आईवडीलांमुळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करतात असं म्हटलं जातं परंतु हा समज अलीजेह हीने खोटा ठरवला आहे. फर्रे हा चित्रपट म्हणजे श्रीमंत घरातील श्रीमंत शाळेत शिकणाऱ्या बिघडलेल्या मुलांवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा पटकथा ही अभिषेक यादव आणि सौमेंद्र पाढी यांनी अनुवादित केली आहे. कथेची सुरुवात ही अर्थातच अलीजेह म्हणजे नियती या पात्रापासून होते. नियती ही अतिशय हुशार, तल्लख बुद्धी असलजली मुलगी आहे जी एका अनाथाश्रमात वाढलेली आहे. तिला अनाथाश्रमातील वॉडर्न म्हणजे रोनीत रॉय हे सांभाळत असतात. नियतीच्या हुशारीमुळे तिला एका आलिशान, श्रीमंत मुलांच्या शाळेत प्रवेश मिळतो. तिथं तिची अतिश्रीमंत घरातील मुलांसोबत ओळख होते, मैत्री होते. जी मुलं अभ्यासात अगदीच ठिकठाक आहेत. पुढे जाऊन हीच मुलं इंटरनॅशनल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नियती हीला पैसे देऊन कॉपी पुरवायला सांगतात. आणि नियती ते काम पैशांसाठी करते. याच शाळेत आकाश हा अजून एक गरीब परंतु नियती सारखा हुशार मुलगा असतो. नियती त्याला सुद्धा या सगळ्यात ओढते. आता पुढे काय होतं..? नियती आणि बाकीच्या मुलांसोबत काय होतं.? ते करत असलेली लबाडी पकडली जाते का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. अलीजेह अग्निहोत्री हीने खरंच वाखाणण्याजोगा अभिनय केला आहे. दिग्दर्शन सुद्धा उत्तम आहे. एका वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट नक्कीच मनोरंजन करणारा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१४. स्टारफीश
२०२३. साहसी, प्रणय, नाटक. २ तास १ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक बीना नायक, आदित्य भटनागर, अखिलेश जायसवाल
दिग्दर्शकअखिलेश जायसवाल
कलाकारखुशाली कुमार, तुषार खन्ना,एहान भट्ट, मिलिंद सोमन
निर्माताभूषण कुमार, किशन कुमार
प्रदर्शित तारीख२४ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

स्टारफीश” चित्रपट समीक्षा :-

२४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला स्टारफीश हा चित्रपट नाही बघितला तरी चालेल हे अगदीच सुरूवातीला सांगायला मला जास्त आवडेल. चित्रपट म्हटल्यावर कथा, पटकथा, संवाद, अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन प्ले अशा बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात. आणि या सगळ्याच गोष्टींची कमतरता या चित्रपटात आहे. त्यातल्या त्यात पाण्याखाली चित्रिकरण केलेली दृश्य, सिनेमॅटोग्राफी बरी आहे म्हणू शकतो.
खुशाली कुमार हीने पुन्हा एकदा तिला अभिनय जमत नाही हे सिद्ध केले आहे. बीना नायक यांच्या “स्टारफिश पिकल: ए गोअन ॲडव्हेंचर” या पुस्तकावर आधारित आहे.
चित्रपटाची कथा एका स्कूबा ड्रायव्हर असलेल्या तारा या नायिकेच्या अवतीभवती फिरणारी आहे. ताराच्या आयुष्यात बरंच काही घडून गेलेलं आहे. तिला मधे मधे पॅनिक ॲटॅक येत असतात. या सगळ्यामुळे ती प्रचंड व्यसनाच्या आहारी गेलेली आहे.
तिला आपल्या आईच्या मृत्यूचा शोध लावायचा आहे तसंच तिला तिचे वडील कोण होते हे सुद्धा शोधून काढायचं आहे. कथेमध्ये प्रेमाचा त्रिकोण सुद्धा आहे. शेवटपर्यंत तारा ही गोंधळलेली दाखवलेली आहे. खर तर अख्खा चित्रपटच गोंधळलेला आहे असं म्हणावं लागेल. असो, चित्रपटात आवर्जून बघावं असं काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.

१५. दो अजनबी
२०२३. रहस्य. १ तास ५४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक संजीव कुमार राजपूत, निरंजन बुद्धद्धारा
दिग्दर्शकसंजीव कुमार राजपूत
कलाकारआर्य बब्बर,अमन वर्मा,अंकित बठला,अनु मित्रा, सनी ठाकुर, कुरुश देबू
निर्मातामयंक शेखर,अनु मित्रा, सुरज शर्मा
प्रदर्शित तारीख२४ नोव्हेंबर २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

दो अजनबी” चित्रपट समीक्षा :-

२४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला दो अजनबी हा चित्रपट संजीव कुमार राजपूत यांनी दिग्दर्शित केला असून
हा एक मर्डर मिस्ट्री असलेला चित्रपट आहे. बऱ्यापैकी सस्पेन्स शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात संजीव कुमार यांना यश मिळालं आहे.
आपल्या भावाच्या ट्रिटमेंट साठी ऑफिस मधील एका सहकाऱ्याचा खून करण्यात येतो. परंतु हा खून ठरवून नाही तर चुकून होतो. परंतु ते कळतं तेव्हा ट्विस्ट काही वेगळाच असतो. आता हा खून कोणी का केला हे शेवटपर्यंत कळत नाही. तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट बघायला हवा. यात फक्त मर्डर मिस्ट्री नाही तर प्रेमकहाणी सुद्धा बघायला मिळते.
फार कमी ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर किंवा टेलिव्हिजन वर येईल तेव्हा तुम्ही तो बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दीड स्टार.

    तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

हे पण वाचा :-

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *