२०१९-२३ मधील प्रदर्शित झालेले सत्यघटनेवर आधारित या “टॉप टेन” वेब सीरीज तुम्ही पाहिल्या आहेत का.?
सत्यघटनेवर आधारित या “टॉप टेन” वेबसिरीज तुम्ही पाहिल्या आहेत का.?
Written by : Akanksha Kolte
Updated : मार्च 25, 2024 | 12:50 AM
हल्ली प्रेक्षकांना चित्रपटांपेक्षा वेबसिरीज बघायला जास्त आवडतं. एक ठराविक वर्ग सोडला तर जास्तीत जास्त मंडळी घरात निवांत बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीज बघणं जास्त पसंत करतात. सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, फॅमिली ड्रामा, कॉमेडी अशा विविध धाटणीच्या सिरीज विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत राहतात.
अशाच सत्य घटनांवर आधारित क्राईम, थ्रिलर अशा वेगवेगळ्या घटनांवर आधारित वेबसिरीज किंवा डॉक्युमेंटरी बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सुद्धा जास्त आहे. आज आम्ही वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर प्रदर्शित झालेल्या सत्यघटनेवर आधारित अशा टॉप टेन वेबसिरीज सांगणार आहोत.
१. स्कॅम १९९२ |
लेखक | सुमित पुरोहित, सौरव डे, वैभव विशाल, करण व्यास |
दिग्दर्शक | हंसल मेहता, जय मेहता |
कलाकार | प्रतिक गांधी, श्रेया धन्वंतरी, हेमंत खेर , सतिश कौशिक |
निर्माता | समीर नायर |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | १० |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | सोनी लिव्ह |
प्रदर्शित तारीख | ९ ऑक्टोबर २०२० |
भाषा | हिंदी |
“स्कॅम १९९२” सीरीज :-
शेअर मार्केटमध्ये जवळपास ४००० हजार कोटी चा घोटाळा करून भारतीय अर्थव्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या हर्षद मेहताची कुंडली मांडणारी ही वेबसिरीज ९ ऑक्टोबर २०२० रोजी सोनी लिव्ह वर प्रदर्शित झाली. “स्कॅम 1992: द हर्षद मेहता” ही वेबसिरीज हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केली आहे. स्टॉक ब्रोकर म्हणून काम करत असलेला हर्षद मेहता आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी भारतीय शेअर बाजारामध्ये भ्रष्टाचार करून कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. पत्रकार सुचेता दलाल यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता परंतु त्याबद्दल सुद्धा बरेच उलटसुलट वादविवाद झाले होते. यावरच आधारित ही वेबसिरीज आहे. प्रतिक गांधी याने यात हर्षद मेहता ही मुख्य भूमिका साकारली असून आजही त्या भुमिकेचं कौतुक केलं जातं. अतिशय उत्कृष्ट अभिनय करत त्याने ही भूमिका साकारली आहे.
१९९० च्या दशकात झालेला हा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यावेळी त्यांनी केलेल्या करामती मुळे शेअर मार्केटमध्ये इतक्या वेगाने वाढलं की हर्षद मेहता याला “बिग बुल” म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याचा हा सगळा प्रवास या सिरीजमध्ये बघायला मिळतो. आजपर्यंतच्या सगळ्यात उत्कृष्ट वेबसिरीज पैकी ही एक सिरीज मानली जाते कारण प्रेक्षकांनीच भरभरून प्रतिसाद दिला होता. तुम्ही ही वेबसिरीज सोनी लिव्ह वर बघू शकता.माझ्याकडून या सिरीज ला चार स्टार.
२. दिल्ली क्राईम : सिझन १ |
लेखक | रिची मेहता |
दिग्दर्शक | रिची मेहता, तनुज चोप्रा |
कलाकार | शेफाली शाह, रसिका दुग्गल, आदिल हुसैन, राजेश तेलंग |
निर्माता | रिची मेहता |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | ७ |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | नेटफ्लिक्स |
प्रदर्शित तारीख | २२ मार्च २०१९ |
भाषा | हिंदी |
“जगभरून फिल्म्स” सीरीज :-
निर्भया बलात्कार प्रकरण आजही लोकांना आठवत असेल. कारण त्या घटनेनंतर संपूर्ण भारत हादरला होता. २०१२ साल आणि दिल्लीतील १६ डिसेंबर ची ती काळीकुट्ट रात्र. एका चालत्या बसमध्ये काही नराधमांनी मिळून एका मुलीवर बलात्कार करून तिच्यावर इतका अत्याचार केला की संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी ती घटना होती. फक्त दिल्लीच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी ही घटना घडली आणि पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले आणि तीव्र आंदोलने आणि इतका निषेध व्यक्त केला गेला की पोलिसांनी सुद्धा या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत पुढच्या चार दिवसांत सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याच संपूर्ण घटनेवर आधारित नेटफ्लिक्स वर “दिल्ली क्राईम” ही वेबसिरीज २२ मार्च २०१९ मध्ये प्रदर्शित झाली.
शेफाली शाह यांनी सिरीजमध्ये डिसीपी वर्तिका चतुर्वेदी ही भूमिका साकारली आहे. आणि एक तपास अधिकारी म्हणून त्यांनी ही भूमिका चोख निभावली आहे. त्याचसोबत रसिका दुग्गल, राजेश तेलंग, आदिल हुसैन या सहकलाकारांनी सुद्धा चांगला अभिनय केला आहे. या संपूर्ण सिरीजमध्ये सुरूवातीपासून म्हणजे पिडीत मुलगी आणि तिचा मित्र त्या बसमध्ये चढल्या पासून तिच्यावर करण्यात आलेला अमानुष अत्याचार ते त्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या इथपर्यंत सगळं दाखवण्यात आलं आहे. तुम्ही जर संवेदनशील असाल तर कदाचित हे सगळं बघताना त्रास होऊ शकतो. एकुण सात भागांची ही सिरीज नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. माझ्याकडून या सिरीजला चार स्टार.
३. द रेल्वे मेन : द अनटोल्ड स्टोरी ऑफ भोपाळ १९८४ |
लेखक | आयुष गुप्ता |
दिग्दर्शक | शिव रवैल |
कलाकार | आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदू, बाबिल खान, जुही चावला |
निर्माता | आदित्या चोप्रा, उदय चोप्रा, योगेंद्र मोगरे, अक्षय विधानी |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | ४ |
प्रदर्शित तारीख | १८ नोव्हेंबर २०२३ |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | नेटफ्लिक्स |
देश | इंडिया |
भाषा | हिंदी |
“द रेल्वे मेन : द अनटोल्ड स्टोरी ऑफ भोपाळ १९८४” सीरीज :-
२ डिसेंबर १९८४ ची एक काळीकुट्ट भयाण रात्र. मध्यप्रदेशातील भोपाळ मधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून २ डिसेंबर रोजी पहाटे पहाटे झालेल्या विषारी वायूच्या गळतीने हजारो लोक अक्षरशः तडफडून मरण पावले. लाखो लोक जखमी झाले, लाखो लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले, आजही भोगत आहेत. या सगळ्यात चुक कोणाची हे माहीत असूनही पुढे त्याचं काही झालं नाही. परंतु या दुर्घटनेत असे काही “अनसंग हीरो” होते ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तेथील लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी जमेल तशी मदत केली. फॅक्टरी पासून काही अंतरावर असलेल्या भोपाळ जंक्शन स्थानकावर लोकांना वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले, त्या प्रयत्नांची गोष्ट सांगणारी ही सिरीज आहे.
या परिस्थितीत स्वतःचं कुटुंब किंवा स्वतःचा जीव याला प्राधान्य न देता आपलं कर्तव्य महत्वाचं आहे, आणि माणूस म्हणून काय करायला हवं ते सगळं स्टेशन मास्तर इफ्तिकार सिद्दिकी यांनी केलं. तेव्हा त्यावेळी खरोखर उपस्थित असलेल्या स्टेशन मास्तर गुलाम दस्तगीर यांनी केलेलं हे योगदान या सिरीजच्या निमित्ताने जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न खरं तर याआधी व्हायला हवा होता. के के मेनन यांनी हे पात्र साकारताना अभिनयाचं सर्वोच्च परिमाण इथं वापरलं असावं.
इफ्तिकार सिद्दिकी यांना त्यावेळी अजून महत्वाची मदत मिळाली ती म्हणजे इमाद रियाज म्हणजेच बबील खान. युनियन कार्बाईड फॅक्टरीतील अनुभव असलेला इमाद लोको पायलट म्हणून दुर्घटने दिवशी स्टेशनवर उपस्थित असतो, प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी इमाद याने सुद्धा स्वतःच्या जिवाची पर्वा केली नाही. वडिलांप्रमाणे बबीलचा अभिनय सुद्धा त्याच्या डोळ्यात दिसतो.
युनियन कार्बाईड चे मॅनेजर म्हणून काम बघत असलेले काम्रुद्दीन(दिब्येंद्रू भट्टाचार्य) यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव गमावला. दिब्येंद्रू यांना मिळालेल्या थोड्याशा भुमिकेत सुद्धा त्यांनी नैसर्गिक अभिनयाची छाप पाडली आहे.
भोपाळमध्ये ही वायू गळती झाल्यावर अनेक प्रश्न उपस्थित राहीले. युनियन कार्बाईड या कंपनीला भारतात फॅक्टरी साठी परवानगी मिळण्यापासून ते या दुर्घटनेला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन सुद्धा पुढे त्याबद्दल काही झालं नाही. त्यामुळे या दुर्घटनेबद्दल या सिरीजच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या विषयावर आधारित सिरीज बनवली गेली त्याबद्दल निर्माते आदित्य चोपडा, उदय चोपडा, लेखक आयुष गुप्ता आणि शिव रवैल यांचं विशेष कौतुक. खरं तर जगाच्या औद्योगिक इतिहासातील सर्वात मोठ्या भीषण दुर्घटनेवर आधारित अशा प्रकारची कलाकृती बनवणं ही त्यावेळी बलिदान दिलेल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलेली मानवंदना आहे. आवर्जून बघावी अशी ही वेबसिरीज आहे. माझ्याकडून या सारीजला चार स्टार.
४. जुबली |
लेखक | सौमिक सेन , विक्रमादित्य मोटवानी, अतुल सभरवाल बहल, विक्रम मल्होत्रा |
दिग्दर्शक | विक्रमादित्य मोटवानी |
कलाकार | अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराणा, सिद्धांत गुप्ता, वामिका गब्बी, प्रोसेनजीत चॅटर्जी, अरूण गोवील, राम कपूर |
निर्माता | विक्रमादित्य मोटवानी , शिबाशीष सरकार, सृष्टी |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | १० |
प्रदर्शित तारीख | ७ एप्रिल २०२३ |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | ॲमेझॉन प्राईम |
भाषा | हिंदी |
“जुबली” सीरीज :-
७ एप्रिल २०२३ रोजी ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली जुबली ही सीरिज आतापर्यंतच्या सिरीजपेक्षा नक्कीच वेगळी आहे. बॉलिवूडचा जन्म झाला आणि बॉम्बे टॉकीज नावाचा स्टुडिओ उदयास आला होता. हिमांशू रॉय आणि देविका राणी यांनी खास जर्मनी वरून शिकून येऊन हा स्टुडिओ सुरू केला होता. कालांतराने हिमांशू रॉय यांच्या मृत्यूनंतर देविका राणी यांची एका रूसी सोबत जोडली गेलेली प्रेमकहाणी , याच स्टुडिओमुळे नावारूपाला आलेले अशोक कुमार , याचप्रमाणे या स्टुडिओ सोबत अनेक कथा जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच या दोघांच्या आयुष्यात अनेक रहस्यमयी घटना घडत गेल्या. याच सगळ्यावर आधारित जुबली ही सीरिज आहे.
रॉय टॉकीज मध्ये काम करणाऱ्या एका सामान्य कारकुनाचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास या सिरीजमध्ये बघायला मिळतो. अपारशक्ती खुराणा याने ही भूमिका अक्षरशः जीव ओतून केलेली आहे. सिरीजमधील प्रत्येक पात्राची एक स्वतंत्र वेगळी कथा आहे. या सिरीजमधील प्रत्येक कलाकाराने हा स्वतःच्या अभिनयाचं कसब पणाला लावून काम केलेलं आहे.
रॉय टॉकीजला एका सुपरस्टारची गरज आहे आणि त्यांनी लखनऊ मधील जमशेद खान ची निवड केल्यानंतर स्टुडिओची मालकीन सुमित्रा कुमारी म्हणजेच अदिती राव ही जमशेद खान ला भेटायला लखनऊ ला जाते तिथे त्यांची प्रेमकहाणी सुरू होते. आणि याची खबर रॉय बाबू यांना लागते. इथुनच मुख्य कथेला सुरुवात होते.
हा काळ स्वातंत्र्यापूर्वी चा दाखवला आहे. यातील अजून एक मुख्य पात्र म्हणजे कराची मधील जय खन्ना. सिद्धांत गुप्ता याने ही भूमिका साकारून त्याच्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. तो भारतात जमशेद खान याला घेऊन जाण्यासाठी आलेला असतो पण जमशेद खान हा गायब असतो. तो कसा गायब होतो. त्याचं काय होतं.? साधा कारकून बिनोद कुमार कसा सुपरस्टार बनतो.? या सगळ्याचा शोध म्हणजे जुबली.
अभिनेत्री वामिका गब्बी हिने उभी केलेली निलोफर सुद्धा लक्षात राहण्यासारखी आहे. जय खन्ना, बिनोद कुमार या सगळ्यांसोबत कनेक्शन असणारी निलोफर हे महत्त्वाचं पात्र आहे. जमशेद खान याच्या गायब होण्यामध्ये बिनोद कुमार चा हात आहे हे कळल्यावर सुमित्रा कुमारी पेटून उठते. ती तिचा बदला घेण्यासाठी काय करते हे बघण्यासाठी ही सिरिज नक्की बघा.
सस्पेन्स थ्रिलर यापेक्षा वेगळी काहीतरी सिरीज बघायची असेल तर तुमच्याकडे जुबली शिवाय उत्तम पर्याय नाही. अतिशय सुंदर कथा, साजेशी पटकथा, त्या काळातील सुंदर चित्रिकरण, सर्व कलाकारांचा सशक्त अभिनय या सगळ्या गोष्टींसाठी ही सीरिज बघायलाच हवी. माझ्याकडून या वेबसिरीजला पाचपैकी चार स्टार.
५. स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी |
लेखक | करण व्यास, किरण यज्ञोपावीत, केदार पाटणकर, (मुळ लेखक – संजय सिंग) |
दिग्दर्शक | हंसल मेहता , तुषार हिरानंदानी |
कलाकार | गगन देव रियार, सना अमीन शेख, मुकेश तिवारी, भरत जाधव |
निर्माता | समीर नायर, दिपक सेगल, इंद्रनील चक्रवती |
सीजन | १ ( व्हॉल्युम एक आणि व्हॉल्युम दोन) |
एकूण एपिसोड | १० |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | सोनी लिव्ह |
प्रदर्शित तारीख | ३१ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
डबिंग भाषा | तमिळ, तेलुगु, मराठी, बेंगाली, मल्याळम, कन्नड, गुजराती |
“स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी” सीरीज :-
स्कॅम १९९२ च्या अभुतपुर्व यशानंतर दिग्दर्शक हंसल मेहता यांनी यावेळी कोट्यावधी रुपयांचा “स्टॅम्प घोटाळा” करणाऱ्या अब्दुल करीमची कहाणी या वेबसिरीज मध्ये दाखवली आहे. एका सर्वसामान्य माणसाने सगळ्या यंत्रणा, राजकारणी सगळ्यांना पैसे देऊन इतका मोठा घोटाळा करून अख्ख्या जगाला भंडावून सोडलं होतं. बरीच वर्षे चाललेल्या या घोटाळ्याचा २००३ मध्ये पर्दाफाश झाला होता. हा घोटाळा एक दोन कोटी नव्हे तर तब्बल ३३ हजार कोटी रुपयांचा होता.
पोलिस यंत्रणा, राजकारणी यांना हाताशी घेऊन मुद्रांक वितरण प्रणाली कसं काम करते याचा अंदाज घेऊन अब्दुल ने कसं जवळपास देशभरात आपल्या बनावट स्टॅम्प पेपर विक्री चं जाळं पसरलं होतं, अनेक गुन्हे दाखल होऊन सुद्धा तो सहिसलामत कसा बाहेर पडत होता हे या सिरीजमध्ये बघायला मिळतं.
१९९० सालचा तो काळ दाखवताना दिग्दर्शक आणि कलादिग्दर्शक यांची मेहनत दिसून येते. गगन देव रियार यांचा अभिनय बिनतोड आणि उत्कृष्ट आहे यात शंका नाही. परंतु जर तुम्ही स्कॅम १९९२ आणि या सिरीजची तुलना करत असाल तर थोडासा फरक जाणवू शकतो. परंतु एक साधा फळ विकणारा माणूस संपूर्ण देशाला कसं फसवतो आणि इतका मोठा घोटाळा करतो हे बघताना अनेक नवीन गोष्टींचा उलगडा होतो. माझ्याकडून या वेबसिरीज ला साडेतीन स्टार.
६. द फरगॉटन आर्मी -आजादी के लिए |
लेखक | कबीर खान , शुभ्रा स्वरूप,हीराझ |
दिग्दर्शक | कबीर खान |
कलाकार | सनी कौशल, शर्वरी वाघ, रोहित चौधरी, करणवीर मल्होत्रा, एमके रैना, आर बद्री, टीजे भानु, श्रुति सेठ |
निर्माता | कबीर खान |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | ५ |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | ॲमेझॉन प्राईम |
प्रदर्शित तारीख | २४ जानेवारी २०२० |
भाषा | हिंदी |
“द फरगॉटन आर्मी -आजादी के लिए” सीरीज :-
भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी अनेक क्रांतिकारी पुढे सरसावले होते. त्यापैकी बऱ्याच जणांचं कार्य आपल्याला माहीत आहेतच परंतु अशाही बऱ्याच घटना किंवा स्वातंत्र्यासाठी लढणारे अनसंग हिरो आहेत ज्यांच्याबद्दल आज आपल्याला फारशी माहिती नाही. त्यांनी केलेल्या कार्याची आपल्याला पुसटशी कल्पना देखील नाही. कबीर खान निर्मित आणि दिग्दर्शित
द फरगॉटन आर्मी -आजादी के लिए ही वेबसिरीज देखील अशाच क्रांतीकारी कार्याची ओळख करून देणारी आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेचं कार्य उलगडणारी ही सिरीज आहे. या सेनेची स्थापना केली गेली तेव्हापासून ते या सेनेच्या अखेरच्या काळापर्यंत घडलेल्या घटनांचा आढावा यात घेतला गेला आहे. कथेच्या सुरूवातीला एक आर्मी ऑफिसर सुरिंदर सोधी (एमके रैना) आपल्याला भेटतो जो आता म्हातारा झाला आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास चाळीस वर्षांनी सिंगापूर येथे आला आहे तिथे आणि आपल्या नातवाला त्याच्या लष्करी दिवसांच्या आठवणी सांगत आहे.
हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळ आहे जेव्हा जपानी सैन्य सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध लढत होते. या सिरीज मध्ये हेच बघायला मिळतं की सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेने जपानी सैन्यासोबत युती करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. यात स्त्री आणि पुरुष दोघांचाही सहभाग होता. परंतु या लढाई बद्दल नंतर कुठेच कसलीच ना चर्चा झाली ना त्या आर्मीची आठवण केली गेली. अशा या फरगॉटन आर्मीचा पराक्रम बघायचा असेल तल ही सिरीज नक्की बघा. सनी कौशल, शर्वरी वाघ यांचा अभिनय बघण्यासारखा आहे. सिनेमॅटोग्राफी छान आहे, तेव्हाचा काळ पडद्यावर बघताना तो खरा वाटतो. ॲमेझॉन प्राईम वर ही सिरीज तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या वेबसिरीज ला साडेतीन स्टार.
तर मंडळी यापैकी कोणती वेबसिरीज तुम्ही पाहीलीय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
७. ट्रायल बाय फायर |
लेखक | प्रशांत नायर, केविन |
दिग्दर्शक | प्रशांत नायर, रणदीप झा आणि अवनी देशपांडे |
कलाकार | अभय देओल, राधिका देशपांडे, अनुपम खेर, रत्ना पाठक शहा |
निर्माता | सिद्धार्थ जैन, हेनरी, रिशी नेगी , विनोद अय्यर, प्रशांत नायर |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | ७ |
प्रदर्शित तारीख | १३ जानेवारी २०२३ |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | नेटफ्लिक्स |
भाषा | हिंदी |
“ट्रायल बाय फायर” सीरीज :-
१९९७ चा तो काळ होता. सगळ्या चित्रपटगृहात जे पी दत्ता यांच्या बॉर्डर या चित्रपटाचे सगळे शोज हाऊसफुल्ल लागत होते. आता तुम्हाला वाटेल बॉर्डर चित्रपट मधेच कुठून आला. पण दिल्लीत या चित्रपटाच्या एका शो च्या वेळी उपहार चित्रपटगृहात जे काही घडलं ते केवळ मन हेलावून टाकणारं होतं.
१३ जून १९९७ रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात सनी देओल चा बॉर्डर चित्रपट चालू होता आणि अचानक आग लागली आणि या घटनेत त्या थिएटर मध्ये अडकलेल्या जवळपास ५९ लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. तर हि लोकं आतमध्ये अडकली होती कारण त्या थिएटरचे दरवाजे बाहेरून बंद करण्यात आले होते. या हृदयद्रावक घटनेमध्ये शेखर कृष्णमूर्ती आणि निलम कृष्णमूर्ती यांच्या दोन्ही मुलांनी आपला जीव गमावला. आणि याच घटनेविरूदध न्याय मागण्यासाठी निलम आणि शेखर हे गेली दोन दशकं न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.
दिल्लीतील बलाढ्य आसामी बन्सल उद्योगपती विरोधात उभं राहणं सोपं नव्हतं परंतु आपल्या मुलांच्या मृत्यूचि न्याय मिळवण्यासाठी निलम आणि शेखर यांनी दिलेल्या लढ्याला मनापासून सलाम. या घटनेमुळे आपल्याकडील राजकीय, पोलिस यंत्रणा कशी काम करते हे बघून अस्वस्थ व्हायला होतं. तेव्हाच्या साक्षीदारांना दिलेल्या धमक्या, न्यायदानासाठी वर्षामागून वर्षे सरणं, आईवडीलांना आपल्या मृत मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा लागत असलेला संघर्ष बघून चीड येते. घुसमट होते. हि सिरीज बघताना अनेक प्रश्न आपल्याला नागरिक म्हणून भेडसावतात. एका क्षुल्लक चुकीमुळे किंवा हलगर्जीपणा मुळे इतक्या लोकांना जीव गमवावा लागणं हे फार वाईट आहे.
या सिरीजमधील कलाकारांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. राजश्री देशपांडे हिने ज्याप्रमाणे ही भुमिका साकारली आहे ते बघून आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत असं वाटतं. अभय देओल याने सुद्धा आपल्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. इतर कलाकारांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका उत्तम झाल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे दिग्दर्शन. ज्याप्रकारे हे सातही भाग बघताना आपण त्या काळात जातो आणि प्रत्येक घटना आपल्या समोर घडतेय असं वाटतं याच संपूर्ण श्रेय हे दिग्दर्शक प्रशांत नायर, रणदीप झा आणि अवनी देशपांडे या तिघांना जातं. नेटफ्लिक्स वर उपलब्ध असलेली हि सिरीज नक्कीच बघण्यासारखी आहे. माझ्याकडून या वेबसिरीज ला चार स्टार.
८. स्कूप |
लेखक | मृण्मयी लागू, मिरत त्रिवेदी |
दिग्दर्शक | हंसल मेहता |
कलाकार | करिष्मा तन्ना, मोहम्मद जीशान अय्युब, प्रोसेनजीत चॅटर्जी , हरमन बावेजा, तनिष्ठा चॅटर्जी, देवेन भोजानी |
निर्माता | हंसल मेहता |
सीजन | 1 |
एपिसोड | ६ |
प्रदर्शित तारीख | २ जून २०२३ |
भाषा | हिंदी |
डबिंग भाषा | तमिळ, तेलुगु, इंग्लिश |
“स्कूप” सीरीज :-
नेटफ्लिक्स वर स्ट्रीम होत असलेली आणि सध्याच्या व्यवस्थेवर नेमकं भाष्य करणारी वेबसिरीज स्कूप ही बघायलाच हवी या कॅटेगरी मधील आहे. आपण बऱ्याचदा बऱ्याच वर्तमानपत्रात एकच बातमी एकाच प्रकारे किंवा वेगवेगळ्या ॲंगलने लिहीली गेलेली वाचतो. आता हि बातमी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी पत्रकारांना त्यातील तथ्य, खरं खोटं तपासून बघावं लागतं. आणि यातूनच एक स्पर्धा सुरू होते. बातम्यांच्या दुनियेतील सर्वात मोठी बातमी जी समाजव्यवस्था ढवळून टाकू शकते, अशी बातमी म्हणजे “स्कूप”.
पत्रकार आणि अंडरवर्ल्ड यांच्या दुनियेतील खऱ्या खोट्या गोष्टींचा उलगडा करणारी ही वेबसिरीज आहे. काही वर्षांपूर्वी नावाजलेले क्राईम रिपोर्टर जे. डे. यांची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी त्यांनी बरेच खुलासे करून पत्रकारितेच्या दुनियेत खळबळ उडवून दिली होती. आणि याच कारणामुळे हत्या करण्यात आली असावी असा अंदाज आहे. पण या सगळ्यात जिग्ना वोरा या महिला पत्रकराला अटक करण्यात आली होती. आणि संपूर्ण राज्यासाठी हा मोठा धक्का होता. पण कालांतराने त्यांची निर्दोष सुटका झाली.
याच अनुभवाचं लिखाण त्यांनी “बिहाईंड बार्स इन भायखळा : माय डेज इन प्रिझन” या पुस्तकात केले असून त्याच पुस्तकावर आधारित ही वेबसिरीज आधारित आहे.
हि वेबसिरीज बघताना एक गोष्ट लक्षात येते की अंडरवर्ल्ड कनेक्शन , पत्रकारिता, पोलिस हे सगळंच आपण बातम्यांमधून बघतो ते तेवढंच नसतं.
या सिरीजमध्ये जागृती वोरा हि क्राईम रिपोर्टर आहे जिचं नुकतंच प्रमोशन झालेलं आहे. खूप कष्टाने तिने इथपर्यंत प्रवास केलेला आहे. पण स्पर्धेच्या या युगात प्रतिस्पर्धी , पाय खेचणारे हे असतातच. या सगळ्यांवर मात करून ती “डेप्युटी ब्युरो चीफ” बनते. यात पत्रकारांमध्ये असणारी चढाओढ, स्कूप साठी केले जाणारे प्रयत्न त्यासाठी त्यांची धडपड सगळंच पहायला मिळतं.
कथेदरम्यान जयदेब सेन या प्रसिद्ध सिनियर पत्रकाराची हत्या करण्यात येते. खरं तर जयदेब यांनी काही महत्त्वाच्या बातम्या उघडकीस आणलेल्या असतात आणि त्यांचा तपास सुरूच असतो. आणि याच कारणामुळे हि हत्या करण्यात येते. परंतु या सगळ्यात अडकवलं जातं ते म्हणजे जागृती वोरा यांना. त्यांच्याविरोधात तशी परिस्थिती निर्माण केली जाते. वरिष्ठ पोलीस अधिकारी ते छोटा राजन सारख्या अंडरवर्ल्ड सोबत त्यांचे कामानिमित्त असलेले संबंध नको त्या पद्धतीने समोर आणले जातात. त्यांना अटक झाल्यानंतर कारागृहात त्यांना मिळणारी वागणूक हे सगळं बघून व्यवस्थेविरुद्ध चीड नक्कीच निर्माण होते.
आता खरंच हा खून जागृती यांच्या सांगण्यावरून झाला होता का.? की नक्की काय झालं होतं हे बघण्यासाठी ही सिरिज नक्की बघा. माझ्याकडून या वेबसिरीजला साडेतीन स्टार.
९. दहाड |
लेखक | रिमा कागती, रूचिका शाह, झोया अख्तर |
दिग्दर्शक | रिमा कागती, रूचिका ओबेरॉय |
कलाकार | सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शाह, गुलशन देवय्या |
निर्माता | रिमा कागती, झोया अख्तर |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | ८ |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | ॲमेझॉन प्राईम |
प्रदर्शित तारीख | १२ मे २०२३ |
भाषा | हिंदी |
“दहाड” सीरीज :-
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिरीजमध्ये एकूण २७ मुलींची गुढ हत्या की आत्महत्या याचा तपास दाखवण्यात आला आहे. विजय वर्मा याने नेहमीच प्रेक्षकांवर त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. या सिरीजमध्ये पुन्हा एकदा त्याचा सशक्त अभिनय पहायला मिळतो.
कर्नाटकातील सायनाईड मोहन म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सिरियल किलर मोहनवर ही वेबसिरीज बनवण्यात आली आहे. अधिकृत अशी माहिती नसली तरी या सिरीजमधील सगळ्या घटना, एक शिक्षक असून ज्याप्रकारे सायनाईड गोळ्यांचा वापर करून लग्नाचं आमिष दाखवून मुलींची हत्या करणारा आनंद, हे सगळं कर्नाटकातील २००९ मध्ये पकडल्या गेलेल्या सायनाईड मोहन केस शी मिळतं जुळतं आहे. मोहन याने २००३ ते २००९ या काळात जवळपास वीस मुलींना फसवून त्यांची हत्या केली होती
राजस्थान मधील एका गावातील एक मुलगी हरवल्याची तक्रार करायला एक गरीब घरातील भाऊ पोलिस स्टेशनमध्ये जातो पण त्याच्य तक्रारी कडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण तेव्हाच तो भाऊ बघतो की एक हिंदू मुलगी एका मुस्लिम मुलासोबत पळून गेल्यामुळे धर्माचं राजकारण करून त्या मुलीला शोधण्यासाठी पोलिसांवर दबाव आणून शोधकार्य जोरात सुरू आहे. म्हणून तो सुद्धा खोटी तक्रार दाखल करतो की त्याची बहीण सुद्धा मुस्लिम मुलासोबत पळून गेली आहे. इथुनच कथानकाला सुरूवात होते. या मुलीचा शोध घेता घेता एकूण सत्तावीस मुली गायब झाल्याचं दिसून येतं.
सोबतच मुलींना एका विशिष्ट पद्धतीने सार्वजनिक शौचालयात कोंडून मारण्याच्या केसेस एकापाठोपाठ एक अशा निदर्शनास येतात. हे खून फक्त गरीब घरातील मुलींचे होत असतात. आणि ते अशा पद्धतीने केले जातात की ती आत्महत्या भासावी. विजय वर्मा याने सायको किलरची भुमिका अतिशय थंडपणे आणि उत्तम साकारली आहे.
आता या सगळ्या मुलींच्या हत्येचा शोध लावण्यात इन्स्पेक्टर अंजली भाटे यशस्वी होते का.? शिक्षक म्हणून काम करणाऱ्या आनंद स्वर्णकर म्हणजेच विजय वर्मा चा राक्षसी चेहरा जगासमोर येतो का हे बघण्यासाठी ही सिरिज नक्की बघा. माझ्याकडून या वेबसिरीजला तीन स्टार.
१०. आखरी सच |
लेखक | सौरव डे |
दिग्दर्शक | रॉबी ग्रेवाल |
कलाकार | तमन्ना भाटिया, अभिषेक बनर्जी, शिविन नारंग, राहुल बग्गा, दानिश इकबाल |
निर्माता | प्रीति सिमोस, नीति सिमोस |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | ६ |
ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म | डिस्नीप्लस हॉटस्टार |
प्रदर्शित तारीख | २५ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“जगभरून फिल्म्स” सीरीज :-
२०१८ साली घडलेलं दिल्लीतील बुरारी आत्महत्या प्रकरण हे इतकं भयानक होतं की आठवलं तरी थरकाप उडतो. एकाच घरातील तब्बल अकरा माणसांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने अख्खी दिल्ली नाही तर संपूर्ण जग हादरून गेले होते. याच घटनेवर आधारित आखरी सच ही वेबसिरीज डिस्नीप्लस हॉटस्टार २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाली होती. या घटनेची माहिती किंवा त्या घरातील सदस्यांनी अशाप्रकारे आत्महत्या का केली असेल याचा उलगडा करण्यात आलेले प्रयत्न थोड्या नाट्यमय पद्धतीने या सिरीजमध्ये बघायला मिळतात.
सुरूवातीलाच या घरातील अंगणात दहा जणांचे मृतदेह ग्रीलला लटकताना दाखवले आले आहेत. प्रत्येकाचे हात बांधलेले आहेत, डोळ्यांवर पट्टी आहे. एका खोलीत एका वयस्कर स्त्रीचा मृतदेह आहे. अशी एकंदर घटनास्थळी परिस्थिती आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच तिथे अन्या(तमन्ना भाटिया) ही तपास अधिकारी पोहचते. तिथून पुढे हा सगळा प्रकार का करण्यात आला असावा याचा शोध घेताना तिला अनेक अविश्वसनीय गोष्टी लक्षात येतात. अनेक रहस्यं समोर येतात. तमन्ना हीने ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. तसंच त्या घरातील दोन नंबरचा मुलगा दाखवण्यात आलेल्या अभिषेक ने याची भुमिका महत्वपूर्ण आहे. कारण ही घटना घडण्यामागे ज्या काही अविश्वसनीय आणि संशयास्पद घटना आहेत त्यात मोठा वाटा या मुलाचा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा आत्मा याच्याशी बोलत असे आणि सगळं करून घेत असे अशा प्रकारच्या नोंदी तिथे सापडलेल्या डायरीत मिळाल्या आहेत. अभिषेक ने चांगला अभिनय केला आहे. परंतु त्याचा हा अभिनय आधीच्या भुमिंकासारखा वाटू शकतो.
आता त्या डायरी मध्ये अजून काय काय लिहिलं होतं.? त्या सगळ्यांनी आत्महत्या का केली असेल.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या सिरीजमध्ये मिळू शकतात. या केसवर आधारित एक डॉक्युमेंटरी सिरीज नेटफ्लिक्स वर सुद्धा उपलब्ध आहे. परंतु आखरी सच ही वेबसिरीज थोड्या नाट्यमय पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना आवडू शकते. माझ्याकडून या वेबसिरीज ला तीन स्टार.
तर मंडळी यापैकी कोणती वेब सीरीज तुम्ही पाहीलीय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.