HomeFilmsMarathi

एप्रिल २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | List of Marathi movies released in April 2024

एप्रिल २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : एप्रिल 16, 2024 | 02:35 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आज या लेखात आपण एप्रिल २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

Marathi movie released in April 2024 list. Movie reviews and information

१. मायलेक (Mylek)
२०२४. परिवार, नाटक. १ तास ५४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक एमेरा
दिग्दर्शकप्रियांका तन्वर
कलाकारसोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने
निर्मातासोनाली आनंद
प्रदर्शित तारीख१९ एप्रिल २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

मायलेक” चित्रपट समीक्षा :-

आई आणि मुलगी या नात्यावर आधारित याआधी सुद्धा बरेच चित्रपट येऊन गेले आहेत. १९ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला मायलेक हा चित्रपट सुद्धा असाच माय लेकीमधील गोड नात्यावर आधारित आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेपासून दिग्दर्शक ते निर्माती अशा सगळ्या महीलाच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली खरे आणि तिची खऱ्या आयुष्यातील मुलगी सनाया आनंद या दोघी चित्रपटात माय लेकीच्या भूमिकेत दिसत आहेत.
चित्रपटाची कथा लंडनमध्ये एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये शेफ म्हणून काम करणाऱ्या शर्वरी दीक्षित (सोनाली खरे) हीच्याभोवती फीरते. शर्वरी ही घटस्फोटीता असून एकटीच आपल्या मुलीला मायराला वाढवत असते. मुलीला मोठं करता शर्वरी ला आपलं स्वतःचं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट लंडनमध्ये चालू करायचं असतं. परंतु जस जशी मायरा मोठी होत असते तसे तिला एका किशोरवयीन मुलींना पडतात तसे अनेक प्रश्न पडायला लागतात. पौगंडावस्थेत होणारा “एंडोमेट्रिओसिस” हा आजार मायरा ला होतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून शर्वरी आणि मायराच्या नात्यात सुद्धा दुरावा यायला सुरुवात होते. या सर्व काळात शर्वरी चा जुना मित्र वैभव तिच्या आयुष्यात येतो. आता त्याच्या येण्यामुळे हा दुरावा वाढतो की ते तिघे एकत्र नव्याने छान आयुष्य सुरु करतात हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
लेखिका एमेरा यांनी एक छान कथा गुंफली आहे परंतु पटकथा आणि संवाद तेवढे परिणामकारक वाटत नाहीत. दिग्दर्शन संगीत या गोष्टींची योग्य जोड मिळायला हवी होती असं देखील वाटतं. कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. एकंदर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. राजकारण गेलं मिशीत (Rajkaran Gela Mishit)
२०२४. विनोदी. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक रा.रं.बोराडे
दिग्दर्शकमकरंद अनासपुरे
कलाकारमकरंद अनासपुरे, प्राजक्ता हणमघर, प्रकाश भागवत, डॉ. विजय देशमुख, डॉ. राजू सोनावणे, नितीन कुलकर्णी, बाळू मुकादम
निर्मातामच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, सुरेश पठारे, त्रिशला देशमाने
प्रदर्शित तारीख१९ एप्रिल २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

राजकारण गेलं मिशीत” चित्रपट समीक्षा :-

विनोदी परंतु मार्मिक टोले लगावत प्रेक्षकांना हसवत सत्य परिस्थितीवर भाष्य करणारे, राजकारण्यांची पोल खोलणारे असे चित्रपट करताना राजकारणावर आधारित चित्रपटांमध्ये मकरंद अनासपुरे यांना याआधीही आपण पाहीलेलं आहे. आता तशाच धाटणीचा “राजकारण गेलं मिशीत” हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन मकरंद अनासपुरे यांनी स्वतः केलं आहे. लेखक रा. रं. बोराडे यांच्या ‘अगं अगं मिशी’ या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.
कथा नेहमीप्रमाणे एका खेडेगावातील आहे. कथेचा नायक अर्थात मकरंद अनासपुरे हेच आहेत, त्यांनी नथुबा ही भूमिका साकारली आहे तर त्यांची बायको धोंडाई हीच्या भूमिकेत प्राजक्ता आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकिय पक्ष आणि नेते यांच्यातील पकडापकडीच्या खेळावर हा चित्रपट सडकून टीका करतो. काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या पक्षातील काही नेते आमदार अचानक एका रात्रीत फुटले होते त्यावर सुद्धा विनोदी पद्धतीने केलेली टीका यात बघायला मिळते. चित्रपटाचा विषय चांगला आहे परंतु लेखकांना ही पटकथा तेवढ्या ताकदीने गुंफायला जमली नाही. मकरंद अनासपुरे यांचं दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक म्हणावं लागेल. संगीत चांगलं आहे, परंतु चित्रपट म्हणावा तेवढा प्रभावी झाला नाही. मकरंद अनासपुरे यांच्या गल्लीत “गोंधळ दिल्लीत मुजरा”, गाढवाचं लग्न हे आधीचे चित्रपट सुपरहिट होते त्या मानाने हा चित्रपट फसला असं म्हणावं लागेल. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३. जुनं फर्निचर (Juna Furniture)
२०२४. परिवार, नाटक. २ तास २४ मिनिटे. [ U ]
लेखक महेश मांजरेक
दिग्दर्शकमहेश मांजरेक
कलाकारमहेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, गिरीश ओक
निर्मातायतिन जाधव, सत्य-सई मांजरेकर
प्रदर्शित तारीख२६ एप्रिल २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

जुनं फर्निचर” चित्रपट समीक्षा :-

सध्या आपल्या आजुबाजुला मुलाने आपल्या वृद्ध आईला किंवा वडीलांना वृद्धाश्रमात टाकलं अशा अनेक बातम्या ऐकतो. आईवडील म्हातारे झाले की कित्येक तरूणांना त्यांचं ओझं वाटू लागतं. त्यांचा सांभाळ करताना, त्यांचं आजारपण काढताना होणारा खर्च मुलांना जड होतो परंतु हेच जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आईवडील आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांना मोठं करतात, शिक्षण करतात. त्यांच्या पायावर त्यांना उभं करतात. परंतु हीच मुलं जेव्हा आईवडिलांचे कष्ट विसरतात, त्यांना आईवडील म्हणजे घरातील जुन्या फर्निचर प्रमाणे टाकाऊ वाटतात आणि ते दुःख सहन करण्या पलिकडचं असतं. अशाच आशयाचा एक चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची कथा पटकथा संवाद लिहीले असून दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलं आहे. विशेष म्हणजे ते स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
गोविंद पाठक(महेश मांजरेकर) यांची ही गोष्ट असून त्यांची पत्नी सुहास पाठक(मेधा मांजरेकर)हीच मृत्यू होतो. आणि आपल्या पत्नीच्या मृत्यूला ते आपल्या मुलालाच जबाबदार धरत आहेत. आणि त्या विरुद्धच गोविंद पाठक हे स्वतःच्या मुलाकडून म्हणजे अभयकडून(भूषण प्रधान)तब्बल ४ कोटी ७२ लाख ८६ हजार शंभर रुपये इतक्या भरपाईची मागणी करतात. आता ही रक्कम नक्की कोणत्या हिशोबाने मागतात? का मागतात? अभय ही रक्कम देतो का.? हे सारं चित्रपट पाहील्यानंतर कळेल.
महेश मांजरेकर यांनी अतिशय सुंदर भूमिका साकारली आहे. मकरंद अनासपुरे, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, सचिन खेडेकर या सगळ्याच कलाकारांनी अभिनय अतिशय उत्तम केला आहे. संगीत, गाणी, कॅमेरा वर्क सगळ्याच गोष्टी जमून आल्या आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


४. लेक असावी तर अशी (Lek Asavi Tar Ashi)
२०२४. परिवार, नाटक. २ तास २३ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक विजय कोंडके
दिग्दर्शकविजय कोंडके
कलाकारगार्गी दातार, यतिन कार्येकर, शुभांगी गोखले, कमलेश सावंत, सुरेखा कुडची, ओंकार भोजने, अभिजित चव्हाण, प्राजक्ता हणमगर
निर्माताविजय कोंडके
प्रदर्शित तारीख२६ एप्रिल २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.२⭐/ ५

लेक असावी तर अशी” चित्रपट समीक्षा :-

या चित्रपटाचं पोस्टर बघीतल्यावरच तुम्हाला माहेरची साडी हा चित्रपट आठवेल. कारण हा चित्रपट सुद्धा निर्माते आणि दिग्दर्शक विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केला आहे. नव्वदच्या दशकात माहेरची साडी या चित्रपटाने एक रेकॉर्ड सेट केला होता. आजही प्रेक्षकांच्या मनात तो चित्रपट आहे. विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला माहेरची साडी हा चित्रपट तेव्हा प्रचंड गाजला होता. परंतु त्यांनी आता निर्मिती केलेला आणि दिग्दर्शित केलेला लेक असावी तर अशी हा चित्रपट तेवढाच फसला आहे.
कथा एका मुलीभोवती फिरते. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर ज्या मुलीला कळतं की आतापर्यंत ज्यांच्यासोबत ती लहानाची मोठी झाली ते तिचे खरे आईवडील नसून तिचे खरे आईवडील कोणीतरी दुसरेच आहेत. अशा प्रसंगी ती काय करते यावर सगळा चित्रपट बेतलेला आहे. विजय कोंडके हे अजून नव्वदच्या दशकात अडकले आहेत असं एकंदरीत वाटतं. सगळे दिग्गज कलाकार असून सुद्धा चित्रपट फारसा प्रभाव पाडत नाही. पटकथा संवाद अगदीच सुमार आहे. दिग्दर्शन सुद्धा जुन्या काळातील चित्रपटांप्रमाणे आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


५. परंपरा (Parampara)
२०२४. नाटक. १ तास ५१ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक प्रणय निशाकांत तेलंग
दिग्दर्शकप्रणय निशाकांत तेलंग
कलाकारमिलिंद शिंदे, वीणा जामकर, प्रशांत नेमण, जनार्दन परब, प्रकाश धोत्रे
निर्माताहरीश कुमार, ॲंड्र्यू रिबेलो
प्रदर्शित तारीख२६ एप्रिल २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

परंपरा” चित्रपट समीक्षा :-

परंपरा हा चित्रपट नावाप्रमाणेच जुन्या परंपरा, जुन्या चालीरीती विरूद्ध आवाज उठवणारा आहे. काही पद्धती किंवा चालीरीती या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात परंतु समाजात राहण्यासाठी जमत नसताना देखील त्या पाळल्या जातात. याच सगळ्यावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रणय निशाकांत तेलंग यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे.
एका गावातील ही कथा असून श्रीपती हा गावातील एक सामान्य शेतकरी आहे. हातावर पोट असलेल्या श्रीपतीच्या नावावर फारशी जमीन नाहीय जी आहे त्याच जमीनीवर त्याचं पोट भागतय. परंतु श्रीपतीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर पोटाची खळगी भयणारा हा एकमेव जमीनीचा तुकडा गहाण ठेवायची वेळ येते. कारण तेरावं घालायचं तर गावाला जेवण घालावं लागतं आणि त्यासाठी पैसा लागतो. परंतु पैशांसाठी जमीन गहाण ठेवण्यासाठी श्रीपतीची बायको तयार नसते. या असल्या परंपरा न पाळल्यास काही बिघडत नाही असं त्याचा मित्र देखील त्याला समजावत असतो. परंतु समाज आपल्याला वाळीत टाकेल अशी भीती श्रीपती ला असते.
आता श्रीपती जमीन गहाण ठेवतो की त्या परंपरे विरोधात आवाज उठवतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. कथा आणि विषय चांगला असला तरी पटकथा भरकटल्यासारखी वाटते. बऱ्याच गोष्टी खटकतात. मिलिंद शिंदे, वीणा जामकर व इतर सहकलाकारांचा अभिनय चांगला आहे. दिग्दर्शन ठिकठाक आहे. गाणी चांगली आहेत. परंतु एकंदर चित्रपट मनोरंजन करण्यात कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.

तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.