HomeFilmsHindi

मे २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | List of Hindi Movies Released in May 2024

मे २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जुलै 16, 2024 | 12:49 AM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात मे महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

Hindi movie list release in May 2024, movie reviews and information

१. श्रीकांत (Srikanth)
२०२४. जीवनचरित्र, नाटक. २ तास १४ मिनिटे. [ यु ]
लेखक जगदीश सिद्धू, सुमित पुरोहित
दिग्दर्शकतुषार हीरानंदानी
कलाकारराजकुमार राव, ज्योतिका, अलाया एफ, शरद केळकर, जमील खान
निर्माताभूषण कुमार, निधि परमार हीरानंदानी
प्रदर्शित तारीख१० मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

श्रीकांत” चित्रपट समीक्षा :-

भारतीय उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या आयुष्यावर आधारित ह चित्रपट आपल्याला एक प्रेरणादायी प्रवास घडवतो. आपण आयुष्याबद्दल नेहमीच तक्रार करत असतो. हे नाही, ते नाही, असं असतं तर मी केलं असतं वैगरे वैगरे. परंतु जन्मतः दृष्टी नसणाऱ्या एका अत्यंत हुशार आणि मेहनती मुलाने प्रतिकूल परिस्थितीत एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख कशी निर्माण केली याचीच ही गोष्ट.
१९९१ साली आंध्रप्रदेश मधील मछलीपट्टनम येथे श्रीकांत यांचा जन्म झाला. सर्व सामान्य घरात मुलगा झाल्यावर जो आनंद होतो तोच यांच्या घरात देखील झाला. परंतु आनंदावर विरजण पडलं जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की श्रीकांत हे दृष्टीहीन आहेत. त्यावरून घरात खूप गोंधळ झाला. हे कटू सत्य सहजपणे स्वीकारलं गेलं नाही. त्याचा श्रीकांत यांना खुप त्रास झाला. परंतु त्यांनी जिद्दीने गावाबाहेर दूर जाऊन सुद्धा शिक्षण चालू ठेवलं. सायन्स सारख्या शाखेत प्रवेश मिळत नसताना न्यायालयात धाव घेऊन न्याय मिळवला. पुढे आयआयटी ने दृष्टीहीन म्हणून प्रवेश नाकारल्यावर थेट अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतले. आणि पुन्हा भारतात येऊन स्वतःची एक उद्योजक म्हणून ओळख निर्माण करत असंख्य अंध व्यक्तींनाच रोजगार मिळवून दिला. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांचा हा खडतर प्रवास मोठ्या पडद्यावर बघताना आपल्या आयुष्यातील समस्या कीती छोट्या आहेत असं वाटतं.
राजकुमार राव याने नेहमी प्रमाणे भुमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. चित्रपट पुर्वार्धात चांगली पकड घेतो परंतु मध्यातंरा नंतर चित्रपट संथ वाटतो. श्रीकांत यांचं फक्त यश पडद्यावर बघताना त्यांना कधी अपयश आलं की नाही असा प्रश्न पडतो. दिग्दर्शक तुषार हीरानंदानी यांनी ती बाजू सुद्धा दाखवायला हवी होती. परंतु एक प्रेरणादायी चित्रपट म्हणून नक्कीच हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. टिप्प्सी (Tipppsy)
२०२४. नाटक, रोमांचक. १ तास ५५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक दिपक तिजोरी
दिग्दर्शकदिपक तिजोरी
कलाकारअलंकृता सहाय, नताशा सूरी, कायनात अरोड़ा, नाजिया हुसैन, सोनिया बिरजे, दिपक तिजोरी
निर्माताराजू चढ्ढा, कायनाथ अरोरा
प्रदर्शित तारीख१० मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

टिप्प्सी” चित्रपट समीक्षा :-

२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्लॉप चित्रपटाचं नाव सांगायचं झालं तर टिप्सी हा चित्रपट तुम्ही सांगू शकता. दिपक तिजोरी याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अतिशय सुमार दर्जाचा हा चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा चार मैत्रीणींची आहे. त्यापैकी एकीचं म्हणजे पोनीचं लग्न ठरलं आहे म्हणून त्या सगळ्याजणी गोव्यात बॅचलर पार्टी करण्यासाठी जातात. तिकडे पोहचल्यावर रात्री धमाल करत , ड्रींक वैगरे पार्टी चालू असते. परंतु सकाळी जेव्हा त्या जाग्या होतात तेव्हा एक वेगळंच संकट समोर उभं राहत. त्या ज्या व्हिला मध्ये असतात तेथील स्विमिंग पूल मध्ये एक डेड बॉडी सापडते. आता ती कोणाची असते.? या चौघींचा त्या खूनाशी काही संबंध असतो का.? या सगळ्यातून त्या सुटतात का.? हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु आमचं ऐकाल तर अजिबात चित्रपट बघू नका.
दिपक तिजोरी यांचं दिग्दर्शन इतक सुमार आहे की एक सस्पेन्स थ्रिलर कथा आहे हे सांगावं लागेल. शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट कमी पडतो. स्क्रीन प्ले, संगीत, अभिनय सगळंच फसलेलं आहे. एकंदर संपूर्ण फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


३. कर्तम भुगतम (Kartam Bhugtam)
२०२४. मानसशास्त्रीय, थ्रिलर. २ तास ११ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक सोहम पी शाह
दिग्दर्शकसोहम पी शाह
कलाकारश्रेयस तळपदे, विजय राज, मधु, अक्षा परदसानी
निर्मातागंधार फिल्म्स ॲंड स्टूडियो
प्रदर्शित तारीख१७ मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

कर्तम भुगतम” चित्रपट समीक्षा :-

चित्रपटाच्या नावावरून लक्षात आलं असेलच की चित्रपटात नक्की काय बघायला मिळेल. आपल्याकडे असं म्हटलं जातं की जशी कर्म तसं फळ. या जन्मी जे काही वाईट किंवा चुकीचं करू त्याचं फळ याच जन्मात भोगायचं आहे. हेच सांगणारा हा चित्रपट आहे. त्याचसोबत ज्योतिष, भविष्य सांगणारे भोंदू बाबा बुवा यांच्यापासून जपून का रहावं हा महत्वपूर्ण संदेश हा चित्रपट देतो.
कथा देव जोशी नावाच्या मुलाची आहे. जो न्युझीलंड ला स्थायिक झालेला आहे परंतु आपल्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तो भारतातील वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकण्यासाठी काही दिवसांसाठी भारतात मध्यप्रदेश मध्ये येतो. या दरम्यान त्याला अण्णा (विजय जोशी) हा एक ज्योतिषी भेटतो. तो सांगतो की देव आता भारताबाहेर जाऊ शकत नाही. आणि देवला अण्णाच्या बोलण्याचा प्रत्यय यायला सुरुवात होते जेव्हा त्याची सर्व कामं काही ना काही कारणाने अडकतात. तेव्हा तो परत अण्णा कडे जाऊन यातून मार्ग काढण्यासाठी मदत करायला सांगतो. यखवर उपाय म्हणून अण्णा त्याला जे करायला सांगतो त्यामुळे देवच्या आयुष्यात काय घडतं ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा प्लॉट चांगला होता परंतु दिग्दर्शकाला तो व्यवस्थित मांडता आला नाही. सस्पेन्स असलेल्या या चित्रपटात बऱ्याच गोष्टी अर्धवट सोडून दिल्या सारख्या वाटतात. संगीत, सिनेमॅटोग्राफी, तांत्रिक गोष्टींमध्ये चित्रपट कमी पडतो. परंतु ज्योतिष, भोंदूगिरी या कचाट्यात सापडल्यावर काय होऊ शकतं हे बघण्यासाठी हा चित्रपट जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


४. भैय्याजी (Bhaiyya Ji)
२०२४. ॲक्शन, गुन्हेगारी, नाटक. २ तास १५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक दीपक किंगरानी, अपूर्व सिंह कार्की
दिग्दर्शकअपूर्व सिंह कार्की
कलाकारमनोज वाजपेयी जपेयी, सुविंदर विकी, जतिन गोस्वामी, विपिन शर्मा, जोया हुसैन, भगीरथ बाई, अमरेंद्र शर्मा, रमा शर्मा
निर्माताशैल ओसवाल, शबाना रजा वाजपेयी
प्रदर्शित तारीख२४ मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

भैय्याजी” चित्रपट समीक्षा :-

मनोज वाजपेयी हा एक अतिशय नैसर्गिक अभिनय करणारा अभिनेता आहे. त्याने गेल्या काही वर्षांत स्वतःला एक सक्षम कलाकार म्हणून सिद्ध केले आहे. परंतु त्याचा भैय्याजी हा चित्रपट बघून त्याने चुकीचा चित्रपट निवडला आहे असं वाटतं. “सिर्फ एक बंदा काफी हैं” सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक अपूर्व सिंह कार्की याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यावेळी ते तेवढं प्रभावी झालं नाही. कदाचित पटकथा आणि संवाद तेवढे दमदार नसल्याने चित्रपटात फार काही करायला मिळालं नाही. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा चित्रपट कमकुवत आहे.
चित्रपटाची कथा सुद्धा नव्वदच्या दशकातील वाटते. चित्रपटाचा नायक खलनायक दोन्ही भूमिका साकारणारा भैय्याजी आपल्या लग्नाच्या गडबडीत आहे. त्याने वडिलांना शब्द दिला आहे त्यामुळे खूनखराबा, मारझोड हे प्रकार त्याने सोडून दिले आहेत. परंतु त्याच्या लग्नासाठी येणाऱ्या छोट्या भावाची हत्या झाल्यामुळे पूर्वीचा भैय्याजी पुन्हा पेटून उठला आहे. आता त्याच्या भावाला कोण मारतं, भैय्याजी बदला कसा घेतो हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. तुम्ही मनोज वाजपेयी चे फॅन असाल तर चित्रपट बघायला हरकत नाही. बाकी चित्रपटात काही खास नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


५. मिस्टर ॲंड मिसेज माही (Mr. & Mrs. Mahi)
२०२४. नाटक, रोमान्स, खेळ. २ तास १९ मिनिटे. [ यु ]
लेखक निखिल मल्होत्रा, शरण शर्मा
दिग्दर्शकशरण शर्मा
कलाकारजान्हवी कपूर, राजकुमार राव, कुमुद मिश्रा, राजेश शर्मा, पुर्णेंदु भट्टाचार्य, जरीना वहाब
निर्माताजी स्टूडियोज, धर्मा प्रोडक्शन्स
प्रदर्शित तारीख३१ मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

मिस्टर ॲंड मिसेज माही” चित्रपट समीक्षा :-

चित्रपटाचं नाव आणि पोस्टर बघून तुम्हाला वाटेल की परत महेंद्रसिगं धोनीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे की काय.? परंतु तसं नाहीय. चित्रपटाची कथा क्रिकेटचं वेड असलेल्या महेंद्र आणि महिमा यांची यांच्यावर आधारित आहे. राजकुमार राव याने श्रीकांत चित्रपटामुळे आधीच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, त्यात पुन्हा या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून छाप सोडली आहे.
चित्रपटाची कथा फार काही वेगळी नाहीय. क्रिकेटची आवड असणारा महेंद्र आणि महिमा ची ही गोष्ट आहे. दोघांनाही क्रिकेट मध्ये करिअर करायचं असतं परंतु काही कारणास्तव तसं न होता महेंद्र वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळतो तर महीमा डॉक्टर होते. आणि दोघांच्या मनाविरुद्ध त्यांचं लग्न लावून देण्यात येतं. परंतु त्यावेळी दोघांनाही क्रिकेटच्या आवडीबद्दल माहीती नसते. काही दिवसांनी महेंद्रच्या लक्षात येते की महिमाला सुद्धा क्रिकेट ची आवड असून ती एक उत्तम फलंदाज आहे. मग तो तिचा कोच बनून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करतो. तसं झालं तर त्याचं नाव होईल हा स्वार्थ त्याच्या मनात असतो. परंतु एकीकडे महिमा ला सुद्धा असं वाटतं असतं की महेंद्र ने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात करावी.
आता महिमा त्याचं ऐकते का? महेंद्रचा स्वार्थ तिला समजतो का .? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. खूप लॉजिक न लावता एक चांगली रोमॅन्टिक लव्ह स्टोरी बघायची असेल तर चित्रपट बघू शकता. जान्हवी कपूर ने घेतलेली मेहनत यात दिसून येते. एकंदर मनोरंजन करणारा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६. सावी (Savi)
२०२४. रोमांचक, ॲक्शन. २ तास ५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक परवेज शेख, असीम अरोड़ा
दिग्दर्शकअभिनय देव
कलाकारदिव्या खोसला, हर्षवर्धन राणे, रागेश्वरी लुम्बा, एम के रैना, हिमांशी चौधरी, मैराज कक्कड़, अनिल कपूर
निर्माताभूषण कुमार , कृष्ण कुमार, मुकेश भट्ट
प्रदर्शित तारीख३१ मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

सावी” चित्रपट समीक्षा :-

सावित्री सत्यवान यांच्या कथेपासून पासून प्रेरणा घेऊन हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच काळानंतर विशेष फिल्म्स निर्मित हा चित्रपट आला आहे. सावित्री ने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवून आणले होते इतकं तिचं प्रेम होतं. असंच काहीसं प्रेम या चित्रपटातील सावीचं आपल्या नवऱ्यावर आहे.
चित्रपटाची कथा लंडनमध्ये घडते. सावी (दिव्या खोसला)ही आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहणारी एक साधी गृहीणी आहे. तीचा नवरा नकुल सचदेव (हर्षवर्धन राणे) आणि मुलगा आर्यन असं हे त्रिकोणी कुटुंब असतं. परंतु एकदा कन्स्ट्रक्शन साइट वर काम करत असताना त्याच्या बॉसचा खून केल्याप्रकरणी सावीच्या नवऱ्याला अटक होते. परंतु सावीला शंभर टक्के खात्री असते की तिचा नवरा दोषी नाहीय. परंतु हे सिद्ध करताना तिला बऱ्याच अडचणी येतात. शेवटी ती त्याला तुरुंगातून पळवून नेण्याचा प्लॅन करते यासाठी ती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पॉल ची मदत घेते. आता सावी आपल्या नवऱ्याला सोडवते का.? तो खरंच निर्दोष असतो का.? या सगळ्यामागे कोणाचा हात असतो, हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. अनिल कपूर आणि दिव्याचा अभिनय चांगला आहे. हर्षवर्धन ला फारशी भूमिका नाही. संगीत ठिकठाक आहे. काही सीन्स सोडले तर चित्रपट छान आहे. एकंदर एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बघायचा असल्यास नक्कीच हा चित्रपट चांगला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


७. छोटा भीम ॲंड द कर्स ऑफ दमयान (Chhota Bheem and the Curse of Damyaan)
२०२४. साहसी, ॲक्शन, कल्पनात्मक, परिवार. २ तास २५ मिनिटे. (यु)
लेखक नीरज विक्रम, श्रीदिशा
दिग्दर्शकराजीव चिलका
कलाकारयज्ञ भसीन,आश्रिया मिश्रा, कबीर साजिद, दिव्यम डावर, दैविक डावर, अद्विक जायसवाल, मकरंद देशपांडे, नवनीत ढिल्लों, मुकेश छाबड़ा, अनुपम खेर
निर्मातामेघा चिलका
प्रदर्शित तारीख३१ मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

छोटा भीम ॲंड द कर्स ऑफ दमयान” चित्रपट समीक्षा :-

“छोटा भीम” हे कॅरेक्टर इतकं प्रसिद्ध आहे की लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना सुद्धा छोटा भीम आवडतो. ॲनिमेशन स्वरूपातील छोट्या भीमच्या गोष्टी लहान मुलं दिवस रात्र टिव्हीवर बघत असतात. म्हणूनच छोट्या मुलांना आवडणारा हा छोटा भीम चित्रपटातून भेटायला आला आहे. “छोटा भीम ॲंड द कर्स ऑफ दमयान” हा चित्रपट राजीव चिलका यांनी दिग्दर्शित केला असून नीरज विक्रम आणि श्रीदिशा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.
चित्रपटाच्या नावावरून लक्षात आलं असेलच की ही गोष्ट एका सर्प रूपातील राक्षसाला मिळालेला शाप आणि छोटा भीम यांच्यावर आधारित आहे. दमयान हा एक सर्प रूपातील राक्षस असतो ज्याने सोनापूर राज्यात हाहाकार माजवलेऋआ असतो. अमरत्व मिळवण्यासाठी त्याने तेथील प्रजेला वेठीस धरलेलं असतं आणि म्हणूनच त्याच्या गुरूंकडून त्याला शाप मिळतो की तो जमीनीखाली गाडला जाईल आणि एक हजार वर्षे तिथेच अडकून राहील जोपर्यंत कोणी निष्पाप असा वीर योद्धा तिथून त्याला बाहेर काढत नाही. आणि त्याला बाहेर काढण्यासाठीच दमयान चे साथीदार ढोलकपूरचे राजा इंद्र वर्मा यांना फसवून छोट्या भीमच्या मदतीने दमयान ला बाहेर काढतात. परंतु बाहेर आल्यानंतर दमयान अधिक रौद्र रूप धारण करून भेटेल त्याला साप बनवायच्या मागे लागतो. आता छोटा भीम आणि त्याचे साथीदार मिळून या दमयान ला कसं वठणीवर आणतात हे या चित्रपटात पहायला मिळतं. लहान मुलांसाठी हा चित्रपट चांगला आहे.
चित्रपटात बऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवते. कलाकारांचा अभिनय सुद्धा नाटकी वाटतो. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. ॲनिमेशन, व्हिएफएक्स इफेक्ट्स ठिकठाक आहेत. चित्रपटाची कथा जास्तच लांबवली आहे त्यामुळे बघताना थोडा कंटाळा येऊ शकतो. परंतु लहान मुलांसाठी मनोरंजन म्हणून ठीक असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


८. डेढ़ बीघा जमीन (Dedh Bigha Zameen)
२०२४. नाटक, परिवार. १ तास ४० मिनिटे. [ यु / ए ]
लेखक पुलकित
दिग्दर्शकपुलकित
कलाकारप्रतीक गांधी,खुशाली कुमार,दुर्गेश कुमार,प्रसन्ना बिष्ट
निर्माताशैलेश सिंह, हीतेश ठक्कर
प्रदर्शित तारीख३१ मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

डेढ़ बीघा जमीन” चित्रपट समीक्षा :-

आपल्या भारतात एखाद्याच्या जमीनीवर कब्जा करणं ही काही नवीन किंवा मोठी गोष्ट नाही. मोठमोठे नेते सुद्धा गरीबांच्या जमीनी हडप करत असतात परंतु बिचारा गरीब शेतकरी नेत्यांविरोधात किंवा यंत्रणेविरूद्ध एकटा लढू शकत नाही. परंतु या चित्रपटातील नायक अनिल आपल्या हक्काच्या दिड बीघा जमीनीसाठी एका विधायका विरोधात कसा संघर्ष करतो हे दाखवलं आहे.
जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला “डेढ़ बीघा जमीन” या चित्रपटाची कथा पुलकित यांनी लिहीली असून दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलं आहे. उत्तर प्रदेश मधील अनिल हा आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या लहान बहीणीचं लग्न कसं करावं या चिंतेत असताना तो आपली जमीन विकण्याचा निर्णय घेतो. परंतु या दरम्यान त्याला समजते की त्याची ही जमीन एका एमएलए ने हडप केलीय. परंतु डगमगून न जाता अनिल त्या विरोधात आवाज उठवतो. आता त्याला त्याची जमीन मिळते की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा तशी जुनीच असल्याने फार काही मनोरंजक असं वाटत नाही. प्रतिक गांधी हा एक उत्कृष्ट अभिनेता असून त्याने उत्तम काम केलं आहे परंतु अख्या चित्रपटात फक्त आणि फक्त प्रतिकलाच बघतोय असं वाटतं. इतर कलाकारांच्या भूमिका छोट्या आहेत. पुलकित यांचं दिग्दर्शन म्हणावं तेवढं खास नाही. एकंदरीत चित्रपट ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


९. हाऊस ऑफ लाईज (House of Lies)
२०२४. गुन्हेगारी, रोमांचक, सस्पेंस, ॲक्शन. १ तास २२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक अभिराज शर्मा
दिग्दर्शकसौमित्र सिंह
कलाकारसंजय कपूर, रितूराज सिंह,मीर सरवार
निर्माताहसन खान
प्रदर्शित तारीख३१ मे २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“हाऊस ऑफ लाईज” चित्रपट समीक्षा :-

आजकाल बरेच चित्रपट सरळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतात. एका दृष्टीने ते बरं असं म्हणायची वेळ येते कारण असे चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघून पश्चात्ताप होण्यापेक्षा हे बरं. असाच एक ठिकठाक असा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे फार कथा सांगणं योग्य नाही. परंतु कथा अर्थातच एक हत्या झाली आहे आणि त्याचा पाठपुरावा करणारी आहे. अल्बर्ट पिंटो(रितूराज सिंह) नावाच्या एका माणसाचा खुन झाला असून पस्तीस करोड रुपये गायब झालेले आहेत. आता हा खुन कोणी पैशांसाठी केला आहे की अजून कोणत्या कारणासाठी हे शोधण्यासाठी राजवीर सिंह(संजय कपूर) या क्राईम ब्रॅंचच्या एका अतिशय हुशार ऑफीसरची नेमणूक करण्यात आली आहे. आता राजवीर खुन्याचा शोध लावतो की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
रितुराज सिंह यांनी अभिनय उत्तम केला आहे. दुर्दैवाने ते आता या जगात नाहीत. हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. संजय कपूर ने चांगला अभिनय केला आहे. काही गोष्टींची त्रुटी चित्रपटात जाणवते. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांचा इतका भरणा वाढलाय की आता प्रेक्षकांना आधीच कळतं की शेवट काय असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट कमी पडतो. परंतु ज्यांना सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बघायला आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट ठीक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघायला जाताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *