मे २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | List of Marathi Movies released in May 2024
मे २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जुलै 14, 2024 | 07:23 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आज या लेखात आपण मे २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

१. नाच गं घुमा (Naach Ga Ghuma) |
लेखक | मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी |
दिग्दर्शक | परेश मोकाशी |
कलाकार | मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकूळ |
निर्माता | स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई |
प्रदर्शित तारीख | १ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“नाच गं घुमा” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या प्रमोशनवरून हा चित्रपट झिम्मा किंवा बाईपण भारी देवा अशा धाटणीचा आहे असं वाटत असेल तर चुकीचं आहे. हा चित्रपट महीला प्रधान असला तरीही एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा आहे. आजकाल नवरा बायको दोघेही कामाला बाहेर पडतात त्यामुळे त्यांना घरी काम करायला बाई हवी असते परंतु हवी तशी “कामवाली बाई” सापडणं म्हणजे दिव्य. या सगळ्यात आपण या बायकांचे किती चोचले, किती नखरे असे ताशेरे ओढून मोकळे होतो परंतु त्यांची सुद्धा एक बाजू असते हे मात्र लक्षात घेत नाही. दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी हिच बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत नोकरी करणाऱ्या जोडप्यांची काम, घर आणि मुलं यात होणारी तारांबळ दाखवली आहे.
कथा मुख्यपणे राणी(मुक्ता बर्वे) आणि आशाताई (नम्रता संभेराव) यांच्याभोवती फिरते. राणी आणि आनंद (सारंग साठ्ये) हे दोघं नोकरी करणारे. त्यांच्या घरी कामाला येणारी राणी ही घरातील कामे आणि राणीची मुलगी सायली हीला सांभाळणं, शाळेत सोडणं ही कामं करत अहते. परंतु तिला कधी यायला उशीर झाल्यावर किंवा अचानक सुट्टी घेतल्याशर राणी आणि आनंद ची काय तारांबळ उडत असते. अशाच एका कारणावरून शेवटी आशाबाई ला राणी कामावरून काढून टाकते परंतु तेव्हा राणी आणि आनंद चे जास्त हाल होतात. अर्धा चित्रपट यातच गेला आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवसांनी राणी आशाला परत बोलवते. परंतु त्यानंतर पुन्हा असं काहीतरी घडतं की राणी पुन्हा तीला कामावरून काढून टाकते. आता ते काय होतं.? आशाबाई पुन्हा येते का? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
या चित्रपटाच्या निमित्ताने घरकाम करणाऱ्या स्त्रियांना समाजात काय स्थान किंवा मान दिला जातो हे परेश मोकाशी यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. घरकाम करत असली, अडाणी असली तरी ती माणसं आहेत हे इपण सोयीस्कररीत्या विसरून गेलो आहोत हे जाणवतं. परेश मोकाशी यांनी हा चित्रपट आधीच्या चित्रपटांपेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. मुक्ता बर्वे अभिनयाची राणी आहेच परंतु यावेळी तुम्ही प्रेमात पडाल ते नम्रता संभेराव हिच्या. तिने साकारलेली आशा ही अतिशय चपखल आणि परफेक्ट आहे. काही ठिकाणी पटकथा रेंगाळते परंतु एकंदर चित्रपटाचा वेग चांगला असल्याने ते फार जाणवत नाही. प्रत्येकाने जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२. स्वरगंधर्व सुधीर फडके (Swargandharv Sudhir Phadke) |
लेखक | योगेश देशपांडे |
दिग्दर्शक | योगेश देशपांडे |
कलाकार | सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सुखदा खांडकेकर, सागर तळाशीकर, आदिश वैद्य |
निर्माता | सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे |
प्रदर्शित तारीख | १ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“स्वरगंधर्व सुधीर फडके ” चित्रपट समीक्षा :-
आपल्या सगळ्यांनाच माहीत असलेले सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके म्हणजेच रसिकांचे लाडके बाबूजी यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाची कथा पटकथा संवाद या सगळ्याच बाजू योगेश देशपांडे यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळल्या आहेत.
चित्रपटाबद्दल सांगायचं झालं हा एक अतिशय सुंदर असा सांगितिक सुरेल प्रवास आहे जो कलेची आवड असणाऱ्या प्रत्येकाने जरूर अनुभवायला हवा. गदीमा सोबत केलेले गीतरामायण असो किंवा “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” यांसारख्या असंख्य गाण्यांनी आपल्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, त्या श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचा जीवनपट उलगडताना अनेक बड्या मंडळीची मांदियाळी चित्रपटात बघायला मिळते. हेडगेवार, गदीमा, माणिक वर्मा, आशा भोसले ते अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छोट्या राम फडकेसोबत झालेली भेट हे सारं चित्रपटात पहायला मिळतं. सगळ्या कलाकारांनी अतिशय सुंदर आणि उत्तम असा अभिनय केला आहे. चित्रपटाचं संगीत, गाणी हे कसं आहे हे शब्दात सांगणं अवघड. एकंदर चित्रपट अतिशय सुंदर आहे. सुनील बर्वे यांनी सुधीर फडके यांची भूमिका अगदी जीवंत केली आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
३. रूद्र (Rudra) |
लेखक | अशोक कामले, सुनील मोटवानी |
दिग्दर्शक | अशोक कामले, सुनील मोटवानी |
कलाकार | सिद्धांत मोरे , दिपाली सय्यद, अनुप सिंह, माधुरी पवार, वीणा जगताप, निशिगंधा वाड |
निर्माता | अशोक कामले, दिपाली सय्यद |
प्रदर्शित तारीख | ३ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“रूद्र” चित्रपट समीक्षा :-
मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही, चित्रपटगृहात शो नाही म्हणून नेहमी तक्रार असते परंतु रूद्रा सारखे चित्रपट या परिस्थितीला जबाबदार असतात. असे दर्जाहीन चित्रपट बनवून निर्माते आपले पैसे वाया का घालवतात हा मोठा प्रश्नच आहे.
चित्रपटाची कथा तीच नेहमीची. गावातील अण्णा पाटील हा अतिशय क्रुर, विकृत ज्याने अख्ख्या गावाला वेठीस धरले आहे. जो गावातील पोरीबाळींची इज्जत कस्पटासमान लेखतो. त्याची दहशत इतकी आहे की गावकरी त्याला घाबरून जगत असतात. आणि याच अण्णा ला संपवायला आणि गावाला वाचवायला आपला हीरो अर्थात रूद्र येतो. त्या गावातील एका तरूणाला अण्णाने ठार मारल्यावर त्याची बहीण(दिपाली सय्यद) ही शपथ घेते की खुनाचा बदला घेईपर्यंत ती केस बांधणार नाही. ही शपथ बघून हसावं की रडावं हा प्रश्न पडू शकतो. चित्रपटातील संवाद इतके हास्यास्पद आहेत की विनोदी चित्रपट असल्यासारखं हसून हसून पुरेवाट होऊ होते.
अतिशय निकृष्ट दर्जाची कथा पटकथा संवाद असलेला हा बघू नका असाच सल्ला आम्ही देऊ. काही कलाकारांचा अभिनय चांगला आहे. बाकी चित्रपटात एकही गोष्ट नाही की ज्यासाठी चित्रपट बघावा. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
४. अप्सरा (Apsara) |
लेखक | चंद्रकांत पवार |
दिग्दर्शक | चंद्रकांत पवार |
कलाकार | सुयश झुंजुरके, अक्षता पाडगावकर, मयुरी आव्हाड, मेघा घाडगे,शशांक शेंडे |
निर्माता | सुनील भालेराव |
प्रदर्शित तारीख | १० मे २०२४ |
भाषा | मराठी |
“अप्सरा” चित्रपट समीक्षा :-
अप्सरा हा १० मे रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट चंद्रकांत पवार यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे. प्रेमाचा त्रिकोण असलेली ही कथा आतापर्यंत आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहीलेली आहे. त्यामुळे वेगळं असं या चित्रपटात काही पहायला मिळत नाही.
सिद्धू हा एक झोपडपट्टीत राहणारा कथेचा नायक आहे. ज्याच्यावर त्याच्याच वस्तीत राहणारी रिंकू मनापासून प्रेम करत असते परंतु सिद्धूच्या मनात त्याच्या ड्रीम गर्लची एक वेगळी छबी असते. आणि त्याला त्याची ड्रीम गर्ल मयुरीच्या रुपात एका ॲक्सिडंट मध्ये भेटते ज्यामध्ये सिद्धू तिला वाचवतो. त्यानंतर अशा अजून दोन तीन घटना घडतात ज्यात सिद्धू मयुरी ला वाचवतो. आता मयुरी सुद्धा त्याच्या प्रेमात पडते की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. चित्रपटात मेघा घाटगे हीने आमदार रत्ना ताई ही भूमिका साकारली आहे. आमदार होण्यासाठी सिद्धूने मदत केलेली असते. त्यामुळे त्या सिद्धूला मानत असतात. आणि याच गोष्टीचा राग त्यांच्या भावाला असतो. आता हे राजकारण आणि प्रेमाचा त्रिकोण या सगळ्याचं काय कनेक्शन आहे हे चित्रपट बघीतल्यावर कळेल.
तीच तीच नेहमीची कथा असल्यामुळे नवीन काही बघायला मिळत नाही. पटकथा आणि संवाद सुद्धा सुमारच आहेत. दिग्दर्शन ठिकठाक आहे. सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. बाकी चित्रपटात खास काही नाही. काही कलाकार सोडले तर बाकी कलाकारांचा अभिनय चांगला आहे. एकंदर चित्रपट सुमार आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
५. मनोमनी (Manonmani) |
लेखक | अविनाश कोनगोळे |
दिग्दर्शक | संजय देवकर |
कलाकार | मिलिंद जाधव, प्रांजली कांजरकर, संजय देवकर, रोहीत परशुराम |
निर्माता | अविनाश कोनगोळे |
प्रदर्शित तारीख | १० मे २०२४ |
भाषा | मराठी |
“मनोमनी” चित्रपट समीक्षा :-
१० मे रोजी प्रदर्शित झालेला मनोमनी हा चित्रपट संजय देवकर यांनी दिग्दर्शित केला असून अविनाश कोनगोळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे. कदाचित म्हणूनच त्यांनी स्वतः या चित्रपटाची निर्मिती करण्याचं धाडस केलं असावं. आजकाल कित्येक मराठी चित्रपट येतात, फ्लॉप होतात आणि जातात. आणि म्हणूनच प्रेक्षकांना या चित्रपटांबद्दल काहीच माहिती नसते. अशा चित्रपटांपैकीच मनोमनी हा चित्रपट.
कथा नेहमीचीच. प्रेमाचा त्रिकोण. एक नायक, दोन नायिका. एक भुतकाळ तर एक वर्तमान. विरू नावाचा हा नायक एका गुंडासाठी काम करत असतो परंतु अर्थात नायिकेला हे माहीत नसतं. त्याचा खूप जवळचा मित्र त्याच्या चांगल्या वाईट काळात नेहमी त्याच्यासोबत असतो. नायिकेला कळतं का की विरू नक्की काय काम करतो.? की चित्रपटात अजूनच वेगळा काही ट्विस्ट येतो हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु तुमचा अमूल्य वेळ वाचवण्यासाठी हा चित्रपट बघू नये.
कथा पटकथा संवाद अगदीच सुमार आहे. दिग्दर्शन सुद्धा खास नाही. कलाकार सुद्धा नवखे असल्याने अभिनय नाटकी वाटतो. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
६. कर्मविरयण (Karmavirayan) |
लेखक | अनिल सपकाळ, धनंजय भावलेकर |
दिग्दर्शक | धनंजय भावलेकर |
कलाकार | किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक |
निर्माता | ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि |
प्रदर्शित तारीख | १७ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“कर्मविरयण” चित्रपट समीक्षा :-
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत अनेक समाजसुधारकांनी आपलं योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा काही समाजसुधारक असे होते ज्यांनी बरेच प्रयत्न करून, संघर्ष करून समाजाला शिक्षण देण्याचं काम केले आहे. असेच समाजातील वंचित आणि बहुजन, गरीब वर्गातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
एका पाटील कुटुंबात जन्मलेल्या भाऊराव पाटील यांना जातीवाद, अस्पृश्य समाजावर होत असलेला अन्याय याबद्दल लहानपणापासून चिड होती त्याविरोधात त्यांनी आवाज देखील उठवला होता. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या आणि त्यांच्या सहवासात राहून त्यांचा वारसा चालवणाऱ्या तसेच महात्मा फुले यांना आदर्श मानणाऱ्या भाऊराव पाटील यांनी उपेक्षित समाजाला शिक्षण देण्यासाठी लयत शिक्षण संस्था स्थापन करेपर्यंत आणि केल्यावर सुद्धा त्यांना काय काय सहन करावं लागलं हे या चित्रपटात पहायला मिळतं.
या चित्रपटात भाऊराव पाटील ही भूमिका किशोर कदम यांनी साकारली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट यांचा अभिनय उत्तम आहे. देविका दफ्तरदार यांचा सहज सुंदर नैसर्गिक अभिनय नेहमीच भावणारा असतो. यांनी दिग्दर्शकाने कलाकारांची अचूक निवड केली असल्यामुळे सगळ्यांकडून नैसर्गिक अभिनय बघायला मिळतो. आताच्या पिढीला दाखवण्यासारखा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
७. भुंडीस (Bhundis) |
लेखक | सोमनाथ संभाजी तांबे |
दिग्दर्शक | वैभव राजेंद्र सुपेकर |
कलाकार | यशराज डिंबळे, भरत शिंदे, माणिक काळे , अद्वैत दळवी, आशुतोष वाडेकर |
निर्माता | दत्ता बापूराव दळवी |
प्रदर्शित तारीख | १७ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“भुंडीस” चित्रपट समीक्षा :-
सोमनाथ तांबे यांनी लिहिलेल्या या कथेत विशेष दम नाही. या कथेवर आधारित किंवा या विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट मराठीत येऊन गेले आहेत. वैभव सुपेकर यांचं दिग्दर्शन चांगलं असून सुद्धा सामान्य कथा आणि संवाद तेवढे परिणामकारक नसल्याने हा चित्रपट काही खास मनोरंजन करत नाही.
एका गावातील बाळासाहेब ऊर्फ भुंडीची ही गोष्ट आहे. भुंडीच्या कुटुंबाला एक जमीन विकत घ्यायची आहे परंतु नेमकी तीच जमीन गावातील एक बडी राजकरणी आसामी आहे त्यांना देखील हवी आहे. खरं तर त्याचा त्या जमिनीवर डोळा आहे. आता ती जमीन कोणाला मिळते हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
एका गंभीर आणि महत्वाच्या विषयावर बनवलेला हा चित्रपट अजून प्रभावी झाला असता जर पटकथा आणि संवाद प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे असते. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. संगीत, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी या सगळ्या गोष्टी ठिक आहेत. एकंदर बरा म्हणू शकतो असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
८. कासरा (Kaasra) |
लेखक | रवी नागपुरे, महेंद्र पाटील |
दिग्दर्शक | विकास विलास मिसाळ |
कलाकार | गणेश यादव, स्मिता तांबे, प्रकाश धोत्रे, जनमेजय तेलंग |
निर्माता | रवी नागपुरे |
प्रदर्शित तारीख | २४ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“कासरा” चित्रपट समीक्षा :-
कासरा हा चित्रपट रवी नागपुरे यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाची निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा सुद्धा महेंद्र पाटील यांच्या सोबत लिहिली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांचं आयुष्य, पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती मधील फरक या सगळ्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. या आधी सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे बरेच चित्रपट आले आहेत. हा चित्रपट सुद्धा त्या चित्रपटासारखाच आहे.
शिवा हा एक शेतकरी कुटुंबातील तरूण आहे जो शिक्षण घेत असून त्याने शेती न करता नोकरी करावी अशी त्याच्या वडीलांची आणि घरच्यांची इच्छा आहे. परंतु शिवाला मात्र आपल्या शेती या पारंपरिक व्यवसायाला हातभार लावून आधुनिक तंत्रज्ञान वापरून, नवीन प्रयोग करून शेती करायची आहे. त्याची प्रेयसी मंजीरी हीची सुद्धा इच्छा आहे की शिवा ने नोकरी करावी. मंजीरीचे वडील हे राजकारणी व्यक्तीमत्व असून नेहमीप्रमाणे ते खलनायकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी शिवाला एक बिझनेस प्रपोजल दिलेलं आहे परंतु गावातील उत्तम नावाच्या शेतकऱ्याने बटाट्याचं पिक न आल्याने आत्महत्या केल्यामुळे शिवाचा शेती करण्याचा निर्धार अजून ठाम बनतो. त्याला सगळ्यांना हे दाखवून द्यायचं असतं की आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. आता शिवा हे साध्य करतो का.? त्याचं आणि मंजीरीचं लग्न होतं का.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा नेहमीचीच असल्याने खास मनोरंजन होत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या हा एक महत्त्वाचा मुद्दा असला तरी सतत त्याच प्लॉटवर त्याच त्याच पटकथा मनोरंजन करत नाही. स्मिता तांबे हीचा अभिनय चांगला आहे. कथेचा नायक जनमेजय याचा अभिनय नाटकी वाटतो. गणेश यादव यांचा अभिनय चांगला आहे. दिग्दर्शन ठिकठाक आहे. एकंदर चित्रपट बरा आहे. परंतु बघाच असं सांगण्या इतपत खास नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
९. डिअर लव्ह (Dear Love) |
लेखक | ऋषिकेश तुरई |
दिग्दर्शक | अमरनाथ खराडे, ऋषिकेश तुरई |
कलाकार | अमरनाथ खराडे, किरण ढाणे, यशोधन गडकरी, अभिषेक वेरणेकर |
निर्माता | अमरनाथ खराडे |
प्रदर्शित तारीख | २४ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“डिअर लव्ह” चित्रपट समीक्षा :-
पुन्हा एकदा एक नवीन प्रेमकथा घेऊन अमरनाथ खराडे हा एक चित्रपट घेऊन आला आहे. ऋषिकेश तुरई याने लिहिलेल्या कथेवर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे हे तुमच्या चित्रपट बघताना लक्षात येईलच.
ग्रामीण भागातील ही कथा आहे. विराज हा तरुण आर्मी मध्ये जाण्याचं स्वप्न बघत आहे, आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न देखील करत आहे. परंतु अचानक त्याच्या आयुष्यात मीरा येते आणि त्याचं आयुष्य बदलून जातं. नवीन नवीन प्रेमात पडलेल्या विराजला बाकी कशाचं भान नसतं. आपल्या स्वप्नापासून सुद्धा तो दूर जातो. आणि इथेच कथेला वळण मिळतं. पुढे जाऊन असं काहीतरी होतं की मीरा आणि विराज एकमेकांपासून दुरावतात. आता नक्की काय होतं ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा प्लस पॉइंट म्हणजे लोकेशन्स. सिनेमॅटोग्राफी इतकी उत्तम आहे की प्रत्येक लोकेशन च्या तुम्ही प्रेमात पडाल. बाकी चित्रपटाची कथा विषय काही नवीन नाही. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. परंतु एक कलाकृती म्हणून मनोरंजन करण्यासाठी बऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवते. प्रेमकथा आवडत असतील तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
१०. शक्तीमान (Shaktiman) |
लेखक | प्रकाश कुंटे |
दिग्दर्शक | प्रकाश कुंटे |
कलाकार | आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव, वैदेही आनंद, ईशान कुंटे |
निर्माता | प्रकाश कुंटे |
प्रदर्शित तारीख | २४ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“शक्तीमान” चित्रपट समीक्षा :-
लहान मुलांना सुपरहिरो बद्दल एक वेगळंच आकर्षण असतं. कित्येकदा त्यांना ते स्वतः सुपरहिरो आहेत असं वाटत असतं किंवा आपल्या वडीलांना ते सुपरहिरो समजत असतात. खरं तर प्रत्येक चांगल्या माणसात एक सुपरहिरो दडलेला असतो. ही गोष्ट सुद्धा अशीच एका शक्तीमान या सुपरहीरोची आहे.
सिद्धार्थ(आदीनाथ कोठारे) हा एक आयटी इंजिनियर असतो. तो त्याची पत्नी सीमा(स्पृहा जोशी) आणि मुलगा इशान(इशान कुंटे) यांच्यासोबत अतिशय आनंदात असतो. त्यांचं छोटंस असं सुखी त्रिकोणी कुटुंब असतं. इशानला सुपरहीरो बद्दल आकर्षण असतं त्यामुळे सिद्धार्थ सुद्धा त्याला सुपरहिरो च्या गोष्टी सांगत असतो. परंतु इशानला जास्त छान वाटतं जेव्हा त्याचे वडील एका सुपरहिरो प्रमाणे वागतात. सिद्धार्थ च्या ऑफिस मधील तानाजी या एका कामगाराच्या मुलीवर हृदयरोपण सारख्या उपचारासाठी पैसे गोळा करण्यासाठी सिद्धार्थ एखाद्या सुपरहिरो सारखे प्रयत्न करतो. खरं तर यामुळे त्याच्यात आणि सीमा मध्ये मतभेद निर्माण होतात. आता ते का होतात.? सीमाचा काय गैरसमज होतो.? तानाजी ची मुलगी वाचते का.? हे सगळं जाणून घेण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
प्रकाश कुंटे यांनी एक चांगली कथा लिहिली आहे परंतु मध्ये मध्ये ती भरकटलेली वाटते. भावनिक प्रसंग तेवढ्या सक्षम पणे मांडले गेले नाही असं वाटतं. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. कलाकार उत्तम आहेत परंतु प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनामुळे बरेच प्रसंग प्रभावी वाटत नाहीत. संगीत सुद्धा अजून चांगलं असतं तर चित्रपट परिणामकारक झाला असता. परंतु एकदा मनोरंजन म्हणून लहान मुलांसोबत बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
११. होय महाराजा (Hoy Maharaja) |
लेखक | संचित बेद्रे |
दिग्दर्शक | शैलेश शेट्टी |
कलाकार | प्रथमेश परब,संदीप पाठक,अभिजीत चव्हाण,समीर चौघुले,वैभव मांगले,अंकिता लांडे |
निर्माता | मोहसीन खान, महेश शेट्टी |
प्रदर्शित तारीख | ३१ मे २०२४ |
भाषा | मराठी |
“होय महाराजा” चित्रपट समीक्षा :-
कलाकारांची नावं वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा एक धमाल विनोदीपट असणार आहे. समीर चौघुले, वैभव मांगले, संदीप पाठक, प्रथमेश परब या सगळ्याच कलाकारांची स्वतःची अशी एक विशिष्ट विनोद शैली आहे. प्रेक्षकांना हे सगळेच कलाकार प्रचंड आवडतात आणि आता तर या सगळ्यांना एकत्र पडद्यावर बघणं म्हणजे हास्याची मेजवानी आहे.
कथा साधी सोपी पण गोंधळाची आहे. आपण बऱ्याचदा काहीतरी लपवायला खोटं बोलतो आणि ते खोटं लपविण्यासाठी परत परत खोटं बोलत राहतो आणि मग सगळा गोंधळ निर्माण होतो. असंच काहीसं या चित्रपटात झालेलं आहे. रम्या म्हणजे प्रथमेश इलेक्ट्रिकल डिप्लोमा करून आपल्या मामाकडे नोकरी निमित्त रहायला आलेला आहे. मॅनेजरच्या नोकरीचं स्वप्न बघणारा रम्या एका शिपायाची नोकरी करत असतो परंतु आपल्या मामाला मात्र मॅनेजर ची नोकरी करतोय असं खोटं सांगत असतो. यातूनच गैरसमजातून रम्या आणि आयेशा यांची प्रेमकथा सुरू होते. परंतु असं काहीतरी घडतं की रम्या ला त्याचा बॉस जिग्नेश (समीर चौघुले) नोकरी वरून काढून टाकतो. एकीकडे त्याचा मामा रशिद भाईकडून(संदिट पाठक) पैसे घेऊन फसलेला असतो. आणि रशिदला काही करून पैसे हवे असतात. याच सगळ्यावर उपाय म्हणून हे तिघे मिळून चोरीचा प्लॅन आखतात. आता त्यांचा प्लॅन यशस्वी होतो का.? की अजून काही गोंधळ निर्माण होतो.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
हा चित्रपट बघताना लॉजिक वैगरे बाजूला ठेवून पाहीला तर तुम्ही एंजॉय करू शकता. सगळे विनोदाचे बादशहा एकत्र आल्यामुळे हा चित्रपट तुमचं नक्कीच मनोरंजन करतो परंतु परंतु तेवढंच असून चालत नाही. कथा पटकथा नाटकी वाटत असल्यामुळे बऱ्याचदा “काहीही” अशी प्रतिक्रिया येते. दिग्दर्शक शैलेश शेट्टी यांचा प्रयत्न चांगला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.