HomeFilmsHindi

जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | List of Hindi Movies released in July 2024

जुलै २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

Written by : के. बी.

Updated : ऑगस्ट 31, 2024 | 12:05 AM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात जुलै महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

List of Hindi Movies released in July 2024 Movie review and information
१. किल (Kill)
२०२४. ॲक्शन, थ्रिलर. १ तास ४६ मिनिटे. [A]
लेखक निखिल नागेश भट्ट, आयशा सैयद
दिग्दर्शकनिखिल नागेश भट्ट
कलाकारलक्ष्य, राघव जुयाल, तान्या मानिकताला, अभिषेक चौहान, आशीष विद्यार्थी, हर्ष छाया,अद्रिजा सिन्हा
निर्मातागुनीत मोंगा कपूर, अचिन जैन, करण जौहर, अपूर्व मेहता
प्रदर्शित तारीख५ जुलै २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

“किल” चित्रपट समीक्षा :-

निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित किल हा चित्रपट नावाप्रमाणेच चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येकाला कील करत सुटलेल्या अति रक्तरंजित कथेवर आधारित आहे. ॲनिमल चित्रपट जर तुम्ही बघितला असेल आणि तो तुम्हाला खूप हिंसक, बीभत्स, रक्तरंजित वाटला असेल तर कील हा चित्रपट त्याच्या कितीतरी पटीने जास्त बीभत्स आणि रक्तरंजित दृश्यांनी भरलेला आहे. किंबहुना या चित्रपटात संवाद कमी आणि ॲक्शन सीन्स जास्त आहेत. पण तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे.
अमृत(लक्ष्य) हा चित्रपटाचा हिरो एक NSG कमांडो असून तो एका मिशनवर असताना त्याची प्रेयसी तूलिका (तान्या) हीचा साखरपुडा दुसऱ्यासोबत लावून दिला जातो. अमृत तिला भेटण्यासाठी ती ज्या ट्रेन ने वडिलांसोबत प्रवास करत असते त्या ट्रेनने आपल्या मित्राला घेऊन जातो आणि तिथे तिला प्रपोज करतो. हे सगळं चालू असतानाच चित्रपटाचा सायको खलनायक फणि (राघव जुयाल) तिथे आपल्या टोळीसोबत येतो. त्याच्यासोबत त्याचे वडील बेनी (आशीष विद्यार्थी) असतात. हे सगळे ट्रेन लुटण्यासाठी आलेले असतात. परंतु सुरूवातच तूलिकापासून झाल्यामुळे चित्रपटाचा हिरो अमृत आणि फणी यांची जी मारामारी सुरू होते ती प्रेक्षकांना चित्रपटाच्या शेवटपर्यंत खिळवून ठेवते. डास मारल्यासारखे माणसं अतिशय हिंसक पद्धतीने मारली जातात‌. आता या सगळ्यात अमृत आणि तुलिका यांचं काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
लक्ष्य याला ॲक्शन सीन करताना बघून अजिबात वाटत नाही की हा याचा पहिला चित्रपट आहे. आणि राघव बद्दल तर काय बोलावं. पठ्ठ्या जेवढा भारी डान्स करतो तेवढीच खतरनाक ॲक्टिंग त्याने या चित्रपटात केली आहे. प्रमोशन कमी पडल्यामुळे कदाचित चित्रपट फार लोकांना माहिती नाही. तुम्हाला जर ॲक्शनपट आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. परंतु जर तुम्ही संवेदनशील मनाचे असाल चुकून सुद्धा तिकडे वळू नका. संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण एका ट्रेनमध्ये करण्यात आलं आहे त्यामुळे इतके खतरनाक ॲक्शन सीन्स शूट करणं हे एक आव्हान होतं परंतु ते आव्हान स्वीकारून दिग्दर्शक निखिल यांनी चांगला चित्रपट बनवला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


२. वाइल्ड वाइल्ड पंजाब (Wild Wild Punjab)
२०२४. विनोदी. १ तास ५० मिनिटे. [U/A]
लेखक लव रंजन, हरमन वडाला, संदीप जैन
दिग्दर्शकसिमरप्रीत सिंह
कलाकारवरुण शर्मा, सनी सिंह, जस्सी गिल, मनजोत सिंह,पत्रलेखा, इशिता राज, राजेश शर्मा, गोपाल दत्त.
निर्मातालव रंजन और अंकुर गर्ग
प्रदर्शित तारीख१० जुलै २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“वाइल्ड वाइल्ड पंजाब” चित्रपट समीक्षा :-

वाइल्ड वाइल्ड पंजाब हे नाव वाचून तुम्हाला वाटत असेल या चित्रपटात हिंसाचार, ड्रग्स, नशा करणारे तरुण असं काही असेल तर असं नाहीय. म्हणजे ड्रग्स, नशा हे सगळं आहे कारण ते दाखविल्याशिवाय पंजाब दाखवू शकत नाही असं सगळ्याच दिग्दर्शक लोकांना वाटत असावं. तर मुद्दा हा की चित्रपट वाइल्ड नसून कॉमेडी आहे. लव रंजन यांनी निर्मिती आणि लेखन केलं असून सिमरप्रीत सिंह यांनी दिग्दर्शन केले आहे.
पंजाब मधील चार मित्रांची ही गोष्ट आहे. खन्ने म्हणजेच राजेश खन्ना (वरुण शर्मा) याचा देवदास झालेला आहे इतका की तो जीव देण्याच्या गोष्टी करत आहे. त्यामुळे त्याचे बाकीचे मित्र त्याचं सांत्वन करायला सरसावले आहेत. गौरव जैन (जस्सी गिल),मान अरोड़ा (सनी सिंह) आणि हनी सिंह (मनजोत सिंह) हे तिघे त्याला सल्ला देतात की ज्या गर्लफ्रेंड ने‌ धोका दिला आहे तर आता तिच्या लग्नात जाऊन तिला “I am over to you” बोलून जब वी मेट स्टाइल मध्ये बदला घ्यायचा. आणि त्यासाठी ते पटियाला वरून पठाणकोट ला जायला बाय रोड निघतात. आता त्यांचा हा तीन तासांचा प्रवास कसा वाढतो, या प्रवासात काय काय गंमती जमती, अडचणी येतात. हे सगळं बघायला मिळतं. या प्रवासात नवीन ट्विस्ट येतात. आता ते काय हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
कॉमेडी असल्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे कमी लांबीचा असल्यामुळे चित्रपट पूर्ण बघू शकतो. खास असं चित्रपटात काही नाही. अभिनय, दिग्दर्शन ठिकठाक आहे. कॉमेडी म्हणून आणि घरी बघता येईल म्हणून बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३. सरफीरा (Sarfira)
२०२४. जीवनचरित्र. नाटक. २ तास ३५ मिनिटे. [U]
लेखक सुधा कोंगारा, शालिनी उषादेवी, पूजा तोलानी
दिग्दर्शकसुधा कोंगारा
कलाकारअक्षय कुमार, राधिका मदान, सीमा विश्वास, परेश रावल, आर शरतकुमार, कृष्णकुमार बालसुब्रमण्यम, इरावती हर्षे, प्रकाश बेलवाडी
निर्माताविक्रम मल्होत्रा, सुधा कोंगारा,सूर्या
प्रदर्शित तारीख१२ जुलै २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-

तमिळ हिरो सुर्या याच्या ‘सोरारई पोटरु’ या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. एका एक्स आर्मी ऑफिसरच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे, ज्यांनी स्वस्त दरात एअर लाइन्स सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं.
अक्षय कुमारचा रेकॉर्ड असू शकतो की त्याने सर्वाधिक बायोपिक केलेले आहेत. त्या लिस्ट मध्ये आता हा एक नवीन चित्रपट ॲड झाला. चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील वीर म्हात्रे या तरुणाची आहे. ज्याच्या वडिलांनी लेखणीतून क्रांती घडवून त्यांच्या खेड्यात वीज आणली तर तोच वारसा पुढे चालवत वीर सुद्धा क्रांतीकारी विचार घेऊन गावासाठी, लोकांसाठी आंदोलनं, मोर्चे हे सगळं करत असतो. अगदी गावात ट्रेन यावी म्हणुन सुद्धा त्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं असतं.
एअर फोर्स मध्ये भरती झालेला वीर खरा पेटून उठतो जेव्हा महाग विमान तिकीटामुळे त्याला आपल्या वडिलांचं अंतिम दर्शन घेता येत नाही. आणि त्याचमुळे तो ठरवतो की सामान्य लोकांना सुद्धा विमानसेवा वापरता आली पाहिजे त्यासाठी स्वस्त दरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी तो जीवाचं रान करतो. परंतु त्याच्या या प्रवासात अनेक अडचणी येतात, परेश गोस्वामी (परेश रावल) सारखे गुंड आडवे येतात. आता या सगळ्यावर मात करून तो‌ त्याचं स्वप्न पूर्ण करतो की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
रिमेक असल्यामुळे तुलना होणं साहजिक आहे. आणि सुपरस्टार सुर्या चा चित्रपट म्हटल्यावर अक्षय कुमार ने विचार करायला हवा होता. राधीका आणि परेश रावल यांनी उत्तम अभिनय केला आहे. बाकी कथा, विषय सगळं भारी आहे पण जर ओरिजनल पाहीला नसेल तरच हा चित्रपट तुम्हाला आवडेल. पण हा चित्रपट नुसताच कॉपी केल्यासारखा वाटतो. बघायचाच असेल तर ओरिजनल चित्रपट बघू शकता जो ॲमेझॉन प्राइम वर उपलब्ध आहे. बाकी माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


४. काकुदा (Kakuda)
२०२४. भयपट, विनोदी, रोमान्स, नाटक. १ तास ५६ मिनिटे. [U/A]
लेखक अविनाश द्विवेदी, चिराग गर्ग
दिग्दर्शकआदित्य सरपोतदार
कलाकाररितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा, साकिब सलीम, आसिफ खान, अरुण दुबे, सचिन विद्रोही, राजेंद्र गुप्ता
निर्मातारॉनी स्क्रूवाला
प्रदर्शित तारीख१२ जुलै २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-

मुंज्या चित्रपटाने महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातला होता. याच चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी तसाच काहीसा हॉरर कॉमेडी अशा धाटणीचा काकूदा हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. खरं तर या चित्रपटाचं चित्रीकरण खूप आधी झालं होतं परंतु काही कारणास्तव तो प्रदर्शित झाला नव्हता. त्यामुळे कदाचित आता तो झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मुंजा सारखीच या चित्रपटात सुद्धा एक भयकथा आणि एक काकूदा नावाचं भूत आहे. या गावात प्रत्येक घराला दोन दरवाजे आहेत. एक छोटा आणि एक मोठा दरवाजा. आणि अशी परंपरा आहे की दर मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजता घरातील सदस्यांनी घरात बसून आतून मोठा दरवाजा लावून घ्यायचा आणि छोटा दरवाजा उघडा ठेवायचा. ज्या घरात ही प्रथा मोडली जाते त्या घरातील पुरूषाला हा काकुदा धरतो म्हणजे त्याच्याशर ताबा मिळवतो. मग त्या पुरुषाच्या पाठीवर कुबड येऊन तेरा दिवसांत तो मरतो. तर होतं असं की सनी (साकिब सलीम) आणि इंदू (सोनाक्षी सिन्हा) हे दोघं एकमेकांवर प्रेम करत असतात. आणि ते दोघे पळून जाऊन लग्न करतात पण नेमका तो दिवस मंगळवार असतो. आणि सनीला छोटा दरवाजा उघडायला वेळ होतो. मग काय त्याच्या पाठीवर कुबड आल्यावर इंदू या सगळ्याचा पाठपुरावा करते आणि ते संकट पळवून लावण्यासाठी आपला मित्र घोस्ट हंटर’ व्हिक्टर म्हणजेच रितेश देशमुख याला पाचारण करते.
आता व्हिक्टर काकुदा ला पळवून लावतो का.? काकुदा म्हणजे नक्की कोण असतो.? तो असं का कलत असतो.? सनीचं पुढे काय होतं.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाची कथा बऱ्याचदा भटकते पण ककुदा सारखी परत जाग्यावर येते. रितेश, साकिबचा अभिनय ठिकठाक आहे तल सोनाक्षीने चांगला अभिनय केला आहे. बाकी चित्रपटात वॉव फॅक्टर काही नाही. हॉरर म्हणावा इतकी भीती वाटत नाही आणि कॉमेडी म्हणावा इतका चित्रपट हसवत नाही. टाईमपास म्हणून बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. बॅड न्यूज (Bad Newz)
२०२४. विनोदी, नाटक. २ तास २२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक इशिता मोइत्रा, तरुण डुडेजा, सुमीत व्यास
दिग्दर्शकआनंद तिवारी
कलाकारविक्की कौशल, एमी विर्क, तृप्ति डिमरी, शीबा चड्ढा, नेहा धूपिया, अनन्या पांडे
निर्माताकरण जौहर, अपूर्व मेहता, अमृतपाल सिंह बिंद्रा, आनंद तिवारी आदि
प्रदर्शित तारीख१९ जुलै २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“बॅड न्यूज” चित्रपट समीक्षा :-

“हुस्न तेरा तौबा तौबा” या विकी कौशलच्या गाण्याने सोशल मीडिया वर अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. या गाण्याने जेवढं लोकांना वेड लावलं त्या मानाने चित्रपट मात्र तेवढा खास नाही. आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा इशिता मोइत्रा, तरुण डुडेजा आणि सुमीत व्यास या तिघांनी मिळून लिहिली आहे.
मुळात कथाच तेवढी सक्षम नाही त्यामुळे दिग्दर्शन आणि चित्रपट ठिकठाक बनला आहे . विकी कौशल, तृप्ती डिमिरी आणि अ‍ॅमी विर्क यांचा या तिघांभोवती हा चित्रपट फिरतो. सलोनी (तृप्ती डिमिरी) ही एक शेफ आहे आणि तिला हॉस्पिटॅलिटी मधील मिराकी हा मानांकित पुरस्कार मिषवायचा आहे. एकीकडे तिची आई तिच्या लग्नाची घाई करत असते याच दरम्यान सलोनी आणि अखिल चढ्ढा(विकी कौशल) यांची ओळख होते. आणि ते दोघे लग्न करतात. परंतु काही दिवसांत सलोनी च्या लक्षात येतं की अखिल हा तिच्या साठी योग्य नाही. मग ती त्याला सोडून जाते आणि तिला तिचा बॉस गुरबीर पन्नूशी (अ‍ॅमी विर्क) भेटतो. आणि अर्थातच जे घडायला नको ते घडतं. परंतु चित्रपटात खरा ट्विस्ट येतो जेव्हा काही महिन्यांत सलोनी ला कळतं की ती आई होणार आहे. परंतु खरी मजा पुढे आहे. एका टेस्ट नुसार कळतं की तिच्या पोटात दोन बाळं असून एकाचा बाप अखिल तर एकाचा गुरबीर आहे. आता हे कळल्यावर ते दोघं सलोनी च्या मागे लागून तिची कशी काळजी घेतात जेणेकरून सलोनी त्यांना निवडेल हे मजेशीर पद्धतीने दाखवलं आहे.
आता सलोनी कोणाला निवडते, अशा प्रकारे एका वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्तींची बाळं पोटात असू शकतात का.? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर हा चित्रपट बघायला हवा. काही दिवसांत तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजे ॲमेझॉन प्राइम वर येईल तेव्हा बघू शकता. कथा अगदीच ओढून ताणून लिहीलेली आहे. विकी कौशल साठी चित्रपट बघू शकता. बाकी चित्रपटात खास असं काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


६. ॲक्सिडंट की कॉन्स्पिरेसी : गोध्रा (Accident or Conspiracy: Godhra)
२०२४. नाटक. २ तास १३ मिनिटे. [A]
लेखक एम के शिवाक्ष, वंशिका तोमर
दिग्दर्शकएम के शिवाक्ष
कलाकाररणवीर शौरी,मनोज जोशी, हीतू कनोडिया, देनिशा घूमरा, अक्षिता नामदेव, राजीव सुरती, गणेश यादव
निर्माताबी जे पुरोहित
प्रदर्शित तारीख१९ जुलै २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“ॲक्सिडंट की कॉस्परन्सी : गोध्रा” चित्रपट समीक्षा :-

साल २००२. अयोध्या वरून अहमदाबाद ला निघालेली साबरमती एक्स्प्रेस, बोगी नं. एस ६. हे सगळं वाचून लक्षात आलं असेल चित्रपट कोणत्या घटनेवर आधारित आहे. गोध्रा या स्टेशनवर ही ट्रेन थांबल्यावर जे घडलं ते अतिशय भयावह आणि थरकाप उडवणारं होतं. ‌ एस ६ या डब्याला आग लागून आत असलेले तब्बल ५९ प्रवासी जिवंत जळून मृत्यूमुखी पडले होते. याच दुर्दैवी घटनेवर आधारित “ॲक्सिडंट की कॉस्परन्सी : गोध्रा” हा चित्रपट असून एम के शिवाक्ष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
या ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी हे करसेवक होते म्हणजे जे अयोध्येला एका महायज्ञा साठी गेलेले होते. त्यामुळे ही घटना एक चुकून झालेला अपघात होता की तो एक सुनियोजित प्लॅन होता हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे आणि यावच चित्रपट आधारित आहे. सुरूवातीला एका कुटुंबातील भावनिक प्रसंग पहायला मिळतात आणि नंतर ट्रेनला आग लागल्यानंतर एकंदर कशा प्रकारे दंगल झाली. जवळपास हजार लोकं त्यात मृत्यूमुखी पडली, यावर दोन वेगवेगळ्या धर्मातील भांडणं, द्वेष त्यामुळे सामान्य माणसाला चुकायला लागलेली किंमत यावर प्रकाश टाकला आहे. चित्रपटातील कोर्ट ड्रामा बघण्यासारखा आहे.
खरं तर या घटनेवर अजून चांगल्या प्रकारे चित्रपट बनवता आला असता. काही ठिकाणी चित्रपट कमी पडल्यामुळे तेवढा प्रभावी वाटत नाही. परंतु ज्यांना सत्य घटनेवर आधारित चित्रपट बघायला आवडतात किंवा कोर्ट ड्रामा आवडतो त्यांना हा चित्रपट आवडेल. त्यामुळे एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


७. ब्लडी इश्क (Bloody Ishq)
२०२४. भयपट, थ्रिलर, नाटक, रोमान्स. २ तास १८ मिनिटे . [ यु / ए ]
लेखक महेश भट्ट
दिग्दर्शकविक्रम भट्ट
कलाकारअविका गोर, वर्धन पुरी, जेनिफर, श्याम किशोर, राहुल देव
निर्माताराकेश जुनेजा
प्रदर्शित तारीख२६ जुलै २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

” ब्लडी इश्क” चित्रपट समीक्षा :-

२६ जुलै रोजी डिस्नी हॉटस्टार वर प्रदर्शित झालेला ब्लडी इश्क हाज्ञेक हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर चित्रपट आहे. म्हणजे तसा बनवण्याचा प्रयत्न तरी केला आहे परंतु तीच तीच कथा, तोच सस्पेन्स बघून प्रेक्षक असशा चित्रपटांच्या वाटेला जात नाहीत .
चित्रपटाची कथा नेहा(अविका गोर) नावाच्या नायिकेभोवती फिरते जीची स्मृती गेलेली आहे. ती पाण्यात बुडाल्यामुळे तीची स्मृती गेलीय असं तिचा नवरा(वर्धन पुरी) तिला सांगतो. तीची स्मृती परत यावी म्हणून ते दोघं एका आयर्लंड वर एका बंगल्यात राहायला आलेले असतात परंतु तिथे तिला विचित्र अनुभव येत असतात. तिथे ते दोघं नसून एका मुलीचा आत्मा असावा असं तिला जाणवत असतं.
आता खरंच तिथे कोणाचा आत्मा असतो का.? असेल तर तो तिला काय सांगण्याचा प्रयत्न करत असेल की हे सगळं एक षडयंत्र आहे. हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. परंतु आमचं ऐकाल तर मा चित्रपट बघून वेळ वाया न घालवणे हे उत्तम. महेश भट्ट यांनी एक अतिशय घासून पुसून गुळगुळीत झालेली कथा लिहिली आहे. त्यात बोल्ड दृश्यांचा इतका भडिमार आहे की हा हॉरर चित्रपट आहे हे दिग्दर्शक विसरून गेले असावेत. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.

    तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघायला जाताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *