HomeFilmsHindi

सप्टेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा

सप्टेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा | List of Hindi Movies released in September 2024 and Movie Reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : सप्टेंबर 17, 2024 | 11:40 AM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

सप्टेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

List of Hindi Movies released in September 2024 & Movie review and information
१. विस्फोट(Visfot)
२०२४. गुन्हेगारी, थ्रिलर. २ तास १० मिनिटे. [A]
लेखक अब्बास दलाल, हुसैन दलाल
दिग्दर्शककूकि गुलाटी
कलाकाररितेश देशमुख, फरदीन खान, प्रिया बापट, क्रिस्टल डिसूजा शिंदे
निर्मातासंजय गुप्ता, अनुराधा गुप्ता
रिलीज तारीख६ सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

“विस्फोट” चित्रपट समीक्षा :-

६ सप्टेंबर २०२४ रोजी जिओ सिनेमा वर प्रदर्शित झालेला विस्फोट हा चित्रपट कूकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाच्या निमित्ताने फरदीन खान आणि रितेश देशमुख यांच्या गंभीर भूमिका बघायला मिळतात. हा चित्रपट क्राईम, सस्पेन्स, थ्रिलर जॉनरचा असून बऱ्यापैकी मनोरंजन करणारा आहे.
डोंगरीतील झोपडपट्टीत राहणारा एक टॅक्सी ड्रायव्हर शोएब(फरदीन खान) आणि एक पायलट आकाश(रितेश देशमुख) या दोघांच्या आयुष्यात चालणाऱ्या घडामोडी अशा पद्धतीने मांडल्या आहेत की एकमेकांना ओळखत नसून देखील संपूर्ण कथा या दोघांभोवती फिरते आणि दोघांनाही जोडणारा एक दुवा या गोष्टीत आहे. या कथेत शोएब कडून ताई नामक एका लेडी डॉनची अशी गोष्ट हरवलेली आहे ज्यामुळे ताईने शोएबला सळो की पळो करून सोडलेलं आहे तर एकीकडे आकाश आपल्या बायकोचं प्रेमप्रकरण रंगेहाथ पकडलं या टेन्शन मध्ये असतानाच त्याच्या मुलीचं अपहरण होतं. आता या दोन्ही गोष्टी कशा एकत्र जोडल्या जातात. मुलगी सापडते का.? शोएब कडून ताई ला माल मिळतो का.? आकाशच्या बायकोचं काय होतं.? हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
‌‌चित्रपटाची कथा शेवटपर्यंत खिळवून नक्कीच ठेवते. इतक्या रोमॅंटीक सीन्स ची गरज नसल्यामुळे ते अती झालेत असं वाटतं. काही ठिकाणी भंपक भडकपणा जाणवतो. परंतु चित्रपटाचा वेग चांगला आहे त्यामुळे जास्त कंटाळा येत नाही. ट्विस्ट आणि टर्न्स भरपूर आहेत त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत बघू शकता. प्रिया बापट, फरदीन, रितेश देशमुख या सगळ्याच कलाकारांनी अभिनय चांगला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. द बंकींगहम मर्डर्स (The Buckingham Murders)
२०२४. गुन्हेगारी, रहस्य, थ्रिलर. १ तास ४९ मिनिटे. [A]
लेखक असीम अरोड़ा, राघव राज कक्कड़, कश्यप कपूर
दिग्दर्शकहंसल मेहता
कलाकारकरीना कपूर,रणवीर बरार,प्रभलीन संधू, एश टंडन, कपिल रेडकर,राहुल सिद्धू , रुक्कू नाहर
निर्माताशोभा कपूर , एकता कपूर, करीना कपूर खान
रिलीज तारीख१३ सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“द बंकींगहम मर्डर्स ” चित्रपट समीक्षा :-

“द बंकींगहम मर्डर्स” हा एक रहस्यपट असून पुन्हा एकदा करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. क्रू, जानेजान या चित्रपटानंतर करीना कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढत आहेत आणि ती सुद्धा या अपेक्षा पूर्ण करताना दिसत आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच हत्या आणि आरोपीचा शोध अशा धाटणीची आहे. परंतु वेगळेपण म्हणजे ही कथा आपल्या भारतात घडत नसून ती यूके मध्ये घडत आहे. जसमीत(करीना कपूर) ही एक डिटेक्टीव असून तिच्याकडे एका सीख मुलाच्या अपहरण आणि हत्येची केस आलेली असते. सुरूवातीला ती ही केस घ्यायला नकार देत असते कारण काही दिवसांपूर्वी तीचा स्वतःचा मुलगा एका गोळीबारात मृत्यूमुखी पडलेला असतो. तिला ही केस सोडवत असताना आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे झालेलं दुःख, तीचं डिप्रेशन सतत जाणवत असतं. आता अशा परिस्थितीत ती ही केस सोडवते का हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
संपूर्ण चित्रपटात प्रत्येकावर आपण संशय घेत राहतो परंतु खूनी कोणी तरी भलताच निघतो हा सस्पेन्स ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. परंतु हा सस्पेन्स संपेपर्यंत दिसेल तो खूनी अशी अवस्था होते. रणवीर बरार ने एकही रेसिपी न सांगता सीन्स दिलेत हे विशेष. गंमतीचा भाग सोडला तर र रणवीर ने अभिनय चांगला केला आहे परंतु कथाच कमकुवत त्यामुळे फार काही अपेक्षा ठेवू शकत नाही. चित्रपट हिंदी कमी इंग्रजी जास्त अशा भाषेत आहे. संगीत ,गाणी नसती तरी बरं म्हणावं अशी आहेत. परंतु बाकी चित्रपट करीना साठी एकदा बघायला हरकत नाही असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


३. सेक्टर ३६ (Sector 36)
२०२४. थ्रिलर, नाटक. २ तास ३ मिनिटे. [A]
लेखक बोधायन रॉय चौधरी
दिग्दर्शकआदित्य निंबाळकर
कलाकारविक्रांत मैसी, दीपक डोबरियाल, दर्शन जरीवाला, आकाश खुराना
निर्मातादिनेश विजन, ज्योति देशपांडे
रिलीज तारीख१३ सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

“सेक्टर ३६” चित्रपट समीक्षा :-

नोएडा येथे २०९६ मध्ये घडलेल्या एका अमानवी हत्याकांडावर हा चित्रपट आधारित आहे. निठारी गावातील हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर अख्ख जग हादरलं होतं. विक्रांत मेस्सी आणि दीपक डोबरियाल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आहे.
गावातील लहान मुलं एकापाठोपाठ एक गायब होत असल्याची तक्रार पोलीस इन्स्पेक्टर रामचरण पांडे याच्याकडे दाखल होतात परंतु झोपडपट्टीत राहणारी मुलं पळून जात असावीत असा कयास बांधून तो या केसेस कडे दुर्लक्ष करतो. परंतु स्वतःची मुलगी गायब झाल्यावर मात्र हाच पोलिस अधिकारी खडबडून जागा होतो आणि केसच्या मुळाशी जाऊन पोहचतो. जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा जग का हादरलं असेल याची कल्पना करू शकतो. विकृतीचा कळस गाठणारं ते हत्याकांड होतं. आता रामचरण त्या विकृत गुन्हेगाराला कसं पकडतो वैगरे हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
अंगावर काटा आणणारी दृश्य आणि विकृती कितीही नकोशी वाटली तरी हे सत्यात घडलं होतं हे नाकारता येत नाही. दिग्दर्शक आदित्य निंबाळकर यांनी अतिशय संवेदनशीलपणे हा चित्रपट हाताळला आहे . श्रीमंत गरीब या दोन वर्गातील दरी सुद्धा दागवण्याचा प्रयत्न केला आहे. विक्रांत मेस्सी याला नकारात्मक भूमिकेत बघणं ही सुद्धा एक ट्रीट आहे. अतिशय ताकदीने ही भूमिका त्याने साकारली आहे तर त्याला तोडीसतोड दीपक डोबरियाल याने काम केलं आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या तर बाकी संपूर्ण चित्रपट एक मनोरंजक मेजवानी आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


४. बर्लिन (Berlin)
२०२४. थ्रिलर, ड्रामा. १ तास ५९ मिनिटे. [U/A]
लेखक अतुल सभरवाल
दिग्दर्शकअतुल सभरवाल
कलाकारअपारशक्ती खुराना,इश्वाक सिंग,राहुल बोस,अनुप्रिया गोएंका,कबीर बेदी
निर्मातामानव श्रीवास्तव, उमेश बन्सल
रिलीज तारीख१३ सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

“बर्लिन” चित्रपट समीक्षा :-

स्पाय थ्रिलर ड्रामा असलेले चित्रपट ज्यांना आवडतात, बर्लिन हा चित्रपट त्यांच्यासाठी आहे. अतुल सभरवाल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला आहे. अपारशक्ती खुराना,इश्वाक सिंग आणि राहुल बोस यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मसाला घालून बनवलेला चित्रपट नसून एक गुप्तहेर आणि राष्ट्रीय सुरक्षा याभोवती फिरणारा आहे.
१९९३ च्या काळात घडणारी ही कथा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर दिल्लीत येणार असतात आणि त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्था तैनात असते. परंतु पाकिस्तान कडून घातपात घडवून आणण्याची शक्यता असतानाच मुक बधीर असलेल्या अशोक (इश्वाक सिंह) युवकाला इंडियन इंटेलिजन्स ब्युरो कडून अटक करण्यात येते. त्यात त्याला बोलता येत नसल्याने त्याची चौकशी करण्यासाठी मूकबधिरांच्या शाळेत शिक्षक असलेल्या पुश्तिन (अपारशक्ती खुराणा) याची नेमणूक केली जाते. या चौकशी दरम्यान अशी सत्य बाहेर येतात की पुश्तिन स्वतः यात फसत जातो. आता नक्की काय होतं हे बघण्यासाठी मात्र हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा विषय सगळं छान आहे परंतु अतिशय संथगतीने हा चित्रपट सरकत राहतो त्यामुळे बघताना कंटाळा येतो. परंतु सस्पेन्स, थ्रीलने भरलेल्या या चित्रपटात शेवटी क्लायमॅक्स चांगला आहे. सगळ्यात विशेष कौतुक म्हणजे ज्या पद्धतीने १९९३ चा काळ दाखवला गेला आहे ते कमाल आहे. ज्यांना असे मसाला नसलेले परंतु चांगली कथा विषय असलेले चित्रपट आवडत असतील त्यांना हा चित्रपट आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


५. अद्भूत (Adbhut)
२०२४. थ्रिलर. ड्रामा. २ तास.
लेखक सब्बीर खान
दिग्दर्शकसब्बीर खान
कलाकाररोहन मेहरा, डायना पेंटी आणि श्रेया धन्वंतरी
निर्मातासब्बीर खान
रिलीज तारीख१५ सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

“अद्भूत” चित्रपट समीक्षा :-

चित्रपटगृहात किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित न होता सरळ टेलिव्हिजन वर प्रदर्शित झालेला अद्भूत हा चित्रपट हॉरर पेक्षा सायकॉलॉजीकल थ्रिलर म्हणावा असा आहे. आजकाल प्रेक्षकांना अशा प्रकारचे चित्रपट जास्त आवडतात हे लक्षात घेऊन कदाचित जुन्याच विषयावर कथा लिहून चित्रपट बनवला असावा असं वाटतं. नवाजुद्दीन सिद्दिकी याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा नवीन नाही परंतु शेवट चांगला आहे.
आतापर्यंत प्रत्येक हॉरर चित्रपटात दाखवतात तसंच यात सुद्धा श्रुती आणि आदित्य हे डॉक्टर असलेलं जोडपं नवीन घरात शिफ्ट होतात. आणि अर्थातच तिथे त्यांना विचित्र अनुभव यायला सुरुवात होते. विचित्र घटना घडायला लागतात. पॅरानार्मल गोष्टी घडत असल्याचं त्यांच्या लक्षात येतं मग याचाच शोध लावण्यासाठी ते डिटेक्टीव्ह गजराज(नवाजुद्दीन सिद्दिकी )ला बोलवतात. आता डिटेक्टीव्हची एन्ट्री झाल्यावर खरी गोष्ट सुरु होते. आता तो नक्की काय शोध लावतो, तिथे कोणाचा खून झालेला असतो की अजून काही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. सुपरनॅचरल थ्रिलर असलेला हा चित्रपट याच्या अनपेक्षित क्लायमॅक्स साठी बघू शकता. कथा पटकथा तीच तीच असली तरी शेवट नक्कीच वेगळा आहे.
सब्बीर खान यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला माझ्याकडून दोन स्टार.


६. कहां शुरू कहां खतम (Kahan Shuru Kahan Khatam)
२०२४. विनोदी, रोमँटिक. १ तास ४६ मिनिटे. [U/A]
लेखक लक्ष्मण उतेकर, ऋषि विरमानी
दिग्दर्शकसौरभ दासगुप्ता
कलाकारध्वनि भानुशाली, आशिम गुलाटी, सुप्रिया पिळगांवकर, राजेश शर्मा, अखिलेंद्र मिश्रा, विक्रम कोचर , राकेश बेदी, गौरव मनवानी
निर्मातालक्ष्मण उतेकर, विनोद भानुशाली
रिलीज तारीख२० सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“कहां शुरू कहां खतम” चित्रपट समीक्षा :-

प्रसिद्ध गायिका ध्वनी भानुशाली हीने “कहां शुरू कहां खतम” या चित्रपटाद्वारे प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असून तिचा हा प्रयोग प्रेक्षकांना आवडला आहे. चित्रपटाची कथा, विषय फारसा नवीन नाही. लेखक लक्ष्मण उतेकर यांनी या वेळी सुद्धा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाची कथा हरियाणा मध्ये घडताना बघायला मिळते. एका नावाजलेल्या गुंडांच्या घरातील एक मुलगी ऐन लग्नाच्या मंडपातून जाते इथून गोष्ट सुरु होते. मीरा म्हणजेच ध्वनी भानुशाली हिचं लग्न तिला न विचारता न सांगता ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच ती आपल्या लग्नातून पळून जायचं ठरवते. नेमकं तिच्या लग्नात क्रिश(आशिम गुलाटी) हा तरुण आलेला असतो. ओळख पाळख नसताना कोणत्याही लग्नात जाऊन फुकटचं जेवणे हा त्याचा छंद असतो. बरं या दोघांची काही ओळख नसते तरी सुद्धा ते दोघं एकत्र पळून जातात. आता पुढे जाऊन त्यांच्यात प्रेम होतं का.? ते कुठं राहतात.? मीरा चे गुंड असलेले भाऊ त्या दोघांना शोधतात का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट बघीतल्यावर मिळतील.
आता हे असे चित्रपट आतापर्यंत ढिगभर तरी येऊन गेले आहेत. त्यामुळे या चित्रपटात नवीन, विशेष असं काही बघायला मिळत नाही. ध्वनी भानुशाली हिच्याकडून फार अपेक्षा नव्हत्या तरी तीने चांगलं काम केलं आहे. दिग्दर्शन ठिकठाक आहे. एकुण सात आठ गाण्यांपैकी मोजकीच चांगली आहेत. ओटीटी वर आल्यावर कधीतरी टाईमपास म्हणून बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


७. युध्रा (Yudhra)
२०२४. ॲक्शन, थ्रिलर. २ तास २१ मिनिटे. [U/A]
लेखक श्रीधर राघवन, फरहान अख्तर, अक्षत घिल्डियाल
दिग्दर्शकरवि उध्यावर
कलाकारसिद्धांत चतुर्वेदी,मालविका मोहनन, गजराज राव, राघव जुयाल, राम कपूर, राज अर्जुन, शिल्पा शुक्ला
निर्माताफरहान अख्तर, रितेश सिधवानी
रिलीज तारीख२० सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“युध्रा” चित्रपट समीक्षा :-

२० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला युध्रा हा चित्रपट रवि उध्यावर यांनी दिग्दर्शित केलेला असून श्रीधर राघवन, फरहान अख्तर आणि अक्षत घिल्डियाल या तिघांनी मिळून चित्रपटाची कथा लिहिली आहे. रवि उध्यावर यांनी याआधी श्रीदेवीच्या मॉम या चित्रपट दिग्दर्शन केलं आहे त्यामुळे खरं तर युध्रा चित्रपट चांगला असावा असं वाटत होतं. परंतु यावेळी भ्रमनिरास झाला आहे. ॲक्शन सीन्स सोडले तर बाकी सगळा आनंदी आनंद आहे.
युध्रा(सिद्धांत चतुर्वेदी) हा चित्रपटाचा नायक आहे परंतु संपूर्ण चित्रपटात तो खलनायकापेक्षा जास्त भयानक प्रकार करत असतो. लहानपणापासूनच तो एक चिडका, प्रचंड रागीट किंवा सनकी म्हणू शकतो असा आहे. राग आल्यावर तो काय करेल याचा नेम नाही. याचाच परिणाम असा की त्याचे आईवडील एका ॲक्सिडंट मध्ये मृत्यूमुखी पडतात असं मानत असलेल्या युध्रा ला जेव्हा कळतं की आईवडिलांना कोणीतरी मारलं आहे तेव्हा तो सुडाने पेटून उठतो. त्यानंतरची काही दृश्ये अंगावर येऊ शकतात अशी आहेत.
चित्रपटाबद्दल फार काही बोलण्यासारखं नाही. राघव जुयाल याचा कॉमीओ आहे. यात सुद्धा तो किल चित्रपटासरखा सायको खलनायक म्हणून दाखवला आहे. चित्रपटातील गाणी, काही रोमॅंटीक सीन्स उगीच गरज नसताना घातलेले असल्यामुळे चित्रपट नको तेवढा लांबतो. तसंही ॲक्शन सीन्स सोडले तर बाकी विशेष बघण्यासारखं चित्रपटात काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


८. नशा, जुर्म और गॅंगस्टर (Nasha Jurm Aur Gangsters)
२०२४. ॲक्शन, थ्रिलर, २ तास १७ मिनिटे. [U/A]
लेखक रॉकी पात्रा, राजकुमार पात्रा, युदी
दिग्दर्शकराजकुमार पात्रा, रॉकी रूपकुमार पात्रा
कलाकाररॉकी पात्रा, राजकुमार पात्रा, युदी, मुन्नी पंकज, अग्नी दत्ता
निर्माताएनसी पात्रा, कबिता पात्रा, राजकुमार पात्रा
रिलीज तारीख२० सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

नशा, जुर्म और गॅंगस्टर” चित्रपट समीक्षा :-

नशा, जुर्म और गॅंगस्टर हा चित्रपट नावाप्रमाणेच शहरात चालणरे ड्रग्स रॅकेट, गुन्हेगारी आणि या सगळं चालवणारे गॅंगस्टर यावर आधारित आहे. खरं तल चित्रपटाबद्दल फार काही लिहीणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे. यावरून लक्षात आलं असेल की चित्रपट बघावा की बघू नये.
स्वतःसाठी स्वतःच काढलेला चित्रपट असावा हा. कदाचित पाहणारे सुद्धा स्वतः लेखक दिग्दर्शक आणि कलाकार इतकेच असावेत. चित्रपटाची कथा जीत, जॅकी आणि बासू या तीन गॅंगस्टर भोवती फिरणारी आहे. या तिघांना नशेच्या दुनियेतील मोठे माफिया बनून खूप पैसे कमवायचे असतात परंतु अशा काही गोष्टी घडतात की त्यांची स्वप्नं‌ धुळीला मिळतात. आता नक्की काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल परंतु तो तुम्ही बघून वेळ वाया घालवू नये.
चित्रपटातील ॲक्शन सीन्स, संवादफेक सगळंच बालिश वाटतं. तांत्रिक गोष्टी, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, संगीत, गाणी सगळ्याचीच बोंब आहे. हिंमत करून चित्रपट बनवल्या बद्दल माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


९. जो तेरा हैं वोह मेरा हैं (Jo Tera Hai Woh Mera Hai)
२०२४. विनोदी. १ तास ४१ मिनिटे. [U/A]
लेखक आदित्य रावल
दिग्दर्शकराज त्रिवेदी
कलाकारपरेश रावल, अमित सियाल, परेश रावल, सोनाली कुलकर्णी, सोनाली सेहगल
निर्माताज्योती देशपांडे, अजय राय
रिलीज तारीख२० सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

जो तेरा हैं वोह मेरा हैं” चित्रपट समीक्षा :-

जो तेरा हैं वो मेरा हैं हा चित्रपट जियो सिनेमा वर २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून राज त्रिवेदी याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपट हलकाफुलका विनोदी अंगाने जाणारा, मधेच भावनिक वाटणारा असा आहे.
चित्रपटाची कथा नवीन नाही. मितेश हा एक नेहमी जुगाड करून लोकांना लुबाडून, याची टोपी त्याला वैगरे असे धंदे करून पैसे कमावणारा ब्रोकर एजंट असतो. त्याचं लहानपणापासून एक स्वप्न असतं. उत्कर्ष नावाचा बंगला त्याला लहानपणापासून आवडत असतो. आणि हा बंगला एक दिवस आपला व्हावा अशी त्याची इच्छा असते. बरं त्या बंगल्याचा मालक गोविंदा म्हणजेच आपले परेश रावल, ते काही केल्या बंगला विकणार नसतात. तर मग आता हा बंगला मिळवायचा कसा हे मोठं आव्हान मितेश समोर असतं. गोविंदा हे एकटेच त्या बंगल्यात राहत असतात. त्यांचा मुलगा वारलेला असतो. मग त्या मुलाचा आपण मित्र सांगून मितेश गोविंदा यांच्या आयुष्यात आणि बंगल्यात प्रवेश मिळवतो. आता तो बंगला आपल्या नावावर होण्यासाठी तो काय काय धमाल करतो हे बघण्यासाठी मात्र चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा चांगली आहे परंतु पटकथा फार खेचून लिहीलीय. चित्रपट छोटा असला तरी तो बघताना मधे मधे कंटाळा येतो. परेश रावल आणि अमित सियाल या दोघांचाही अभिनय उत्तम आहे. फार मसाला वैगरे नसलेला हलका फुलका विनोदी चित्रपट बघायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


१०. लव्ह सितारा (Love, Sitara)
२०२४. रोमान्स, ड्रामा, परिवार. १ तास ४५ मिनिटे. [U/A]
लेखक वंदना कटारिया, सोनिया बहल, हुसैन दलाल, अब्बास दलाल
दिग्दर्शकवंदना कटारिया
कलाकारशोभिता धुलिपाला, राजीव सिद्धार्थ, बी जयश्री, सोनाली कुलकर्णी, सुधन्वा देशपांडे, वर्जीनिया रॉड्रिग्स, संजय भूटियानी, तमारा डिसूजा, रिजुल रे, इखलाक खान
निर्मातारॉनी स्क्रूवाला
रिलीज तारीख२७ सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

लव्ह सितारा” चित्रपट समीक्षा :-

झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेला लव्ह सितारा हा चित्रपट वंदना कटारिया यांनी दिग्दर्शित केलेला असून रॉनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. खरं तर कोरोनाच्या काळातच या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं परंतु काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता.
सितारा(शोभिता धुलिपाला) नावाच्या नायिकेभोवती चित्रपटाची कथा लिहिली आहे. सितारा ही एक महत्वकांक्षी आणि मुंबईतील यशस्वी अशी इंटेरियर डिझायनर आहे. अर्जुन(राजीव सिद्धार्थ) हा तिला वारंवार प्रपोज करत असतो आणि प्रत्येक वेळी ती त्याला नकार देत असते परंतु अचानक ती त्याच्यासोबत लग्न करायला तयार होते. परंतु तिला हे लग्न केरळला तिच्या आजीच्या गावी करायचं असतं. तिकडे गेल्यावर तिला तिच्या आईवडिलांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे होतात ज्यामुळे तिचं लग्न, तिचं नातं तुटायच्या मार्गावर येतं. आता नक्की असं काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
एक साधी सरळ प्रेमकथा, थोडासा इमोशनल टच, काही ट्विस्ट आणि टर्न्स ने मिळून हा चित्रपट बनला आहे. केरळमधील सौंदर्य बघण्यासारखं आहे. मनोरंजन म्हणून एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. दिग्दर्शन चांगलं आहे. छायाचित्रण उत्तम. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


११. बिन्नी ॲंड फॅमिली (Binny and Family)
२०२४. विनोदी, ड्रामा, परिवार. २ तास २० मिनिटे. [U/A]
लेखक नमन त्रिपाठी, संजय त्रिपाठी
दिग्दर्शकसंजय त्रिपाठी
कलाकारअंजनी धवन, पंकज कपूर, चारु शंकर, राजेश कुमार , हिमानी शिवपुरी , ताय खान, नमन त्रिपाठी
निर्माताए झुनझुनवाला, एस के अहलूवालिया
रिलीज तारीख२७ सप्टेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

बिन्नी ॲंड फॅमिली” चित्रपट समीक्षा :-

बिन्नी ॲंड फॅमिली हा चित्रपट थोडा वेगळा आहे. म्हणजे आईवडील आणि मुलांच्या नात्यावर आतपर्यंत बरेच चित्रपट आले आहेत परंतु आजीआजोबा आणि नातवंडं अशा नात्याची वीण उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे. संजय त्रिपाठी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नमन त्रिपाठी आणि संजय त्रिपाठी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
बिंदिया म्हणजेच बिन्नी(अंजनी धवन) ही आपल्या आईवडिलांसोबत लंडन मध्ये राहत असते. अर्थात तिची लाईफस्टाईल अगदी मॉडर्न प्रकारची असते. रात्री उशिरापर्यंत पार्टी, तोकडे कपडे, मित्र मैत्रिणी हे सगळं तिच्या साठी नॉर्मल असतं परंतु तिच्या या सगळ्या गोष्टी वर्षातून एकदा दोन महीन्यासाठी पूर्ण बंद होतात ते म्हणजे तिचे आजी आजोबा जेव्हा बिहार वरून त्यांच्याकडे राहायला येतात. हे दरवर्षी ठरलेलं असतं. त्यामुळे ते दोन महिने बिन्नी ला नकोसे व्हायचे. एकदा दोन महिने राहून गेल्यानंतर सुद्धा आजी आजोबा परत येणार कळतं तेव्हा बिन्नी पेटून उठते. परंतु असं काहीतरी घडतं की त्या नंतर बिन्नी आणि तिचे आजोबा यांच्यातील नातं पूर्ण बदलून जातं. ते एकमेकांचे चांगले मित्र बनतात. आत अशी नक्की काय जादू होते हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
अंजनी धवन हीने पदार्पण केलं असलं तरी अभिनय मात्र उत्तम आहे. कथा चांगली आहे परंतु पटकथा अजून चांगल्या प्रकारे लिहीली असती तर चित्रपट न कंटाळता बघता आला असता. काही तांत्रिक गोष्टी, एडिटिंग वैगरे अजून चांगलं होऊ शकलं असतं. परंतु मनोरंजन करण्यात चित्रपट यशस्वी होतो. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.

    तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *