मार्च 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा
मार्च 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Hindi movies released in March 2025 and their reviews
मार्च २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जून 9, 2025 | 10:29 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात मार्च २०२५ महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

१. नादानियां (Nadaaniyan) |
लेखक | इशिता मोइत्रा, रीवा राजदान कपूर, जेहान हांडा |
दिग्दर्शक | शॉना गौतम |
कलाकार | इब्राहिम अली खान, खुशी कपूर, महिमा चौधरी, सुनील शेट्टी, दीया मिर्जा, जुगल हंसराज, अर्चना पूरण सिंह |
निर्माता | करण जोहर, अपूर्वा मेहता, सोमेन मिश्रा |
रिलीज तारीख | ७ मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“नादानियां ” चित्रपट समीक्षा :-
करण जोहर , अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांची निर्मिती असलेला चित्रपट नादानियां ७ मार्च ला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला. करण जोहरने खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान यांना घेऊन हा चित्रपट बनवला यातच नेपोटिझम आहे की नाही हे सिद्ध होतं. खरं तर हा चित्रपट आणि कलाकार आधीच इतके ट्रोल झालेत की तुम्हाला आधीच माहीत असेलच सांगण्या सारखं सुद्धा या चित्रपटात काही नाही.
चित्रपटाची कथा आपल्या आकलनशक्तीच्या पलिकडची आहे. दिल्लीतील एका अति श्रीमंत घरातील पिया जय सिंह (खुशी कपूर)ही अल्ट्रा एलिट स्कूल मध्ये शिकत असते. आई महिमा चौधरी) आणि वडील रजत (सुनील शेट्टी) यांच्यातील भांडणं बघत मोठी झालेली दिया ही एकटी पडलेली असते. अशातच कॉलेज मध्ये सुध्दा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गैरसमज होऊन दुरावा आलेला असतो. आणि इथेच गोष्ट सुरु होते. मित्रमैत्रिणींना आपला बॉयफ्रेंड आहे हे सांगितल्यानंतर काही गैरसमज दूर होतात परंतु त्यासाठी दियाला खोटा बॉयफ्रेंड उभा करावा लागतो. अशातच शाळेत एन्ट्री होते सर्वगुणसंपन्न अर्जुन मेहता (इब्राहिम अली खान) याची. वडील(जुगल हंसराज) एक निष्णात डॉक्टर असतात तर आई(दीया मिर्जा) एका नामांकित शाळेत शिक्षिका. स्विमिंग चॅम्पियन असलेला अर्जुन दियाचा खोटा बॉयफ्रेंड बनायला तयार होतो बदल्यात आठवड्याचे पंचवीस हजार रुपये घेऊन. आता या दोघांचं पुढे काय होतं.? यांचं खोटं प्रेम सगळ्यांसमोर येतं की ते खरंच एकमेकांच्या प्रेमात पडतात हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
एक अतिशय टुकार दर्जाचा चित्रपट म्हणजे नादानियां. या चित्रपटाची निर्मिती म्हणजेच नादानियां म्हणावं लागेल. दिग्दर्शन बरं म्हणावं असंही नाही. शहरातील नामांकित डॉक्टर आणि मोठ्या शाळेत शिक्षिका असलेले लोक जर दिग्दर्शकाला मिडल क्लास वाटत असतील तर बहुतेक दिग्दर्शक त्याच्या स्वतःच्या वेगळ्या विश्वात राहतो असं वाटतं.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल तर बोलायलाच नको. सुनील शेट्टी, दिया मिर्झा, महीमा चौधरी, जुगल हंसराज हे कलाकार सोडले तर बाकी सगळा आनंदी आनंद आहे. खुशी कपूर हिला मेहनतीची गरज नाहीय कारण मुळात तीने अभिनय हे क्षेत्र च चुकीचं निवडलं आहे. इब्राहिम फक्त दिसायला बरा वाटतो बाकी संवादफेक, हावभाव यातल कखघग सुद्धा जमलेलं नाही. एक गाणं सोडलं तर चित्रपटात काही बघण्यासारखं नाही. एकंदरीत हा चित्रपट बघून तुम्ही बहुमूल्य वेळ वाया घालवू नये. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
२. द डिप्लोमॅट (The Diplomat) |
लेखक | रितेश शाह |
दिग्दर्शक | शिवम नायर |
कलाकार | जॉन अब्राहम, सादिया खतीब, शारिब हाशमी, कुमुद मिश्रा, रेवती |
निर्माता | भूषण कुमार , जॉन अब्राहम और समीर दीक्षित |
रिलीज तारीख | ७ मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“द डिप्लोमॅट” चित्रपट समीक्षा :-
जॉन अब्राहम ची निर्मिती असलेला आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित असलेला द डिप्लोमॅट हा चित्रपट १४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. परंतु दुर्दैवाने या इतक्या चांगल्या चित्रपटाचं फारसं प्रमोशन झालेलं नाही. स्पेशल ऑप्स किंवा नाम शबाना सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे शिवम नायर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने बघावा असा हा चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा ही “उज्मा अहमद” भारतीय महिलेची आहे. मलेशियात असलेल्या उज्माची एका पाकिस्तानी तरुणाकडून फसवणूक केली जाते आणि पाकिस्तान मध्ये तिला बंदिस्त करून तिचे छळ केले जातात. ताहीर हा पाकिस्तानी तरूण उज्माच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या आयुष्यात कसं वादळ आलं हे या चित्रपटात पहायला मिळतं. उज्माची मुलगी एका दुर्धर आजाराने त्रस्त असते, तिच्या उपचारासाठी उज्मा प्रत्येक प्रयत्न करत असते अशातच तिची ओळख ताहीर सोबत होते. तो तिला प्रेमाचं नाटक करून पाकिस्तान ला घेऊन जातो परंतु तिथे गेल्यावर वेगळंच संकट उभं असतं. ताहीर तिचा हरप्रकारे छळ करतो. तिला ड्रग्स देऊन शारीरिक अत्याचार, मारझोड सगळं तिला भोगावं लागतं आणि म्हणूनच शेवटी हिंमत एकवटून इस्लामाबादमधील भारतीय दूतावास यांच्याकडे मदत पोहचली. तत्कालीन डेप्युटी कमिशनर जीपी जेपी सिंह(जॉन अब्राहम) आणि तत्कालीन विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी उज्माला भारतात पलत आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. मानवीय मुल्यांचा आधार घेत तिला मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. हा संपूर्ण चित्तथरारक प्रवास या चित्रपटात पहायला मिळतो.
चित्रपटाची कथा अतिशय सुंदर पद्धतीने सादर केली आहे. सुरूवात संथ वाटते परंतु नंतर जशी कथा वेग घेते तसे आपल्या छातीचे ठोके वाढत जातात. जॉन अब्राहमने या वेळी आश्चर्याचा धक्का देत नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारली आहे. इतरही सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. दिग्दर्शन छायाचित्रण कॅमेरा वर्क सगळंच उत्तम आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. माय मेलबर्न (My Melbourne) |
लेखक | नजिफा अमिर, शिवांगी भौमिक, समिरा, मौनीक नायर, विल्यम दूआ, ग्रेगरी फ्रॅन्सिस, अरिफ अली |
दिग्दर्शक | ओनीर, रिमा दास, इम्तियाज अली, कबीर खान, अरीफ अली, राहुल व्होरा |
कलाकार | अरक आ दास, आरुषी शर्मा, कॅट स्टेवर्ट, रियाना स्काय लॉसन, सितारा अमीरी, ब्रॅड हॉज, जॅक्सन, मौली गांगुली, जॅक रॅन |
निर्माता | मितू भौमिक लांगे |
रिलीज तारीख | १४ मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“माय मेलबर्न” चित्रपट समीक्षा :-
माय मेलबर्न हा चित्रपट म्हणजे चार वेगवेगळ्या कथांचा मिळून एक ॲंथोलॉजी प्रकारचा चित्रपट आहे. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार वेगवेगळ्या कथा यात आहेत. चारही कथांचा एक समान धागा आहे तो म्हणजे स्वतःची ओळख शोधणे, किंवा स्वतःचं अस्तित्व शोधणं. या चारही कथा मेलबर्न मध्ये घडतात. अशा प्रकारचे चित्रपट आवडणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग असतो, त्यामुळे सगळ्यांनाच हा चित्रपट आवडेल असं नाही.
पहीली “नंदीनी” ही कथा ओनिर यांनी दिग्दर्शित केलेली असून यात एका समलैंगिक मुलाची गोष्ट आहे. ज्याला समलैंगिक असल्यामुळे स्वतःच्या वडिलांनी स्विकारलेलं नाहीय इतकच काय तर समलिंगी मुलासोबत राहत असल्यामुळे स्वतःच्या आईला भेटू दिलेलं नसतं. परंतु त्याच वडिलांसोबत जेव्हा स्वतःच्या आईच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी त्याला मेलबर्नला जावं लागतं तेव्हा त्या मुलाची स्वतःची ओळख शोधतानाची घालमेल, वडीलांसोबत असलेला दुरावा हे सगळं दिग्दर्शक ओनिर यांनी सुंदररित्या दाखवलं आहे.
दुसऱ्या कथेत दोन मुलींच्या एकमेकांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या समान धाग्याची गोष्ट आहे. मेलबर्न मधील एका रेस्टॉरंट मध्ये काम करणारी ज्यूल्स ही बेघर असलेली एक ऑस्ट्रेलियन मुलगी आहे तर लग्नानंतर मेलबर्न मध्ये आलेली साक्षी ही एक भारतीय मुलगी आहे जीचं नवऱ्यासोबतचं नातं चांगलं नाहीय.परंतू ज्यूसला बघून साक्षी स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने बघायला शिकते. त्या दोघींची ही कथा इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेली आहे.
तर तिसरी “एम्मा” ही कथा रिमा दास यांनी दिग्दर्शित केलेली असून यात एक एम्मा(रियाना स्काय लॉसन) नावाची मुलगी आहे जी एक उत्तम नृत्यांगना आहे आणि त्यातच तिला नाव कमवायचे आहे परंतु तिच्या एका आजारामुळे तिची श्रवण क्षमता कमी होत जाते. अशा परिस्थितीत खचून न जाता ती काय करते तो संघर्ष या कथेत बघायला मिळतो.
तर चौथी सितारा ही कथा सितारा नावाच्या मुलीची असून ही मुलगी तालिबानी राजवटीला झुगारून अफगाणिस्तान वरून मेलबर्न ला आलेली असते. शाळेतील क्रिकेट मॅच मध्ये खेळण्याची संधी असताना फक्त पुन्हा जगाच्या नजरेत यायला नको म्हणून ती खेळायला नकार देत असते. पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. ही कथा कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेली आहे.
या चारही कथा खरं तर एक संदेश देणाऱ्या आहेत. परंतु ज्या संथ आणि शांत पद्धतीने त्या मांडल्या आहेत त्यामुळे ठराविक लोकांनाच त्या आवडू शकतात. कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन उत्तम आहे. मेलबर्न मधील नयनरम्य दृश्य छान आहेत. सिनेमॅटोग्राफी छान आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
४. बी हॅप्पी (Be Happy) |
लेखक | रेमो डिसूजा, तुषार हीरानंदानी , कनिष्क देव और चिराग गर्ग |
दिग्दर्शक | रेमो डिसूजा |
कलाकार | अभिषेक बच्चन, इनायत वर्मा, नोरा फतेही ,नासर, हरलीन सेठी, जॉनी लीवर |
निर्माता | लिजेल रेमो डिसूजा |
रिलीज तारीख | लिजेल रेमो डिसूजा |
भाषा | हिंदी |
“बी हॅप्पी” चित्रपट समीक्षा :-
एबीसीडी सिरीज नंतर रेस ३ सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर रेमो डिसूजा आता बी हॅप्पी चित्रपटाच्या निमित्ताने परत एकदा दिग्दर्शन करत आहेत. बाप मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारे अनेक चित्रपट यापूर्वीही आले आहेत. हा चित्रपट सुद्धा अशीच बाप आणि एका छोट्या मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा आहे.
चित्रपटाची कथा उटी शहरात राहणाऱ्या शिव(अभिषेक बच्चन) आणि त्याची मुलगी धारा(इनायत वर्मा) या दोघांची आहे. आपल्या बायकोच्या रोहीणीच्या(हरलीन सेठी) मृत्यूनंतर शिव हा हसत खेळत आयुष्य जगायचं विसरून गेलेला असतो. परंतु वडील आणि त्याची मुलगी घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. शिवची मुलगी धारा ही उत्तम नृत्य करत असते आणि डान्स हे तिचं पॅशन असतं. टेलिव्हिजन वरील एका मोठ्या रिऍलिटी शो मध्ये सहभागी व्हायचं हे तिचं स्वप्न असतं. परंतु शिवला तिचं हे तात्पुरतं डान्सचं वेड आहे असं वाटत असतं. परंतु जेव्हा धारा तिच्या शाळेतील नृत्य स्पर्धेत प्रथम आल्यावर मुंबईतील एका मोठ्या डान्स ॲकडमी मधून मॅगी ही धारा ला तिच्या ॲकडमीत प्रशिक्षण घेण्यासाठी बोलवते तेव्हा मात्र शिव हे सगळं गांभीर्याने घेतो. खरं तर शिवला मुंबईत जायचं नसतं परंतु मुलीच्या प्रेमापोटी तो मुंबईत जातो. परंतु कथेमध्ये मोठा ट्विस्ट येतो जेव्हा नृत्य स्पर्धेत जजेस चं मन जिंकून घेणारी धारा फायनल राऊंड ला पोहचेल की नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आता असं का होतं.? ती फायनल राऊंड ला पोहचते का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा यात फारसं नाविन्य नाही आणि कथा सक्षम नाही त्यामुळे चित्रपट म्हणावा तसा प्रभावी वाटत नाही. अभिषेक बच्चन याने एक संवेदनशील भावुक बाप चांगला रंगवल आहे. इनायत वर्मा हीने सुद्धा छान काम केलं आहे परंतु रेमो डिसूजा याचं दिग्दर्शन म्हणावं इतकं खास नाही. एकंदरीत एकदा ओटीटी वर उपलब्ध आहे म्हणून बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
५. इन गलियों में (Inn Galiyon Mein) |
लेखक | पुनर्वसु |
दिग्दर्शक | अविनाश दास |
कलाकार | जावेद जाफ़री, विवान शाह,अवंतिका दसानी,सुनील शेट्टी,मनीषा कोइराला,सुशांत सिंह, वीनाय भास्कर |
निर्माता | करण जौहर,विनोद यादव,संजीवव गोस्वामी,आदर्श सक्सेना, जांनिसार हुसैन |
रिलीज तारीख | १४ मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“इन गलियों में” चित्रपट समीक्षा :-
बघता हिंदू मुस्लिम ऐक्य असताना देखील धर्मातील तेढ वाढवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न जो प्रयत्न केला जातो त्याच धर्तीवर आधारित “इन गलियों में” हा चित्रपट आहे. सद्याची राजकीय परिस्थिती ही तशीच आहे. हा चित्रपट अविनाश दास यांनी दिग्दर्शित केलेला असून लखनऊ शहरात घडणारी ही कथा आहे.
लखनऊ शहरातील बाजू बाजूला असलेल्या दोन गल्ल्यांमध्ये हिंदू मुस्लिम धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने नांदत असतात. रहमान गल्ली आणि हनुमान गल्ली अशा या दोन्ही गल्लीत दोन्ही धर्माचे सण, समारंभ, चालीरीती सगळं दोन्ही बाजूची माणसं एकत्र येऊन साजरी करत असतात. तिथेच राहणारे हरिराम(विवान शाह) आणि शब्बो(अवंतिका) हे दोघं भाजी विक्रेते असतात. हरिराम ला शब्बो आवडत असते परंतु शब्बो सुरूवातीला त्याला वारंवार नकार देत असलेली शब्बोही नंतर त्याच्या प्रेमात पडते. कथेतील तिसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याच गल्लीत चहाची टपरी असणारा शायर मिर्जा(जावेद जाफरी). प्रत्येकाला शायरी ऐकवत चहा पाजणारा मिर्जा म्हणजे एक जाणकार व्यक्ती. सारं काही आलबेल असताना ऐन निवडणुकीच्या काळात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून त्या दोन्ही गल्लीतील लोकांना भडकावलं जातं. त्यामुळे हरिराम आणि शब्बो यांच्या प्रेमात धर्म आड येतो. आता त्या दोघांचं प्रेम पुर्णत्वास जाते का.? गल्लीतील दोन्ही धर्माच्या लोकांचं काय होतं.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
हिंदू मुस्लिम ऐक्य किंवा तेढ यावर याआधीही खूप चित्रपट आलेले आहेत. त्यामुळे या चित्रपटात फारसं नवीन काही बघायला मिळत नाही. पुनर्वसु यांनी एक अतिशय सामान्य कथा लिहिली आहे. त्यात अविनाश दास यांचं दिग्दर्शन देखील ठिकठाकच आहे. एकंदरीत बरा चित्रपट आहे. नाही बघीतला तरी चालेल असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
६. आचारी बा (Aachari Baa) |
लेखक | श्रेयस अनिल लोवलेकर |
दिग्दर्शक | हार्दिक गज्जर |
कलाकार | नीना गुप्ता, कबीर बेदी, वत्सल सेठ |
निर्माता | ज्योती देशपांडे, पुनम श्रॉफ, पार्थ गज्जर |
रिलीज तारीख | १४ मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“आचारी बा” चित्रपट समीक्षा :-
आजकाल सगळीकडे आईवडील गावाकडे आणि मुलं शहरात अशी परिस्थिती असते. काही मुलांना आईवडीलांची ओढ असते परंतु काही मुलं आपल्या संसारात इतकी व्यस्त आणि मग्न होतात की आपल्या गावी असलेल्या आईवडिलांचा विसर पडतो. परंतु अडचण आल्यावर मात्र आईवडिलांची आठवण होते. याच विषयावर आधारित आचारी बा हा चित्रपट हार्दिक गज्जर यांनी दिग्दर्शित केलेला असून नीना गुप्ता यांनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
गुजरात मध्ये राहत असलेल्या बा(नीना गुप्ता) या एकट्याच गुजरात मधील गावात राहत असतात. लोणचं बनवण्यात पटाईत असलेल्या बा लोणचं बनवण्यासाठी प्रसिद्ध असतात. मुंबईत असलेल्या मुलाच्या फोनची रोज आतुरतेने वाट बघत असलेल्या बा यांना वाटत असतं की कधीतरी आपल्या मुलाचा फोन येईल आणि तो आपल्याला त्याच्या घरी बोलवेल. खूप प्रतिक्षेनंतर त्यांच्या मुलाचा फोन येतो आणि तो बा यांना मुंबईत बोलवून घेतो. खूप खुश होऊन गेलेल्या बा यांना मुंबईत गेल्यावर मात्र वेगळ्याच अनुभव येतो. त्यांचा मुलगा आपल्या बायको मुलांना फिरायला घेऊन जाणार असतो आणि म्हणूनच त्याने त्याच्या घरी असलेल्या “जेनी” या श्वानाला सांभाळायला बा यांना बोलावलेलं असतं. परंतु बा यांना कुत्रा या प्राण्याची अजिबात आवड नसते. तिथे एकट्या पडलेल्या बा आपली आवड असलेलं लोणचं तिथे बनवायला सुरुवात करतात आणि त्यातच त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतो. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. आधीच तिथे जाऊन एकट्या पडलेल्या बा त्या जेनी ला कसं सांभाळतात.? जेनी आणि त्यांच्यात कशी मैत्री होते.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
दिग्दर्शक हार्दिक गज्जर यांनी विनोदी पद्धतीने मांडलेल्या या चित्रपटात बरेच भावनिक प्रसंग आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आठवण येईल. खरं तर आत्ताच्या काळात चित्रपट बनवावा इतका हा विषय खरं तर प्रभावी वाटत नाही. परंतु हलकाफुलका, भावना प्रधान असा चित्रपट बघायचा असल्यास हॉटस्टार वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. नीना गुप्ता यांनी या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. इतरही सगळ्याच कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
७. बैदा (Baida) |
लेखक | हिमांशू रॉय |
दिग्दर्शक | पुनीत शर्मा |
कलाकार | हिमांशू रॉय, सौरभ राज जैन |
निर्माता | पुनीत शर्मा,हिमांशू रॉय |
रिलीज तारीख | २१ मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“बैदा” चित्रपट समीक्षा :-
सायन्स फिक्शन आणि सुपरनॅचरल थ्रिलर सस्पेन्स असलेल्या बैदा या चित्रपटाची कथा हिमांशू रॉय यांनी लिहिलेली असून पुनीत शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. हिमांशू रॉय यांनी स्वतः या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारलेली असून तुंबाड सारख्या एका वेगळ्या पठडीतील असलेल्या या चित्रपटाला काही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली असली तरी बऱ्याच लोकांना या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही.
चित्रपटाची कथा इंटेलिजन्स ब्युरो साठी काम करणाऱ्या रामबाबू(सुधांशू रॉय) याच्याभोवती फिरणारी आहे. इंटेलिजन्स साठी डिटेक्टीव म्हणून काम करताना रामबाबू ने इतक्या लोकांना मारलेलं असतं की त्याला त्या कामाचा उबग येतो म्हणून शेवटी ते काम सोडून तो एका ट्रॅक्टरच्या कंपनीत सेल्समन म्हणून कामाला लागतो. या कंपनीकडून त्याला उत्तरप्रदेश मधील एका गावात पाठवले जाते तेव्हा त्याच्या आयुष्यात अनपेक्षित आणि अद्भूत अविश्वसनीय अशा घटना घडायला सुरुवात होते. त्या गावात पोहचण्यासाठी त्याला एका जंगलातून चालत जावे लागते. तेव्हा त्याला रस्त्यात एक माणूस(सौरभ राज जैन)भेटतो जो आपल्या झोपडीत घेऊन जातो. परंतु तिथं गेल्यावर काही वेगळंच घडतं. रामबाबू ला गुंगी आल्यासारखं होतं आणि तो थेट ब्रिटिश काळात पोहचतो. त्याला फाशीवर चढवणार इतक्यात तो शुद्धीत येतो. आता त्यापुढे काय घडतं ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
ब्रिटिश काळ आणि आत्ताचा काळ अशा दोन काळात कथा घडत असते. चित्रपटाचा शेवट अनपेक्षित धक्के देतो. क्लायमॅक्स आपण विचार करतो त्यापेक्षा वेगळा आहे. अभिनय चांगला आहे. कथेची मांडणी बघता काही ठिकाणी आपला गोंधळ होतो. दिग्दर्शन चांगलं आहे. ज्यांना सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडतात त्यांना हा चित्रपट आवडेल. ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर चित्रपट नक्की बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
८. तुमको मेरी कसम (Tumko Meri Kasam) |
लेखक | विक्रम भट्ट |
दिग्दर्शक | विक्रम भट्ट |
कलाकार | अनुपम खेर, इश्वाक सिंह, अदाह शर्मा, इशा देओल |
निर्माता | डॉ. अजय मुर्डिया |
रिलीज तारीख | २१ मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“तुमको मेरी कसम” चित्रपट समीक्षा :-
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील “मातृत्व” हा खूप महत्त्वाचा भाग असतो. लग्नानंतर प्रत्येक स्त्रि आई होण्याचं स्वप्न बघत असते. परंतु काही स्त्रियांचं हे स्वप्न काही कारणांमुळे पूर्ण होत नाही. असंच मातृत्वाचं स्वप्न आयव्हीएफ उपचारा द्वारा पूर्ण करण्याचा ध्यास ज्या व्यक्तीने घेतला ते म्हणजे डॉक्टर अजय मुर्डिया. २१ मार्च रोजी प्रदर्शित झालेला विक्रम भट्ट दिग्दर्शित “तुमको मेरी कसम” हा चित्रपट डॉ. अजय मुर्डिया यांच्याच आयुष्यावर आधारित आहे.
व्यंधत्व असलेल्या जोडप्यांना आशेचा किरण घेऊन आलेल्या डॉ. अजय मुर्डिया यांनी १९८८ साली इंदिरा आयव्हीएफ सेंटरची स्थापना केली आणि कित्येक स्त्रियांना मातृत्वाचा आनंद दिला. परंतु त्यांचं आयुष्य ढवळून निघालं ते राजीव खोसला यांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर केला गेला. याच केस ने कथेची सुरुवात होते. डॉ. मुर्डिया यांच्याकडे कामाला असलेल्या शिपाई दुर्गेश कुमार यांचा मुलगा राजीव खोसला याच्या हत्येचा आरोप असलेले डॉ. मुर्डिया यांचं करिअर, आयुष्य या केसने ढवळून निघतं. अजय मुर्डिया यांनीच राजीव याला शिकवून लहानाचं मोठं केलेलं असतं. परंतु त्याच्याच हत्येचा आरोप झाल्यानंतर डॉ अजय यांचं आयुष्य पणाला लागतं. त्यांना निर्दोष ठरवण्यासाठी ॲड. मिनाक्षी(ईशा देओल) या पूर्ण ताकदीनिशी ही केस लढत असतात. तो पूर्ण कोर्ट ड्रामा या चित्रपटात पहायला मिळतो. तसेच तरुणपणी डॉ. मुर्डिया(इश्वाक सिंह) आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी असलेली, त्यांना साथ देणारी पत्नी इंदिरा (अदाह शर्मा) यांचा इंदिरा आयव्हीएफ चा संपूर्ण प्रवास चित्रपटात दाखवला आहे.
विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाची कथा छान लिहिली आहे परंतु पटकथा मांडताना गडबड झालेली दिसते. तसंच दोन काळात कथा दाखवली गेल्यामुळे प्रेक्षकांचा बऱ्याचदा गोंधळ होतो. तरूणपणी असलेले डॉ अजय आणि पत्नी इंदिरा यांच्यातील लव्हस्टोरी सुंदर प्रकारे दाखवली आहे. कोर्ट ड्रामा आवडत असेल तर हा चित्रपट नक्की बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
९. पिंटू की पप्पी (Pintu Ki Pappi) |
लेखक | शिव हरे |
दिग्दर्शक | शिव हरे |
कलाकार | सुशांत थमके, जान्या जोशी, विधी यादव, गणेश आचार्य |
निर्माता | विधी आचार्य |
रिलीज तारीख | २१ मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“पिंटू की पप्पी” चित्रपट समीक्षा :-
आजकाल कथा, पटकथा कशाचाही पत्ता नसलेले सुद्धा चित्रपट प्रदर्शित होत असतात आणि याचा परिणाम व्हायचा तोच होतो. अशा चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही आणि स्क्रीन मिळाली प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत नाही. शिव हरे दिग्दर्शित “पिंटू की पप्पी” हा चित्रपट देखील कधी आला आणि कधी गेला हेच माहीत नाही. चित्रपट विनोदी आहे परंतु चित्रपटाचा विषय हास्यास्पद आहे.
चित्रपटाची कथा प्रशांत बाबू उर्फ पिंटू(सुशांत थमके) नावाच्या तरूणाची आहे. या पिंटूचं दुर्दैव असं असतं की त्याची प्रत्येक प्रेयसी त्याला सोडून दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करते. परंतु यामागे योगायोग हा असतो की पिंटू ज्या प्रेयसीची पप्पी घेतो त्यानंतर मात्र तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी होतं. आपलं हे दुःख पिंटू आपला मामा(आचार्य गणेश) याच्याकडे मांडतो तेव्हा हा मामा त्याला याच दुर्दैवाचा सुदैवी फायदा कसा करावा हे सांगतो. पिंटू ची पप्पी वाली गोष्टीचा फायदा करत ते मुलींची लग्न ठरवण्याचा व्यवसाय सुरू करतात. परंतु कथेमध्ये ट्विस्ट येतो जेव्हा पिंटू ला त्याच्याकडे लग्न ठरवण्यासाठी आलेली एक मुलगी आवडते आणि ती मात्र एका राजकारणी नेत्याची मुलगी असते. त्यामुळे पिंटूचं त्या मुलीशी सहजासहजी लग्न होतं शक्य नसतं. आता पिंटूचं त्या मुलीशी लग्न होतं की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
खरं तर अतिशय सुमार आणि अर्थहीन अशी कथा पटकथा असल्यामुळे विनोदी असला तरी चित्रपट म्हणावा तसा प्रभावी नाही. दिग्दर्शन सुद्धा अगदीच ठिकठाक आहे. कलाकार नवीन असल्यामुळे कलाकारांकडून सुद्धा फारशा अपेक्षा नाहीत. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
१०. सिकंदर (Sikandar) |
लेखक | ए आर मुरूगॉदास, रजत अरोडा़, हुसैन दलाल, अब्बास दलाल |
दिग्दर्शक | ए आर मुरूगॉदास |
कलाकार | सलमान खान, रश्मिका मंदाना, शरमन जोशी, सत्यराज, काजल अग्रवाल, प्रतिक बब्बर, संजय कपूर, नवाब शाह |
निर्माता | साजिद नाडियादवाला |
रिलीज तारीख | ३० मार्च २०२५ |
भाषा | हिंदी |
“सिकंदर” चित्रपट समीक्षा :-
दरवर्षी ईद म्हटली की सलमान खान चा चित्रपट प्रदर्शित होतोच. यावर्षी मात्र सलमान खान ची जादू थोडी ओसरलेली दिसते. ३० मार्च रोजी प्रदर्शित झालेला “सिकंदर” ए आर मुरूगॉदास याने दिग्दर्शित केलेला असून चित्रपटाची कथा सुद्धा इतर लेखकांसोबत त्याने लिहीली आहे.
चित्रपटाची कथा तीच जुनी आहे जी वर्षानुवर्षे हिंदी चित्रपटात पहायला मिळत आलेली आहे. चित्रपटाची कथा राजकोट मधील सिकंदर राजकोट ची आहे. कथेची सुरुवात एका विमानातील प्रसंगाने होते. सिकंदर राजकोट म्हणजेच आपला सल्लूभाई एकदा विमानात प्रवास करत असताना चित्रपटाचा खलनायक प्रधान(प्रतिक बब्बर)एका महीलेची छेडछाड करत असतो तेव्हा आपला भाईजान त्या महीलेला वाचवण्यासाठी धावून जातो आणि अर्थातच त्या प्रधानला मारतो. आणि मग इतका मोठा नेता सगळ्यांसमोर मार खातो म्हटल्यावर बदला घेतल्याशिवाय गप्प कसा बसणार.? मग तो सिकंदरची बायको साईश्री(रश्मिका मंदाना) हीला मारून बदला घेतो. पण बदला घेण्याचा हा सिलसिला सुरूच राहतो. कथेत अजून तिघांची एन्ट्री होते ज्यांच्या मागे प्रधान हात धुवून लागतो आणि सिकंदर त्या तिघांना वाचवण्यासाठी स्वतः त्यांची ढाल बनून येतो. आणा ते तिघं कोण आहेत.? तो नेता त्यांना का शोधत असतो.? सल्लू भाई त्या तिघांना का वाचवत असतो.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
सलमान खान चे फॅन असाल तर चित्रपट सहन करत बघू शकता. नाहीतर हा चित्रपट बघून अमूल्य वेळ वाया घालवू नये. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ॲक्शन सीन्स कशातच काही नावीन्य नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. अभिनय सुद्धा बरा म्हणावा असा आहे. खान बंधूंनी आपलं वय झालं हे स्विकारण्याची वेळ आली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
तर मंडळी वरीलपैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणता आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे सुद्धा सांगा.