HomeFilmsHindi

एप्रिल 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा

एप्रिल 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Hindi movies released in April 2025 and their reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जून 9, 2025 | 10:41 PM

एप्रिल २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.

 आज या लेखात एप्रिल २०२५ महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत. 

List of Hindi Movies released in April 2025 & Movie review and information
List of Hindi Movies released in April 2025 & Movie review and information

१. जाट (Jaat)
२०२५. ॲक्शन, ड्रामा. २ तास ३३ मिनिटे. [U/A १६+]
लेखक गोपीचंद मलिनेनी, साई माधव बुर्रा, सौरभ गुप्ता
दिग्दर्शकगोपीचंद मलिनेनी
कलाकारसनी देओल, रेजिना कसांड्रा, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, संयमी खेर ,राम्या कृष्णन, जगपति बाबू, उपेंद्र लिमये
निर्मातानवीन येरनेनी, यलंमचिली रवि शंकर, टी जी विश्व प्रसाद, उमेश कुमार बंसल
रिलीज तारीख१० एप्रिल २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

१. जाट” चित्रपट समीक्षा :-

गदर २ बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर सनी देओल पुन्हा एकदा एक जबरदस्त ॲक्शन चित्रपट घेऊन आला आहे. गोपीचंद मलिनेनी दिग्दर्शित जाट या चित्रपटात सनी देओल सोबतच रणदीप हुडा सुद्धा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत मारामारी, हिंसा, खून, रक्त हे बघायला मिळतं. चित्रपटाची कथा सुरू होते श्रीलंकेतील एका मारामारीने. राणातुंगा म्हणजेच रणदीप हुडा हा एक साधा कामगार असतो. श्रीलंकन सैन्यासाठी खोदकाम करत असताना त्याला आणि त्याच्या भावाला खाणीच्या ठिकाणी एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला बॉक्स मिळतो. तो घेऊन ते समुद्रमार्गे थेट भारतात आंध्रप्रदेशातील एका छोट्या गावात पोहचतात. भारतात येऊन राणातुंगा स्वतःचं साम्राज्य उभं करतो. त्याच्या मार्गात जो कोणी आडवा येतो त्याचं सरळ मुंडकं धडापासून वेगळं होतं. अशी तुम्ही असंख्य मुंडकी कापताना बघता. आणि मग अर्थातच एन्ट्री होते आपल्या
ढाई किलो हात असलेल्या सनी पाजींची. ब्रिगेडियर बलदेव प्रताप सिंह (सनी देओल) हा आपला हिरो खरं तर एकाकडून सॉरी म्हणवून घेण्यासाठी राणातुंगाच्या साम्राज्यात पोहचतो. आता प्रतापसिंहचा ढाई किलो हात राणातुंगाचं साम्राज्य का आणि कसं उखडून टाकतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
साधी सरळ कथा. एक गुंड गावातील लोकांना भयंकर छळतोय. मारतोय. हाल करतोय आणि मग एक हिरो येऊन त्यांना वाचवतो. पण या कथेत इतका मसाला घातलाय की ॲक्शन चित्रपट आवडणाऱ्या लोकांसाठी एकदम मसालेदार मेजवानी झालेली आहे. बाकी चित्रपटात लॉजिक वगैरे शोधण्याची गरज नाही. रणदीप हुडा हा एक हरहुन्नरी कलाकार आहे हे त्याने परत एकदा सिद्ध केलेलं आहे. आपल्या सनी पाजींनी देखील धमाल काम केलंय. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे. एकंदर एक मसालेदार, भरपूर मारामारी असलेला हा चित्रपट आहे. फार अपेक्षा न ठेवता ओटीटीवर आल्यावर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. छोरी २ (Chhorii 2)
२०२५. भयपट. २ तास १२ मिनिटे. [A]
लेखक विशाल फुरिया, अजित जगताप, दिव्य प्रकाश दुबे, मुक्तेश मिश्रा
दिग्दर्शकविशाल फुरिया
कलाकारनुसरत भरुचा, सोहा अली खान, गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, हार्दिका शर्मा, कुलदीप सरीन
निर्माताभूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा, जैक डेविस
रिलीज तारीख११ एप्रिल २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

छोरी २” चित्रपट समीक्षा :-

विशाल फुरिया दिग्दर्शित लपाछपी या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक छोरी हा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचात सिक्वेल असलेला छोरी २ हा आता प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे.
जन्मतः मुलींना ठार मारून टाकणाऱ्या कुप्रथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा आता सात वर्षांनी पुढे बघायला मिळते. साक्षी ही कथेची नायिका. सात वर्षांपूर्वी गरोदर असलेली साक्षी आपल्या नवऱ्यापासून आणि त्या सासरच्या माणसांच्या तावडीतून सुटून इन्स्पेक्टर समर (गश्मीर महाजन) सोबत नव्याने आयुष्य जगत आहे. परंतु तिला सतत भिती वाटत असते की तिचा भुतकाळ परत तिच्या समोर येईल. आणि कालांतराने तिची भिती खरी ठरते. तिच्या सात वर्षाच्या मुलीचं इशानीचं (हार्दिका शर्मा) अपहरण होतं. तिला शोधण्यासाठी म्हणून साक्षी पुन्हा तिच्या सासरच्या त्याच भयानक गावात पोहचते. आता यावेळी त्या गावात एक वेगळंच साम्राज्य समोर येतं. विहिरींच्या खाली असलेल्या रहस्यमयी गुहेत साक्षी आणि इशानी एकमेकींना भेटतात. परंतु तिथं त्या साम्राज्याचा नायक असलेल्या प्रधानासमोर त्या बंदीस्त अवस्थेत असतात. या प्रधानाला नवकन्यांचा भोग लागत असतो म्हणूनच इशानीला तिथं आणलेलं असतं. या प्रधानाची बायको दासी मा म्हणजे सोहा अली खान ही प्रधाना इतकीच क्रुर दाखवलेली आहे. आता साक्षी आपल्या मुलीला या सगळ्यातून सोडवते का.? तो‌ प्रधान कोण आहे.? हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
आधीचा छोरी आणि आताचा सिक्वेल यात आताची कथा जरा उगीच ताणलीय असं वाटतं. त्यातही तिसऱ्या सिक्वेलचे संदेश दिलेले आहेत. भयपट, गुढपट या सोबतच एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी केलेला आहे. नुसरत भरुचा आणि सोहा अली खान या दोघींनी कमाल अभिनय केला आहे. गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, हार्दिका शर्मा या सगळ्यांनी देखील उत्तम अभिनय केला आहे. हॉरर चित्रपट आवडत असतील तर नक्की बघू शकता. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३. केसरी चाप्टर २ (Kesari Chapter 2: The Untold Story of Jallianwala Bagh)
२०२५. ड्रामा, हिस्टोरिकल. २ तास १५ मिनिटे. [A]
लेखक करण सिंग त्यागी, अमृतपाल सिंग बिंद्रा, सुमित सक्सेना
दिग्दर्शककरण सिंग त्यागी
कलाकारअक्षय कुमार,आर माधवान,अनन्‍या पांडे,साइमन पैस्‍ले डे, रेजिना कॅसैंड्रा
निर्माताकरण जोहर, आदर पुनावाला, अपुर्व मेहता, अम्रितपाल सिंग बिंद्रा, आनंद तिवारी, हिरू यश जोहर
रिलीज तारीख१८ एप्रिल २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

३. केसरी चाप्टर २” चित्रपट समीक्षा :-

१३ एप्रिल १९१९ रोजी पंजाब मधील अमृतसर येथे घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला चित्रपट केसरी चाप्टर २, १८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. रघू पलट आणि पुष्पा पलट यांच्या ‘द केस देंट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर हा सिनेमा बेतलेला असून अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचा हा एक लढा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे एका शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या जमावावर ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्याकडून केलेला अंदाधुंद गोळीबार आणि मृत्यूचं थैमान. या हत्याकांडा नंतर ब्रिटिश सरकारमध्ये चांगल्या पदावर असलेले वकील सी. शंकरन नायर यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या डायर आणि ब्रिटिश सरकार विरूद्ध कोर्टात खटला दाखल केला. याच खटल्याची सुनावणी म्हणजे हा चित्रपट. सी शंकरन यांनी ज्या प्रकारे हा लढा लढला तो इतिहास या चित्रपटाच्या निमित्ताने सगळ्यांसमोर आला.
जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे अमृतसर मधील असंख्य भारतीयांनी दिलेली आहुती. या प्रकरणा नंतर स्वातंत्र्य चळवळीला अजून गती मिळाली. केसरी चाप्टर २ या चित्रपटात मनोरंजनापेक्षा माहीत नसलेला इतिहास अधिक जाणून घेता येतो. अक्षय कुमार याने सी. शंकरन ही भूमिका साकारली आहे. बऱ्याच काळानंतर अक्षय कुमारला बघून बरं वाटलं. आर माधवन म्हणजे बोनस पॉईंट. उत्तम अभिनय. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिने चांगला अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा उत्तम आहे अर्थातच जी सत्यघटनेवर आणि इतिहासाचा आढावा घेणारी आहे. दिग्दर्शन सुद्धा छान आहे. पार्श्वसंगीत अजून प्रभावी असायला हवं होतं. खरं तर असे चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून बघायला हवेत परंतु दुर्दैवाने अशा चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. तुम्ही आता हा चित्रपट जियो हॉटस्टार वर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


४. लॉगआऊट (Logout))
२०२५. ड्रामा, थ्रिलर. १ तास ४८ मिनिटे. [U/A १३+]
लेखक बिस्वपति सरकार
दिग्दर्शकअमित गोलानी
कलाकारबाबिल खान , रसिका दुग्गल , गंधर्व दीवान और निमिषा नायर
निर्माताकेविन वाज , अजित अंधारे , समीर सक्सेना , सौरभ खन्ना , बिस्वपति सरकार और अमित गोलानी
रिलीज तारीख१८ एप्रिल २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

लॉगआऊट” चित्रपट समीक्षा :-

आजकाल माणसं माणसांसोबत कमी आणि मोबाईल मध्ये जास्त अडकलेली दिसतात. सोशल मिडियावर प्रत्येकजण तासनतास घालवत असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सोशल मिडियावर पोस्ट करण्याची प्रत्येकाला घाई असते. तर काही जणांचं खरं आयुष्य वेगळं असतं आणि सोशल मिडियावर त्यांचं जगाला दाखवण्यासाठी निर्माण केलेलं एक वेगळंच जग असतं. परंतु कितीही खोटी माहिती सोशल मीडियावर टाकली तरी त्या व्यक्तीची सगळी गुपीतं त्याच्या मोबाईल मध्ये कैद असतात. अशा व्यक्तीचा मोबाईल आणि पासवर्ड कोणाला समजला तर काय होईल हे सांगणारा चित्रपट म्हणजे झी फाईव्ह वर प्रदर्शित झालेला लॉगआऊट.
बबील खान हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून त्याने प्रत्यूष नावाच्या इन्फ्लुएन्सरची भूमिका साकारली आहे. ज्याचे फॉलोअर्स एक करोड होणार आहेत असा हा प्रत्यूष खरा वेगळाच असतो परंतु त्याने सोशल मिडियावर स्वतःची वेगळी फेक ओळख निर्माण केलेली असते. प्रत्यूषची एक कॉम्पिटिटर आहे जीचे सुद्धा एक करोड फॉलोअर्स होणार असतात परंतु जर आधी तिचे एक करोड पूर्ण झाले तर मात्र प्रत्यूसच्या हातून बऱ्याच जाहीराती जाणार असतात. तसं व्हायला नको म्हणून तो एका प्रसिद्ध
इन्फ्लुएन्सर सोबत कोलॅब करतो. परंतु तो व्हिडिओ अपलोड होण्याआधी प्रत्यूषचा मोबाईल हरवतो. तो मोबाईल प्रत्यूषच्या फॅनकडे जातो आणि काही कारणास्तव प्रत्यूष स्वतःच तिला पासवर्ड सांगतो. आणि इथुनच खऱ्या अर्थाने चित्रपट सुरू होतो. एका पासवर्ड मुळे प्रत्यूषच्या संपूर्ण आयुष्याचा, भविष्याचा कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातात जातो. प्रत्यूषचा सगळा भूतकाळ बाहेर पडतो. ज्या व्यक्तीकडे हा मोबाईल असतो ती व्यक्ती प्रत्यूष आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड यांचे फोटो तिच्या आताच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवते. खरं तर ती व्यक्ती मोबाईल आणि पासवर्ड मुळे बऱ्याच गोष्टी करायला सुरुवात करते ज्यामुळे प्रत्यूषच्या पायाखालची जमीन सरकते. हा एक सस्पेन्स सायकॉजीकल थ्रिलर चित्रपट आहे. प्रत्यूषचा मोबाईल हॅक झाल्यामुळे त्याचं आयुष्य पणाला लागलेलं असतं. या सगळ्यातून तो बाहेर पडतो का.? कसा बाहेर पडतो.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. झी फाईव्ह वर हा चित्रपट उपलब्ध आहे.
बबील खान हा आपल्या वडिलांप्रमाणेच एक उत्कृष्ट कलाकार आहे हे त्याने याआधी सुद्धा दाखवून दिलं आहे. या चित्रपटात सुद्धा त्याने उत्तम नैसर्गिक अभिनय केला आहे. संपूर्ण चित्रपट एक महत्त्वाचा संदेश देणारा आहे. फार काही मसाला नसलेला परंतु प्रत्येकाला रिलेट करेल असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


५. ग्राऊंड झीरो (Ground Zero)
२०२५. हिस्टोरिकल, ॲक्शन, थ्रिलर. २ तास १७ मिनिटे. [U/A]
लेखक संचित गुप्ता, प्रियदर्शी श्रीवास्तव
दिग्दर्शकतेजस प्रभा विजय देओस्कर
कलाकारइमरान हाशमी, साई तम्हणकर, जोया हुसैन, मुकेश तिवारी, रॉकी रैना, गुनीत सिंह
निर्माताफरहान अख्तर, रितेश सिधवानी
रिलीज तारीख२५ एप्रिल २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

ग्राऊंड झीरो” चित्रपट समीक्षा :-

बऱ्याच काळानंतर इम्रान हाश्मी एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आला आहे. २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला ग्राऊंड झिरो या चित्रपटात इम्रान हाश्मी याने एका बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून हा चित्रपट २००१ च्या भारतीय संसद हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी गाझी बाबा याला संपवण्यासाठी बीएसएफ जवान नरेंद्र नाथ धर दुबे यांनी जी कामगिरी केली त्यावर आधारित असलेला हा चित्रपट आहे.
चित्रपटात सुरूवातीला २००१ चा काळ आणि तेव्हा काश्मीरमध्ये असलेली परिस्थिती दाखवली आहे. तेव्हा काश्मीरमध्ये भारतीय आर्मी ऑफिसर यांना तेथील स्थानिक लोक कसे वागणूक देत असत, त्यांच्यावर केली जाणारी दगडफेक हे सगळं दाखवलं आहे. नंतर अर्थात संसद हल्ला झाल्यानंतर आपले किती जवान मारले गेले आणि त्यामुळे “अब प्रहार होगा” म्हणत अधिकारी नरेंद्र नाथ धर दुबे यांनी कसं गाझीला शोधण्यासाठी कारवाई केली हे सगळं या चित्रपटात बघायला मिळतं. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे त्यामुळे चित्रपट बघायला हवाच परंतु एक चित्रपट म्हणून बऱ्याच ठिकाणी चित्रपट कमी पडतो. कथा संथ गतीने पुढे सरकते. चित्रपट उगीच लांबवल्यासारखा वाटतो. इम्रान हाश्मी याने अभिनय उत्तम केला आहे परंतु एक बीएसएफ जवान म्हणून त्याला स्विकारणं सुरूवातीला जरा अवघड जातं. इतर काही कलाकारांचा सुद्धा अभिनय म्हणावा तसा प्रभावी वाटत नाही. छायाचित्रण, दिग्दर्शन, संकलन बऱ्याच गोष्टींमध्ये काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. एकंदरीत एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


६. ज्वेल थिफ द हाईस्ट बिगिन्स (Jewel Thief – The Heist Begins)
२०२५. ॲक्शन, थ्रिलर. २ तास १७ मिनिटे. [U/A १६+]
लेखक डेविड लोहान, सुमित अरोड़ा, करण व्यास, संबित मिश्रा
दिग्दर्शककूकी गुलाटी, रॉबी ग्रेवाल
कलाकारसैफ अली खान, जयदीप अहलावत, कुणाल कपूर, निकिता दत्ता, कुलभूषण खरबंदा, गगन अरोड़ा, सुमीत गुलाटी
निर्मातासिद्धार्थ आनंद, ममता आनंद
रिलीज तारीख२५ एप्रिल २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.४⭐/ ५

ज्वेल थिफ द हाईस्ट बिगिन्स” चित्रपट समीक्षा :-

२५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला “ज्वेल थिफ द हाईस्ट बिगिन्स” हा चित्रपट कूकी गुलाटी आणि रॉबी ग्रेवाल यांनी दिग्दर्शित केलेला आहे. एका किंमती हिऱ्याची चोरी करण्यासाठी असलेली चढाओढ इतकी साधी सरळ स्टोरीलाईन असलेल्या या चित्रपटात जयदीप अहलावत आणि आपले नवाब सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटाची कथा अगदीच सुमार आहे. रेडसन हा एक अफ्रिकी हिरा आहे ज्याची किंमत पाचशे करोड आहे. आणि हा हिरा चोरण्यासाठी राजन औलाख (जयदीप अहलावत) हा रेहान रॉय(सैफ अली खान) याच्यासोबत पार्टनरशीप करतो. दोघेही एकमेकांना कसं फसवता येईल आणि हिरा एकट्याकडे राहील याच प्रयत्नात असतात. त्यातच रेहान राजनच्या बायकोच्या प्रेमात पडतो. त्यामुळे मग हिरा आणि फराह (निकिता दत्ता) या दोन्ही गोष्टी कशा मिळवता येतील यासाठी रेहान काय करतो.? आणि रेहानला फसवून हिरा कसा मिळवता येईल यासाठी राजन काय करतो यावर अख्खा चित्रपट बेतलेला आहे. यातच शून्य एक्स्प्रेशन आणि थंड डायलॉग डिलिव्हरी करणारा एक पोलिस विक्रम पटेल (कुणाल कपूर) हा सुद्धा आहे. आता तो या दोघांना पकडतो का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
नेटफ्लिक्सने हा चित्रपट का घेतला असावा असा प्रश्न पडतो. जयदीप अहलावत आहे म्हणून चित्रपट बघीतला जातो. सैफ अली खान अगदीच विनोदी वाटतोय. कथा, पटकथा नावाला सुद्धा नाही. दिग्दर्शन ठिकठाक. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


७. फुले (Phule)
२०२५. जीवनचरित्र, ड्रामा. २ तास ९ मिनिटे. [U]
लेखक अनंत नारायण महादेवन, मोअज्जम बेग
दिग्दर्शकअनंत नारायण महादेवन
कलाकारप्रतीक गांधी , पत्रलेखा , विनय पाठक , सुशील पांडे , दरशील सफारी , जॉयसेन गुप्ता , सुरेश विश्वकर्मा
निर्माताडॉ. राज खवाड़े , शिवराज खवाड़े , उत्पल आचार्य , प्रणय चोकशी , जगदीश पटेल , अनुया चौहान कुडेचा
रिलीज तारीख२५ एप्रिल २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

फुले” चित्रपट समीक्षा :-

१८४८ ते १८९७ या काळात वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था याविरोधात आवाज उठवणाऱ्या फुले दाम्पत्याचं महात्म्य सांगणारा हा चित्रपट आहे. त्या काळात शिक्षणाची गरज ओळखून स्त्रीयांना शिकवण्यासाठी स्वतः प्रवाहाविरुद्ध लढणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगाथेवर हा चित्रपट आधारित आहे.
त्यावेळी जर जोतिबा फुले यांनी शिक्षणाची मशाल हाती घेतली नसती तर आजही स्त्रिया गुलामगिरीच्या काळोखात अडकून पडल्या असत्या. परंतु त्यावेळी समाजव्यवस्थे विरूद्ध आवाज उठवून स्त्रीयांना शिक्षण देणं इतकं सोपं नव्हतं. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागल्या. लोकांनी दगड मारले, शेण फेकलं पण फुले दाम्पत्य ठाम राहीलं. त्यांच्या या संघर्षाची ही महान गाथा मोठ्या पडद्यावर अनंत नारायण महादेवन या दिग्दर्शकाला आणावी वाटली हे विशेष. चित्रपटात या जोडप्याने केलेल्या जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलन, समाज प्रबोधन, स्त्री शिक्षण अशा अनेक कार्यांचा आढावा घेतला आहे.
जोतिबा (प्रतीक गांधी) आणि सावित्रीबाई (पत्रलेखा) यांनी उत्तम अभिनय केला आहे. तत्कालीन काळात ब्राह्मणांकडून झालेला तीव्र विरोध आणि त्यांनी फुले दाम्पत्याला दिलेला त्रास, स्त्री शिक्षणासाठी केवेला विरोध हे सगळं बघताना फुले यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता दाटून येते. खऱ्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे त्यामुळे फार मसाला वगैरे काही नाही. परंतु प्रत्येकाने बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


८. ओये भुतनिके (Oye Bhootni Ke)
२०२५. भयपट, ड्रामा, विनोदी. २ तास २९ मिनिटे. [U/A १६+]
लेखक तनुराज अधिकारी, नितिन रायकर, अभिषेक
दिग्दर्शकअजय कैलाश यादव
कलाकारमिमोह चक्रवर्ती, आदित्य कुमार, डायना खान, रोहित सुर्यवंशी
निर्माताजसपाल सिंग पी गुनीया, राजेश तिवारी
रिलीज तारीख२५ एप्रिल २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

ओये भुतनिके” चित्रपट समीक्षा :-

ओये भुतनिके हा चित्रपट खरं तर डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणास्तव तो रखडला आणि शेवटी एकदाचा तो आता २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. अजय कैलाश यादव यांनी दिग्दर्शित केलेला या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने पदार्पण केलेलं आहे. ज्या चित्रपटाचा ३ मिनिटांचा ट्रेलर बघणं शक्य होत नाही तिथे हा चित्रपट तुम्ही बघावा असं आम्ही अजिबातच सुचवणार नाही. हा विनोदी भयपट आहे.
चित्रपटाची कथा अगदीच सुमार आहे. एका बंगल्यातील खोट्या भूतांना पळवून लावण्यासाठी तीन मित्र आतमध्ये शिरतात. परंतु बंगल्यात गेल्यावर त्यांना काही वेगळाच अनुभव येतो. बंगल्याच्या बाहेर सुद्धा काही गुंड त्यांच्या मागे लागलेले असतात. तर बंगल्यात भूतं आणि बाहेर गुंड अशा कचाट्यात ते तीघं सापडलेले असताना काय गोंधळ होतो हे या चित्रपटात विनोदी पद्धतीने बघायला मिळतं. दिग्दर्शक अजय यादव यांनी एक निष्फळ प्रयत्न केलेला आहे ज्यात मिमोह चक्रवर्ती हे सुद्धा सामिल आहेत. फार काही लिहावं असं या चित्रपटात काही नाही. बघीतला नाही तरी चालेल असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.

    तर मंडळी वरीलपैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणता आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे सुद्धा सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *