HomeFilmsMarathi

एप्रिल 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा

एप्रिल 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Marathi movies released in April 2025 and their reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जून 24, 2025 | 09:26 PM

*एप्रिल २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.

   आज या लेखात आपण एप्रिल २०२५मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.
List of Marathi Movies released in April 2025 & Movie review and information

१. अशी ही जमवा जमवी (Ashi Hi Jamva Jamvi)
२०२५. विनोदी, ड्रामा. परिवार. २ तास ९ मिनिटे. [U/A १३+]
लेखक लोकेश गुप्ते
दिग्दर्शकलोकेश गुप्ते
कलाकारअशोक सराफ, वंदना गुप्ते, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते
निर्माताराहुल शांताराम
रिलीज तारीख१० एप्रिल २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.६⭐/ ५

अशी ही जमवा जमवी” चित्रपट समीक्षा :-

१० एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला “अशी ही जमवा जमवी” हा चित्रपट लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केलेला असून चित्रपटाची कथा देखील त्यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिकेत अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी पहायला मिळत आहे. हा एक विनोदी चित्रपट असला तरीही आजच्या तरुण पिढीने किंवा एकूणच सगळ्यांनी वयस्कर लोकांकडे, त्यांच्या समस्यांकडे कोणत्या दृष्टीने बघायला हवं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चित्रपटाची कथा नेहमीचीच आहे. या आधी सुद्धा अशा प्रकारचे अनेक चित्रपट आलेले आहेत. तर चित्रपटातील मोहन म्हणजेच अशोक सराफ हे आपल्या मुलीकडे, निलिमा सोबत (सुलेखा तळवलकर) जावई शेखर (मिलिंद फाटक) आणि नात सारा (तनिष्का विशे) यांच्यासह राहत असतात. अर्थातच त्यांची पत्नी आता या जगात नसते. तथ दुसरीकडे वंदना (वंदना गुप्ते) या विधवा असून त्या आपल्या मोठ्या मुलाकडे , निरंजनकडे (सुनील बर्वे) राहत असतात. त्यांच्या सोबत त्यांची सून निवेदिता (चैत्राली गुप्ते), छोटा मुलगा नितीन (पुष्कराज चिरपुटकर) आणि नातू अभिषेक (ओंकार कुलकर्णी) हे सुद्धा असतात. तर मुख्य कथा अशी आहे की मोहन आणि वंदना एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखत असतात आणि उतारवयात एकमेकांची सोबत म्हणून त्यांना एकमेकांशी लग्न करायचं असतं. परंतु समस्या ही असते की हे सगळं आपापल्या घरी सांगायचं कसं.? हीच या चित्रपटाची गंमत आहे. घरी सांगितल्यावर काय काय घडतं हे या चित्रपटात पहायला मिळतं.
अर्थातच अशोक सराफ आणि वंदना गुप्ते हे दोघं कसलेले कलाकार आणि त्यात विनोदी चित्रपट म्हणजे सगळी धमाल आहे. मनोरंजन म्हणून एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. दिग्दर्शन चांगलं आहे
परंतु काही ठिकाणी काही पात्रांचा अभिनय उगीच ओव्हर वाटतो. कथा सुद्धा अगदी नेहमीचीच असल्यामुळे वेगळं असं काही बघायला मिळत नाही. परंतु चित्रिकरण गोव्यात झाल्यामुळे सुंदर दृश्य बघायला मिळतात. सिनेमॅटोग्राफी छान आहे. संगीत ठिकठाक आहे. एकंदरीत ओटीटी वर आल्यावर एकदा बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


२. जय भीम पॅंथर एक संघर्ष (Jay Bhim Panther – Ek Sangharsh )
२०२५. ड्रामा. सोशल, पॉलिटिकल. २ तास १३ मिनिटे. [U/A १६+]
लेखक निशांत नाथराम धापसे
दिग्दर्शकनिशांत नाथराम धापसे
कलाकारमिलिंद शिंदे, चिन्मय उदगीरकर, गौरव मोरे, प्रवीण डाळींबकर, विजय धाकडे, संजय कुलकर्णी, अभिजीत चव्हाण
निर्माताभदंत थेरो
रिलीज तारीख११ एप्रिल २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“जय भीम पॅंथर” चित्रपट समीक्षा :-

समाज कितीही शिकला, पुढारला तरी जातपात, उच्च नीच हे अजून कोणालाही मुळापासून उखडून फेकता आलेलं नाही. दलित समाज नेहमीच या शोषणाची शिकार बनत आलेला आहे. जय भीम पॅंथर हा चित्रपट अशाच दलित समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारा आहे. कितीही नाही म्हटलं तरी आजही खेड्यापाड्यात दलित समाज ठराविक समाजाच्या वर्चस्वाखाली भरडला जात आहे. निशांत नाथराम धापसे यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दलित समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पाच मित्रांची ही गोष्ट आहे.
चित्रपटाची कथा एका गावात घडताना बघायला मिळते. गावातील दलित लोकांना छळणारा, त्यांचे शोषण होत आहे हे बघून गावातीलच पाच मित्र आवाज उठवतात. भाई (मिलिंद शिंदे), सिद्धार्थ (चिन्मय उदगीरकर), राहुल (गौरव मोरे), कासिम (प्रवीण डाळींबकर) आणि रावबा (विजय धाकडे) हे पाच जण बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित एक जय भीम पँथर नावाची संघटना स्थापन करतात. ही संस्था दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवते. आणि अर्थातच त्यांच्या या संघटनेमुळे सर्वसामान्य दलित समाजातील लोकांना धीर मिळतो. स्वतःसाठी उभं राहायला हवं याची जाणीव होते. त्यामुळे गावातील सत्ताधारी पक्षाचे नेते या संघटनेची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन या पँथरचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. गावातील राजकीय नेता शुभनराव (संजय कुलकर्णी) आणि बाबुराव (जयवंत वाडकर) यांना आपली किंमत कमी होईल हे लक्षात येतं. ते पोलिस असलेल्या जाधवला (अभिजीत चव्हाण) हाताला धरून जय भीम पँथर ला उध्वस्त करण्याचं ठरवतात. आता पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
निशांत नाथराम धापसे यांनी एक सर्वसामान्य कथा लिहिली आहे. अशा प्रकारचे बरेच चित्रपट याआधी आलेले आहेत. कथा काळाशी सुसंगत वाटत नाही. परंतु दलित समाजावर होणारा अन्याय यावर भाष्य करणारे चित्रपट काढणं हे सुद्धा एक धाडस आहे. त्यामुळे एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केलेला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


३. इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी (Institute Of Pavtollogy)
२०२५. विनोदी, ड्रामा. २ तास १९ मिनिटे. [U/A १६+]
लेखक संतोष शिंत्रे
दिग्दर्शकप्रसाद नामजोशी, सागर वंजारी
कलाकारगिरीश कुलकर्णी,दिलीप प्रभावळकर,सयाजी शिंदे,छाया कदम
निर्मातानेहा गुप्ता, प्रसाद नामजोशी
रिलीज तारीख११ एप्रिल २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी” चित्रपट समीक्षा :-

मराठी चित्रपटांना प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत अशी बोंब नेहमीच ऐकायला मिळते परंतु चित्रपटाच्या नावाखाली काहीही कथा घेऊन बाष्कळ विनोद लिहून चित्रपट काढले तर अर्थातच प्रेक्षक पाठ फिरवतात. ११ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला “इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी” असाच चित्रपट आहे ज्यात मोठे कलाकार असून देखील चित्रपट अत्यंत निराशाजनक आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून संतोष शिंत्रे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
“इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी” हे एक असं आगळवेगळं इन्स्टिट्यूट आहे जिथं गुंडगिरीचं प्रशिक्षण दिले जाते. दिवेकर म्हणजेच गिरीश कुलकर्णी हे या इन्स्टिट्यूटची स्थापना करतात. इथे गुंडानी वाईट गोष्टींचा कसा उपयोग करून घेता येईल, राडे कसे करता येतील असं शिकवलं जातं. अर्थातच थत्ते म्हणजे दिलिप प्रभावळकर हे या गोष्टींना विरोध करतात. तर दुसरीकडे कलांत्रे म्हणजे सयाजी शिंदे हे या विद्यार्थ्यांचा स्वतःसाठी वापर कसा करता येईल हे बघत असतात. खरं तर चित्रपटाची कथा पटकथा इतकी सुमार आणि निरर्थक वाटते की चित्रपटात बघण्यासारखं काही उरत नाही. दिलिप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांना अशा प्रकारच्या चित्रपटात काम करताना बघून वाईट वाटतं.
दिग्दर्शन सुद्धा अगदीच सुमार आहे. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. कलाकार चांगले आहेत म्हणून थोडा वेळ चित्रपट सहन करू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


४. सुशीला सुजीत (suSHEELA – suJEET)
२०२५. विनोदी, ड्रामा. १ तास ३५ मिनिटे. [U/A १६+]
लेखक प्रसाद ओक
दिग्दर्शकप्रसाद ओक
कलाकारस्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, सुनील तावडे, रेणुका दफ्तरदार, राधा सागर, अजय कांबळे, अमृता खानविलकर.
निर्माताप्रसाद ओक, मंजीरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी, स्वप्नील जोशी
रिलीज तारीख१८ एप्रिल २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“सुशीला सुजीत” चित्रपट समीक्षा :-

आजकाल मराठी विनोदी चित्रपट म्हटलं की विनोद असले तरी कथा चांगली असेलच असं नाही. १८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला “सुशीला सुजीत” हा चित्रपट देखील असाच काहीसा आहे. सोनाली कुलकर्णी यांच्यासारखी अभिनेत्री असल्यामुळे खरं तर फार अपेक्षा ठेवून चित्रपट बघायला जाल तर नक्कीच निराशा पदरी येईल.
प्रसाद ओक लिखित आणि दिग्दर्शित असलेल्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी हे दोघं मध्यवर्ती भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा या दोघांभोवतीच फिरते. कथा म्हणावी अशी फार काही विशेष कथा नाही. सुशीला(सोनाली कुलकर्णी) आणि रमाकांत(सुनील तावडे) हे दोघं नवरा बायको एका उंच इमारतीमध्ये राहत असतात. रमाकांत हा वयाने मोठा असतो त्यात बायको दिसायला देखणी त्यामुळे त्याच्या मनात एक न्यूनगंड असतो. आणि त्याला सतत एक प्रकारची इनसिक्युरिटी वाटत असते. अशातच एकदा त्यांच्या एका बेडरूम मधील शॉवर बिघडलेला असतो आणि तो दुरुस्त करण्यासाठी एके दिवशी एक प्लंबर सुजीत(स्वप्निल जोशी) हा त्यांच्या घरी येतो. चित्रपटात ट्विस्ट असा येतो की रमाकांत ऑफिस ला निघून गेल्यावर ज्या बेडरूमचा शॉवर बिघडलेला असतो त्या रूमचा दरवाजा वाऱ्यामुळे बंद होतो. आणि गंमत म्हणजे तो दरवाजा फक्त बाहेरून उघडला जातो. म्हणजे त्या रूममध्ये आता सुशीला आणि सुजीत अडकले जातात. पूर्ण दिवस ते दरवाजा उघडण्याचे निष्फळ प्रयत्न करतात. तिकडे सुशीला फोन उचलत नाही म्हणून रमाकांत च्या डोक्यात भलतेसलते विचार येत असतात. तर शेवटी दरवाजा कसा उघडतो.? दिवसभर काय गोंधळ उडतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा पहिला भाग नक्कीच चांगला आहे. परंतु उत्तरार्धात चित्रपट अगदीच फसला आहे. विनोद निर्मितीच्या नावाखाली विनोंदाचा अतिरेक झालेला आहे. स्वप्नील जोशी ने थोडा ब्रेक घ्यावा असं मनापासून वाटतं. एकंदरीत कथा चांगली नसली तरी मनोरंजन करू शकेल इतका विनोदी चित्रपट बनलेला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई (Sant Dnyaneshwaranchi Muktaai)
२०२५. जीवनचरित्र, ड्रामा, हिस्टोरिकल. २ तास २६ मिनिटे. [U/A]
लेखक दिग्पाल लांजेकर
दिग्दर्शकदिग्पाल लांजेकर
कलाकारतेजस बर्वे,अक्षय केळकर,सुरज पारसनीस,नेहा नाईक, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, प्रवीण तरडे, अजय पुरकर
निर्मातारेश्मा कुंदन थडानी
रिलीज तारीख१८ एप्रिल २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

५. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” चित्रपट समीक्षा :-

आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे. अशाच महान संतांपैकी एक महान संत म्हणजे संत ज्ञानेश्वर. खरं तर संत ज्ञानेश्वरां प्रमाणेच विठ्ठलपंत आणि रूक्मिणीबाई यांची इतर अपत्ये देखील महान संत. निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई अशा या चार भावंडांची गाथा उलगडणारा चित्रपट म्हणजे “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई”. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन देखील केलेलं आहे. खरं तर या चित्रपटाचं प्रमोशन झालं नाही किंवा म्हणावी अशी जाहिरात झाली नाही त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना हा चित्रपट कधी येऊन गेला याची कल्पना देखील नाही.
आईवडिलांच्या देहत्यागानंतर या चार भावडांची समाजाकडून झालेली उपेक्षा, अपमान, छळ सारं काही या चित्रपटात पहायला मिळतं. परंतु समाजाने इतका त्रास देऊन सुद्धा आध्यात्मिक साधनेचा मार्ग पत्करून या चारही जणांनी त्याग आणि प्रेम याचा सुंदर मिलाप समाजाला दाखवून दिला. या चित्रपटात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक प्रवासात या चारही संतानी केलेलं महान कार्य उलगडून दाखवले आहे. संत ज्ञानेश्वर यांची बहीण मुक्ताबाई यांच्या महान कार्याची ओळख या चित्रपटाच्या निमित्ताने परत एकदा होते.
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते सारं चित्रपटाला साजेस आहे. दिग्दर्शन सुद्धा छान आहे. मुख्य म्हणजे सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील या महान संतांना अधिक जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६. देवमाणूस (Devmanus)
२०२५. ड्रामा. थ्रिलर. २ तास ९ मिनिटे. [U/A १६+]
लेखक नेहा शितोळे
दिग्दर्शकतेजस देऊस्कर
कलाकारमहेश मांजरेकर,रेणुका शहाणे,सुबोध भावे,सिद्धार्थ बोडके,अभिजीत खांडकेकर
निर्मातालव रंजन, अंकुर गर्ग
रिलीज तारीख२५ एप्रिल २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

६. देवमाणूस” चित्रपट समीक्षा :-

देवमाणूस हे चित्रपटाचं नाव खूप सूचक आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरंगात देव आणि प्रसंगी दानव अशा दोन्ही प्रकारच्या भावना दडलेल्या असतात. हाच या चित्रपटाचा गाभा आहे. २०२२ मध्ये वध हा एक हिंदी चित्रपट आला होता. जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. याच कथेवर आधारित देवमाणूस हा चित्रपट बेतलेला आहे. महेश मांजरेकर आणि रेणूका शहाणे ही जोडी या चित्रपटात पहायला मिळते.
चित्रपटाची कथा वध या चित्रपटाची होती तशीच आहे. फक्त या कथेला मराठी टच दिलेला आहे. केशव म्हणजे महेश मांजरेकर हे एक निवृत्त शिक्षक असतात तर त्यांची पत्नी लक्ष्मी म्हणजे रेणुका शहाणे ही घरातच हातमागावर पैठणी विणण्याच काम करत असते. दोघांनीही खूप कष्ट करून, कर्ज काढून आपल्या मुलाला परदेशी पाठवलेलं असतं. याच कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी गुंड असलेला दिलिप त्यांना प्रचंड त्रास देत असतो, छळत असतो. याच छळाला कंटाळून अखेर केशव यांच्या हातून दिलिपचा खून होतो. खरं तर पैशाचा तगादा लावून दिलीपचा बॉस याला केशव यांची जमीन हडपायची असते. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र हा चित्रपट बघावा लागेल.
उत्तम पार्श्वसंगीत आणि महेश मांजरेकर यांचा उत्तम अभिनय हा मेळ चांगला जुळून आला आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थ बोडके याने कमाल अभिनय केला आहे. तसंच अभिजित खांडकेकर याने देखील नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारली आहे. सुबोध भावेची भूमिका देखील चांगली आहे. एकंदरीत मनोरंजन करणारा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


७. झापुक झुपूक (Zapuk Zupuk)
२०२५. विनोदी, ड्रामा, रोमँटिक. २ तास २४ मिनिटे. [U/A १६+]
लेखक ओमकार मंगेश दत्त
दिग्दर्शककेदार शिंदे
कलाकारसुरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी, पुष्कराज चिरपुटकर,दीपाली पानसरे
निर्माताज्योती देशपांडे, बेला शिंदे
रिलीज तारीख२५ एप्रिल २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

झापुक झुपूक” चित्रपट समीक्षा :-

२५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला “झापुक झुपूक” हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बराच चर्चेत होता त्याचं कारण म्हणजे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेला सुरज चव्हाण. टिकटॉक च्या माध्यमातून पुढे आलेला हा तरुण थेट बिग बॉस स्पर्धक म्हणून सामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत बनला. आणि जेव्हा याच सुरजला घेऊन चित्रपट निर्मिती करणार अशी घोषणा केदार शिंदे यांनी केली तेव्हा प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आणि आता शेवटी सुरजचा झापुक झुपूक प्रदर्शित झालेला आहे. परंतु केदार शिंदे यांनी जी अपेक्षा ठेवली होती असेल त्या बाबतीत मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला.
चित्रपटाची कथा नेहमीचीच. कथा एका गावातील आहे. गावातील पंजाबराव पाटील(मिलिंद गवळी) यांची मुलगी नारायणी(जुई भागवत) शहरातून शिक्षण घेऊन गावातील मुलांना साक्षर बनवण्याचं ध्येय बाळगून गावात येते. गावातील ज्या शाळेत ती शिक्षिका म्हणून रूजू होते त्या शाळेत सुरज हा एक शिपाई असतो. अर्थातच त्याची अक्षरओळख सुद्धा झालेली नसते. परंतु या सुरजला नारायणी पाहता क्षणी आवडते. आणि सुरजचा देखील असा समज होतो की तिला सुद्धा तो आवडतो.‌ म्हणून तो गावातील सुशिक्षित शेखरकडून(इंद्रनील कामत) प्रेमपत्र लिहून घेतो. परंतु ट्विस्ट असा येतो की नारायणीला वाटतं हे पत्र शेखरने लिहीलं आहे. त्यात अजून गोंधळ म्हणजे ते पत्र पंजाबराव यांना सापडतं. आता यापुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र हा चित्रपट बघावा लागेल.
ओमकार मंगेश दत्त यांनी अतिशय सामान्य अशी कथा लिहिली आहे. केदार शिंदे यांनी कितीही ठरवलं असतं तरी दिग्दर्शन करायला फारसा कथेत वाव नव्हता. जुई भागवत, इंद्रनील, मिलिंद गवळी या कलाकारांचा अभिनय चांगला आहे. परंतु सुरज चव्हाण याने सुरूवाती पासून शेवटपर्यंत फक्त आरडा ओरडा केला आहे. तो माणूस म्हणून कितीही गरीब किंवा साधा असला तरीही एक कलाकार म्हणून तो नक्कीच कमी पडलाय. एकंदरीत चित्रपट मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.

   तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *