ऑगस्ट २०२५ मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा
List of Marathi films released in August 2025 and their reviews.
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जानेवारी 15, 2025 | 09:06 PM
ऑगस्ट २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण ऑगस्ट २०२५मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

| १. अवकारिका (Avkarika – The Biggest Environmental Threat) |
| लेखक | सीए अरविंद भोसले |
| दिग्दर्शक | सीए अरविंद भोसले |
| कलाकार | विराट मडके, राहुल फलटनकर, रोहित पवार, डॉ नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, पंकज धुमाळ, विनोद खुरुंगळे , पिया कोसुंबकर |
| निर्माता | भरत टिळेकर, अरूण जाधव |
| रिलीज तारीख | १ ऑगस्ट २०२५ |
| भाषा | मराठी |
“अवकारिका” चित्रपट समीक्षा :-
१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला अवकारिका हा चित्रपट आपल्या शहरांना, गावांना, आजुबाजुच्या परिसराला आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता दूत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आपण आपलं रोजचं आयुष्य सुखाने स्वच्छ परिसरात जगू शकतो कारण हे स्वच्छता दूत आहेत. कोव्हीडच्या काळात यांचं महत्त्व अधोरेखित झालं, पण तरीही त्यांना हवा तो मान सन्मान समाजाकडून त्यांना मिळत नाही. त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेतून बघितलं जातं, त्यांना स्पर्श करणं देखील आपण टाळतो, परंतु ते करत असलेलं काम जर त्यांनी केलं नाही तर आपल्याला अक्षरशः कचऱ्यात वावरावं लागेल. ते जे काम करतात त्यासाठी त्यांचे आभार नाही पण किमान माणुसकी म्हणून तरी त्यांच्याशी आपण बरं वागलं पाहिजे असा संदेश देत आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा सत्या(विराज मडके) हा एक सफाई कामगार असतो. पत्नीच्या निधनानंतर आपल्या दोन मुलींचा सांभाळ तो करत असतो. सत्याला खरंतर तो करत असलेल्या कामाचा तिटकारा नसतो परंतु समाजाकडून जी वागणूक मिळत असते, जी उपेक्षा होत असते त्याबद्दल राग असतो, खंत असते. तो आतल्या आत झुरत असतो. एकदा सत्याला एका घरगुती कार्यक्रमासाठी जायचं असतं आणि त्यासाठी सुट्टी हवी असते परंतु त्याचा मुकादम भाऊसाहेब (प्रफुल्ल कांबळे) हा आधीच वैतागलेला असतो कारण त्याला वरून आदेश आलेला असतो की संपूर्ण शहर स्वच्छ करायचंं आहे, मोठे साहेब तपासणी करणार असतात. त्यामुळे त्याला ते सुट्टी देत नाहीत. कमी वेळात अख्खं शहर स्वच्छ करणं हे अवघड असतं अशा वेळी कामाचा ताण खूप वाढतो. आता अशा परिस्थितीत सत्या काय करतो.? तो जातो का..? मुकादम काय करतो? हे सगळं या चित्रपटात दाखवलेलं आहे.
चित्रपटाची कथा, विषय नक्कीच चांगला आहे. एक संदेश देणारा आहे. सफाई कामगारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे हे सांगणारा आहे. परंतु याआधीही अशा प्रकारचे बरेच चित्रपट आपल्याकडे आलेले आहेत. दिग्दर्शन ठिकठाक आहे . कथा फार नवीन नाही त्यामुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात कमी पडते. केवळ मनोरंजन म्हणून न बघता एकंदरीत एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट म्हणून बघावा. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
| २. परिणती – बदल स्वतःसाठी (Parinati) |
| लेखक | अक्षय बाळ सराफ |
| दिग्दर्शक | अक्षय बाळ सराफ |
| कलाकार | अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, अक्षर कोठारी, चिन्मयी स्वामी |
| निर्माता | हर्ष नरुला, पराग मेहता |
| रिलीज तारीख | १ ऑगस्ट २०२५ |
| भाषा | मराठी |
“परिणती” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावावरून लक्षात येतं की चित्रपट स्वतःची ओळख निर्माण करणं, अस्तित्व शोधणं आणि स्वतःसाठी जगणं किती महत्त्वाचं आहे हे सांगणारा असावा आणि हा चित्रपट तसाच आहे. अर्थातच हे सारं स्त्रीयांच्या बाबतीत आहे. अक्षय बाळ सराफ यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन देखील केलेलं आहे. खरं तर या चित्रपटाचं जवळपास सात आठ वर्षापूर्वी चित्रिकरण पूर्ण झालं होतं परंतु काही कारणास्तव तो रखडला होता. त्यामुळे आता हा चित्रपट बघताना बऱ्याच त्रुटी जाणवतात. छायाचित्रण असेल किंवा संकलन, किंवा अजून काही तांत्रिक कारणांमुळे हा चित्रपट थोडा कमकुवत वाटतो परंतु कथा, संवाद आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स या सगळ्यावर मात करतो.
चित्रपटाची कथा मुख्यतः डॉ. सायली साने(अमृता सुभाष) आणि बार डान्सर(सोनाली कुलकर्णी) यांच्या मैत्री भोवती फिरते. सायली ही एक उत्तम डॉक्टर असते. एकदा आपल्या नवऱ्याला (अक्षर कोठारी)एका परस्त्री सोबत बघितल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिचं आयुष्य बदलून जातं. ती दारू प्यायला ज्या बारमध्ये जाते तिथे एक बार डान्सर(सोनाली कुलकर्णी)भेटते. जी तिची सखी बनते, तिला आयुष्याकडे नव्याने बघायला शिकवते. तिच्यामुळेच पूर्णपणे खचून गेलेली सायली स्वतःसाठी परत जगायला लागते. हा सगळा भावनिक प्रवास बघताना बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्याच आहेत असंही वाटतं.
चित्रपटाचा खरा आत्मा आहे तो म्हणजे कथानक , लेखन आणि संवाद. अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असे संवाद लिहिले गेले आहेत. दिग्दर्शक म्हणून अक्षय बाळ सराफ हे थोडे कमी पडले परंतु कथानक आणि संवाद कमालीचे ताकदीचे लिहिले आहेत. शेवटी क्लायमॅक्स तर नक्कीच अचंबित आणि थक्क करणारा आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर नक्की बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
| ३. मुंबई लोकल (Mumbai Local) |
| लेखक | अभिजित बोंबले |
| दिग्दर्शक | अभिजित बोंबले |
| कलाकार | ज्ञानदा रामतीर्थकर, प्रथमेश पराब,मनमित, पृथ्वीक प्रताप, वनीता खरात |
| निर्माता | निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल, तन्वी माहेश्वरी |
| रिलीज तारीख | १ ऑगस्ट २०२५ |
| भाषा | मराठी |
“मुंबई लोकल” चित्रपट समीक्षा :-
“मुंबई लोकल” म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी. अख्खी मुंबई याच लोकलच्या वेगाने धावते आणि जगते. त्यांच्या या लोकलच्या रोजच्या प्रवासात कित्येक चेहरे ओळखीचे होतात, कित्येक ओळखी मैत्रीत बदलतात तर काही जण तर प्रेमात देखील पडतात.अशीच लोकलमध्ये रोज एकमेकांना दुरून बघणाऱ्या दोन प्रेमी युगलांची ही कथा आहे. अभिजित बोंबले यांनी या चित्रपटाची कथा पटकथा लिहिली असून दिग्दर्शन केलेलं आहे.
आशिष(प्रथमेश परब) हा एक रोज सकाळच्या लोकलने प्रवास करणारा नोकरी करणारा मुलगा असतो. याच लोकलने लेडीज डब्यात बसणारी मिस. नायगाव(ज्ञानदा रामतीर्थकर) हीला तो रोज बघायचा. रोज एकमेकांना समोरासमोर बघत जणू त्यांचंं नजरेतून बोलणं व्हायचं. आशिष तर तिच्या प्रेमात पडलेलाच असतो, आणि तो तिला प्रपोज सुद्धा करणार असतो. परंतु ट्विस्ट असा येतो की त्याचं त्याचा दिवशी अपघात होतो. आता अपघातानंतर काय होतं.? तो तिला भेटतो का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाचा क्लायमॅक्स नक्कीच खास आहे.
चित्रपटाची कथा पटकथा नक्कीच नवीन अशी काही नाही परंतु मनोरंजन नक्कीच करते. पृथ्वीक प्रताप, वनीता खरात, मनमित यांचा अभिनय उत्तम आहे. छायाचित्रण, संगीत छान आहे. संवाद प्रभावी नाही वाटत आण भावनिक दृष्ट्या सक्षम असायला हवा होता जो कमी पडतो. परंतु एकंदरीत एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
| ४. जित्राब (Jitraab) |
| लेखक | अरविंद जगताप |
| दिग्दर्शक | तानाजी घाडगे |
| कलाकार | सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, शिवाली टरब, पार्थ भालेराव |
| निर्माता | निहारिका गणबोटे, सुनिल फडतरे |
| रिलीज तारीख | ८ ऑगस्ट २०२५ |
| भाषा | मराठी |
“जित्राब” चित्रपट समीक्षा :-
चला हवा येऊ द्या च्या पत्रलेखनामुळे घराघरांत पोहोचलेले अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या जित्राब या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेलं आहे. नेहमीचा वाटणारा पण तरीही अगदी आगळावेगळा असा हा विषय आहे. शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणींपैकी एक अडचण. दुष्काळग्रस्त भागात जिथं पिक पाणी नसलं की स्वतःचं पोट भरण्याचे वांदे होतात तेव्हा शेतीच्या कामासाठी किंवा दुधासाठी सुद्धा एखादी गाय उपयुक्त नसते तेव्हा अशा जनावरांचं पोट कसं भरायचं ही एक भीषण समस्या असते. याच समस्येवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आपल्याकडे गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं मानतात म्हणूनच गोमाता पूजन वगैरे केलं जातं. पण कित्येक ठिकाणी या अशाच गायी कत्तलखान्यात विक्री साठी जातात कारण एकतर त्यांचा उपयोग नसतो आणि शेतकऱ्यांना त्यांना पोसणं शक्य नसतं. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या कथेत एक भीषण वास्तव आपल्यासमोर येतं.
आप्पा म्हणजेच नामदेव (सुहास पळशीकर) हे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आहेत. आपला मुलगा, पत्नी आणि आई असं छोटंसं सुखी कुटुंब असतं. त्यांच्याकडे असलेल्या गायीवर आप्पांच्या आईचा खूप जीव असतो. मृत्यूपूर्वी त्या आप्पाकडून वचन घेतात की ही गाय ब्राह्मणाला दान द्यायची. आणि आप्पा ते वचन पूर्ण करतो देखील. गावातीलच देवा(भारत गणेशपुरे)याला ती दान देतात. पण काही दिवसांनी देवाच्या लक्षात येतं की ही गाय भाकडगाय आहे. म्हणजेच आता यानंतर ती कधी दुध वगैरे देऊ शणार नाही. त्याल वाटतं आप्पाने त्याची फसवणूक केली आहे. तो ती गाय परत आप्पा कडे नेऊन देतो. परंतु दुष्काळामुळे आधीच काही पिकं न आल्याने आप्पाच्याच घरी खाण्याचे वांदे असतात. एकतर मुलगा काही कामाचा नसतो. ती गाय कोणी विकत देखील घेणार नाही अशी परिस्थिती असते. आता आप्पा काय करतो..? त्या गायीचं पुढे काय होतं ते बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा चांगलली आहे परंतु एकतर अशा प्रकारचे चित्रपट बघणारा प्रेक्षकवर्ग तसा कमीच. चित्रपटाचं दिग्दर्शन अजून चांगलं होऊ शकलं असतं. सत्य परिस्थितीवर आधारित आणि एक भीषण वास्तव मांडणारा हा चित्रपट मनोरंजन कमी करतो परंतु बरंच काही सांगून जातो. गायींची कत्तलखान्यात विक्री केली जाते त्यासाठी विरोध आंदोलन करणारे ढोंगी राजकारणी ते अगदी गायीचं राजकारण करून दंगली पेटवणारं राजकारण यावर देखील दिग्दर्शकाने निशाणा साधला आहे. सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे यांनी अगदी नैसर्गिक अभिनय केला आहे. बाकी कलाकारांनी देखील अभिनय चांगला केला आहे. एकंदरीत चित्रपट बरा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
| ५. वाजव रे (Vaajav Re) |
| लेखक | जय राठोड |
| दिग्दर्शक | जय राठोड |
| कलाकार | संतोष जुवेकर, गणेश यादव, गौरव मोरे, केतकी कदम |
| निर्माता | जय राठोड |
| रिलीज तारीख | ८ ऑगस्ट २०२५ |
| भाषा | मराठी |
“वाजव रे” चित्रपट समीक्षा :-
८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला “वाजव रे” हा चित्रपट एका खऱ्या संघर्षाची कहाणी सांगणारा आहे. मुंबई गिरगाव मधील प्रसिद्ध कच्ची ढोल म्हणजेच पारंपरिक ढोल वाजवणारे संगितकार मिलिंद जंगम यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. संतोष जुवेकर याने या चित्रपटात त्यांची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाची कथा एका गरीब घरात जन्माला आलेल्या पण निसर्गाने कला प्रदान केलेल्या तरूणाची आहे. मिलिंद हा एक गरीब तरूण असतो. कच्ची ढोल वाजवणं ही त्याची फक्त कला, आवड नसून ते त्याचं वेड असतं, सर्वस्व असतं. परंतु खूप स्ट्रगल करूनही त्याच्या कलेला हवी ती दाद किंमत मिळत नसते. खूप अपमान, अडचणी सगळ्याला सामोरं जावं लागतं परंतु तो आपली आवड सोडत नाही. अशातच त्याचं आयुष्य बदलून जातं जेव्हा गिरगाव मधील एका गणपती विसर्जन मिरवणुकीत तो लोकांच्या नजरेत येतो. त्यानंतर पुढे काय होतं ते बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
दिग्दर्शक जय राठोड यांचा प्रयत्न बरा होता परंतु चित्रपट सगळ्याच बाबतीत कमी पडतो. अगदी संतोष जुवेकर सुद्धा नेहमीप्रमाणे वाटत नाही. कथा मांडणी, दिग्दर्शन प्रभावी वाटत नाही. मोठ्या पडद्यावर मनोरंजन करण्यात चित्रपट नक्कीच कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
| ६. बेटर हाफची लव्ह स्टोरी (Better Half Chi Love Story) |
| लेखक | संजय अमर |
| दिग्दर्शक | संजय अमर |
| कलाकार | सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्वासराव |
| निर्माता | रजत अग्रवाल |
| रिलीज तारीख | ८ ऑगस्ट २०२५ |
| भाषा | मराठी |
“बेटर हाफची लव्ह स्टोरी” चित्रपट समीक्षा :-
सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांची जोडी असलेला बेटर हाफची लव्ह स्टोरी हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. संजय अमर यांनी या चित्रपटाची कथा पटकथा लिहिली असून दिग्दर्शन केलेलं आहे. एक अतिशय बालिश कथानक असलेल्या या चित्रपटात हॉरर कॉमेडी दाखवण्याचा बालिश प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा अजय(सुबोध भावे) नावाच्या एका लेखकाभोवती फिरते. ज्याचं लग्न त्याच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या सोनिया (रिंकू राजगुरू) सोबत होतं. परंतु सतत संशय घेणारी सोनिया अजयचं जगणं अक्षरशः मुश्किल करते. अजयची बॉस मोना(प्रार्थना बेहरे) हीच्यासोबत अफेअर असल्याच्या संशयावरून ती त्याचं जगणं नकोसं करून टाकते. अगदी त्यच मित्र भगवान (अनिकेत विश्वासराव)याचा सुद्धा तिला राग येतो. असंच एकदा भांडणं सुरू असताना अपघातात सोनियाचा मृत्यू होतो. आता अजयला वाटतं की सुखाने शांततेत जगायला मिळेल परंतु त्यानंतर उलट असं काही घडतं की आधी होतं ते बरं म्हणायची वेळ येते. अजयला अक्षरशः वेड लागतं. आता नक्की काय होतं ते बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
संजय अमर यांनी टाईमपास म्हणून ही कथा लिहिली असावी हे समजू शकतो परंतु सुबोध भावे सारख्या गुणी कलाकाराने यात काम का केलं असेल असा प्रश्न पडतो. दिग्दर्शन ठिकठाक आहे. विनोदी प्रसंग सुद्धा विनोदी वाटत नाहीत. मुळात सुबोध आणि रिंकू यांची जोडीच विजोड वाटते. पात्र किंवा कथानकाची गरज असली तरीही त्या दोघांना जोडी म्हणून स्वीकारणं अवघड जातं. एकंदरीत चित्रपट ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
| ७. हेलो कदम (Hello Kadam) |
| लेखक | आकाश आशा नितीनचंद्र |
| दिग्दर्शक | आकाश आशा नितीनचंद्र |
| कलाकार | अधिश पैगुडे, प्रांजली कांजळकर, सचिन बांगार, श्वेता शिंदे |
| निर्माता | संतोष सायकर |
| रिलीज तारीख | २२ ऑगस्ट २०२५ |
| भाषा | मराठी |
“हेलो कदम” चित्रपट समीक्षा :-
२२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला “हेलो कदम” हा एक क्राईम थ्रिलर सस्पेन्स चित्रपट असून आकाश आशा नितीनचंद्र यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन देखील केलेलं आहे. खरं तर आजकाल इतके सस्पेन्स थ्रिलर चित्रपट येतात की प्रेक्षकांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत, तेच तेच कथानक आणि क्लायमॅक्स असलेले चित्रपट त्यांना आवडत नाहीत. हेलो कदम हा चित्रपट खरं तर याबाबत प्रेक्षकांना निराश करतो. नवीन असं या चित्रपटात काहीच नाही.
कदम हा एक पोलिस इन्स्पेक्टर आहे. त्याच्या पत्नीला आणि मुलीला एका गुंड, गुन्हेगार वाटणऱ्या व्यक्तीने अपहरण केलेलं आहे. परंतु ट्विस्ट म्हणजे त्या दोघींना सोडविण्यासाठी तो कोणतीही रक्कम मागत नाही तर तो इन्स्पेक्टरला नवीन नवीन टास्क देऊन ते पूर्ण करायला लावतो. आता ते टास्क काय असतात.? तो असं का करत असतो.? तो खरंच किडनॅपर आहे की तो कोणता जुना बदला पुर्ण करतोय हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
खरं तर चित्रपटाची मांडणी, दृश्यं, पटकथा इतकी प्रभावी नाहीत की शेवटपर्यंत खिळवून ठेवते. दिग्दर्शन सुद्धा कमी पडलं. बजेट कमी असल्यामुळे कदाचित इतरही तांत्रिक गोष्टींची कमतरता जाणवते. कलाकारांचा अभिनय बरा आहे. सस्पेन्स थ्रिलर असून सस्पेन्सची कमी आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स काय असेल याचा अंदाज खूप आधीच येतो. फार मजा येत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

