अवघ्या दहा दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर टीआरपीच्या स्पर्धेत द्वितीय स्थानावर असलेली मुक्ता आणि सागरच्या “प्रेमाची गोष्ट” हि मालिका कशी आहे हे पहा
Written by : आकांक्षा कोलते
Updated : सप्टेंबर 17, 2023 | 11:27 PM
अवघ्या दहा दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर टीआरपीच्या स्पर्धेत द्वितीय स्थानावर असलेली मुक्ता आणि सागरच्या “प्रेमाची गोष्ट” कशी आहे हे पाहुया.!
प्रेमाची गोष्ट |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
ओटीटी प्लॅटफॉर्म | डिज्नी प्लस हॉटस्टार |
दिग्दर्शक | अजय कुरणे |
कलाकार | राज हंचनाळे, तेजश्री प्रधानव, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपुर्वा नेमळेकर |
प्रदर्शित तारीख | ४ सेप्टेंबर २०२३ |
वेळ | सोमवार ते शनिवार. रात्री ८ वाजता |
देश | भारत |
भाषा | मराठी |
कथा :-
“प्रेमाची गोष्ट” मालिका समीक्षा :-
मनोरंजन करणारी कितीही साधनं उपलब्ध असली तरी सर्वाधिक पसंतीचं साधन म्हणजे टेलिव्हिजन. विविध चॅनल वर प्रसारित होणाऱ्या मालिकांना त्यातल्या त्यात जास्त पसंती. त्यामुळे नेहमीच सगळ्या वाहिन्यांमध्ये मालिकेच्या टीआरपी साठी स्पर्धा असते. याच ऑनलाईन टीआरपीच्या स्पर्धेत सध्या “आई कुठे काय करते” या मालिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर आलेली स्टार प्रवाह वरची नवी कोरी मालिका म्हणजे “प्रेमाची गोष्ट”.
४ सप्टेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरू झाली आहे. यात सगळ्यांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे ही जोडी मुख्य भूमिकेत आहे. तसेच सगळ्यांनाच परिचित असणारी शेवंता म्हणजेच अपुर्वा नेमळेकर ही नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. तेजश्रीने जवळपास अडीच वर्षांनी टेलिव्हिजन वर कमबॅक केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या तेजश्री कडून, एकंदरच या मालिकेकडून खूप अपेक्षा आहेत.
प्रेमाची गोष्ट ही मालिका स्टार प्लस वरील “ये है मोहब्बते” या मालिकेचा रिमेक असल्याने प्रेक्षकांनी सुरूवातीला या मालिकेच्या प्रोमो ला बरंच ट्रोल केलं होतं परंतु गेले काही एपिसोड बघता हि मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक बघितल्या जाणाऱ्या मालिकांपैकी दुसऱ्या क्रमांकाची मालिका आहे. याचाच अर्थ प्रेक्षकांना हि मालिका आवडतेय. या मालिकेत तेजश्री आणि राज हे अनुक्रमे मुक्ता आणि सागर हि पात्रं रंगवत आहेत. निलेश मोहरीर यांनी या मालिकेचं शीर्षक गीत संगीतबद्ध केलं असून प्रेक्षकांना ते आवडलं सुद्धा आहे.
तर प्रेमाची गोष्ट अशी आहे की, नायिका म्हणजे मुक्ता(तेजश्री प्रधान)ही एक गोड मुलगी आहे परंतु काही कारणास्तव ती कधीच आई होऊ शकणार नाहीय त्यामुळे तिच्या घरच्यांना तिच्या लग्नाची काळजी अर्थातच आहे. परंतु नेहमीप्रमाणे सकारात्मक भूमिका साकारणाऱ्या तेजश्री ला या भुमिकेत सुद्धा तसंच बघायला मिळतं. यात सुद्धा ती जे आहे ते स्विकारून हसतमुख राहण्याचा प्रयत्न करणारी मुलगी आहे. यात तिचा आईची भूमिका साकारली आहे शुभांगी गोखले यांनी. शुभांगी गोखले या एक उत्तम अभिनेत्री असून आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकेतील सगळे कलाकार हे उत्तम असल्याने ही जमेची बाजू आहे.
एकीकडे मुक्ता आई होऊ शकत नाही त्यामुळे लग्न होईल की नाही माहीत नाही तर दुसरीकडे सागर(राज हंचनाळे) याचं सुद्धा लग्न लावण्याचा प्रयत्न त्याची आई करताना दिसत आहे. परंतु सागर याचं आधी लग्न झालेलं असून आता घटस्फोट झालेला आहे व त्याला सई नावाची गोड मुलगी आहे जी त्याच्यासोबत राहतेय. सईची भुमिका ईरा परवडे या सहा वर्षांच्या चिमुरडीने साकारली आहे. सागर एका कोळी कुटुंबातील असून त्याची आई पारंपरिक कोळी महिला असतात त्या वेशभूषेत दाखवली आहे जी आपल्या मुलाचा दुसरा सुखाचा संसार मांडू पाहतेय. सागरच्या आईच्या भुमिकेत संजीवनी जाधव या आहेत. संजीवनी जाधव यांना बऱ्याच मालिकांमध्ये आपण बघत आलोय. या मालिकेत सुद्धा त्या एका वेगळ्या अंदाजात पहायला मिळतात.
यात सखवनी (अपुर्वा नेमळेकर) ही सागरची पहीली पत्नी असून आता ती सईची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न करतेय. आणि सागर मात्र सई वर जीवापाड प्रेम करताना आणि जपताना दिसतोय. त्याला काही करून ही कस्टडी स्वतःकडेच ठेवायची आहे. त्यामुळे सागरला हा प्रश्न आहे की पुन्हा लग्न केलं तरी सईला चांगली आई मिळेल का.? आणि मुक्ता असा प्रश्न विचारतेय की आई होऊ न शकणाऱ्या मुलीशी कोणी लग्न करेल का.? आणि हीच या मालिकेची कथा आहे.
आता सई ची कस्टडी कोणाला मिळते.? मुक्ता आणि सागर यांच्यात प्रेम कसं फुलतं. मग घरच्यांची भुमिका काय असेल. सावनी म्हणजेच सागरची पत्नी नक्की काय काय प्रयत्न करते हे सगळं बघण्यासाठी ही मालिका बघायला हवी. रात्री आठ वाजता म्हणजेच प्राईम स्लॉट ला ही मालिका तुम्ही बघू शकता फक्त स्टार प्रवाह वर.
मालिकेचा मुख्य गाभा हा कथानक असतो. त्यामुळे कथा आणि कलाकार चांगले असतील तर प्रेक्षक अशा मालिका आवडीने बघतातच. प्रेक्षकांना नेहमी काहीतरी वेगळं बघायचं असतं. तीच तीच सासु सुनांची भांडणं, प्रेमाचा त्रिकोण, कौटुंबिक मालिकांमध्ये सगळं चांगलं असलं की एक कोणीतरी निगेटिव्ह असतं, मग कट कारस्थान वैगरे हे सगळं बघून प्रेक्षक कंटाळलेत. या मालिकेचं कथानक सुद्धा प्रेक्षकांच्या परिचयाचं आहे. खरं तर याच धर्तीवर थोडीफार सारखी असलेली स्टार प्रवाह वर “नकळत सारे घडले” ही मालिका येऊन गेली आहे. त्यामुळे आता या मालिकेत नवीन काय बघायला मिळणार ही उत्सुकता नक्कीच आहे.
“प्रेमाची गोष्ट” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
“प्रेमाची गोष्ट” स्टार प्रवाह चॅनेल वर आणि डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.४⭐ स्टार देईन.
तुम्ही या मालिकेचे आतापर्यंतचे एपिसोड पाहीले असतील तर तुम्हाला ही मालिका कशी वाटतेय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.!