प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या स्टार प्रवाह वरील “टॉप टेन” मराठी मालिका.!
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 18, 2023 | 11:33 PM
मनोरंजन करणारी कितीही साधनं उपलब्ध असली तरी सर्वाधिक पसंतीचं साधन म्हणजे टेलिव्हिजन. विविध चॅनल वर प्रसारित होणाऱ्या मालिकांना त्यातल्या त्यात जास्त पसंती. त्यामुळे नेहमीच सगळ्या वाहिन्यांमध्ये मालिकेच्या टीआरपी साठी स्पर्धा असते. आणि याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, आपला टीआरपी वाढवण्यासाठी या मालिका इतक्या भरकटत जातात की आपण त्या का बघतोय असा प्रश्न सुज्ञ प्रेक्षकांना पडतो. तरीही मालिका बघणारा प्रेक्षकवर्ग हा नक्कीच मोठा आहे. चित्रपटापेक्षा मालिकांमधील पात्र ही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहतात कारण ती रोज भेटत असतात. त्यामुळे बऱ्याच कलाकारांना सुद्धा चित्रपटात काम करण्यापेक्षा मालिकेत काम करायला जास्त आवडतं. कारण त्यांना प्रेक्षकांसोबत जास्त कनेक्ट होता येत.
तर अशीच कोणकोणती पात्रं प्रेक्षकांना सध्या आवडत आहेत ते आपण आज बघणार आहोत. टीआरपीच्या स्पर्धेत जो पहिला ती प्रेक्षकांची आवडती मालिका असं साधं सोपं गणित असतं. अशाच प्रेक्षकांनी पसंती दर्शवलेल्या आणि सर्वाधिक बघितल्या जाणाऱ्या दहा मराठी मालिका आपण बघणार आहोत.
१. ठरलं तर मग |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
दिग्दर्शक | सचिन गोखले |
तारांकित | प्रियांका तेंडोलकर, जुई गडकरी, अमित भानुशाली, मोनिका दाभाडे |
निर्माता | आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर |
प्रसारण तारीख | २०२२ |
सीजन १ | २०२२ – चालू |
एकूण एपिसोड | २६६ |
भाषा | मराठी |
“ठरलं तर मग” मालिका माहिती :-
ध्या स्टार प्रवाह या वाहिनीचे सुगीचे दिवस आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा बाहेर मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिका सर्वात जास्त बघतो.
त्यामुळे टीआरपी च्या यादीत सुद्धा टॉप टेन मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका जास्त आहेत.
पहिल्या क्रमांकावर असलेली मालिका म्हणजे “ठरलं तर मग!” गोड, सोज्वळ अशा जुई गडकरीला प्रेक्षकांचं जास्त प्रेम मिळत आहे. लहानपणीच आपल्या आईवडिलांपासून दुरावलेली सायली म्हणजेच जुई गडकरी ही एका अनाथाश्रमात वाढते. परंतु याच आश्रमाचे सर्वेसर्वा आणि सायलीला वडिलांप्रमाणे असणारे मधू भाऊ खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात जातात तेव्हा त्यांना सोडविण्यासाठी सायली ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याच्यासोबत त्याच्या अटीनुसार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते. कारण अर्जुनचं लग्न लहानपणी तन्वी सोबत ठरलेलं असतं परंतु तन्वी आणि तिची आई अपघातात हरवतात. त्यानंतर समोर येते ती प्रिया जी आपण तन्वी असल्याचा दावा करते आणि या तन्वी सोबत अर्जून ला लग्न करायचं नसतं.
त्यांच्या या खोट्या लग्नाला आता सहा महिने झाले असून अर्जुनला ती आवडायला लागली आहे असं वाटतंय.
आता त्यांची प्रेमकहाणी फुलतेय का.? सायली हीच तन्वी आहे हे सत्य कधी सगळ्यांसमोर येणार.? तन्वी ची आई म्हणजेच प्रतिमा पलत येणार का.? अशा अनेक रंजक गोष्टी कधी समोर येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
स्क्रीनवर असलेली अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना जास्त आवडतेय. त्यामुळेच त्यांच्यातील प्रेमकहाणी कधी एकदा पुढे सरकतेय याची प्रेक्षक वाट बघत आहेत. सचिन गोखले यांचं दिग्दर्शन असलेल्या या मालिकेत ज्योती चांदेकर, माधव अभ्यंकर, मोनिका दाभाडे, अतुल महाजन असे बरेच कलाकार आहेत. गेल्या आठवड्यात आलेल्या रिपोर्ट नुसार टीआरपी च्या यादीत ही मालिका अव्वल स्थानावर आहे.
२. तुझेच गीत मी गात आहे |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
लेखक | चेतन सैदाणे, अनिल देशमुख |
दिग्दर्शक | केदार वैद्य |
तारांकित | अभिजित खांडकेकर, उर्मिला कानेटकर, प्रिया मराठे, अवनी तायवाडे |
निर्माता | तेजेंद्र नेसवणकर |
प्रसारण तारीख | २ मे २०२२ |
सीजन २ | २००२ – चालू |
एपिसोड | ३८५ |
भाषा | मराठी |
“तुझेच गीत मी गात आहे” मालिका माहिती :-
टॉप टेन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील “तुझेच गीत मी गात आहे”. अभिजित खांडकेकर, उर्मिला कानिटकर, अवनी तायवाडे, अवनी जोशी आणि तेजस्विनी लोणारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
गाण्याचं स्वप्न उराशी बाळगून स्वरा ही छोटी मुलगी आपल्या आईच्या मृत्यूनंतर आपल्या वडिलांना शोधायला शहरात येते. मल्हार कामत हा प्रसिद्ध गायक असून स्वरा ही इतके दिवस त्यांच्या घरात मुलाच्या वेशात राहत होती. परंतु आता तिचं सत्य सर्वांसमोर आलेलं आहे.
खरं तर स्वरा ही मल्हार कामत आणि वैदेहीची मुलगी असते परंतु हे सत्य अजुन मल्हार कामत याला माहीत नाही. सध्या एक नवीन ट्विस्ट आला होता की मोनिका चा एक्स बॉयफ्रेंड सनी म्हणजेच हार्दिक हा परत आलाय. व त्याला त्याच्या आणि मोनिकाच्या मुलीला म्हणजे पिहू ला घेऊन जायचं आहे. परंतु स्वरा हीच सनीची मुलगी आहे असं सिद्ध करण्यात मोनिकाला यश मिळालं आहे. तर आता मालिका रंजकदार वळणावर येऊन पोहोचली आहे. खरंच स्वरा सनीसोबत परदेशी जाईल का.? मल्हार ला स्वरा बद्दल खरं कधी कळणार.? मंजुळा हीच वैदेही आहे का.? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रेक्षक न चुकता हि मालिका बघतात.
स्वराची भुमिका करणारी अवनी तायवाडे आणि पिहुची भुमिका साकारणारी अवनी जोशी या दोघींनी छान अभिनय केला आहे. आता मालिकेत येणाऱ्या नवीन नवीन ट्विस्ट आणि टर्न्स मुळे हि मालिका टेलिव्हिजन आणि ओटीटी वर सुद्धा बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणुनच नुकत्याच जाहीर झालेल्या टीआरपी च्या यादीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
३. प्रेमाची गोष्ट |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
ओटीटी प्लॅटफॉर्म | डिज्नी प्लस हॉटस्टार |
दिग्दर्शक | अजय कुरणे |
तारांकित | राज हंचनाळे, तेजश्री प्रधानव, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपुर्वा नेमळेकर |
निर्माता | |
प्रसारण तारीख | ४ सेप्टेंबर २०२३ |
सीजन २ | सोमवार ते शनिवार. रात्री ८ वाजता |
भाषा | मराठी |
“प्रेमाची गोष्ट” मालिका माहिती :-
अवघ्या महिन्याभरात प्रेक्षकांना आवडलेली आणि टीआरपीच्या यादीतील तिसऱ्या स्थानावर असलेली मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट. ही मालिका स्टार प्लस वरील “ये है मोहब्बते” या मालिकेचा रिमेक असून खरं तर प्रेक्षकांनी सुरूवातीला या मालिकेच्या प्रोमो ला बरंच ट्रोल केलं होतं परंतु आता मात्र ही मालिका प्रेक्षकांना आवडली आहे.
तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे ही जोडी मुख्य भूमिकेत असून अपुर्वा नेमळेकर ही नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. मुक्ता(तेजश्री प्रधान)ही एक गोड मुलगी आहे परंतु काही कारणास्तव ती कधीच आई होऊ शकणार नाहीय त्यामुळे तिचं लग्न होत नाहीय तर दुसरीकडे सागर(राज हंचनाळे) आणि अवनी(अपुर्वा नेमळेकर) यांचा घटस्फोट झालेला असून मुलीच्या कस्टडी वरून दोघांमध्ये वाद आहेत.
आता मुक्ता आणि सागर यांची प्रेमकहाणी कशी फुलते हे या मालिकेत बघायला मिळेल. आपण कधीच आई होणार नाही हे सत्य स्वीकारून आपल्यासोबत कोणी लग्न करेल का असा प्रश्न मुक्ता पडला आहे तर दुसरं लग्न झाल्यावर ती मुलगी आपल्या मुलीची आई होऊ शकेल का हा प्रश्न सागरला पडला आहे.
खरं तर सुरूवातीपासून मुक्ता ची आई आणि सागरची आई यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे असं पाहायला मिळतंय, तर एकीकडे सई म्हणजे सागरची मुलगी आणि मुक्ता यांच्यात छान केमिस्ट्री जुळतेय असं बघायला मिळतंय. एकंदरच या मालिकेचि प्लॉट प्रेक्षकांना आवडला आहे. खूप कमी कालावधीत या मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत आपलं द्वितीय स्थान पटकावलं आहे. खरं तर दर आठवड्याला हे गणित बदलत राहतं. गेल्या आठवड्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती परंतु आता ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोमवार ते शनिवार प्राईम टाईमला म्हणजेच रात्री आठ वाजता ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होते.
४. सुख म्हणजे नक्की काय असतं.? |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
लेखक | अभिजित गुरु |
दिग्दर्शक | चंद्रकांत कणसे |
तारांकित | गिरी प्रभू , मंदार जाधव, वर्षा उसगावकर, लक्ष्मी शिंदे, |
निर्माता | महेश कोठारे, आदिनाथ कोठारे |
प्रसारण तारीख | १७ ऑगस्ट २०२० |
सीजन १ | १७ ऑगस्ट २०२० – चालू |
भाषा | मराठी |
“सुख म्हणजे नक्की काय असतं.?” मालिका माहिती :-
टीआरपी च्या यादीत चौथ्या स्थानावर असलेली मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं.?” ही मालिका. आता चौथ्या स्थानावर आहे म्हणजे ती चांगली असणार असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. खरं तर ही मालिका यापूर्वीच संपायला हवी होती परंतु लेखक दिग्दर्शक यांनी ती इतकी ताणली आहे की काही प्रेक्षकांनी या मालिकेचा नवीन प्रोमो बघून प्रचंड ट्रोल केली आहे.
या मालिकेतील मुख्य जोडी गौरी आणि जयदीप यांच्यावर येत राहणाऱ्या संकटांना कोणतीच सीमा नाही. जयदीप ची वहिनी शालिनी, यांना ठार मारण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असते, कट कारस्थान करत असते. आणि सतत तेच तेच बघून प्रेक्षक कंटाळले आहेत. टीआरपी वाढवण्यासाठी आणि नवीन ट्विस्ट आणण्यासाठी मालिकेचं मुळ कथानक कुठल्या कुठे भरकटलं आहे. तरीही यादीत चौथं स्थान या मालिकेला कसं मिळालं हा प्रश्नच आहे.
आता मालिकेत शालिनीच्या पापांचा घडा भरणार, सगळ्यांसमोर तीचं खरं रूप येणार हे एका प्रोमो मध्ये दिसत आहे. तरी प्रेक्षकांची ही मालिका लवकरात लवकर बंद करावी अशी मागणी होताना दिसत आहे. तर इथून नवं वळण सुरू होणार की मालिका निरोप घेणार हे येत्या काही दिवसांत कळेलच.
५. आई कुठे काय करते.? |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
लेखक | मुग्धा गोडबोले |
दिग्दर्शक | रवींद्र करमरकर |
तारांकित | मधुराणी गोखले – प्रभुलकर, मिलिंद गवळी, दिपाली पानसरे, रुपाली भोसले, |
निर्माता | राजन शाही |
प्रसारण तारीख | २३ डिसेंबर २०१९ – चालू |
भाषा | मराठी |
“आई कुठे काय करते.?” मालिका माहिती :-
मधुराणी प्रभुलकर हीची मुख्य भूमिका असलेली आई कुठे काय करते.? ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडत होती. न चुकता ही मालिका पाहीली जायची. परंतु मालिका अति ताणल्या की त्या रटाळ वाटायला लागतात. मुळ कथा बाजूला ठेवून इतर उपकथानकं यायला लागली की मालिका कंटाळवाणी होते नेमकं हेच या मालिकेच्या बाबतीत झालं आहे.
नवरा, मुलं, सासू सासरे आणि आपलं घर यांच्यासाठीच जगणारी अरुंधती एकेकाळी अतिशय बुजलेली, आत्मविश्वास नसलेली एक साधी गृहिणी असते. परंतु अनिरुद्ध म्हणजे तिच्या नवऱ्याने तिच्या सोबत प्रतारणा, फसवणूक केल्यानंतर ते सहन न करता ती घटस्फोट घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहते. कालांतराने आशुतोष सोबत लग्न करते इथपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले होते असं म्हणू शकतो. परंतु आता ही मालिका भरकटत चालली हे खरंय.
या मालिकेची सकारात्मक बाजू म्हणजे या मालिकेत विविध प्रसंगांमधून छान संदेश दिला जातो. नात्यांचं महत्त्व असेल, नैतिक मूल्यांची जपणूक असेल या गोष्टी खूप छान पद्धतीने दाखवल्या जातात. या मालिकेतील सगळ्याच पात्रांसाठी लिहीलेले संवाद सुद्धा छान असतात.
सध्या या मालिकेत आरोही नावाच्या पात्राची एन्ट्री झाली असून तिच्यावर काही गुंडांनी अत्याचार केला आहे व त्या विरुद्ध तिने न्यायालयात दाद मागितली आहे. आणि अर्थातच अरुंधती तिच्या पाठीशी उभी आहे. आता पुढे काय होतं हे येत्या काही भागांत बघायला मिळेल. मालिका वाढवली असली तरी टीआरपी च्या यादीत या मालिकेने आपलं पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.
६. ठिपक्यांची रांगोळी |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
लेखक | मनस्विनी लता, रवींद्र, स्मिता प्रकाशकर |
दिग्दर्शक | गिरीश वसईकर |
तारांकित | ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, शरद पोंक्षे, सुप्रिया पठारे, लीना भागवत |
निर्माता | रुपाली गुहा, कल्याण गुहा |
प्रसारण तारीख | ४ ऑक्टोबर २०२१ – चालू |
भाषा | मराठी |
“ठिपक्यांची रांगोळी” मालिका माहिती :-
ज्याप्रमाणे रांगोळी पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ठिपका जोडणं महत्त्वाचं असतं तसंच कुटुंब पूर्ण होण्यासाठी प्रत्येक सदस्य महत्वाचा असतो, असा संदेश देणारी ही मालिका घरांघरांत आवडीने बघीतली जाते.
या मालिकेतील अप्पू शशांकची जोडी असेल किंवा कुटुंबातील इतर सदस्य सगळेच आपल्या घरातील भाग असल्यासारखं वाटतं. हलक्या फुलक्या विनोदांनी मनोरंजन करणारी ही मालिका नात्यांचं महत्त्व सांगणारी आहे. एकीकडे विभक्त कुटुंब पद्धतीची नवीन संस्कृती उदयास येत असताना एकत्र कुटुंब पद्धती का आणि कशी महत्वाची आहे हे सांगणारी ही मालिका आहे. कुटुंबप्रमुख विनायक कानिटकर म्हणजेच दादा काका यांचे संस्कार, यांची शिकवण, नियम यावर अख्खं कुटुंब कशाप्रकारे एका घरात सुखाने नांदतं हे बघताना नक्कीच छान वाटतं.
ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते. स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका टीआरपी च्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
७. मन धागा धागा जोडते नवा |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
दिग्दर्शक | राजू पार्सेकर |
तारांकित | दिव्या पुगावकर, अभिषेक राहालकर, पुष्कर सरद, नेहा परांजपे, राजश्री निकम |
निर्माता | सुझाना घई, हेमंत रुपारेल, रणजीत ठाकूर |
प्रसारण तारीख | ८ मे २०२३ – चालू |
भाषा | मराठी |
“मन धागा धागा जोडते नवा” मालिका माहिती :-
मन धागा धागा जोडते नवा ही एक स्त्री प्रधान कौटुंबिक मालिका असून दिव्या पुगावकर ही मुख्य भूमिका साकारत आहे. आनंदी ही एक नवऱ्याच्या अत्याचारांना कंटाळून घटस्फोट घेऊन माहेरी आली आहे. परंतु तिचा नवरा अजुनही तिला त्रास देतोय, अशातच तिचं माहेरी राहणं तिच्या भावाला आवडत नाहीय. तरीही ही आनंदी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द घेऊन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहे.
कथेचा नायक सार्थक हा तिचा बॉस असून त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे परंतु आता मालिकेत ट्विस्ट असा आला आहे की सार्थक चा एक घटस्फोटीत भाऊ असून त्याला आनंदी सोबत लग्न करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपल्या प्रेमाचा त्याग करून सार्थक हे लग्न लावून देतोय. परंतु काल झालेल्या महाएपिसोड मध्ये सार्थक चा भाऊ भर मांडवात सगळ्यांना सांगतो की त्याला हे लग्न करायचं नाही कारण सार्थक चं आनंदी वर प्रेम आहे. आता पुढे काय होणार हे पुढच्या भागात कळेलच. आनंदीचं लग्न नक्की कोणासोबत होणार.? सार्थक वर एकतर्फी प्रेम करणारी रेश्मा आता नवीन काय कट रचणार की आहे ते स्विकारून पुढे जाणार हे कळेलच.
८. कुण्या राजाची गं तू राणी |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
दिग्दर्शक | गिरीश वसईकर |
तारांकित | हर्षद अटकरी, शर्वरी जोग, पूर्णिमा डे, समिधा गुरु |
निर्माता | स्मृती शिंदे |
प्रसारण तारीख | १८ जुलै २०२३ – चालू |
भाषा | मराठी |
“कुण्या राजाची गं तू राणी” मालिका माहिती :-
अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी मालिका म्हणजे “कुण्या राजाची गं तू राणी.?” हर्षद अटकरी आणि शर्वरी जोग हे दोघं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत.
स्टार प्लस वरील इमली या मालिकेचा हा रिमेक असल्यामुळे प्रसारित होण्यापूर्वी या मालिकेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आणि हर्षद याने यापूर्वी स्टार प्रवाह वरील “या फुलाला सुगंध मातीचा” यामध्ये हिरोची भुमिका साकारली होती आणि प्रेक्षकांना नवीन चेहरा बघायला त्यामुळे सुद्धा ही मालिका ट्रोल झाली.
या मालिकेत गुंजा हे मुख्य पात्र असून ही डोंगरवाडी या छोट्या गावातील कथा आहे. गुंजा हिला खूप शिक्षण घेऊन खूप मोठं व्हायचं आहे आणि आपल्या आईला घेऊन शहरात जायचं आहे. तर आता गुंजाला प्रेक्षक किती पसंती दाखवतात हे येत्या काळात कळेलच. सध्या तरी ही मालिका टीआरपी च्या यादीत आठव्या स्थानावर आहे.
९. अबोली |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
तारांकित | सचिन पाटील, गौरी कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, रेशम टिपणीस, शर्मिष्ठा राऊत |
निर्माता | संदीप सिकंद |
प्रसारण तारीख | २३ नोव्हेंबर २०२१ – चालू |
एकूण एपिसोड | ६०२ |
भाषा | मराठी |
“अबोली” मालिका माहिती :-
स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणारी अबोली ही मालिका बघणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. सचित पाटील याने अंकुश ही भूमिका साकारली असून तो इन्स्पेक्टर आहे आणि गौरी कुलकर्णी हीने अबोली ही मुख्य भूमिका साकारली आहे.
खरं तर सुरूवातीला ही मालिका प्रेक्षकांना आवडली होती परंतु आता कथानक इतकं भरकटलं आहे की ट्विस्ट आणि टर्न्स दाखवण्याच्या नादात बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना बघाव्या लागत आहेत. अंकुश चा मृत्यू असेल किंवा त्याचं परत येणं आणि टिपिकल तिच स्टोरी ज्यामध्ये त्याची स्मृती जाणं असेल या गोष्टी वर्षानुवर्षे बघत आल्यामुळे प्रेक्षकांना आता कंटाळा आला आहे. अबोली ला मारण्याचा प्रयत्न, तिरडीवरून तिचं पुन्हा जिवंत होणं या गोष्टी अतर्क्य आहेत आणि कोणत्याही सुज्ञ प्रेक्षकाला न पटणाऱ्या आहेत त्यामुळे ही मालिका प्रचंड ट्रोल सुद्धा होत असते. परंतु सुरूवातीपासून बघत असल्यामुळे आता शेवट काय होणार ही उत्सुकता असल्याने प्रेक्षक ही मालिका बघतात.
सध्याचा सचित राजे हा अंकुश आहे की नाही याचा शोध अबोली घेत आहे. तर सत्य काय आहे हे आता येत्या काही दिवसांत कळेलच.
१०. मुरांबा |
चॅनेल नांव | स्टार प्रवाह |
लेखक | मनस्विनी लता रवींद्र |
दिग्दर्शक | सुशांत पोळ |
तारांकित | शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशाणी बोरुळेसुलेखा तळवलकर |
निर्माता | सुझाना घई |
प्रसारण तारीख | १४ फेब्रुवारी २०२२ – चालू |
सीजन २ | |
भाषा | मराठी |
“मुरांबा” मालिका माहिती :-
सध्या स्टार प्रवाह या वाहिनीचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण टीआरपी च्या यादीत टॉप टेन असलेल्या सगळ्या मालिका या स्टार प्रवाह वाहिनीवरील आहेत. दहाव्या क्रमांकावर असलेली मालिका म्हणजे मुरांबा. नवीन आलेल्या मालिंकामुळे शशांक केतकर ची मालिका गेल्या काही भागांत खाली घसरली आहे.
रमा आणि अक्षय यांच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. रमा ही कमी शिकलेली पण आत्मविश्वास असलेली, एक हुशार आणि सालस पत्नी आहे. सुरूवातीला रमाची जिवलग मैत्रीण रेवा वर अक्षय याचं प्रेम असतं परंतु तेव्हा रेवाचं दुसऱ्या मुलावर प्रेम असतं त्यामुळे अक्षयला नकार देऊन ती त्या मुलासोबत पळून जाते. आणि आता जेव्हा रमा आणि अक्षय यांचा सुखाचा संसार चालू आहे तेव्हा ती त्यांच्यात येते. आता तिला काही करून अक्षय हवा आहे आणि त्यासाठी ती अक्षयचे वडील आणि आजीला हाताला धरून नवनवीन कटकारस्थान करत असते.
सध्या अक्षयचे वडील हे नयना वर अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात असतात. परंतु आता ते बाहेर आलेले दाखवलं आहे आणि आता नयना ला किडनॅप केलं आहे. तर मग आता रमा आणि अक्षयची आई सीमा या दोघी नयनाला कसं सोडवायचं याचा विचार करत आहेत. आता पुढील भागात कळेल नयनाचं काय होतं आणि यामागे नक्की कोण कोण आहे.
हे पण वाचा :-
प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या या जुन्या फेमस मराठी मालिका तुम्हाला आठवतात का..? भाग १
प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या या जुन्या मालिका तुम्हाला माहीत आहेत का..? भाग :- २
तर मंडळी या टॉप टेन मालिका टीआरपीच्या रिपोर्ट नुसार आहेत तर तुम्हाला यापैकी कोणती मालिका जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.