HomeMarathi TV SeriesTV Series

प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या या जुन्या फेमस मराठी मालिका तुम्हाला आठवतात का..? भाग १

प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या या जुन्या फेमस मराठी मालिका तुम्हाला आठवतात का..?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : सप्टेंबर 25, 2023 | 12:00 AM

   "जुनं ते सोनं" हे आता आपण सगळ्याच बाबतीत म्हणायला लागलोय. म्हणजे जुनी गाणी, जुने चित्रपट, जुने नट नट्या, एखादी जुनी फॅशन, जुन्या गोष्टी सगळं जुनं ते सोनं होतं असं वाटतं आणि ते खरं सुद्धा आहे. हेच जुन्या मालिकांच्या बाबतीत सुद्धा लागु होतं. आताच्या मालिका म्हणजे त्याच त्याच घासून पुसून गुळगुळीत झालेल्या कथा पटकथा, प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातून मग बदला, कट कारस्थानं हेच सगळं हल्लीच्या मालिकांमध्ये बघायला मिळतं. टीआरपी आणि एपिसोड वाढविण्यासाठी या मालिका काय दाखवतील याचा नेम नाही. परंतु पुर्वीच्या मालिकांमध्ये असं नव्हतं. त्या बघताना आपण आपल्या घरातील एखादा प्रसंग बघतोय इतकं एकरूप होऊन प्रेक्षक त्या मालिका बघत असत. 
  त्यामुळे आजही त्या जुन्या दर्जेदार अशा सुंदर मालिका आठवतात. आज आम्ही अशाच काही जुन्या मालिका सांगणार आहोत ज्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आजही युट्यूबवर जाऊन प्रेक्षक या मालिकांचे एपिसोड बघतात. आजही प्रेक्षकांच्या मनात या मालिकांना विशेष स्थान आहे. चला तर मग बघुया अशा कोणकोणत्या मालिका आहेत ज्या मालिकांनी नेहमीच चांगलं काही देण्याचा प्रयत्न केला होता. 
Old Femous marathi tv series information and review
१. दामिनी (१९९८)
१९९८ – २०००. नाटक. परिवार. पत्रकारिता. २५ मिनिटे एक ( एपिसोड ).
चॅनेल नांवडीडी सह्याद्री मराठी वाहिनी
कलाकारप्रतीक्षा लोणकर, सचिन खेडेकर, मोहन जोशी, रमेश भाटकर
प्रदर्शित तारीख१९९८ ते २०००
एकूण एपिसोड१०५०
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.३⭐/ ५

दामिनी” मालिका माहिती :-

जुन्या मालिका म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती मालिका म्हणजे दामिनी. दुरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होणारी पहीली वहीली दैनंदिन मराठी मालिका म्हणजे दामिनी.
आताच्या मालिकांमध्ये नवऱ्याच्या मागं पुढं करणाऱ्या, चुल आणि मुल यात अडकलेल्या, अजिबातच आत्मविश्वास नसलेल्या नायिका बघितलं की आठवते ती तडफदार दामिनी. आताच्या नायिकांना बरंच काही शिकायला हवं म्हणजे आताचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी शिकणं गरजेचं आहे. पत्रकारितेवर आधारित ही मालिका होती. एक निर्भिड पत्रकार म्हणून काम करत असताना कित्येक गरजू, गरीबांचा आधार होती. कोणत्याही परिस्थितीत मुळूमुळू रडत बसण्यापेक्षा ती लढत होती.
न्यायदेवता या कथेवर आधारित असणारी ही मालिका त्या काळी प्रचंड गाजली होती. सत्याची कास पकडून नैतिक मुल्यांना जपणारी एक कणखर आणि तडफदार दामिनी साकारली होती प्रतिक्षा लोणकर या अभिनेत्रीने. नव्वदच्या दशकातील या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात इतकं स्थान मिळवलं की तेव्हाची पिढी आजही प्रतिक्षा लोणकर यांना दामिनी म्हणूनच ओळखते. संध्याकाळी साडेचार वाजता घरांघरांत ऐकू यायचं ते कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील “सत्यता शोधण्या घेऊनी लेखणी” हे शीर्षकगीत. हि मालिका पुन्हा बघायला मिळाली तर खरंच ते जुने दिवस पुन्हा आठवतील.


२. आभाळमाया (१९९९)
१९९९-२००३. परिवार. २५ – ३० मिनिटे. (एक एपिसोड).
चॅनेल नांवअल्फा टीव्ही मराठी (झी मराठी)
दिग्दर्शकविनय आपटे, विवेक देशपांडे, मंदार देवस्थळी
कलाकारसुकन्या कुलकर्णी, संजय मोने, मनोज जोशी, हर्षदा खानविलकर, आतिशा नाइक, शुभांगी जोशी, परी तेलंग, स्वरांगी मराठे
निर्माता अच्युत वाजे
प्रदर्शित तारीख१६ ऑगस्ट १९९९ ते ४ जुलै २००३
सीजन १ १६ ऑगस्ट १९९९ ते ८ जून २००१
सीजन २१९ ऑगस्ट २००२ ते ४ जुलै २००३
एकूण एपिसोड
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.४⭐/ ५

आभाळमाया” मालिका माहिती :-

लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली मालिका म्हणजे आभाळमाया. १९९९ साली आलेली ही मालिका झी मराठीची पहीली दैनंदिन मालिका आणि टेलिव्हिजन वरील दामिनी नंतरची दुसरी मालिका. या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता.
सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि मनोज जोशी या तिघांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत हर्षदा खानविलकर, आतिशा नाइक, शुभांगी जोशी, परी तेलंग, स्वरांगी मराठे असे बरेच सहकलाकार होते. पण या मालिकेची नायिका सुधा म्हणजेच सुकन्या कुलकर्णी यांची भूमिका विशेष लक्षात राहीली.
घर, मुलं संसार सांभाळत असताना हि सुधा प्राध्यापिकेची नोकरी तेवढ्याच सक्षमपणे सांभाळत आहे.
नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध कळल्यावर त्याचा स्वीकार न करता त्याच्या प्रेयसीच्या मुलीला मात्र ती मोठ्या मनाने स्विकारते. एक स्वतंत्र विचारांची आणि कणखर स्त्री सुधाने सुंदर साकारली होती.
या मालिकेची अजुन एक गोष्ट म्हणजे शीर्षकगीत. देवकी पंडित यांच्या आवाजातील हे गीत आजही तेवढंच लोकप्रिय आहे. या मालिकेने एक इतिहास रचला आहे म्हणायला हरकत नाही. १९९९ ते २००३ इतका मोठा काळ ही मालिका लोक आवडीने बघत होते. व आता सुद्धा ही मालिका पुन्हा टेलिव्हिजन वर दाखवण्यात यावी अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. यावरून लक्षात येते की ही मालिका किती गाजली होती.


३. श्रीयुत गंगाधर टिपरे
२००१ – २००३. विनोदी, परिवार. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवअल्फा टीव्ही मराठी (झी मराठी)
लेखक दिलीप प्रभावळकर
दिग्दर्शककेदार शिंदे
कलाकारदिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले
निर्माताभरत जाधव, बेला शिंदे
प्रदर्शित तारीख२ नोव्हेंबर २००१ – २४ डिसेंबर २००४
एकूण एपिसोड
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८⭐/ ५

श्रीयुत गंगाधर टिपरे” मालिका माहिती :-

एक काळ असा होता की झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका या दर्जेदार असत. अशीच एक दर्जेदार आणि उत्कृष्ट मालिका म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे. मालिका कशी हवी याचं हे उत्तम उदाहरण.
दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या अनुदिनी या पुस्तकावर आधारित हि मालिका केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केली होती. स्वतः दिलीप प्रभावळकर यांनी या मालिकेत आबा म्हणजे घरातील आजोबांची भुमिका साकारली होती. एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी असं हे कुटुंब. तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व करत प्रत्येक भागात नवीन काहीतरी संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे टिपरे कुटुंब करत होतं. आणि तेही अगदी हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीने.
उत्तम पालकत्व कसं करावं हे सांगणारी ही मालिका होती. बघताना कित्येकदा आपल्याच घरातील एखादा प्रसंग टिव्हीवर बघतोय असं वाटावं इतकं सुंदर दिग्दर्शन. शलाका आणि शिऱ्या हि दोन भावंड, शेखर आणि शामला हे त्यांचे आईवडील आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे आबा. असं पंचकोनी कुटुंब आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यातील छोटे मोठे प्रसंग यावरच ही मालिका बेतलेली होती. शिऱ्या आणि आबांची जोडी तर प्रेक्षकांना विशेष आवडायची. कोणाला शिऱ्या आणि शलाका ही भावंडं आपल्या सारखीच वाटायची. २००१ साली प्रसारित होणारी ही मालिका बघताना आजही तेवढीच ताजी वाटते. किंबहुना आताच्या मालिकांपेक्षा कैक पटीने दर्जेदार वाटते. खरं तर तुलनाच होऊ शकत नाही. १६७ भागांची ही मालिका तुम्ही आजही युट्यूबवर पाहू शकता.


४. एक धागा सुखाचा
परिवार. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवझी मराठी
लेखक अनिल हर्डीकर
दिग्दर्शकदासबाबू
कलाकारविक्रम गोखले , चंद्रकांत गोखले, सुहास जोशी, नयनतारा, जयंत सावरकर, आनंद अभ्यंकर, विजय चव्हाण, संतोष जुवेकर, अनिल हर्डीकर, उमेश कामत
निर्मातादासबाबू
एकूण एपिसोड २६
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५⭐/ ५

एक धागा सुखाचा” मालिका माहिती :-

तब्बल वीस एक वर्षापुर्वी विक्रम गोखले , चंद्रकांत गोखले, सुहास जोशी, नयनतारा, जयंत सावरकर, आनंद अभ्यंकर, विजय चव्हाण, संतोष जुवेकर, अनिल हर्डीकर, उमेश कामत एवढी मोठी कलाकारांची फौज असलेली आणि सामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेणारी ही मालिका अल्फा मराठी म्हणजे आताची झी मराठी वर प्रसारित व्हायची.
सर्वसामान्य माणसाला आयुष्यात खूप काही सहन करावं लागतं, रोज नवनवीन अडचणींना तोंड द्यावं लागतं. या सगळ्यात त्याला एखादा सुखाचा क्षण , एक सुखाचा धागा पुरेसा असतो. हेच सांगणारी ही कौटुंबिक मालिका होती. या मालिकेने कित्येकांना सकारात्मक विचार करायला भाग पाडले असेल. आणि हीच तेव्हाच्या मालिकांची ताकद होती.
आता सुद्धा ही मालिका युट्यूबवर उपलब्ध आहे. अवघ्या २६ भागांच्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करून लवकर निरोप घेतला आणि म्हणुनच ती जास्त भावली होती.


५. अवंतिका
२००२-२००५. नाटक, परिवार. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवअल्फा टीव्ही मराठी (झी मराठी)
लेखक रोहिणी निनावे
दिग्दर्शकसंजय सूरकर
कलाकारमृणाल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सुबोध भावे, सुचित्रा बांदेकर, श्रेयस तळपदे, गिरीश ओक, स्मिता तळवलकर, सुलेखा तळवलकर, आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री
निर्मातास्मिता तळवलकर
सीजन
एकूण एपिसोड ७३८
प्रदर्शित तारीख२००२ – २००५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

अवंतिका” मालिका माहिती :-

दामिनी, आभाळमाया नंतर अजून एक नायिका प्रधान मालिका म्हणजे अवंतिका. अवंतिका ही भूमिका साकारली होती मृणाल कुलकर्णी यांनी. आजही कित्येक लोकं त्यांना अवंतिका म्हणून ओळखतात. झी मराठीच्या लोकप्रिय झालेल्या मालिकांपैकी ही सुद्धा एक.
एका सामान्य कुटुंबातील या हुशार मुलीचं शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं राहावं असं स्वप्न असतं. तो असा काळ होता जेव्हा मुली करीयर ला महत्व देऊ लागल्या होत्या. आर्थिक दृष्ट्या मुलींनी स्वावलंबी असावं हे एव्हाना सर्वांना पटायला लागलं होतं त्यामुळे अशी अवंतिका तेव्हा तरूण पिढीला जास्त जवळची वाटत होती.
अवंतिका ही खरं तर एका छोट्याशा कथेवर आधारित मालिका होती. लग्न झाल्यावर सुखी संसार करत असताना अचानक जेव्हा अवंतिकाला कळतं की आपल्या नवऱ्याचं आपल्यावर कधी प्रेम च नव्हतं किंबहुना ज्या मुलीवर तो प्रेम करतो ती त्यांच्याच सोबत इतके दिवस एकाच घरात राहत होती, हे कळल्यावर ती खचून न जाता आपल्या बाळाला घेऊन घर सोडते. स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करते. म्हणुनच रडत न बसणारी, आणि अन्याय होत असेल तर तो सहन न करता स्वताची भुमिका मांडणारी अवंतिका प्रेक्षकांना जास्त आवडली होती.
संदीप कुलकर्णी यांनी अवंतिकाच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. तसेच श्रेयस तळपदे, गिरीश ओक, स्मिता तळवलकर, सुलेखा तळवलकर, आदेश बांदेकर, शर्वाणी पिल्ले, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे, सुनील बर्वे, सारिका निलाटकर असे अनेक कलाकार या मालिकेत होते. आणि इतके दिग्गज कलाकार एकत्र असणं ही सुद्धा एक जमेची बाजू होती. स्मिता तळवलकर यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन संजय सुरकर यांनी केलं होतं.


६. वादळवाट
२००३-२००७. नाटक, परिवार. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवझी मराठी
लेखक चिन्मय मांडलेकर
दिग्दर्शकमंदार देवस्थळी
कलाकारअविनाश नारकर, सुबोध भावे, अदिती सारंगधर, प्रसाद ओक, उमेश कामत, नीलम शिर्के, चिन्मय मांडलेकर, श्वेता शिंदे, संतोष जुवेकर, हेमांगी कवी
निर्माताशशांक सोलंकी
प्रदर्शित तारीख७ जुलै २००३ – ९ फेब्रुवारी २००७
एकूण एपिसोड९३९
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.३⭐/ ५

वादळवाट” मालिका माहिती :-

२००३ मध्ये लोकप्रिय वाहिनी वर म्हणजेच आताच्या झी आणि तेव्हाच्या अल्फा मराठी वर प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे वादळवाट. या मालिकेचं शीर्षकगीत म्हणजे तर आजही लोकांना तेवढंच आवडतं. आजही, जवळपास वीस वर्षानंतर सुद्धा या गीताची इतकी लोकप्रियता आहे की कित्येकांच्या मोबाईलची ही रिंगटोन आहे. देवकी पंडित यांच्या आवाजातील “थोडी सागर निळाई थोडे शंख न शिंपले”…. हे गीत आजही मनाचा अगदी ठाव घेतं.
कौटुंबिक असली तरी या मालिकेचा विषय, कथानक इतर मालिकांपेक्षा थोडं वेगळं होतं. आबा म्हणजे अरुण नलावडे आणि देवराम म्हणजे शरद पोंक्षे यांच्यातील व्यावसायिक दुश्मनी, दोघांच्याही वृत्तपत्रांमधील स्पर्धा हा या मालिकेचा पाया होता. शरद पोंक्षे यांनी व्हिलन असलेला देवराम सुंदर साकारला होता. अरुण नलावडे यांनी नैतिक मुल्ये जपणारे, सत्याची कास धरणारे आबासुद्धा छान साकारले होते. याचसोबत अविनाश नारकर, आनंद अभ्यंकर , सुबोध भावे, अदिती सारंगधर, प्रसाद ओक,लोकेश गुप्ते, उमेश कामत, नीलम शिर्के, चिन्मय मांडलेकर, श्वेता शिंदे, संतोष जुवेकर, क्षिती जोग,अशा बऱ्याच कलाकारांची मांदियाळी होती.
२००३ ते २००७ पर्यंत चालू असलेली हि मालिका कधीच कंटाळवाणी वाटली नव्हती याचं कारण म्हणजे कथानक, उपकथानक. प्रत्येक एपिसोड हे काहीतरी सांगणारा होता. उगीच मालिका वाढविण्यासाठी केलेले बाष्कळ प्रयत्न कुठेच नव्हते त्यामुळे हि मालिका दर्जेदार ठरली.

हे पण वाचा :-

प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या या जुन्या मालिका तुम्हाला माहीत आहेत का..? भाग :- २

तर मंडळी सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम आणि दर्जेदार अशा मालिकांची ही यादी इथेच संपत नाही तर भेटू परत नवीन नावं आणि नवीन लेख घेऊन. तोपर्यंत तुम्हाला अशा कोणत्या मालिका आठवत असतील ज्यांनी तुमचं बालपण सोनेरी केलं आहे तर नक्की आम्हाला कमेंट करून अशा मालिकांची नावं सांगा.
Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *