HomeMarathiMarathi TV SeriesTV Series

प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या या जुन्या मालिका तुम्हाला माहीत आहेत का..? भाग :- २

प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या या जुन्या मालिका तुम्हाला माहीत आहेत का..?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑक्टोबर 1, 2023 | 3:54 PM

“जुनं ते सोनं” हे आता आपण सगळ्याच बाबतीत म्हणायला लागलोय. म्हणजे जुनी गाणी, जुने चित्रपट, जुने नट नट्या, एखादी जुनी फॅशन, जुन्या गोष्टी सगळं जुनं ते सोनं होतं असं वाटतं आणि ते खरं सुद्धा आहे. हेच जुन्या मालिकांच्या बाबतीत सुद्धा लागु होतं. आताच्या मालिका म्हणजे त्याच त्याच घासून पुसून गुळगुळीत झालेल्या कथा पटकथा, प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातून मग बदला, कट कारस्थानं हेच सगळं हल्लीच्या मालिकांमध्ये बघायला मिळतं. टीआरपी आणि एपिसोड वाढविण्यासाठी या मालिका काय दाखवतील याचा नेम नाही. परंतु पुर्वीच्या मालिकांमध्ये असं नव्हतं. त्या बघताना आपण आपल्या घरातील एखादा प्रसंग बघतोय इतकं एकरूप होऊन प्रेक्षक त्या मालिका बघत असत. त्यामुळे आजही त्या जुन्या दर्जेदार अशा सुंदर मालिका आठवतात. आज आम्ही अशाच काही जुन्या मालिका सांगणार आहोत ज्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आजही युट्यूबवर जाऊन प्रेक्षक या मालिकांचे एपिसोड बघतात. आजही प्रेक्षकांच्या मनात या मालिकांना विशेष स्थान आहे. चला तर मग बघुया अशा कोणकोणत्या मालिका आहेत ज्या मालिकांनी नेहमीच चांगलं काही देण्याचा प्रयत्न केला होता.

Old Femous marathi tv series information and review
१. अग्निहोत्र
२००८ – २०१०. नाटक. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवस्टार प्रवाह
दिग्दर्शकश्रीरंग गोडबोले, सतीश राजवाडे
कलाकारविनय आपटे, मोहन जोशी, मोहन आगाशे, शरद पोंक्षे, सुहास जोशी, विक्रम गोखले, इला भाटे, शुभांगी गोखले, अभिजित चव्हाण, गिरीश ओक, अविनाश नारकर
निर्मातानिखील शेठ
प्रसारण तारीख२००८ – २०२०
सीजन १ २७ नोव्हेंबर २००८ – १४ ऑगस्ट २०१०
सीजन २ २ डिसेंबर २०१९ – ६ मार्च २०२०
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८⭐/ ५

अग्निहोत्र” मालिका माहिती :-

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू झालेलं अग्निहोत्र आजही प्रेक्षकांच्या मनात धगधगत आहे. २००८ साली लागणारी हि मालिका आताही तेवढ्याच उत्कंठेने आणि आवडीने प्रेक्षक युट्यूबवर बघतात.
झी मराठी वाहिनीवरील मालिका लोकप्रिय आणि सर्वाधिक बघितल्या जाणारा असा तो काळ होता. एकापाठोपाठ एक हिट मालिका झी मराठी आणि ई टिव्ही वर येत होत्या अशातच नवीन सुरू झालेल्या स्टार प्रवाह वाहिनीवर अग्निहोत्र ही अनोखा आणि वेगळा विषय असलेली मालिका चालू झाली. नेहमीच्या कौंटुबिक मालिकांपेक्षा ही मालिका वेगळी होती.
नाशिकमध्ये राहणारं एक अग्निहोत्री कुटुंब जे पुर्वापार चालत आलेली अग्निहोत्र कायम तेवत ठेवण्याची परंपरा जपत आहे. या अग्निहोत्रींच्या वाड्यात अनेक रहस्यं दडली आहेत. गणपती बाप्पाचं मंदिर या वाड्यात आहेच पण या व्यतिरिक्त तळघरातील देवघरात असलेल्या गुढ दरवाजामागे आठ गणपतींचं रहस्य दडलं आहे.
कालांतराने नवीन पिढी इतरत्र राहायला गेल्यावर या घराची आणि अग्निहोत्राची जबाबदारी एकटा महादेव म्हणजे शरद पोंक्षे बघत असतो. परंतु या कुटुंबातील नवीन पिढीचा नील म्हणजे सिद्धार्थ चांदेकर याला या सगळ्यात रस असतो. आपल्या वाड्यातील रहस्ये शोधून काढणे आणि पर्यायाने मोठ्या पिढीतील दुरावलेल्या भावंडांना एकत्र आणणे हे त्याचं उद्दीष्ट बनतं. या सगळ्याचा रोमांचकारी प्रवास म्हणजे ही मालिका. या मालिकेत अनेक उप कथानकं आहेत.
विनय आपटे, मोहन जोशी, मोहन आगाशे, शरद पोंक्षे, सुहास जोशी, विक्रम गोखले, इला भाटे, शुभांगी गोखले, अभिजित चव्हाण, गिरीश ओक, अविनाश नारकर अशी तगडी आणि जाणकार, अभिनयात मुरलेली कलाकार मंडळी एकत्र येऊन काम करण्याची ही एकमेव मालिका असेल. ही मालिका आणि यातील कलाकार म्हणजे अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ.
तसेच मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, मृण्मयी गोडबोले, स्पृहा जोशी यांसारखे नवोदित कलाकार सुद्धा या मालिकेने घरांघरांत पोहोचवले. श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेने एक इतिहास रचला आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हाच्या काळात सस्पेन्स थ्रिलर क्राईम हे सगळं या दैनंदिन मालिकेत बघायला मिळत होतं ही खूप मोठी गोष्ट आहे.


२. असंभव
२००१ – २००३. रहस्य, नाटक, परिवार. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवझी मराठी
लेखक चिन्मय मांडलेकर, विवेक अग्निहोत्री
दिग्दर्शकसतीश राजवाडे, संगीत कुलकर्णी
कलाकारआनंद अभ्यंकर, अमिता खोपकर, इला भाटे, चिन्मय मांडलेकर, उमेश कामत, मानसी साळवी, उर्मिला कानिटकर
निर्मातापल्लवी जोशी
प्रसारण तारीख१२ फेब्रुवारी २००७ – २९ ऑगस्ट २००९
एकूण एपिसोड७७४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

असंभव” मालिका माहिती :-

एखाद्या मालिकेचा दुसऱ्या वाहिनीवर दुसऱ्या भाषेतील रिमेक प्रसारित होणं हे आता विशेष वाटत नाही परंतु २००७ साली प्रदर्शित झालेल्या असंभव मालिकेने हा विक्रम केला होता. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली होती की एक नव्हे तल दोन भाषांमध्ये रिमेक बनवण्यात आला होता.
झी मराठी वाहिनीवर रात्री साडेआठ वाजता लागणारी असंभव मालिका लोकं आवर्जून बघत असत. ही एक गुढ, एकामागून एक रहस्य उलगडणारी भयकथा असलेली मालिका होती. सतिश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली होती. तेव्हा भयकथा असलेल्या जास्त मालिका नव्हत्या, त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका नेहमीच्या मालिकांपेक्षा वेगळी वाटत होती.‌
आदिनाथ शास्त्री म्हणजे उमेश कामत आणि सुलेखा म्हणजे निलम शिर्के यांचं एकमेकांवर प्रेम असतं. ते लग्न करून परदेशी स्थायिक होण्याचा विचार करत असतात परंतु अचानक आदिनाथ कोकणात कामासाठी जातो आणि तिकडून येताना शुभ्राशी म्हणजे मानसी साळवी हिच्यासोबत लग्न करून येतो. आणि इथुनच नवनवीन रहस्य समोर येण्याचा खेळ सुरू होतो. पुनर्जन्म या संकल्पनेवर आधारित ही कथा असल्याने बरेच ट्विस्ट आणि टर्न्स या मालिकेत येत राहतात. त्यामुळे पुढे काय होणार ही उत्कंठा प्रत्येक एपिसोड नंतर वाढत जाणारी असे.
आनंद अभ्यंकर, अमिता खोपकर, इला भाटे, चिन्मय मांडलेकर, उमेश कामत, मानसी साळवी, उर्मिला कानिटकर, असे अनेक दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेत होती. या मालिकेचे सर्व भाग तुम्ही झी फाईव्ह या ॲपवर किंवा युट्यूबवर पाहू शकता.


३. प्रपंच
२०९९ – २००२. नाटक, परिवार. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवझी मराठी
लेखक प्रतिमा कुलकर्णी
दिग्दर्शकप्रतिमा कुलकर्णी
कलाकारसंजय मोने, सुहास जोशी, अमिता खोपकर, रसिका जोशी, सोनाली पंडित, भरत जाधव, सुनील बर्वे, भार्गवी चिरमुले, शर्वरी पाटणकर, आनंद इंगळे
प्रसारण तारीख१९९९ – २००२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.७⭐/ ५

प्रपंच” मालिका माहिती :-

१९९० च्या दशकात झी मराठी या वाहिनीने म्हणजे तेव्हाच्या अल्फा मराठीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या वाहिनीवर प्रसारित होणारी प्रत्येक मालिका प्रेक्षक आवडीने बघत असतं. आणि तेव्हाच्या मालिका सुद्धा दर्जेदार असतं, ज्यातून काहीतरी शिकवण, बोध मिळेल अशा असायच्या. अशीच एक कौटुंबिक मालिका म्हणजे “प्रपंच”.
माजी स्वातंत्र्यसैनिक असलेले अण्णा म्हणजे सुधीर जोशी आणि त्यांची पत्नी माई म्हणजे प्रेमा साखरदंडे यांचं हे सुखी आणि साधं सरळ आयुष्य जगणारं एक कुटुंब. त्यांची दोन मुलं आणि सुना , नातवंडे असे सगळे मिळून मिसळून एकत्र कुटुंबात राहून सुद्धा कसलंच भांडण नाही की कटकारस्थान नाही. आणि हेच या मालिकेचं गमक होतं. मालिकेची कथा या संपूर्ण कुटुंबाभोवतीच फिरते.
एका नातीचा घटस्फोट होऊन तीचं परत घरी येणं, समुद्र किनारी वसलेल्या यांच्या आश्रय बंगल्याला पाडून नवीन टोलेजंग इमारतीचा प्रस्ताव येणं आणि प्रत्येकाला स्वतंत्र खोली मिळणार म्हटल्यावर त्यातून निर्माण होणारे मतभेद, ही सगळी उपकथानकं या मालिकेत बघायला मिळतात. विभक्त कुटुंब पद्धतीकडे लोकांचा ओढा वाढत असताना या मालिकेने लोकांना विचार करायला भाग पाडले.
या मालिकेत तसे सगळेच एकापेक्षा एक सरस कलाकार. संजय मोने, सुहास जोशी, अमिता खोपकर, रसिका जोशी, सोनाली पंडित, भरत जाधव, सुनील बर्वे, भार्गवी चिरमुले, शर्वरी पाटणकर, आणि आनंद इंगळे असे बरेच कलाकार या मालिकेत होते. रसिका जोशी हिने खूप लवकर एक्झिट घेतली हे ही मालिका पाहिल्यावर परत तीव्रतेने जाणवते. या मालिकेचे सर्व भाग युट्यूबवर पाहू शकता.


४. अवघाचि संसार
२००६ – २०१०. नाटक, परिवार. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवझी मराठी
लेखक रोहिणी निनावे, विनय आपटे
दिग्दर्शकमंदार देवस्थळी
कलाकारप्रसाद ओक, अमृता सुभाष, कादंबरी कदम, संजय मोने, नेहा जोशी, हेमांगी कवी, सुबोध भावे
निर्माताशशांक सोलंकी
प्रसारण तारीख२२ मे २००६ – २४ एप्रिल २०१०
एकूण एपिसोड११६९
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.४⭐/ ५

अवघाचि संसार” मालिका माहिती :-

       तब्बल चार वर्षे चाललेली आणि हजारांहून अधिक भाग असलेली झी मराठी वाहिनीवरील अजुन एक लोकप्रिय मालिका म्हणजे अवघाचि हा संसार. या मालिकेचं शीर्षक गीत आजही लोकप्रियतेच्या शिखरावर तसंच विराजमान आहे. "मन माझे मोरपिशी स्वप्न जणू…मन माझे शिशिरातील इंद्रधनू…" रोहीणी निनावे यांनी शब्दबद्ध केलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं आणि देवकी पंडित यांच्या आवाजातील हे गाणं आजही लोकांना तेवढंच आवडतं. 
    मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक मालिकेतील नायिका ही स्वतःचं मत मांडणारी , स्वतःच्या तत्वांचा आदर करणारी आणि तसं वागणारी असायची. या मालिकेतील आसावरी सुद्धा अशीच होती. अमृता सुभाष हीने आसावरी हे पात्र सुंदररित्या पडद्यावर साकारलं होतं. आसावरी म्हणून ती ओळखली जाऊ लागली होती. हर्षवर्धन भोसले म्हणजेच प्रसाद ओक याच्या प्रेमात पडलेल्या आसावरीला नवऱ्याचं खरं रूप हे लग्नानंतर कळतं. त्याचे इतर कोणासोबत असलेले विवाहबाह्य संबंध वैगरे या सगळ्यामुळे आसावरीला मानसिक धक्का बसतो तरीही आपल्या मुलीसाठी कशी खंबीरपणे उभी राहते याचीच गोष्ट म्हणजे अवघाचि हा संसार ही मालिका.
५. कळत नकळत
२००७ – २००९. विनोदी, परिवार. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवझी मराठी
लेखक सचिन धारेकर, रोहिणी निनावे
दिग्दर्शकमहेश तगडे
कलाकारसुकन्या कुलकर्णी, सुबोध भावे, अनिकेत विश्वासराव, सुनील बर्वे, ऋतुजा देशमुख, हर्षदा खानविलकर
निर्माताविद्याधर पाठारे
प्रसारण तारीख२४ सेप्टेंबर २००७ – १७ ऑक्टोबर २००९
एकूण एपिसोड६४७
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

कळत नकळत” मालिका माहिती :-

जुन्या गाजलेल्या मालिंकाबद्दल बोलायचं झालं तर झी मराठी नक्कीच अव्वल स्थानावर आहे. एकापाठोपाठ एक अशा सुंदर, दर्जेदार मालिका अल्फा मराठी वर प्रसारित व्हायच्या अर्थात तो काळ वेगळा होता. झी मराठीचा सुवर्णकाळ म्हणता येईल.
२००७ साली प्रसारित होणारी “कळत नकळत” हि मालिका सुद्धा खूप गाजली होती. यातील मधुरा आणि गौरव म्हणजेच ऋतुजा देशपांडे आणि अनिकेत विश्वासराव यांची जोडी लोकप्रिय जोडी झाली होती.
मधुरा ही एक सामान्य कुटुंबातील एक हुशार मुलगी असते जिचं भूषणवर म्हणजे सुबोध भावे वर प्रेम असतं परंतु तिच्या शिस्तप्रिय वडिलांना हे पटणार नसतं आणि म्हणूनच ते तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवतात. परंतु भूषणवर प्रेम करणाऱ्या मधुराला त्याच्याच सोबत लग्न करायचं असतं म्हणून ती घरातून पळून जाते. परंतु स्वार्थी भुषण मात्र तिची साथ देत नाही त्यामुळे तिला तिचा मित्र गौरवकडे जाऊन रहावं लागतं. आणि नंतर गौरवच्या सांगण्यावरून ते त्याच्या आजोबांना दाखवण्यासाठी लग्नाचं नाटक करतात आणि कालांतराने खरंच प्रेमात पडतात.
परंतु पुढे नियतीने मधुराच्या आयुष्यात खूप काही वाढून ठेवलेलं असतं. गौरवचं अपघातात निधन होतं आणि काही काळाने पुन्हा त्याच्याच सारखा दिसणारा रोहीत तिच्या आयुष्यात येतो. अशी प्रेमाची गोष्ट सांगणारी हि मालिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती कारण तो काळ कौटुंबिक मालिकांचा होता.
या मालिकेचं शीर्षक गीत सुद्धा लोकप्रिय होतं आणि अजुनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सुकन्या कुलकर्णी, हर्षदा खानविलकर, प्रिया मराठे, सुनील बर्वे असे अनेक कलाकार या मालिकेत होते.

६. कुलवधू
२००८ – २०१०. नाटक. २२ – २५ मिनिटे. (एक एपिसोड)
चॅनेल नांवझी मराठी
दिग्दर्शकमहेश तगडे
कलाकारसुभोध भावे, पूर्वा गोखले, मिलिंद गुणाजी, आशालता वाबगावकर, सुप्रिया पाठारे, सदाशिव अमरापूरकर, सुलभा देशपांडे, लोकेश गुप्ते
प्रदर्शित तारीख१७ नोव्हेंबर २००८ – १२ जून २०१०
एकूण एपिसोड४९०
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.२⭐/ ५

कुलवधू” मालिका माहिती :-

२००९ साली प्रसारित होणाऱ्या मालिकांपैकी झी मराठी वाहिनीवरील सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार प्राप्त मालिका म्हणजे कुलवधू. आणि खरंच ही मालिका खूप लोकप्रिय सुद्धा होती.
सुबोध भावे, पुर्वा गोखले, सदाशिव अमरापूरकर, मिलिंद गुणाजी, पल्लवी वैद्य, निशिगंधा वाड यांसारखे बरेच कलाकार या मालिकेत काम करत होते. एका गावातील एका शाळेत शिकवणाऱ्या सामान्य मुलीची, देवयानीची ही कथा. दामोदर देशमुख म्हणजे सदाशिव अमरापूरकर यांची ही मुलगी असते. दामोदर देशमुख हे अत्यंत सरळ मार्गाने, सत्याने जगणारे असतात. याच्याच विरूद्ध गावातील प्रतिष्ठित, श्रीमंत घरातील भैय्यासाहेब हे अतिशय स्वार्थी आणि पैशांसाठी वाट्टेल त्या थराला जाणारे.
पण कथानकात असं काही वळण येतं की देवयानी ही भैय्यासाहेब यांचा मुलगा विक्रम सोबत लग्न करण्याचं पक्क ठरवते जेव्हा की विक्रम सुद्धा पैशांचा माज असलेला श्रीमंत बापाचा मुलगा असतो. परंतु पुढे जाऊन देवयानी आपल्या प्रेमाच्या बळावर परिस्थिती बदलते. ही मालिका प्रत्येक घरात पाहीली जायची. या मालिकेचं शीर्षक गीत सुद्धा लोकप्रिय होतं. कित्येकांच्या मोबाईलची रिंगटोन असलेल्या या गीताला वैशाली माडे यांनी गायलं होतं तर निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केले होते.

हे पण वाचा :-

प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या या जुन्या फेमस मराठी मालिका तुम्हाला आठवतात का..? भाग १

तर मंडळी सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम आणि दर्जेदार अशा मालिकांची ही यादी इथेच संपत नाही तर भेटू परत नवीन नावं आणि नवीन लेख घेऊन. तोपर्यंत तुम्हाला अशा कोणत्या मालिका आठवत असतील ज्यांनी तुमचं बालपण सोनेरी केलं आहे तर नक्की आम्हाला कमेंट करून अशा मालिकांची नावं सांगा.
Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *