Saturday, April 25, 2026
Latest:
HomeHindiWeb Series

नागराज मंजुळे यांनी विजय वर्मा वर लावलेला “मटका” लागला की फसला.? जाणून घ्या थेट ६०-७० च्या दशकात घेऊन जाणारी “मटका किंग” वेबसिरीज कशी आहे.?

Matka King Series Review: Did the “Matka King” that Nagraj Manjule placed on Vijay Varma pay off, or did it fail? Find out what the web series “Matka King”—which transports you straight back to the 60s and 70s—is really like.

Written by : आकांक्षा कोलते

Updated : एप्रिल 22, 2026 | 11:02 PM

‘मटका किंग’ वेब सिरीजचा आढावा: नागराज मंजुळे यांनी विजय वर्मावर टाकलेला ‘मटका किंग’चा डाव यशस्वी ठरला, की तो फसला? तुम्हाला थेट ६० आणि ७० च्या दशकात घेऊन जाणाऱ्या *मटका किंग* या वेब सिरीजमध्ये नेमकं काय आहे, हे जाणून घ्या.

मंडळी या विकेंडला काय बघायचं हा तुम्हाला प्रश्न पडण्याआधीच आम्ही उत्तर घेऊन आलोय. नागराज मंजुळे दिग्दर्शित “मटका किंग” ही वेबसिरीज ॲमेझॉन प्राईम वर नुकतीच प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सस्पेन्स थ्रिलर असा कोणताच जॉनर नसलेली, कथानक संथ असलेली अशा संमिश्र प्रतिक्रिया येऊन सुद्धा ट्रेंडींगला पहील्या नंबरवर असलेली ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वरील ही सिरीज नक्की कशी आहे हे थोडक्यात जाणून घेऊया.

Matka King Web Series Review, Star cast, Director, and all information about Matka King Series, Nagraj Manjule and Vijay Verma Series
मटका किंग (Matka King)
२०२६. ड्रामा, क्राईम. ४२–६२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकअभय कोराणे
दिग्दर्शकनागराज मंजुळे
कलाकार विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर, सिद्धार्थ जाधव, साइरस साहूकार, जेमी लीवर
निर्मातासिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुले, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिदवानी, आशीष आर्यन
संगीतअजय जयंती
प्रोडक्शन कंपनीरॉय कपूर फिल्म्स, आतपट प्रोडक्शन, एसएमआर एंटरटेनमेंट
ओटीटी प्लॅटफॉर्मॲमेझॉन प्राईम व्हिडिओ
रिलीज तारीख१७ एप्रिल २०२६
एकूण सीजन
एकूण भाग
देश इंडिया
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५ ⭐/ ५

कथा :- 

सत्यघटनांवर आधारित हे कथानक तुम्हाला थेट १९६० च्या काळातील मुंबई शहरात घेऊन जातं. म्हणजेच त्या काळातील चाळी, गिरणी कामगार, गुन्हेगारी विश्व हे सगळं विश्व नागराज मंजुळे यांनी जसंच्या तसं उभं केलं आहे. असाच ब्रीज भट्टी (विजय वर्मा) हा एका चाळीत भाड्याच्या घरात राहणारा गिरणी कामगार,लालजीभाई (गुलशन ग्रोव्हर) याच्या गिरणीत काम करत असतो. परिस्थितीने पिचलेल्या ब्रीजचा भाऊ लच्चू (भूपेंद्र जडावत) हा जुगाराच्या नादाने वाया गेलेला असतो तर ब्रीजची बायको बरखा भट्टी (सई ताम्हणकर) ही गरोदर असते. अशात घरमालकाने भाड्यासाठी ब्रीजच्या मागे तगादा लावलेला असतो. या सगळ्या परिस्थितीत अडकलेल्या ब्रीजला काय करून पैसे कमवावे हे कळत नसतं. आणि इथुनच खरी गोष्ट सुरु होते.

मटका किंग” सीरिज समीक्षा :-

सुरूवातीला ब्रीज भट्टी लज्जीभाईची गिरणी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करतो पण त्यात तो बुडतो. त्यानंतर मात्र तो असं काही डोकं लावतो की संपूर्ण मुंबईत “मटका किंग” म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतो. खरं तर मटका हा एक जुगार तरीही तो इमानदारीने करणे ही या मटका किंगची खासियत. या मटका जुगारात ब्रीजच्या सोबत असतात ते आधीच्या गिरणीतील कामगार दगडू विचारे( सिद्धार्थ जाधव )आणि एक विधवा पारसी महिला गुलरुख दुबाश (क्रितिका कामरा). हे दोघंही त्याला या मटका जुगाराच्या व्यवसायात मदत करतात. त्यांचा मटका जुगाराचा धंदा इतक्या वेगाने वाढतो आणि मुंबईभर पसरतो की त्यांची उलाढाल कोटींच्या घरात जायला लागते अर्थातच हे काही सगळं लगेच होत नाही. हा प्रवास तुम्हाला सिरीज बघताना समजेलच.
परंतु जुगार तो शेवटी जुगारच. सुरूवातीला या मटक्याच्या धंद्यामुळे ऐशोआरामात मिळालेलं आयुष्य आणि पैसा ब्रीजला चांगलं वाटतं परंतु हाच धंदा त्याच्या आयुष्यातून त्याच्या खऱ्या माणसांना दूर करतो. त्याची बायको सुद्धा त्याचा तिरस्कार करू लागते. या मटका जुगारच्या व्यवसायात जणू त्याने स्वतःच्या आयुष्याची बोली लावलेली असते. हे सगळं सुरू असताना हा मटका जुगाराचा धंदा आणि मटका किंगचं मुंबईत पसरलेल्या विश्वाचा पर्दाफाश करू पाहणाऱ्या एका शोधपत्रकाराची गोष्ट सुद्धा कथानकात एकीकडे समांतर सुरू राहते. आता तो पत्रकार हे सगळं उघडकीस आणतो का.? मटका किंग ब्रीज भट्टी चं पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ही संपूर्ण सिरीज तुम्हाला बघावी लागेल.

कसा आहे कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन .?
या सिरीजच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी डिजिटल क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. त्यांनी याआधी दिग्दर्शित केलेल्या फॅंड्री, सैराट या चित्रपटांप्रमाणेच या वेबसिरीजमध्ये सुद्धा नैसर्गिक अभिनय आणि इतर वास्तववादी चित्रणांवर जोर दिलेला आहे. विशेष म्हणजे या सिरीज मध्ये मराठी कलाकारांची जास्त वर्णी लागली आहे. आणि त्या सगळ्यांनीच कमाल अभिनय केला आहे. पण भरत जाधव आणि गिरीश कुलकर्णी यांसारख्या कलाकारांना मिळालेलं पात्रं हे अन्यायकारक वाटलं. तरीही कमी वेळासाठी हे दोघंही आपली छाप सोडून जातात. सई ताम्हणकरचा अभिनय देखील चांगला आहे परंतु काही ठिकाणी ती उगाचच गोंधळलेली वाटते. गुलशन ग्रोवरचा लालजीभाई ठिकठाक आहे. म्हणजे नेहमीचाच गुलशन ग्रोवर इथेही दिसतो. सगळ्यात जास्त या सिरीजचा भार कोणी उचलला असेल तर तो आहे विजय वर्मा. मुळात नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन आणि विजय वर्मा चा अभिनय हिच एक मेजवानी आहे. काही सीन्स मध्ये तो सुद्धा थकल्यासारखा वाटतो परंतु ही मध्यवर्ती भूमिका त्याने उत्तम साकारली आहे. आणि अगदी शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहतो तो म्हणजे सिद्धार्थ जाधवने साकारलेला दगडू. सिद्धार्थने मिळालेल्या भुमिकेचं सोनं केलं आहे.
आता दिग्दर्शन म्हणाल तर प्रामाणिकपणे सांगायचं तर नागराज मंजुळे यापेक्षा सुंदर रिझल्ट देऊ शकले असते. परंतु सगळी गोम आहे ती कथानकात. सिरीज उत्तम आहे, कलाकारांचा अभिनय उत्तम आहे परंतु एकुण आठ भागांची ही मालिका ज्या वेगाने पुढे सरकते तो वेग अतिशय संथ आहे. गाणी नसती तरी चाललं असतं असं वाटतं.
आठ ऐवजी सहा भागांची मालिका जास्त प्रभावी झाली असती हे नक्की. बरं या सिरीज मध्ये सस्पेन्स थ्रिलर किंवा ट्विस्ट, क्लायमॅक्स असं काही नाही त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांना ही सिरीज आवडेल असं नाही. परंतु एकदा बघायला हरकत नाही अशी ही सिरीज आहे.
या सिरीजची जमेची बाजू म्हणजे, कलाकारांचा अभिनय आणि कलादिग्दर्शन. १९६०-७० चा तो काळ, तेव्हाची मुंबई, चाळी, गिरण्या, रेसकोर्सवरचा सीन, तेव्हाचा आणीबाणी लागू झाली तो प्रसंग हे सगळं हुबेहूब अगदी त्याच काळातील आहे असं पडद्यावर दिसतं. निदान त्यासाठी तरी ही सिरीज बघायलाच हवी.

खरा मटका किंग कोण.?
मुळात ही सिरीज सत्य घटनांवर आधारित असल्यामुळे ती जास्त रोमांचक वाटते. मुंबईतील साठ सत्तरचं दशक गाजवलेला सट्टेबाजी सारखा व्यवसाय इमानदारीने करणाऱ्या मटका किंग “रतन खत्री” याच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिरीज मध्ये त्याचं वैयक्तिक आयुष्य ते त्याने उभं केलेलं मटका जुगाराचं‌ साम्राज्य हे सगळं बघायला मिळतं. त्याशिवाय यात तत्कालीन काळातील क्रिकेट, राजकारण, मनोरंजन, गिरणी कामगारांच आयुष्य आणि महत्त्वाचं म्हणजे अंडरवर्ल्डची दुनिया हे सगळं दाखवलं आहे. पोलिसांना हवा असलेला गुन्हेगार रतन खत्री सर्वसामान्य जनतेसाठी, गिरणी कामगारांसाठी मात्र देवमाणूस होता. आता ते का.? या प्रश्नाचं उत्तर देखील या सिरीज मध्ये मिळेल. तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहतील ज्यांची उत्तरं पुढच्या सिझन मध्ये मिळतील.
तर अगदी थोडक्यात सांगायचं तर सिरीचं कथानक, पटकथा संथ आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यासाठी कमी पडते. परंतु काही ठिकाणी स्कीप किंवा पुढे ढकलून तुम्ही कलाकारांचा अभिनय आणि १९६०-७० चा काळ पुन्हा पडद्यावर बघण्यासाठी एकदा ही सिरीज नक्कीच बघू शकता. माझ्याकडून या सिरीजला अडीच स्टार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *