जुलै 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा
List of Marathi Movies released in July 2025 and their reviews
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 24, 2025 | 04:57 PM
जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण जुलै २०२५मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

| १. गाडी नंबर १७६० (Gaadi Number 1760) |
| लेखक | योगीराज संजय गायकवाड |
| दिग्दर्शक | योगीराज संजय गायकवाड |
| कलाकार | सुहास जोशी,शशांक शेंडे, प्रथमेश परब, प्रियदर्शनी इंदलकर,कृष्ण बिष्ट,प्रसाद खांडेकर |
| निर्माता | कैलास सोरारी, विनिता सोरारी |
| रिलीज तारीख | ६ जुलै २०२५ |
| भाषा | मराठी |
“१. गाडी नंबर १७६०” चित्रपट समीक्षा :-
योगीराज गायकवाड लिखित आणि दिग्दर्शित गाडी नंबर १७६० हा विनोदी चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. खरं तर जुलै महिन्यात मोजून ३ चित्रपट प्रदर्शित झाले, तरीही या चित्रपटाबद्दल फारसं बोललं गेलं नाही किंवा चर्चा झाली नाही. सुहास जोशी, प्रथमेश परब, प्रियदर्शनी इंदलकर, प्रसाद खांडेकर हे कलाकार आहेत म्हटल्यावर विनोद असणारच परंतु हा चित्रपट म्हणावा तसा मनोरंजन करत नाही याचं कारण चित्रपटाची कथा आणि पटकथा. वर्षानुवर्षे तीच तीच कथा आणि तेच विषय, तीच पैशांची बॅग मग तिची अदलाबदल वगैरे करून विनोदनिर्मिती करत चित्रपट बनवले जातात, या चित्रपटात देखील तेच आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच एका पाच कोटी रक्कम असलेल्या बॅगभोवती फिरणारी आहे. विधानसभा निवडणूकीत उमेदवार असलेल्या जयकांत म्हात्रे (शशांक शेंडे)याल पक्षाकडून पाच करोड मिळणार असतात आणि ती बॅग अर्थातच लपून छपून त्यांच्यापर्यंत पोहचवली जाणार असते. ती जबाबदारी त्याचा उजवा हात भास्कर (शुभंकर तावडे) याच्याकडे असते. परंतु १७६० नंबरप्लेट असलेल्या ज्या गाडीत ती बॅग ठेवणं अपेक्षित असतं त्याऐवजी ती बॅग दुसऱ्याच गाडीत ठेवली जाते. आणि इथूनच खरा गोंधळ सुरू होतो. ती बॅग एका सोसायटीत जोशी आजीच्या घरी (सुहास जोशी)पोहचते. त्या सोसायटीत अभि (प्रथमेश परब) आणि प्रसाद खांडेकर हे वॉचमन म्हणून काम करत असतात. या सगळ्या बॅगच्या गोंधळात आता सगळेच गुंतलेले असतात. चिनू (प्रियदर्शिनी इंदलकर)ही अभिची प्रेयसी जिला स्वतःचं पार्लर सुरू करायचं आहे ती सुद्धा यात अडकते. बॅग लपवण्याचा सगळेच प्रयत्न करतात तर दुसरीकडे भास्कर वेड्यासारखा बॅग शोधत असतो. आता ती बॅग भास्करला सापडते का.? ती कुठे जाते.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा अतिशय जुनी आणि अजिबातच नाविन्य नसलेली आहे. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. कलाकार चांगले आहेत म्हणून एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
| २. ये रे ये रे पैसा ३ (Yere Yere Paisa 3) |
| लेखक | सुजय जाधव |
| दिग्दर्शक | संजय जाधव |
| कलाकार | संजय नार्वेकर,सिद्धार्थ जाधव,उमेश कामत,तेजस्विनी पंडित,आनंद इंगळे,नागेश भोसले |
| निर्माता | अमेय खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोळटे, ओंकार माने |
| रिलीज तारीख | १७ जुलै २०२५ |
| भाषा | मराठी |
“ये रे ये रे पैसा ३ ” चित्रपट समीक्षा :-
१७ जुलै रोजी प्रदर्शित झालेला ये रे ये रे पैसा ३ हा चित्रपट पुन्हा एकदा संजय जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. याआधीचा “ये रे ये रे पैसा २” हा हेमंत ढोमे याने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सुद्धा आधीचेच कलाकार एकत्र आले आहेत त्यामुळे आधीचे दोन चित्रपट ज्यांना आवडले होते त्यांना हा चित्रपट बघायला मजा येईल.
खरं तर चित्रपटाची कथा पटकथा परत एकदा गाडी नंबर १७६० या चित्रपटा सारखीच आहे. फक्त इथे पाच कोटी किंमत असलेली सोन्याची बिस्किटे आहेत जी याच्याकडून त्याच्याकडे करत भलतीकडेच जातात, मग प्रत्येक जण ती मिळवण्यासाठी धावत राहतो.
चित्रपटाची कथा मुख्यतः आदित्य(उमेश कामत), बबली(तेजस्विनी पंडित),सनी(सिद्धार्थ जाधव) या तिघांभोवती फिरते. कथा अशी आहे की विजय आनंद हा एक डॉन असतो आणि त्याची पाच कोटी किंमतीची सोन्याची बिस्किटे तो दुसऱ्याकडे पोहचवण्यासाठी मोना(मीरा जगन्नाथ) हिच्याकडे देतो. पण ती चुकून जग्गू म्हणजे संजय नार्वेकर याच्याकडे देते. असं करत करत ती याच्याकडून त्याच्याकडे जात जात गायब होतात. शेवटी ती कोणाला सापडतात हे बघण्यासाठी खरं तर चित्रपट बघावा लागेल.
परंतु जर तुम्हाला डोकं, मेंदू, लॉजिक बाजूला ठेवून चित्रपट बघायला आवडत असतील तरच हा चित्रपट बघावा. कारण या चित्रपटाच्या सुरुवातीलाच तशी सुचना दिलेली आहे. त्यात पटकथा इतक्या वेगाने पुढे सरकते की आधीच्या सीनमध्ये काय झालं होतं हे सुद्धा आठवत नाही. इतका गोंधळ आहे की कोणाचं काय चाललंय हेच समजून घेईपर्यंत चित्रपट बराच पुढे निघून जातो. संजय जाधव यांचं दिग्दर्शन या चित्रपटात तरी म्हणावं इतकं खास जाणवत नाही. एकतर कथा इतकी कॉमन आहे की तीच तीच विनोदनिर्मिती करत हसवणं हा एक मोठा टास्क म्हणावा लागेल. कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. एकंदरीत निव्वळ टाइमपास करायचा असेल तर बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
| ३. धाप (Dhaap) |
| लेखक | योगेश गाडगे |
| दिग्दर्शक | योगेश गाडगे |
| कलाकार | योगेश गाडगे, किरण शेजाळ,केतन पवार, माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले |
| निर्माता | योगेश गाडगे |
| रिलीज तारीख | २५ जुलै २०२५ |
| भाषा | मराठी |
“धाप” चित्रपट समीक्षा :-
२५ जुलै रोजी प्रदर्शित झालेला धाप हा चित्रपट एक सामाजिक तसेच भावनिक संदेश देणारा आहे. खरं तर या चित्रपटाचा अख्खा डोलारा एकट्या तरूणाने उचलला आहे यासाठी तरी नक्कीच कौतुक. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या योगेश गाडगे या तरुणाने या चित्रपटाची कथा पटकथा अशा प्रकारे लिहीली आहे की ग्रामीण भागातील जीवनशैली आणि तिथल्या समस्या हा कथेचा भाग आहेत. तसेच या चित्रपटात सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र आपण कसे विसरत चाललो आहोत याची जाणीव करून देण्यात आली आहे. विकलांग व्यक्ती, दिव्यांग असलेल्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो याचं वास्तववादी चित्रण यात आहे.
चित्रपटाची कथा विट्या नावाच्या एका मुकबधीर तरुणाभोवती फिरते. त्याच्यावर नितांत प्रेम करणारी गावातील एक मैत्रीण, त्याचा जीवाला जीव देणारा मित्र केत्या हे त्याचं जग असतं. पण एक एक करून त्याच्या आयुष्यातून सगळे निघून जातात. नियतीने त्याच्यासमोर काहीतरी वेगळंच वाढून ठेवलेलं असतं. हाल, लोकांकडून मिळणारी उपेक्षा, एकटेपण या सगळ्याने सैरभैर झालेला विट्या शहरात पोहचतो आणि बराच संघर्ष केल्यानंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. अगदी तो त्यांच्यासारख्या असंख्य लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत काम करायला सुरुवात करतो. तो नक्की काय करतो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
खरं तर चित्रपटाची कथा,विषय चांगला आहे. प्रयत्न म्हणून दिग्दर्शन आणि कथालेखन नक्कीच चांगलं आहे. परंतु एक चित्रपट म्हणून तांत्रिकदृष्ट्या अजून सक्षम असायला हवा होता. योगेश गाडगे याने स्वतः मुख्य पात्र साकारलं असून अभिनय उत्तम केला आहे. परंतु इतर नवीन सहकलाकार जरा कमी पडले. प्रमोशन कमी झाल्याने किंवा फार सेलिब्रिटींची मांदियाळी नसल्याने चित्रपट फारसा चालला नाही. परंतु एका गावच्या तरूणाने केलेला प्रयत्न म्हणून ओटीटी वर आल्यावर एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

